'कलंदर' आव्हान...! (श्रीराम पवार)

'कलंदर' आव्हान...! (श्रीराम पवार)

‘हजरत लाल शाहबाज कलंदर’ या सूफी दर्ग्यातल्या ‘धमाल’वर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसनं स्वीकारली आहे. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातल्या सेहवान या ठिकाणी गेल्या आठवड्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानं ८८ जणांचे बळी घेतले. सूफी परंपरेत संगीताच्या नादात गोल गोल फिरत ईश्‍वराशी तादात्म्य पावण्याची कल्पना म्हणजे धमाल. ही आध्यात्मिक अनुभूती असल्याचं सूफी मानतात. मात्र, यातलं नृत्य-संगीत कट्टरपंथीयांना खुपतं. ‘धर्माच्या आणि जीवनशैलीच्या आपल्याला मान्य नसलेल्या कल्पना असणाऱ्या कुणालाही जगायचा अधिकारच नाही... त्यांना संपवलंच पाहिजे,’ हा मानवताविरोधी दहशतवादी विचार या हल्ल्यामागं आहे.  मात्र, आदल्या दिवशी ज्या ठिकाणी रक्ताचा सडा दहशतवाद्यांनी घातला, त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी भाविकांचा ‘धमाल’ आधीच्याच सहजतेनं रंगला. ‘आम्ही अशा हल्ल्यांना भीक घालत नाही,’ हेच ‘धमाल’कर्त्यांनी दाखवून दिलं. ही ऊर्मी हत्यारानं, हिंसेनं संपणारी नाही, ही जाणीवच पाकिस्तानातल्या कट्टरतावादानं झाकोळल्या वातावरणात आशेचा किरण असू शकते.

पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात हजरत लाल शाहबाज कलंदर दर्ग्यासमोर पारंपरिक धमाल सुरू असताना आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानं ८८ जणांचे बळी घेतले. हा हल्ला घडवल्याची जबाबदारी ‘इसिस’नं स्वीकारली आहे. पाकिस्तान यासाठी अफगाणी दहशतवादी गटांकडं बोट दाखवतो आहे. इतकचं नव्हे, तर त्याला अफगाणिस्तानचा पाठिंबा असल्याचंही सांगितलं जात आहे. यात पाकिस्तानविरोधी शक्तींचा हात असल्याची बोंब पाकिस्ताननं ठोकली आहेच. नेहमीच्या कांगाव्यापलीकडं यात काही नाही. ‘आम्ही दहशतवादाचे बळी आहोत,’ असं गळा काढून रडायची आणखी एक संधी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना मिळाली. आपल्याकडं ‘पाकिस्तान सुधारणारच नाही... कराची हाच दहशतवाद्यांचा अड्डा बनला आहे. हाफिज सईद, दाऊदवर्गीय गणंग असे सगळे तिथंच आसऱ्याला आहेत आणि पाकिस्तान असे साप पोसत कुणीतरी डंख मारल्याचा कांगावा करतो,’ अशा प्रकारचं निदान जोरात आहे. दोन्हीकडच्या प्रतिक्रिया जवळपास ठरल्यासारख्या आहेत. मात्र, त्यानं दहशतवादी घटनांमध्ये खंड पडत नाही. हा हल्ला इसिसच्या दाव्याप्रमाणं त्यांच्या गटानंच केला, की तालिबान्यांनी, की आणखी कुणी, हा सुरक्षा यंत्रणांसाठी महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. मात्र, कुणीही केला असला तरी या हल्ल्यात मुद्दा आहे, की त्यासाठी सूफी दर्गा का निवडला? याचं उत्तर ‘अधिकाधिक एकारलेला आणि खतरनाक बनत चाललेला जिहादी दहशतवादी विचार’ हे आहे. सगळ्या मुस्लिम जगाची आणि दहशतवादाची सांगड घालायची गरज नाही हे खरं आहे. मात्र, इस्लामचा आधार घेऊन दहशतवाद माजवणारे या धर्मातीलही अन्य कोणती परंपरा मानायला तयार नाहीत. इतरांचं अस्तित्व मान्य करणारं, सर्वसमावेशकतेचा धूसरही प्रयत्न करणारं काही शिल्लक ठेवायचं नाही, हे इसिससारख्या झापडबंद धर्मांधांचं आणि त्याला कळत-नकळत साथ देणाऱ्यांचं सूत्र आहे. नावं वेगळी असली तरी अल्‌ कायदा, तालिबान, बोको हराम, टीटीपी ते लष्कर-ए-तोयबा या सगळ्यांची चौकट एकच आहे. हे कडवेपण आधी अन्यधर्मीय आणि नंतर अहमदिया, शिया असं करत करत जो कथित खिलाफती वहाबी विचार मानत नाही, अशा प्रत्येकाला संपवण्याकडं जातं. हाच मूळ इस्लाम असल्याचं सोईनं सांगायचा प्रयत्न होत आहे.

खरंतर धर्म कोणताही असो, स्थल-कालानुसार त्यातल्या प्रथा, रीती-रिवाज बदलत राहतात. मूळ तत्त्वज्ञान कायम राहूनही हे व्यवहारातले बदल होऊ शकतात, होत असतात. हेच मानवी वाटचालीत नैसर्गिक आहे. म्हणूनच त्याला विरोध करणारे कितीही कडवे असले, भारलेले असले, तरी मानवी वर्तनव्यवहाराच्या विविध छटा संपवता येत नाहीत. ज्या लाल शाहबाज कंलदर दर्ग्यासमोर दहशतवाद्यांनी रक्ताचा सडा टाकला, तिथं दुसऱ्याच दिवशी पुन्हा धमाल रंगली. हे संपवता येत नाही, हे खरं जगातल्या सगळ्या दहशतवादी विचारसरणींचं दुखणं आहे; आणि उत्क्रांत होत असलेल्या संस्कृतीतून आलेलं हे संचित तसं संपवताही येत नाही. इसिसची अडचण हीच आहे. हा हल्ला शियांच्या स्थानावरचा हल्ला म्हणून सांगितला जातो. इसिसनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना जाणीवपूर्वक तसा उल्लेख केला आहे. मात्र, केवळ शियांचा दर्गा म्हणून रक्तपात घडवला असं नाही, तर तिथं मुस्लिमांमधले सगळे पंथ आणि हिंदूही जमतात. सूफी परंपरेत संगीताच्या नादात गोल गोल फिरत ईश्‍वराशी तादात्म्य पावण्याची कल्पना म्हणजे धमाल. ही आध्यात्मिक अनुभूती असल्याचं सूफी मानतात, तर यातलं नृत्य-संगीत कट्टरपंथीयांना खुपतं. धमालची प्रथा थोड्याफार फरकानं पाकिस्तानात अनेक भागांत चालते आणि धर्मापलीकडं जाऊन तिथं लोक सहभागी होतात. अशा लोकपरंपरा आणि त्यातलं धर्मापलीकडं जाऊन लोकांचं एकमेकांत मिसळणं इसिस किंवा त्यासारख्या दहशतवादी संघटनांना मानवणारं नाही. ‘कलंदर’चा एक अर्थ ‘सीमारेषा न मानणारा’, ‘चौकटीपलीकडचा’ असाही आहे. ही चौकट धर्मांधांच्या विरोधात जाणारी आहे.

हल्ला केल्यानंतर शियांच्या कार्यक्रमावर हल्ला केल्याचा इसिसनं लावलेला सूर हे अर्धसत्य आहे. लाल शाहबाज कलंदर हे सूफींचं महत्त्वाचं स्थान आहे. लाल शाहबाज कलंदरचा दर्गा असलेलं सेहवान हे प्रस्थापितविरोधी विचारांचं ठाणं आहे. इसिस ज्यारीतीनं जगाकडं ‘वहाबी इस्लाम आणि इतर सगळे’ या चौकटीतून पाहते, त्यात लाल शाहबाज कलंदर मावणारं प्रकरण नाही. बाराव्या शतकात होऊन गेलेल्या या अवलियानं धर्मापलीकडं जाऊन लोकांना भूल पाडली. सिंधमधल्या हिंदूंसाठी शाहबाज कलंदर पीर आहे आणि मुस्लिमांसाठीही. यात सुन्नी-शिया असा मुद्दा नाही, की हिंदू-मुस्लिम असाही. हा संत सिंधी आणि पंजाबी सूफी पंरपरांना जोडणाराही होता. शाहबाज कलंदरच्या परिसरात फाळणीनंही शांतता ढळली नव्हती आणि धमाल थांबले नव्हते. क्रमाक्रमानं संकुचित आणि कडवा बनत गेलेल्या पाकिस्तानात हे एक आगळंच ठिकाण आहे. कधीतरी ती फाळणीपूर्व अखंड भारताची ओळख होती. ती द्विराष्ट्रवादाच्या बुडाशी असलेल्या संकुचितपणालाही छेद देणारी आहे. असली ठिकाणं दहशतवादाचा फैलाव करू पाहणाऱ्यांसाठी नेहमीच आव्हानं देत आली आहेत. हे आव्हान पेलणं सोपं नाही. अन्यवर्ज्यक बहुसंख्याकवादी एकारलेल्या राष्ट्रावादाला भिडण्याची क्षमता तिथं आहे. इसिससारख्यांचं दुखणं तेच तर आहे. लाल शाहबाज कलंदर किंवा त्यांच्यासारखे सूफी एकारलेल्या इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना नेहमीच खुपत राहिले आहेत. सूफी हा इस्लाममधला मवाळ प्रवाह मानला जातो. ‘सूफी मंडळी धर्मापलीकडं बंधुभावाचं बोलतात,’ ही साचेबद्ध दृष्टिकोन असलेल्या दहशतवाद्यांसाठी अडचण आहे. लाल शाहबाज कलंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या सूफी संताचं मूळ नाव सय्यद महंमद उस्मान मरवंदी. ते रुमी यांचे समकालीन सूफी संत. तुर्की, पुश्‍तू, अरबी, सिंधी, संस्कृत अशा अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला हा अवलिया आठ-नऊ शतकं उलटून गेल्यानंतर आजही मूलतत्त्ववाद्यांना अडचणीचा वाटतो, यातच त्याचं मोठेपण अधोरेखित होतं. सूफींमधल्या सगळ्यात लोकप्रिय संतांपैकी असलेले लाल शाहबाज कलंदर यांचे संदर्भ सूफी गीतांमधून येतात, शाहबाज कलंदर म्हणूनही आणि झुलेलाल म्हणूनही.  

लाल शाहबाज कलंदर दर्ग्यावरचा हल्ला म्हणजे जी तत्त्वं सूफी प्रस्थापित करू पाहतात, त्या तत्त्वांवरचा हल्ला होय. पाकिस्तानचं सरकार ‘हा पाकिस्तानवरचा हल्ला आहे,’ असं सांगून दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम चालवू इच्छितं. हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी १०० च्या वर दहशतवाद्यांना ठारही केलं. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांना इतक्‍या नेमकेपणानं दहशतवादी माहीत होते, तर
त्या यंत्रणा कारवाईसाठी हल्ल्याची वाट पाहत होत्या काय, असा प्रश्‍न विचारला जाणं स्वाभाविक आहे. ‘हल्ला पाकिस्तानवर आहे’ असा तिथला सरकारी दावा असला, तरी ‘हा कोणत्या पाकिस्तानवरचा हल्ला’, हा खरा प्रश्‍न आहे. हल्लेखोरांची भूमिका आणि पाकिस्ताननं अधिकृतपणे पोसलेली, दुही माजवणारी, धर्माधर्मांत तेढ तयार करणारी व्यवस्था यांत तसं कोणतं अंतर आहे? दहशतवादी उघड हिंसेचा आधार घेऊन विरोधी किंवा पर्यायी विचार, जीवनशैली बळानं नष्ट करू पाहत आहेत, तर पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि लष्कर गेली काही दशकं पद्धतशीरपणे विविधतेला मारणारी, सर्वसमावेशकता नाकारणारी व्यवस्था आणते आहे. पाकिस्तान हे ‘दहशतवाद्यांचं अभयारण्य’ काही उगाच बनलं नाही. पाकिस्तानच्या निर्मात्यांनी फाळणी धर्माच्या आधारे मागितली, तरी आधुनिक, धर्मनिरपेक्ष राष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र, पाकिस्तान हे धर्मांधता पोसणारं राष्ट्र बनलं ते धर्ममार्तंडांच्या आणि राज्यकर्त्यांच्या सक्रिय युतीमुळंच. त्यामुळं इसिसचा हल्ला पाकिस्तानात असला, तरी त्या देशानं पोसलेल्या कल्पनांशी तो सुसंगतच आहे. पाकिस्तानात अजूनही सेहवानसारखे काही अपवाद शिल्लक आहेत, त्या पाकिस्तानवरचा हा हल्ला आहे. तसं त्यावरचं आक्रमण ही नित्याची बाब आहे. ‘धर्माच्या आणि जीवनशैलीच्या आपल्याला मान्य नसलेल्या कल्पना असणाऱ्या कुणालाही जगायचा अधिकारच नाही... त्यांना संपवलंच पाहिजे,’ हा मानवताविरोधी दहशतवादी विचार त्यामागं आहे. सेहवानमधला हल्ला त्यामुळंच एका धर्मस्थळापुरता मुद्दा उरत नाही. इसिसला तो सुन्नी किंवा सलाफी वहाबींनी शियांवर केलेला हल्ला म्हणून दाखवायचा आहे. मात्र, इतकीही त्याची मर्यादा नाही. ‘समन्वयाचं, माणसामाणसांमधले संबंध सुधारण्याचं बोलणाऱ्या कुणालाही संपवलंच पाहिजे,’ हा विचार घेऊन जाणाऱ्या मध्ययुगीन मानसिकतेत जगणाऱ्यांचं हे पुढारलेल्या आणि समन्वयवादी समाजाशी युद्ध आहे. याआधीही सूफी गायक अमजद साबरी यांना पाकिस्तानातच गोळ्या घालून ठार केलं गेलं. बलुचिस्तानातल्या शाह नूरानी दर्ग्यावर अशाच हल्ल्यात ५० जणांचा बळी गेला. तो हल्ला करणारे पाकिस्तानी तालिबानी होते. त्याआधी गुलाम शाह गाजी, कराचीतलं अब्दुल्ला शाह गाजी, बाबा फरीदगंज सरकार, लाहोरचा दाता दरबार, इस्लामाबादमधलं बारी इमाम, फतेहपूरचा पीर राखेल शहा अशा अनेक धार्मिक स्थळांवर हल्ले झाले. ही सगळी ठिकाणं कट्टरपंथीयांना सलणारी आहेत. इसिस असो, तालिबान असो किंवा तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान असो, हे सगळे सूफींच्या मागं लागले आहेत.

सूफीवाद हे मुळात बंडाचं प्रतीक आहे. सूफींचे काद्री, चिश्‍ती, सुऱ्हावर्दी, नक्‍शबंदी हे आणि असे अनेक प्रकार आहेत. बहुतेक सूफींचं कार्य मूलतः प्रस्थापितविरोधीच होय. यातल्या काही परंपरा तर कायम त्या त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या विरोधात लोकांच्या बाजूनं उभ्या राहिल्याचं जाणकार सांगतात. भारतीय उपखंडातली ही परंपरा सातत्यानं राजे-सुलतान आणि धर्ममार्तंडांच्या आघाडीविरुद्ध राहिली आहे. धार्मिक- आध्यात्मिकदृष्ट्या सूफी कोणत्या ठराविक साच्यात बसणारा नाही. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांपासून ते पंजाबपर्यंत भक्तिपरंपरेशी जोडणारी अनेक साधनं यात आहेत. ‘शांतता- सहअस्तित्वाच्या सूत्रावर आधारलेलं आणि सत्याच्या शोधात निघालेलं तत्त्वज्ञान,’ असं सूफीवादाचं मुळात स्वरूप आहे. सूफींमधल्या वहादत-अल्‌-वजूदचं सांगणं आहे ः ‘ईश्‍वरापासून कुणी वेगळं नाही, तो सगळ्यांमध्ये आहे.’ अधिक मोकळा विचार आणि झापडबंद विचार यांतली स्पर्धा भारतीय उपखंडात अनेक शतकांची आहे. झापडबंद विचार राज्यकर्त्यांनीच स्वीकारला आणि बळाच्या जोरावर कितीही लादला, तरी मुक्तपणे फुलणारी सूफी परंपरा कायम राहिली.  
सेहवानमधल्या या हल्ल्याची जबाबदारी इसिसनं स्वीकारल्यानं केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे, तर भारतासह संपूर्ण उपखंडासाठी हा हल्ला दखलपात्र ठरतो. इसिसचं सीरियातलं साम्राज्य आक्रसत चाललं आहे. हळूहळू का असेना; पण या दहशतवाद्यांविरुद्ध लढणाऱ्यांना यश येतं आहे. इसिसच्या प्राधान्यक्रमात पाकिस्तान किंवा दक्षिण आशिया असल्याचं मानलं जात नव्हतं. मात्र, सीरियातून पीछेहाट होत असताना कदाचित सगळ्या प्रकारच्या दहशतवाद्यांचं आश्रयस्थान बनत चालेल्या पाक-अफगाण सीमावर्ती भागात इसिसही बस्तान ठोकू पाहत आहे काय, हा चिंतेचा मुद्दा आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानची दहशतवाद्यांवरची कारवाई आणखी गती घेईल, तीत अनेक दहशतवादी टिपले जातील... हे नेहमीप्रमाणे यथासांग घडेल. हल्ल्यानंतर लोकांमध्ये विश्‍वास तयार करण्यासाठीही अशा बाबी राज्यकर्त्यांना आवश्‍यक असतात. ‘झर्ब-ई-अज्ब’ नावाची दहशतवादविरोधी युद्धमोहीम तशीही पाकिस्ताननं सुरू केली आहेच. तीत जवळपास नऊ हजार ५०० दहशतवाद्यांना संपवल्याचा लष्कराचा दावा आहे. तरीही लष्करी शाळेतल्या कोवळ्या मुलांना गोळ्या घालणं थांबलं नव्हतं आणि सूफी दर्ग्यांवरचे हल्लेही बंद झाले नाहीत. लष्करी कारवाई हा दहशतवाद्यांशी करायच्या युद्धाचा एक भाग आहे. मात्र, अशा विचारांना कच्चा माल पुरवणारी व्यवस्था पोसत राहून तो संपेल असं समजणं भाबडेपणाचं आहे. दहशतवाद्यांशी लढताना पाकिस्ताननं नेहमीच यात दुटप्पी व्यवहार ठेवला आहे. दहशतवाद्यांचा व्यूहनीतीत वापर करणाऱ्या पाकिस्तानसाठी हे त्रांगडं आहे. पाकनं अफगाणिस्तानकडं केलेला निर्देश वाढत्या अफगाण-भारत मैत्रीकडंही आहे. हा कांगावा असला तरी भारताला सावध राहावंच लागेल. पाकिस्तानमधला ‘रिवाज’ पाहता, तिथं काही मोठं घडलं, की लक्ष दुसरीकडं वळवण्यासाठी भारतात घातपाती कारवाया घडवून आणल्या जातात.

लाल शाहबाज कलंदर दर्गा टिकवून असलेली परंपरा पाकिस्तानी भूमीच्या इतिहासाचा भाग आहे. हा जोडणारा धागा तोडून द्वेषावर आधारलेली बहुसंख्याकवादी व्यवस्था आणणं हे दुखण्याचं मूळ आहे. पाकनं अफगाणिस्तानच्या राजदूताला पाचारण करून हल्ल्यानंतर ७८ दहशतवाद्यांना सोपवण्याची मागणी केली. अशा प्रकारचे मुत्सद्देगिरीचे खेळ आणि लष्करी कारवाई तर होतच राहील. दहशतवाद्यांमध्ये ‘भेदाभेद अमंगळ’ मानून मूळचं दुखणं दुरुस्त करण्याची तयारी आहे का, हा मुद्दा आहे. लाल शाहबाज कलंदर दर्ग्यात सगळ्या पंथांमधले, मुस्लिम- हिंदू- शीख- ख्रिश्‍चन- पारशी असे विविध धर्मांमधले स्त्री-पुरुष आणि तृतीयपंथीही सहभागी होतात, हे कट्टरपंथीयांना न रुचणारं आहे. हा हल्ला त्यावरचा आहे. मात्र, हल्ला झाल्यानंतर लगेच पहाटे साडेतीन वाजता तिथं नित्याचे कार्यक्रम सुरू झाले. इतकचं नव्हे, तर रात्रीचा ‘धमाल’ही नेहमीप्रमाणं रंगला. ही ऊर्मी हत्यारानं, हिंसेनं संपणारी नाही, ही जाणीवच पाकिस्तानातल्या कट्टरतावादानं झाकोळल्या वातावरणात आशेचा किरण असू शकते. आमिर खुस्रोनं लिहिलेल्या, बुल्लेशाहनं सिंधी रंग चढवलेल्या ‘दमा दम मस्त कलंदर’चे सूर लोकांना जोवर मोह पाडत राहतील, तोवर कट्टरपंथीयांचा सर्वसमावेशकतेवर विजय अशक्‍य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com