हसतील त्यांचे दात दिसतील! 

बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

मुळात सारं काही राजकीय आहे. रामनामाचा जप करणाऱ्या भाजपनं रेणुका चौधरींची तुलना शूर्पणखेशी केली. कॉंग्रेसनं मात्र महाभारतातल्या द्रौपदीचा आधार घेतला. द्रौपदीच्या जागी रेणुका चौधरी, कृष्णाच्या भूमिकेत राहुल गांधी अन्‌ दरबारात हास्यविनोद करणारे मोदी, शहा, रिजिजू यांच्या प्रतिमा, सिंहासनावर धृतराष्ट्राच्या जागी लालकृष्ण अडवानी दाखविणारे फलक अलाहाबादेत झळकले.

रेणुका चौधरी यांचं राज्यसभेतलं हसणं अन्‌ त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावलेला टोला, यामुळं स्त्रियांच्या सामाजिक मर्यादांवर चर्चा सुरू आहे. राजकीय आघाडीवर भाजप रामायणातली शूर्पणखा, तर कॉंग्रेस महाभारतातल्या द्रौपदीच्या रूपात रेणुका चौधरींना रंगवू पाहातेय. 

परवा राज्यसभेतल्या पौराणिक टीकाटिप्पणी नाट्यात एक लक्षात आलं काय? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेणुका चौधरी यांच्या हसण्याला "रामायणा'तल्या विकट हास्याची उपमा दिली अन्‌ मोदींच्या अवतीभोवतीचे मंत्री, सत्ताधारी खासदारांमध्ये चेकाळल्यासारखा हास्यस्फोट झाला. तेव्हाही चौथ्या रांगेतल्या उमा भारती अन्‌ तिसऱ्या रांगेत डाव्या कोपऱ्यावरच्या निर्मला सीतारामन मोठ्यानं हसू शकल्या नाहीत. उमा भारतींनी तरी अचंबित होऊन झटकन तोंडावर हात नेत हास्याची उकळी दाबली. निर्मला सीतारामन मात्र निर्विकार राहिल्या. स्त्रियांनी कुठं अन्‌ किती हसावं, या संदर्भातले भारतीय समाजमान्य संकेत म्हणून दोघींच्या प्रतिक्रियांकडे पाहावं लागेल. 

निमित्त होतं, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तराचं. आधार कार्डाची संकल्पना 1998 मध्ये लालकृष्ण अडवानी यांनीच पहिल्यांदा पुढे आणली होती, असं पंतप्रधानांनी सांगताच रेणुका चौधरी सातमजली हसू लागल्या. बाकावरचा ध्वनिक्षेपक चालू नसतानाही ते ऐकू आलं. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू संतापले. तेव्हा ""रामायण सीरिअल के बाद ऐसी हंसी सुनने का सौभाग्य आज मिला है'', अशी टिप्पणी मोदींनी केली अन्‌ जणू सत्ताधारी बाकांवर आनंदाचा कडेलोट झाला. रामानंद सागर यांच्या "रामायण' मालिकेतल्या पात्राचं, त्राटकेचं किंवा शूर्पणखेचं नाव मोदींनी घेतलं नव्हतं. ते काम गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी केलं व हक्‍कभंग ओढवून घेतला. रावणाची बहीण शूर्पणखेच्या विकट हास्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांनी टाकला. नंतर तो काढून घेतला. त्यावर शूर्पणखेची भूमिका साकारणाऱ्या रेणू खानोलकर यांनी नाराजी व्यक्‍त केली. 

मुळात सारं काही राजकीय आहे. रामनामाचा जप करणाऱ्या भाजपनं रेणुका चौधरींची तुलना शूर्पणखेशी केली. कॉंग्रेसनं मात्र महाभारतातल्या द्रौपदीचा आधार घेतला. द्रौपदीच्या जागी रेणुका चौधरी, कृष्णाच्या भूमिकेत राहुल गांधी अन्‌ दरबारात हास्यविनोद करणारे मोदी, शहा, रिजिजू यांच्या प्रतिमा, सिंहासनावर धृतराष्ट्राच्या जागी लालकृष्ण अडवानी दाखविणारे फलक अलाहाबादेत झळकले. सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरून देवदत्त पटनायकांच्या अलीकडच्या "द लाफ्टर ऑफ वुमन' लेखाची आठवण झाली. राज्यसभेतल्या प्रसंगानंतर मृणाल पांडे यांनीही एका लेखात पुरुषसत्ताक संकेतांचा आढावा घेतलाय. 

स्त्रियांनी आपल्याकडं पाहून हसणं, परपुरुषाच्या विनोदाला मोठ्यानं हसून दाद देणं वगैरे गोष्टींनी भारतीय पुरुषांचा अहंकार दुखावतो. मुळात मोठ्यानं हसणं हे आपल्याकडे असंस्कृतपणाचं लक्षण मानलं जातं. "उगीच फिदीफिदी हसू नको', "दात काढू नको', "बाईनं बाईसारखं वागावं', अशा सूचना मुलींना लहानपणापासूनच मिळत असतात. या संस्कारांना पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ आहेत. "नवनाथ कथासार' ग्रंथात सिंहली द्वीपावरची मंदाकिनी आकाशात विहरणाऱ्या देवाच्या शरीराकडे पाहून हसते, तेव्हा तिला उर्वरित आयुष्य स्त्रीराज्यात राहण्याचा शाप मिळतो. जेणेकरून तिला कधी पुरुषाचे दर्शन घडणार नाही. त्या राज्यात मच्छिंद्रनाथ जातात. तिकडेच रमतात, तेव्हा "चलो मछिंदर गोरख आया', म्हणत गोरक्षनाथ त्यांना परत आणतात. देवीपुराणात महिषासुराचे मर्दन करण्यासाठी दुर्गादेवी रणांगणात विकट हास्य करून असुराला ललकारते, त्याचं शिर धडापासून वेगळं करते. महाभारतातलं द्रौपदीचं उदाहरण ठळक आहे. पांडवांनी बांधलेल्या मयसभेत दुर्योधन जमीन समजून पाय ठेवतो अन्‌ पाण्यात पडतो. तेव्हा द्रौपदी हसते. "आंधळ्याचा मुलगाही आंधळा', असं हिणवते. इरावती कर्वे यांनी ही दंतकथा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचे सार एकच, स्त्रियांनी मर्यादेत राहावं, उघड, मोठ्यानं हसू नये. 

पुराणातल्या या सगळ्या व्यक्‍तिरेखा भारतीय जनमानसावर ठसल्या त्या थोर चित्रकार राजा रविवर्मा यांच्या कलाकृतींमुळं. लक्ष्मी, पार्वती, सरस्वती, सीता इथपासून ते गेला बाजार शूर्पणखेपर्यंत आपल्या नजरेपुढे पौराणिक स्त्रियांची जी प्रतिमा उभी राहते, ती मुख्यत्वे रविवर्मा यांच्या चित्रांमधली आहे. मराठी साहित्य रसिक पुढच्या आठवड्यात मराठी साहित्य संमेलनासाठी महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या राजधानीत, बडोद्याला जातील. रविवर्मा यांच्या काही अजरामर कलाकृती तिथल्या लक्ष्मीविलास पॅलेसच्या संग्रहालयात आहेत. 

रेणुका चौधरी मुळात बोल्ड म्हणूनच परिचित आहेत. त्या हवाई दल अधिकाऱ्याच्या कन्या. एअर कमांडर के. सूर्यनारायण राव यांना थोरल्या रेणुकांसह तीन कन्या. रेणुका व श्रीधर चौधरी यांनाही दोन मुलीच. परिणामी, घरात मुलींना मुलांसारखं वाढविण्यात आलेलं. एन. टी. रामाराव यांनी कदाचित त्यामुळंच रेणुका चौधरी या तेलुगू देसम पक्षातल्या एकमेव मर्द असल्याचं म्हटलं असावं. लोकसभा किंवा राज्यसभेच्या खासदार किंवा केंद्रात मंत्री असतानाही रेणुका चौधरी बिनधास्त राहिल्या. ट्रॅक्‍टर चालवतानाचं त्यांचं छायाचित्र अनेकांना आठवत असेल. थोडक्‍यात काय, तर मोदींची टिप्पणी रेणुका चौधरी यांना समजेल अशीच बोल्ड होती. स्त्रीवादी मंडळी मात्र रेणुका चौधरींच्या मोठ्यानं हसण्याच्या हक्‍काच्या बाजूने उभी आहेत. "एलएलआरसी' म्हणजे "लाफ लाइक रेणुका चौधरी' हॅशटॅग ट्रेंड झाला. ग्रीक, भारतीय संस्कृतीचे दाखले दिले जाताहेत. थोडक्‍यात, दीडेक वर्षावर आलेल्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेलेय.

Web Title: Shrimant Mane writes about Renuka Choudhary laugh