हमारी मुठ्ठी में आकाश सारा... 

मंगळवार, 2 जानेवारी 2018

नव्या ग्रेगरीअन वर्षाचा सूर्योदय पूर्वेकडून पश्‍चिमेकडे सरकत जातो. अथांग प्रशांत महासागराच्या मध्यभागी प्रवाळ बेटांनी मिळून बनलेल्या किरीबाटी नावाच्या चिमुकल्या देशात पहिला सूर्योदय होतो, असं जग मानतं. कीर्तिमाती किंवा ख्रिश्‍चन आयलंडवर नव्या वर्षातला पहिला जन्म नोंदल्याची मान्यता आहे.

मावळत्या वर्षातल्या कडू-गोड आठवणी पाठीवर टाकून रविवारी जगानं एकविसाव्या शतकातल्या अठराव्या संवत्सराचं जल्लोषात स्वागत केलं. ऑकलंड, सिडनी, हॉंगकॉंग, सिंगापूर, मुंबई, बगदाद अशा क्रमानं पूर्वेकडून पश्‍चिमेकडं उत्साह, आतषबाजी, रोमांच प्रवाहित होत गेला.

नव्या आशांना धुमारे फुटले, नवे संकल्प सोडले गेले. नवं वर्ष म्हणजे नवं काहीतरी असावंच ना, थोडं रोमांचकारी! यंदाची एक जानेवारी असाच हर्षभरित करणारा मुद्दा घेऊन आलीय. चक्‍क बाविसावं शतक पाहू शकणाऱ्या दीर्घायू बाळांनी अनेक देशांमध्ये वर्षाच्या पहिल्या दिवशी पृथ्वीतलावर चिमुकलं पाऊल ठेवलंय. "हमारी मुठ्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा सितारा', म्हणत सातशे साठ कोटींच्या जगात दाखल झालेल्यांच्या कोवळ्या मुठींमध्ये पुढच्या विस्मयकारी शतकाची स्वप्नंही सामावलीत. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथल्या "वर्ल्ड डाटा लॅब'च्या मदतीनं "युनिसेफ'नं हा अंदाज बांधलाय. 

एकविसाव्या शतकाचा पूर्वार्धच अजून अर्ध्या टप्प्यावरही पोचलेला नसताना बाविसाव्या शतकाची स्वप्नं पाहणं हे आहे खरं चित्तथरारक. मानवी जीवन अधिक सुखकर बनल्याचं, सर्वसामान्यांच्या जगण्यानं बाळसं धरल्याचंही हे लक्षण आहे. विशेषत: लहान मुलांचं पोषण, आरोग्य, संगोपन, वैद्यकीय सुविधा यांबाबत जगानं गेल्या काही दशकांमध्ये खरंच प्रगती केलीय. 2017 मध्ये ही प्रगती नेमकी कुठं पोचली ते कळेल यथावकाश; तथापि, या गोंडस प्रगतीच्या गालावर एक काळा तीटदेखील आहे. 2016 मध्ये जगात तब्बल 56 लाख बालकं त्यांचा पाचवा वाढदिवस साजरा करू शकली नव्हती. त्यातल्या 46 टक्‍के अर्भकांचं अस्तित्व एका महिन्याचंही नव्हतं. जगाच्या कानाकोपऱ्यांत रक्‍तरंजित संघर्ष अन्‌ विस्थापनामुळं लाखो मुलं संकटात आहेत. रक्‍ताळलेल्या चेहऱ्यांचं शैशव संवेदनशील माणसाला व्यथित बनवतं. अशावेळी ही सुखाचा शिडकावा करणारी, बाविसाव्या शतकापर्यंत जगू शकणाऱ्या माणसांची बातमी आलीय. 

नव्या ग्रेगरीअन वर्षाचा सूर्योदय पूर्वेकडून पश्‍चिमेकडे सरकत जातो. अथांग प्रशांत महासागराच्या मध्यभागी प्रवाळ बेटांनी मिळून बनलेल्या किरीबाटी नावाच्या चिमुकल्या देशात पहिला सूर्योदय होतो, असं जग मानतं. कीर्तिमाती किंवा ख्रिश्‍चन आयलंडवर नव्या वर्षातला पहिला जन्म नोंदल्याची मान्यता आहे. एक जानेवारीला जगभरात जन्मलेल्या अंदाजे चार लाख (नेमकेपणानं तीन लाख 85 हजार 793) बालकांपैकी ते पहिलं असेल. शेवटचं मूल पश्‍चिम टोकावरच्या अमेरिकेत जन्माला आलेलं असेल. 

देशोदेशीच्या जन्मदरावरून "युनिसेफ' प्रत्येक देशात रोज जन्मणाऱ्या बालकांची, त्यातल्या मुलांची व मुलींची संख्याही मांडते. जवळपास चार लाखांपैकी निम्मी मुलं भारत, चीन, नायजेरिया, पाकिस्तान, इंडोनेशिया, अमेरिका, कांगो, इथिओपिया व बांगलादेश या नऊ देशांमध्ये जन्मतात. चीनसारखा जन्मदर कमी करण्यात अजूनही भारताला पुरेसं यश आलेलं नसल्यानं रोज चीन व नायजेरिया मिळून एकूण जन्मापेक्षा भारतात अधिक म्हणजे जवळपास सत्तर हजार मुलं जन्म घेतात. नव्या वर्षाचा पहिल्या सूर्योदयाचा साक्षीदार होणाऱ्या नवजात बालकांमध्ये न्यूझीलंडची संख्या असेल अवघी 170, म्हणजे 0.044 इतकी. नायजेरियातली लोकसंख्या जगात सर्वाधिक वेगानं वाढतेय अन्‌ तिथलं आयुर्मान मात्र अवघं 55 वर्षे. भारतात सरासरी आयुर्मान मात्र जवळजवळ 69 वर्षे असं खूप कमी आहे. त्याबाबत भारताचा जगात 165 वा क्रमांक लागतो. अगदी नव्वदीच्या टप्प्यावर पोचलेला मोनॅको, तसेच जपान, सिंगापूर, मकाऊ, सॅन मरिनो हे याबाबत पहिल्या पाच क्रमांकांवर आहेत. अर्थात, गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये तिथं जन्मलेली अनेक बालकं सहजपणे बाविसावं शतक पाहू शकतील. 

इंदूरच्या चौकांमधला मूनवॉक... 
असं म्हणतात ना, "प्रसिद्ध माणसं वेगळं असं काहीच करीत नाहीत, ते जे काही करतात ते वेगळ्या पद्धतीनं करतात'. मध्य प्रदेशातल्या इंदूरच्या वाहतूक शाखेतला पोलिस शिपाई रणजित सिंग याचंच उदाहरण घ्या ना. होळकरांच्या राजधानीत "सिंघम भय्या' म्हणून बालगोपालांमध्ये प्रसिद्ध असलेल्या रणजितवर "बीबीसी' अन्‌ "अल- जझीरा' यांसारख्या वाहिन्यांनी कालपरवा विशेष वृत्तांत चालवला. "अल जझीरा'चा व्हिडिओ अवघ्या तीन तासांत एक लाख चाळीस हजार जणांनी पाहिला. रणजितला मुळात नृत्याचं वेड; पण पदरात नोकरी पडली रुक्ष अशा पोलिस खात्यातली. वाहतूक शाखेत बदली झाल्यानंतर तिथंही त्यानं नृत्याचा छंद जोपासला. मायकल जॅक्‍सनच्या प्रसिद्ध "मूनवॉक' नृत्याद्वारे वाहतुकीचं नियंत्रण करणारा 38 वर्षांचा रणजित सिंग चौकात दिसला, की त्याचं पदलालित्य पाहात लोक सिग्नल तोडायचं विसरतात. अपघात वाचतात. बॉलिवूडचे कलाकार किंवा अन्य नामवंत इंदूरला गेले की आवर्जून रणजितला भेटतात. त्याचं कौतुक करतात. रणजित शाळा-शाळांमध्ये जातो, विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या शिस्तीचे धडेही देतो. टळलेले अपघात, वाचलेले जीव अन्‌ लहानग्यांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहणारा कुतूहलमिश्रित आनंद या सगळ्यानं दिवसभर नाचनाचून रणजितला आलेला थकवा कुठल्या कुठे गायब होत असावा!

Web Title: Shrimant Mane writes about new year celebration and technology