लाल ध्रुव निखळताना...! (श्रीराम पवार)

fidel-castro
fidel-castro

फिडेल कॅस्ट्रो गेले. जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य लाभलेला एक कणखर; पण तितकाच वादग्रस्त आणि घेतला वसा जीवनभर जपणारा, जगाच्या इतिहासावर अर्धशतकभर प्रभाव टाकलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. अमेरिकेच्या अंगणात अमेरिकेच्या नाकावर टिच्चून समाजवादी व्यवस्था उभी करणारा आणि अमेरिकेसह पाश्‍चात्यांच्या आर्थिक निर्बंधापुढं न झुकता ती सुरू ठेवणारा नेता ही कॅस्ट्रोंची ओळख. तसंच आपल्या मतांच्या विरोधात उभे राहू पाहणाऱ्या प्रत्येकाला चिरडून टाकणारा, अमेरिकाद्वेषाच्या हट्टपायी देशाला आर्थिक आघाडीवर मागास ठेवणारा हुकूमशहा अशीही त्यांची दुसरी बाजू. कॅस्ट्रो यांनी क्‍यूबाला काय दिलं आणि काय हिरावलं, यावर गेली ५० वर्षं चर्चा सुरू आहे. कॅस्ट्रो यांचा नेमका वारसा काय, यावरही अशीच चर्चा होत राहील. आपल्या काळावर आणि एका राष्ट्राच्या जगण्यावर; किंबहुना श्‍वास घेण्यावरही -हुकमत म्हणावी इतका- प्रभाव ठेवणारा हा नेता कायम वादाच्या भोवऱ्यात राहिला. ‘जग बदलत असताना एक मागासलेला, जिथं मोकळेपणे व्यक्त होणंही शक्‍य नाही, असा क्‍यूबा मागं सोडणारा नेता’ म्हणून कॅस्ट्रोंचे टीकाकार त्यांचं वर्णन करतील, तर ‘संपूर्ण आर्थिक कोंडी असूनही देश जगवणारा, ताठ मानेनं देशाला उभं करणारा तत्त्ववादी नेता,’ असं त्यांचे प्रशंसक सांगतील. देशाची सगळी सूत्रं ५० वर्षं कॅस्ट्रो यांच्या हाती होती आणि आयुष्याच्या सायंकाळी अगदीच विकलांग झाल्यानंतर त्यानं ती आपलाच धाकटा भाऊ आणि क्‍यूबाच्या क्रांतीतला साथीदार राऊल कॅस्ट्रो यांच्याकडं ती सोपवली. त्यानंतर क्‍यूबाची दारं पाश्‍चात्य जगासाठी किंचित किलकिली जरूर झाली आहेत. बराक ओबामा यांची क्‍यूबा भेट नावाचं १०-१५ वर्षांपूर्वी आक्रित वाटावं, असं वास्तव तयार झालं आहे. एकमेकांपासून तुटून-फटकून वागणं शक्‍यच नाही, अशा जगात क्‍यूबा आणि अमेरिकेलाही काही मुद्द्यांना मुरड घालून जमेल तिथं एकत्र यावं लागेल. निदान हात मिळवण्यापुरते तरी संबंध ठेवावे लागतील, असा काळ आल्याचं भान दोन्ही बाजूंनी दाखवलं. कॅस्ट्रो यांच्यानंतरचा क्‍यूबा आणि ट्रम्प यांची अमेरिका ते कायम ठेवेल का, हा मात्र प्रश्‍नच आहे. 

तब्बल ९० वर्षं जगलेल्या कॅस्ट्रो यांनी क्‍यूबात क्रांती घडवली, तेव्हा हा बंडखोर नेता देशाचा हीरो होता. चे गव्हेरा आणि कॅस्ट्रो ही मंडळी क्रांतिवाद्यांसाठी नेहमीच ‘प्रेरणा देणारा आदर्श’ अशी राहिली. वकिली करता करता राजकारणाकडं ओढले गेलेले कॅस्ट्रो आपल्या दाढीधारी सहकाऱ्यांसह हवानात घुसले केव्हा आयसेनहॉवर, मॅक्‍मिलन आणि क्रुश्‍चेव्ह हे जगाला आकार देणारे राज्यकर्ते सत्तेत होते. क्‍यूबातले अमेरिकी उद्योग आणि भांडवलाचं बिनदिक्कत राष्ट्रीयीकरण करून टाकणारे कॅस्ट्रो अमेरिकेसाठी खलनायक बनले. त्यांना संपवण्याचे, सत्तेवरून हटवण्याचे किती प्रयत्न झाले याला गणती नाही. अमेरिकेच्या तब्बल ११ अध्यक्षांची कारकीर्द आणि आर्थिक निर्बंध कॅस्ट्रो यांनी अनुभवले. शीतयुद्धाच्या काळात आधी लोकशाहीची, खुल्या निवडणुकांची भाषा करणारे कस्ट्रो हे अमेरिकेकडून झिडकारलं जात असल्याचं लक्षात येताच सोव्हिएत संघाकडं झुकले. साम्यवादाच्या वैचारिक जवळिकीतून क्‍यूबा सोव्हिएत संघाचा मित्र बनला. तेलसंपन्न व्हेनेझुएलाच्या ह्यूगो चावेझ यांनी क्‍यूबाला मदत केली. मात्र, तंत्रज्ञान आणि भांडवल या आघाड्यांवर कॅस्ट्रो यांचा क्‍यूबा मागंच राहिला. 

कॅस्ट्रो यांच्या हत्येचे कथित प्रयत्न, त्यासाठी अमेरिकी गुप्तचर संस्थांनी केलेल प्रयोग यांची तर जंत्रीच दिली जाते. हत्येच्या ६०० च्या वर प्रयत्नांतून कॅस्ट्रो बचावल्याचं सांगितलं जातं. सिनेमातच शोभाव्यात अशा अनेक मार्गांनी कॅस्ट्रो यांच्या हत्येचे प्रयत्न झाले. कॅस्ट्रो यांना स्कूबा डायव्हिंगचा शौक होता आणि त्याचा फायदा घेऊन डायव्हिंग सूटद्वारे बुरशीचा संसर्ग करून त्यात कॅस्ट्रो यांचा अंत होईल इथपासून ते पाण्याखाली स्फोटकं ठेवून त्यांना उडवून द्यायचं ते अगदी त्यांची प्रसिद्ध दाढी जाळून टाकायची इथपर्यंतच्या प्रयत्नांची चर्चा अनेक दशकं होत राहिली. यातल्या काही प्रयोगांचं नियोजन निदान कागदावर तरी झालं होतं, हे अमेरिकेनंच नंतर गोपनीयतेच्या आवरणातून बाहेर आणलेल्या कागदपत्रांतून स्पष्ट होतं. 

कॅस्ट्रो यांची राजवट कम्युनिस्ट म्हणूनच ओळखली गेली. तेही अखेरपर्यंत तसेच राहिले. मात्र, हवानात चे गव्हेरा, राऊल कॅस्ट्रो आणि ८० साथीदारांसह आलेल्या कॅस्ट्रो यांचं मूळ आश्‍वासन कम्युनिस्ट राजवटीचं नव्हतं; किंबहुना कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली क्‍यूबातल्या बॅटिस्टा यांची जुलमी राजवट उलथून टाकणारे सगळे क्रांतिकारी किंवा त्यांचं बंड ही कम्युनिस्ट क्रांती नव्हती. विचारानं डावीकडं झुकलेल्या कॅस्ट्रो यांनी साम्यवादाचा अधिकृत स्वीकार नंतरच केला. त्या विचारसरणीचा वापर संपूर्ण एकाधिकारशाहीसाठी केला. ‘संघर्षातून सिद्धान्ताकडं’ अशी कॅस्ट्रो यांची वाटचाल होती. आधीच समजावादी मूल्यांनी भारावून त्यासाठी क्‍यूबाची क्रांती झाली, असं घडलेलं नाही. बाटिस्टा यांच्या जुलमी सत्तेला उलथवून राजकीय स्वातंत्र्य देण्याचं कॅस्ट्रो यांचं आश्‍वासन होतं. मात्र, एकदा कम्युनिस्ट विचार स्वीकारल्यानंतर मात्र हा बंडखोर नेता पक्का कम्युनिस्ट बनला. अमेरिकाविरोधासाठी कॅस्ट्रो यांची ती गरजही होती. जगभरात लाल बावट्याची पीछेहाट होत असताना एकापाठोपाठ एक असे पूर्व युरोपातले कम्युनिस्ट बुरुज ढासळत असताना अमेरिकेच्या नाकावर टिच्चून दक्षिण अमेरिकेतच कॅस्ट्रो यांच्या क्रांतीचा लाल ध्रुव अढळस्थानी राहिला. शीतयुद्धआत अमेरिकेचा विजय आणि सोव्हिएत संघाची पीछेहाट झाल्यानंतर जगभरातल्या कम्युनिस्टांसाठी, बंडखोरांसाठी प्रेरणा देणारं राज्य कॅस्ट्रो यांचंच उरलं. ती धमक, करिष्मा कॅस्ट्रो यांच्यामध्ये नक्कीच होता. त्यामुळंच कॅस्ट्रो यांच्या राजवटीत मानवी अधिकारांचं काय, असल्या प्रश्‍नाला वावच नव्हता. अमेरिकेला विरोध आणि त्यातून ओढवून घेतलेले आर्थिक निर्बंध हेच त्यांनी आपलं बलस्थान बनवलं आणि क्‍यूबन राष्ट्रवादाची वीण अमेरिकाविरोधावर त्यांनी घट्टपणे बेतली. आरोग्य, शिक्षणात क्रांतिकारी म्हणावं असं काम क्‍यूबानं करून दाखवलं. कॅस्ट्रो यांची खरी क्रांती ती याच क्षेत्रातली. पाश्‍चात्य राष्ट्रांनाही दखल घ्यावी लागेल, अशी प्रगती त्यांनी आरोग्याच्या क्षेत्रात करून दाखवली. क्‍यूबामधली आरोग्यसेवा आणि या क्षेत्रातील प्रगती जगासाठी आदर्श वाटावी, अशी बनवली. वैद्यकीय क्षेत्रातल्या उच्च दर्जाच्या संशोधनाचं क्‍यूबा हे केंद्र बनलं. क्रीडाक्षेत्रातही कॅस्ट्रो यांनी क्‍यूबाला अभिमान वाटावा अशा प्रगतीच्या मार्गावर नेलं. या छोट्याशा कॅरेबियन देशानं जगाच्या क्रीडाक्षेत्रावर लक्षणीय छाप सोडली, हेही कॅस्ट्रो यांच्या राजवटीचं फलित. शिक्षणातले कॅस्ट्रो यांचे प्रयोगही जगाला दखल घ्यायला लावणारे होते. त्यांनी शिक्षण सक्तीचं आणि मोफतही केलं. देश साक्षरतेत आघाडीवर नेला. इतका की कॅस्ट्रो एका मुलाखतीत म्हणाले होते ः ‘माझ्या देशातल्या वेश्‍यासुद्धा पदवीधर आहेत.’ पहिल्या जगातल्या आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा प्रत्येक नागरिकाला मिळायलाच हव्यात, यावर कटाक्ष असणारे कॅस्ट्रो यांनी स्वतंत्र अभिव्यक्तीच्या साऱ्या शक्‍यताही चिरडून टाकल्या. त्यांना विरोध करणाऱ्यांना क्‍यूबात स्थान उरलं नाही. आर्थिक आघाडीवर आकांक्षा असणाऱ्या वर्गासाठी आवश्‍यक तो खुलेपणा कधीच त्यांनी दिला नाही. समाजवादाच्या नावाखाली या आकांक्षा दडपल्या गेल्या. कॅस्ट्रो यांना विरोध तर सोडाच; वेगळा सूर लावणारेही त्यांच्या तडाख्यातून सुटले नाहीत. शांततेनं विरोध करणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकण्यासारखे उपाय कॅस्ट्रो यांच्या राजवटीचं वैशिष्ट्य बनलं होतं. धार्मिक स्वातंत्र्य कधीच संपलं होतं. साहजिकच अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते कॅस्ट्रो यांचे विरोधक बनले. अशा कित्येकांना तुरुगांत जावं लागलं. अनेकजण परागंदा झाले. कॅस्ट्रो यांच्या मृत्यूनंतर आनंद साजरा करणाऱ्यांत बव्हंशी हीच मंडळी आहेत. जगात स्वातंत्र्यवादी चळवळी यशस्वी होत असताना, हुकूमशाही उलथवली जात असताना क्‍यूबातली कॅस्ट्रो यांची सत्ता कायम राहिली. तिचा चिराही ढासळला नाही. कोणताही राजकीय, नागरी समूहाचा विरोध त्यांनी कधीच जुमानला नाही. अमोघ वक्‍तृत्वाचा धनी, प्रचंड काम करण्याची ऊर्जा, थेटपणे जनतेशी सतत संवाद ठेवतानाच आपल्या विरोधकांबाबत अखंड सावधानता हे अनेक हुकूमशहांप्रमाणं कॅस्ट्रो यांचंही वैशिष्ट्य होतं. मुळात कॅस्ट्रो यांचा अमेरिकेला विरोध होता, असंही नाही. हनिमूनलाही ते अमेरिकेतच गेल्याचं सांगितलं जातं. क्‍यूबाची सत्ता घेतल्यानंतर ते अमेरिकेत गेले तेव्हा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष आयसेनहॉवर यांनी त्यांना भेटण्यापेक्षा गोल्फ खेळण्याला प्राधान्य दिलं. क्‍यूबाचे आधीचे हुकूमशहा बाटिस्टा हे अमेरिकेच्या कलानं चालणारे होते. अमेरिकेला हुकूमशाहीचं वावडं नव्हतंच. मुद्दा हुकूमशहा अमेरिकेच्या हिताचं रक्षण करणारा असला म्हणेज झालं इतकाच! बाटिस्टा यांची सत्ता उलथवणारे बंडखोर कॅस्ट्रो हे ‘अमेरिकेची पसंती’ बनू शकले नाहीत. यातून कॅस्ट्रो यांचा अमेरिकाद्वेष सुरू झाला. तो कॅस्ट्रो यांनी क्‍यूबन राष्ट्रवादाशी जोडला. देश कितीही अडचणीत आला तरी ‘देशाची प्रतिष्ठा’ या आवरणाखाली अमेरिकेचा विरोध त्यांनी क्‍यूबातला एकमेव विचार बनवला. अमेरिकेच्या विरोधात म्हणून क्‍यूबा सोव्हिएत संघाकडं खेचला गेला. साखरेच्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या क्‍यूबाची साखर घेणं अमेरिकेनं बंद केलं, तेव्हा सोव्हिएत संघ पुढं आला. सोव्हिएत संघाचं विघटन होईपर्यंत सतत मिळणारी अब्जावधी डॉलरची मदत, पुढं व्हेनेझुएलाकडून मिळणारं तेल हा अमेरिकेविरोधात टिकून राहण्यासाठीचा क्‍यूबाचा दीर्घकाळचा आधार होता. त्या काळी जगाची विभागणीच ‘अमेरिकेच्या बाजूचे की सोव्हिएतच्या?’ अशी होती. कॅस्ट्रो यांनी विरोध करणारे विचारवंत, कलाकार, पत्रकार, अगदी आधीचे सहकारी यांचीही पत्रास ठेवली नाही. सरकारी माध्यमांचा आपल्या उदात्तीकरणासाठी वापर, जमेल तेवढी सेन्सॉरशिप ही क्‍यूबातल्या सार्वजनिक जीवनातली वैशिष्ट्यं राहिली. समाजजीवनावर नकळत भीतीची छाया राहिली पाहिजे, असा हुकूमशहांचा प्रयत्न असतोच. त्या भीतीला देशाच्या उद्धारासाठीची आवश्‍यकता आणि नेत्याविषयी आदर म्हणून सादर करण्याच्या हातोटीत कॅस्ट्रो हे अग्रणी ठरावेत. 

कॅस्ट्रो जगभरातल्या तरुणांना क्रांतीची प्रेरणा देणारं नेतृत्व ठरले. जगभर समाजवाद कोसळत असताना क्‍यूबावरचा लाल बावटा फडकवत ठेवणारा करिष्मा त्यांनी दाखवला. हा नेता अमेरिकेच्या ११ अध्यक्षांच्या कारवायांना पुरून उरला. अमेरिकेच्या सक्रिय पाठिंब्यावर त्यांची राजवट उलथवण्यासाठीचं बंड त्यांनी १९६१ मध्ये मोडून काढलं. सोव्हिएत संघाची क्षेपणास्त्रं बोलावून जगाला १३ दिवस का असेना अणुयुद्धाच्या छायेनं ग्रासलं. हे सगळं खरं असलं तरी कॅस्ट्रो यांची राजवट एकाधिकारशाहीची होती आणि कोणत्याही हुकूमशहाप्रमाणं त्यालाही स्वतंत्र विचारांची, अभिव्यक्तीच्या मोकळेपणाची ॲलर्जीच होती. राष्ट्रवादाची भाषा करत व्यक्त होण्याच्या मूलभूत प्रेरणांनाच दडपणाऱ्या, हवं तसं वाकवू इच्छिणाऱ्या, डाव्या असोत की उजव्या कर्मठांच्या चलतीचा काळ सुरू असताना या मालिकेत मुकुटमणी शोभावा असा नेता कॅस्ट्रो यांच्या निधनानं निघून गेला आहे. त्यांची अमेरिकेसारख्या महासत्तेला टक्कर देण्याची जिगर लक्षात राहील, तशीच लाल हुकूमशाहीसुद्धा! 

भविष्यातला क्‍यूबा कसा असेल, यावर आता जगातले शहाणे स्वाभाविकपणे अधिक विचार करू लागले आहेत. तसेही कॅस्ट्रो जवळपास विकलांग झाले आणि भाऊ राउल यांच्याकडं सूत्र दिली तेव्हापासून ‘फिडेलपेक्षा हे धाकटे कॅस्ट्रो काहीसे वेगळे आहेत,’ याची जाणीव करून देत आहेतच. शत्रू राष्ट्र ठरवलेला अमेरिकेच्या अध्यक्षांशी हस्तांदोलन करण्याचा धाडसी बदल राऊल यांनी दाखवला आहे. तरीही आर्थिक आघाडीवर मुक्ततेची धोरणं क्‍यूबामध्ये किती वेगानं येतील, यावर साशंकता आहेच. क्‍यूबाच्या नागरिकांसाठी नावीन्य असलेली घरं, वाहनांची खरेदी-विक्री, त्यावरची व्यक्तिगत मालकी राऊल यांच्या पुढाकारानं प्रत्यक्षात आली. कदाचित क्‍यूबा राजकीयदृष्ट्या साम्यवादाची पोलादी चौकट कायम ठेवून व्यवहारात चीनसारखा भांडवलदारी मार्गानं जाऊ शकतो किंवा लाल हुकूमशाहीचा संपूर्ण त्याग करून लोकशाहीकडंही वळू शकतो. राऊलही ८५ वर्षांचे आहेत आणि २०१८ मध्ये पदत्यागाची घोषणा त्यांनी आधीच केली आहे. साहजिकच क्‍यूबात सत्ता घेणारी पुढची पिढी कोणती, याला महत्त्व असेल. यात दोन्ही कॅस्ट्रोंची मुल-बाळंही असू शकतात. याच वेळी क्‍यूबाशी पुन्हा राजनैतिक संबंध जोडणाऱ्या बराक ओबामा यांच्यानंतर अमेरिकेची धुरा अधिक आक्रमक असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडं येते आहे. बदलत्या स्थितीत क्‍यूबालाही अधिक खुल्या व्यापाराच्या, आर्थिक सुधारणांच्याच मार्गानं जावं लागण्याची शक्‍यता अधिक. 

सन १९५३ मध्ये बाटिस्टा सरकार उलथवण्याच्या प्रयत्नात कॅस्ट्रो यांना अटक झाली, त्या वेळच्या खटल्यात ते म्हणाले होते ः ‘इतिहास मला दोषमुक्तच करेल.’ तेव्हा १५ वर्षांची शिक्षा झालेला हाच बंडखोर क्‍युबाचा सूत्रधार झाला. त्यांना लोकशाहीलाच नाकारणारा हुकूमशहा ठरवायचं की अमेरिकेशी दोन हात करत चिमुकल्या कॅरेबियन बेटाला निदान काही क्षेत्रात प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर नेणारा, जगभरातल्या तरुणांना क्रांतीची भुरळ घालणारा महान नेता ठरवायचं यावर इतिहास वाद घालतच राहील. कॅस्ट्रो यांचं आयुष्य कोणत्याही एका बाजूनं ठाम मतं नोंदवावं असं नाहीच. म्हणूनच ‘फिडेल कॅस्ट्रो नावाची दंतकथा’ अमर असेल! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com