विचारांचा महोत्सव

डॉ.सुगाता मित्रा
डॉ.सुगाता मित्रा

गोव्याच्या कला आणि संस्कृती संचालनालयाचा वैचारिक खाद्य देणारा डी.डी. कोसंबी विचारमहोत्सव दरवर्षी होत असतो. व्याख्यानमालेचा दशकपूर्ती महोत्सव कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात नुकताच झाला.

दरवर्षी देश विदेशातील नामवंत विचारवंत आपले विचार येथे प्रगट करतात. त्यांचे विचार, अनुभव ऐकायला मिळतात. यावर्षी राष्ट्रीय भौगालिक अन्वेषक तथा वन्य जीव छायाचित्रकार संदेश कडूर, टाटा मूलभूत संशोधन केंद्राच्या जैविक विज्ञान विभागाच्या प्राध्यापक डॉ.शुभा तोळे, न्यू कासल विद्यापीठाचे शैक्षणिक विभागाचे प्राध्यापक डॉ.सुगाता मित्रा, आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य तथा लंडनच्या वेलकम ट्रस्टच्या आरोग्य विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम पटेल आणि बी.ओ.पी. हब तथा जागतिक स्वच्छतागृह संघटनेचे संस्थापक जेक सीम यांचा समावेश होता. ही विचार व्याख्यानमाला नावाप्रमाणे खरंच विचार प्रवर्तक होती. यंदा या व्याख्यानमालेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले होते. 

दर दिवशी 200 ते 300 तरुण मुले या व्याख्यानमालेत उपस्थित असत. पहिल्या दिवशी राष्ट्रीय भौगालिक अन्वेषक तथा वन्य जीव छायाचित्रकार संदेश कडूर यांनी पाण्यासाठी तिसरे महायुध्द होऊ शकते आणि याला पूर्णतः मानव जबाबदार असेल असं सांगितलं. माणसानं स्वतःच्या फायद्यासाठी निसर्गाचा  समतोल बिघडवला आहे. त्यासाठी वेळीच माणसांनी सावरलं पाहिजे. त्यासाठी जलसंवर्धन अतिशय महत्त्वाचं आहे. हे सांगत असतानाच त्यांनी निसर्ग जतनाचा मंत्र दिला. डोंगर, जंगलं हे जलाशयाचे मूलस्रोत आहेत. पशु-पक्ष्यांच्या मुक्त विहाराची जागा  आहे. आपली संस्कृती ही निसर्गाशी जोडलेली आहे. आमचे सर्व सण, व्रते ही निसर्गाशी निगडित आहेत. त्या सण आणि व्रतांच्या माध्यमातून हजारो वर्षापासून आम्हाला पर्यावरण जतन हा एकच संदेश दिला जात आहे. त्यामुळे आम्हाला त्या काळाचे ऋषीमुनी किती दूरदृष्टीचे होते हे दिसून येते. पण आजचा प्रगत मानव प्रगतीच्या नावाखाली निसर्गाची वाट लावायला लागला आहे.

आजच्या पिढीत निसर्गाविषयी प्रेम, आदर, संयम निर्माण केला, तर ही पिढी निसर्गाची निगा, काळजी घेतील व त्यावर प्रेम करतील. पश्‍चिम घाटातील जैविक संपती पाश्‍चिमात्यांना भारतात येण्याची भुरळ पाडणारी आहे, हे सांगतानाच नद्यांवर धरणे बांधून पाणी अडविण्याचे, नद्यांच्या प्रवाहात बदल करण्याचे प्रकार जैव विविधतेसाठी घातक असल्याचा इशारा त्यांनी दिला. सध्या बेमुसार वाढलेला प्लास्टिकचा वापर थाबवायला पाहिजे, नाहीतर एक दिवस हे प्लास्टिकच माणसाचा जीव घेईल, असा संदेश त्यांनी दिला. जाताजाता ते म्हणाले, आपल्या घरातूनच निसर्ग संवर्धनाची सुरवात झाली पाहिजे. जबाबदारी आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तसेच शिक्षणाबरोबरच पर्यावरणविषयक कायदेही आवश्‍यक आहेत. जो कोणी निसर्गाचा ऱ्हास करतो, त्यांना कडक शिक्षा व्हायला हवी, असं कडूर यांनी पोटतिडकीनं 
सांगितलं. 

दुसऱ्या दिवशी डॉ. शुभा तोळे यांनी मानवी मेंदूच्या कार्यान्वयीकरणावर प्रकाशझोत टाकला. मानवी मेंदूची शक्ती अफाट असते, तशी त्याची रचनाही अफलातून असते. आपण मेंदूचा पूर्ण वापर करत नाही. आपण काही पाहतो वा ऐकतो, तेथून 
सुरू होणारी, त्या पाहण्या- ऐकण्यावरील आपली प्रतिक्रिया कशी विकसित होते आणि आपल्या कृती व उक्तीतून उमटते हे सांगताना प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाचं सार त्याचं ते अस्तित्वच वाढविण्यात कसं असतं, हे त्यांनी 20-25 मुलांच्या 
मदतीनं विषद केलं. स्वतःच्या विकासासाठी आवश्‍यक सामग्री मिळवत कलेकलेनं घडत जाणारा मेंदू आणि दरम्यानच्या काळात विकसित झालेली काया, मेंदूच्या कार्यक्रियेतील अगम्य गती आणि लवचिकता याचा वेध घेताना लिहावं ,वाचावं 
यासाठीची क्षमता विकसित करण्याची गरज मानवाला का पडली असा प्रश्न त्यांनी केला. आपल्या मज्जा यंत्रणेतल्या विशिष्ट शाखा नेमक्‍या क्रिया आणि प्रतिक्रियांसाठीच स्वतःला कशा काय वाहून घेतात याचा वेध घेतानाच या यंत्रणेच्या निर्मितीत खोट राहिली, तर अपंगत्व निर्माण होते याचा उहापोह केला. 

तिसऱ्या दिवशी डॉ. सुगाता मित्रा यांनी आपले विचार मांडले. डॉ. मित्रा यांच्या शिक्षण क्षेत्रातील अनोख्या प्रयोगाने उपस्थितांची मती गुंग झाली. डॉ.मित्रा यांनी भौतिकशास्त्रात डॉक्‍टरेट मिळवली आहे. आज भारत स्वतंत्र होऊन 70 वर्षं झाली, तरीही भारतीय शिक्षणपद्धती ब्रिटिश अधिकारी मेकॉले याच्या यांच्या शिक्षणपद्धतीला घट्ट चिकटून आहे. ती बदलण्याची गरज आहे हे त्यांच्या व्याख्यानातून वेळोवेळी जाणवत होते. "ज्ञानार्जनाचे भवितव्य' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. त्यांनी व्याख्यानाची सुरवात आपल्या "होल इन दी वॉल' या प्रयोगानं केली. "होल इन दी वॉल' हा प्रयोग दिल्लीतल्या कल्काजी झोपडपट्टीत राबविला गेला. डॉ.मित्रा यांच्या आय. आय. टी. तल्या कार्यालयाला खेटूनच ही झोपडपट्टी आहे. तेथे त्यांनी झोपडपट्टीतल्या मुलांना भिंतीला भोक पाडून संगणक हाताळायला शिकवलं. त्यांचा हा 
प्रयोग चांगलाच यशस्वी झाला. यावरून अशा निष्कर्ष काढता येतो की, जर मुलांभोवती योग्य वातावरण निर्माण केलं तर ती स्वतःच ज्ञान मिळवू शकतात. त्यानंतर त्यांनी हा प्रयोग जगातील निरनिराळ्या देशात केला आणि त्यांना याचा चांगला अनुभव 
आला. याचा अर्थ असा की, मुलं कोणत्याही देशातील असली, तरी ती समूहात चांगली प्रगती करू शकतात. त्यांचा बौद्धिक, सांघिक विकास झपाट्यानं होतो. त्याच पद्धतीत थोडा बदल करून "सोल' (सेल्फ ऑर्गनाईज्ड लर्निंग) या पद्धतीनं हा प्रयोग सधन आणि 
सुशिक्षित समाजात केला आणि तेथेही त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला. आजची मुलं ही काळाच्या खूप पुढे गेलेली आहेत. त्यांची आकलनाची, निर्णय घेण्याची शक्ती आजच्या पन्नास-साठीच्या वयातील लोकापेक्षा खूप पुढे आहे. याचा आजच्या शिक्षण पद्धतीत 
उपयोग करून घेतला पाहिजे. तीच ती कालबाह्य शिक्षणपद्धती बदलायला पाहिजे. आज प्रश्नाच्या आधारे चिकित्सक वृतीला वाव देणारा अभ्यासक्रम हवा आहे. तसेच नवीन अभ्यासक्रमात इंटरनेटचा मुक्त वापर करता येईल असा हवा. प्रक्रिया आणि पद्धतीवर नव्हे, तर उत्पादकतेच्या निकषावर भर देणारे मूल्यांकन हवे. त्यांनी "स्कूल इन क्‍लाउड' ही संकल्पना राबविली. आणि त्यामार्फत वेगवेगळ्या देशातील बुजुर्ग लोकांनी परदेशी मुलांना वेगवेगळ्या विषयांचे धडे हसत खेळत दिले. या प्रयोगाचे फलित असे की, मुलांचं वाचन, आकलन, संवादकौशल्य माहितीच्या महाजालावरून नेमकी माहिती मिळविणे या गोष्टीत झपाट्यानं वाढ झाली.त्याच बरोबर त्याचा आत्मविश्वास वाढला.आजची परीक्षापद्धती झपाट्याने संपुष्टात येणार आहे हे निश्‍चित. त्यासाठी शिक्षण तज्ञांनी याची दखल घेऊन वेळीच उपाययोजना करायला हवी असं डॉ. मित्रा यांनी सांगितले. 

चौथ्या दिवशी डॉ. विक्रम पटेल यांनी "आपले आरोग्य आमच्या हाती' या विषयावर आपले विचार मांडले. ते "सांगाती' या अशासकीय संस्थेमार्फत करत असलेल्या कामामुळे देशभरातील लोकांना परिचित आहेत. ही संस्था बालविकास, किशोरवयीनांचे आरोग्य आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रात काम करते. डॉ.विक्रम पटेल यांनी 
वैद्यकीय या सेवाभावी व्यवसायात कशी लूट चालली आहे याचं जिवंत चित्रण आपल्या व्याख्यानात केलं. रोगी आणि त्यांचे नातेवाईक डॉक्‍टरकडे "देवदूत' म्हणून पाहतात. पण हाच डॉक्‍टर त्या कुटुंबाचा आर्थिक अंदाज घेत हपापलेल्या गिधाडासारखा त्यांच्यावर तुटून पडतो याचं प्रत्यकारी वर्णन त्यांनी केलं. त्यासाठी त्यांनी भारतात हृदविकारावर कसे उपचार केले जातात या पाहणीविषयी आपले मत व्यक्त करताना जे सांगितलं ते गंभीर आहे. जगात उपचार हे रुग्णांच्या वैद्यकीय गरजा पाहून केले 
जातात. मात्र भारतात रुग्णांची आर्थिक परिस्थिती पाहून उपचारांची व्याप्ती ठरवली जाते असा निष्कर्ष या पाहणीतून निघाला. ऍन्जिओग्राफी, बायपास हे गरीब रोग्यांच्या तुलनेनं श्रीमंत कुटुंबातील रुग्णांवर जास्त प्रमाणात केलं जातं.तसेच मृत्यूचे प्रमाण श्रीमंत कुटुंबातील रुग्णांपेक्षा गरीब रुग्णात जास्त आहे हे आढळून आलेलं आहे. याचा अर्थ वैद्यकीय सेवा गरज नसून उद्योग झालेला आहे, हे खेदानं म्हणावं लागतं. या परिस्थितीमुळं निराश न होता आपण ती कशी पालटू शकतो हे सांगताना गडचिरोली जिल्ह्यात डॉ.अभय बंग आणि राणी बंग या दाम्पत्याने केलेल्या अभिनव प्रयोगाचा त्यांनी दाखला दिला. 

मानसिक व्याधीची शिकार झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज भारतात जवळजवळ 10 टक्के लोक या व्याधीचे शिकार झालेले आहेत.त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रोगांची लागड होते. आज भारतात जवळजवळ 90 
टक्के लोकांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्‍टर कमी आहेत हे जाणून "सांगाती' या संस्थेने समाजात आरोग्य कर्मचाऱ्यांची फळी तयार करून खारीचा वाटा उचलला आहे. आज भारतासारख्या देशाला सेवाभावी डॉक्‍टरांची गरज आहे. त्यांच्या मतानुसार राजकीय क्षेत्रातील लोकांनी प्रेरित होऊन दर्जेदार आरोग्य सेवा अल्प दरात उपलब्ध करून द्यावी, प्रदूषण, कुपोषण अशा आरोग्यावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टींच्या विरोधात संघटित व्हायला हवं. जीवनशैलीच्या बदलामुळे होणारे रोग होऊ नयेत म्हणून आपण आपली जीवनशैली आदर्श ठेवायला हवी. 

"शौचालय' हा विषय अनेकांच्या जिव्हाळ्याचा बनविणाऱ्या "टॉयलेट मॅन' जेक सिमीने यंदाच्या महोत्सवातील शेवटचे पुष्प गुंफताना विचारांना एक अनपेक्षित अशी दिशा दिली. जेक सीम यांनी शौचालयं का हवी आहेत, त्यांचा मानव व पर्यावरणावर कसा परिणाम होतो याचे विनोदी पद्धतीने विवेचन करून अंतर्मुख केले. उघड्यावर शौचविधी करण्याची सवय मोडायला पाहिजे, यातून प्रदूषण फैलावते आणि आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. केवळ भारतातील 90 टक्के भूपृष्ठीय पाणी मानवी विष्ठेमुळे प्रदूषित झाले आहे. यावरून जर आजपासून आम्ही बंद शौचालय वापरण्यास सुरवात केली नाही, तर येणाऱ्या काळात केवढे मोठे संकट आमच्या समोर उभे राहणार याची कल्पना केलेली बरी. सिंगापुरात एक यशस्वी उद्योजक असताना केवळ मानव जातीची सेवा करण्याच्या उद्देशानं सर्व उद्योग- व्यवसाय सोडून या कामात त्यांनी झोकून 
दिलेलं आहे.

"उघड्यावर शौचविधी करण्याची वृत्ती जगभर आहे. हे थांबविण्यासाठी एक वैश्विक पातळीवर चळवळ उभारण्याचा मनात विचार करून मी त्या दिशेनं काम करत गेलो आणि यश मिळत गेलं. माझं काम पाहून मला बिल गेट्‌स, अभिनेता मेट 
डेमन, लिबेरीयाचे राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्‍लिंटन, सिंगापूरचे पंतप्रधान तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या समस्त देशांच्या प्रतिनिधींचं पाठबळ मिळालं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 कोटी शौचालये उभारण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला, त्याची स्तुती त्यांनी केली.आज गरीब लोकसुद्धा महागडे स्मार्ट फोन वापरतात. पण आपल्या बायकोमुलांना उघड्यावर शौचविधी करण्यास पाठविण्यास त्यांना लाज वाटत नाही. किंबहुना ते शौचालय उभारण्यात पैसे खर्च करत नाहीत. शौचालय हा असूयेचा, ईर्ष्येचा विषय व्हावा ही इच्छा आहे, असं मत शेवटी त्यांनी व्यक्त केलं. आणि एका विचारांना प्रवृत्त करणाऱ्या महोत्सवाची सांगता झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com