गुजरातच्या आखाड्यात... (श्रीराम पवार)

रविवार, 10 डिसेंबर 2017

भरकटलेल्या प्रचारामुळं गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची लढत एखाद्या आखाड्यात परिवर्तित झाली आहे. यशाची खात्री उरली नाही की जे घडतं ते सारं गुजरातमध्ये सध्या सुरू आहे. मग ते काँग्रेसला मंदिरं आठवणं असो की भाजपनं ‘औरंगजेब’, ‘खिलजी’ आदींना प्रचारात उतरवणं असो... तिथला प्रचार असा भलत्याच कारणांनी गाजत आहे. परिणामी, निवडणूक चुरशीची झाली आहे हे नक्की. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी या तीन तरुण नेत्यांसह राहुल गांधींनी जमवलेलं सोशल इंजिनिअरिंग काँग्रेसला लाभदायी ठरणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा भारी ठरणार याचा फैसला आता दूर नाही.

भरकटलेल्या प्रचारामुळं गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची लढत एखाद्या आखाड्यात परिवर्तित झाली आहे. यशाची खात्री उरली नाही की जे घडतं ते सारं गुजरातमध्ये सध्या सुरू आहे. मग ते काँग्रेसला मंदिरं आठवणं असो की भाजपनं ‘औरंगजेब’, ‘खिलजी’ आदींना प्रचारात उतरवणं असो... तिथला प्रचार असा भलत्याच कारणांनी गाजत आहे. परिणामी, निवडणूक चुरशीची झाली आहे हे नक्की. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी या तीन तरुण नेत्यांसह राहुल गांधींनी जमवलेलं सोशल इंजिनिअरिंग काँग्रेसला लाभदायी ठरणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा भारी ठरणार याचा फैसला आता दूर नाही. मात्र, ‘दुसऱ्याचं प्रतिमाभंजन’ करण्याच्या ‘कले’चं दर्शन या प्रचारात दोन्ही बाजूंनी घडवलं हे खरं!

देशाचं लक्ष असलेल्या गुजरातच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडताना, ‘गुजरात कुणाचा? गुजराती अस्मितेचं प्रतीक बनू पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा की ‘गुजरात विकास मॉडेल’वरच प्रश्‍नचिन्ह लावू पाहणाऱ्या काँग्रेसचा?’ याचा फैसला जवळपास निम्म्या गुजरातनं केला आहे. तशी देशातली प्रत्येक निवडणूक राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असतेच. अलीकडं प्रत्येक राज्यात ‘अभी नही तो कभी नही’ थाटाच्या लढाया लढल्या जात आहेत. यात २०१४ च्या लोकसभेतल्या यशानंतर मोदी-अमित शहांनी भारत काँग्रेसमुक्त करायची घोषणा केल्यानंतर या लढती अधिकच लक्षवेधी बनवल्या जात आहेत. गुजरातच्या निवडणुकीला खास महत्त्व आलं आहे, याची कारणं दोन. एकतर उत्तर प्रदेशात अफाट यश मिळवल्यानंतर ‘आता पुढची लोकसभा जिंकलीच,’ अशा थटात वावरणाऱ्या भाजपनं १८२ सदस्यांच्या विधानसभेत १५० आमदारांचं लक्ष्य ठेवलं आहे. भाजपनं ते गाठलं तर पक्षाचं जनमानसातलं वर्चस्व अधोरेखित होईल. विरोधी पक्ष आणखी खचतील. साहजिकच हे लक्ष्य भाजप गाठणार काय, याकडं साऱ्यांचं लक्ष आहे. दुसरीकडं निकालाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पक्षाध्यक्ष बनणार आहेत. थेटपणे मोदींना लक्ष्य करत चाललेला त्यांचा प्रचार गुजराती मतदाराला किती भावतो, याचा फैसला या निवडणुकीत होईल. तो राहुल यांच्या बाजूनं लागला तर लोकसभा निवडणुकीत ते प्रबळ दावेदार म्हणून उभे राहतील. उलट झालं तर अध्यक्षपदाच्या कारकीर्दीला सुरवातीलाच पराभवाचा खडा लागेल. त्याची बोच लोकसभा निवडणुकीतही जाणवल्याखेरीज राहणार नाही.

गुजरातच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हा तिथला भाजपचा विजय गृहीतच धरला जात होता. मुद्दा तो किती मोठा असेल आणि विरोधातला काँग्रेस पक्ष तो कुठपर्यंत रोखण्यात यश मिळवेल हाच होता. मात्र, निवडणूक पुढं जाईल तशी निदान ती चुरशीची होईल, अशी चिन्ह दिसत आहेत. भाजपकडून प्रत्येक निवडणुकीत असंच वातावरण तयार केलं जातं. प्रत्यक्षात गुजराती मतदार भाजपच्याच पाठीशी राहतो, असा दावा केला जातो. वरकरणी तो बिनतोड वाटतो. मात्र, केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला आणि भाजपसाठी मतांचं एकमेव आशास्थान असलेल्या मोदींना आता पहिल्यांदाच, दुसऱ्यांना प्रश्‍न विचारायचे नाहीत तर उत्तरं द्यायची आहेत. पंरपरेनं चालत आलेल्या जातसमूहांच्या मतगठ्ठ्यांची फेरजुळणी करणारं गणित काँग्रेस मांडू पाहत आहे. त्याला उत्तर देणारी रणनीती भाजपनंही तयार केली आहे. हे नवं सोशल इंजिनिअरिंग काय परिणाम घडवतं, यालाही या निवडणुकीत कमालीचं महत्त्व आहे. मोदींची प्रतिमा आणि शहा यांचं निवडणूक-व्यवस्थापनाचं कौशल्य या बळावर गुजरातच्या होमपिचवर सहज बाजी मारता येईल, हे वातावरण तरी नक्कीच पालटलं आहे. प्रचाराच्या सुरवातीच्या टप्प्यात राहुल गांधींना अनपेक्षित प्रतिसाद मिळाल्यानं काँग्रेसवाल्यांचं मनोबल उंचावणं स्वाभाविक आहे. एकदा स्वतः मोदी प्रचारात उतरल्यानंतर चित्र सहज बदलेल असं सांगितलं जात होतं. घरच्या मैदानावर मोदींच्या अर्धशतकी सभा लावायची वेळ भाजपवर आली, हे चुरशीची दखल घ्यावी लागल्याचंच निदर्शक आहे.

गुजरात ही भाजपच्या राजकीय उत्थानाची प्रयोगशाळा राहिली आहे. बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला यंदा २५ वर्षं झाली. त्या घटनेनंतर देशाच्या राजकारणात भाजपचा ठळकपणे उदय झाला. मधल्या पाव शतकात इतर राज्यांतली भाजपची कामगिरी कितीही वर-खाली झाली तरी गुजरातनं नेहमीच भाजपला साथ दिली. राजकीय हिंदुत्व खऱ्या अर्थानं रुजवण्यात भाजपला यश आलेलं राज्य गुजरात हे आहे. भाजपच्या गुजरातमधल्या उदयाआधी तिथं काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि त्यात माधवसिंह सोळंकींनी जमवलेल्या क्षत्रीय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम या समूहांच्या एकत्रीकरणाचा वाटा मोठा होता. यातून बाजूला पडलेल्या सामाजिक उतरंडीमधल्या वरिष्ठ समजल्या जाणाऱ्या जाती, खासकरून व्यापार-शेतीत प्रभुत्व असलेला पाटीदार किंवा पटेल समाज भाजपकडं गेला. या जातगटांच्या आघाडीला हिंदुत्वाची फोडणी देत भाजपनं गुजरातमध्ये पाय रोवले, त्याला आता दोन दशकं उलटून गेली. विकासाचा डंका वाजवत हिंदुत्वाचं उघड ध्रुवीकरणाचं राजकारण हे गुजरातच्या भाजपवर्चस्वाचं सूत्र राहिलं आहे. यात सातत्यानं हिंदुत्वविरोधी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला खलनायकाच्या रूपात रंगवणं शक्‍य होतं. मोदींनी ते मागच्या सगळ्या निवडणुकांमध्ये यथासांगपणे केलं आहे. हिंदूहिताचं रक्षण करणारा भाजप आणि मुस्लिमांचं लांगूलचालन करणारा काँग्रेस अशा प्रतिमा रंगवण्याचा खेळ गुजरातमध्ये भाजपच्या पथ्यावर पडणारा होता. ‘आम्ही पाणी श्रावणात दिलं...ते सत्तेत असते तर रमजानमध्ये दिलं असतं’ यासारखी भाषा मागच्या निवडणुकांत वापरली गेली. त्याचा लाभही भाजपला झाला. या वेळी पहिल्यांदाच भाजपनं स्क्रिप्ट लिहावं आणि इतरांनी फरफटत जावं, अशी स्थिती नाही. पक्षाचं अध्यक्षपद निश्‍चित झालेले राहुल गांधी आर्थिक आघाडीवरच्या कच्च्या दुव्यांवर तुटून पडताना, भाजपला पलटवार करण्याची संधी मिळणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेत असल्याचं प्रचारादरम्यान दिसत होतं. ट्‌विटरवरून त्यांनी सुरू केलेली प्रश्‍नमालिका लक्ष वेधून घेणारी होती. काँग्रेसला हिंदूविरोधी रंगवण्याची संधी द्यायची नाही, असा चंग बांधल्यासारखा काँग्रेसचा प्रचार होता. राहुल यांनी अनेक मंदिरांच्या वाऱ्या केल्या, ज्यावर भाजपला आक्षेप घ्यावा असं वाटलं. कळत-नकळत हिंदुत्वाच्या भावनेला चुचकारण्याचा प्रयोग काँग्रेसही करू लागला. यावर लोक किती विश्‍वास ठेवतात, त्याचा लाभ किती हे निकालच सांगेल; पण भाजपच्या नेहमीच्या ट्रॅपमध्ये निदान प्रचारादरम्यान तरी अडकायचं नाही, यासाठी काँग्रेसनं पराकाष्ठा केली. गुजरातमध्ये २२ वर्षं भाजपचं राज्य आहे आणि एवढा मोठा काळ कुठंही प्रस्थापितविरोधी जनमत तयार व्हायला पुरेसा असतो. आधी तसं ते झालं नाही, याचं एक कारण म्हणजे मोदींनी नेहमीच निवडणुकीत ‘केंद्रातलं सरकार गुजरातच्या विकासाआड येतं’ अशी हाकाटी पिटण्याचा यशस्वी प्रयोग केला. गुजराती अस्मितेचा मुद्दा ते हिरीरीनं मांडत. मोदींना गुजरातच्या अस्मितेचं प्रतीक बनवल्यानंतर त्यांच्यावर होणारी कोणतीही टीका म्हणजे गुजरातवरचा हल्ला असल्याचा प्रचार करणं सोपं होतं. मोदी याआधीच्या सर्व निवडणुकांत केंद्राला, म्हणजेच तिथं सत्तेवर असलेल्या काँग्रेसला, कोणत्याही न झालेल्या कामांसाठी जबाबदार धरत. आता ती संधी गेली आहे. केंद्रात खुद्द मोदींचंच सरकार आहे; तेही बहुमतानं निवडून दिलं गेलेलं. मोदींची प्रतिमाही अशी की ते ठरवतील ते करायला समर्थ आहेत आणि राज्यात त्यांच्या नावानं राज्य करणं एवढंच नेमलेल्या मुख्यमंत्र्याचं काम आहे. साहजिकच आता गुजरामध्ये शेतकऱ्यांत, व्यापाऱ्यांत जो रोष आहे, उद्योगांचा विकास झाला; मात्र रोजगार का मिळत नाही, यांसारखे बोचणारे जे प्रश्‍न आहेत, त्यांची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलायची सोय नाही. गुजरातमध्ये दीर्घ काळ सत्तेवर नसल्यानं तिथल्या कोणत्याही प्रश्‍नांची जबाबदारी घेण्यापासून काँग्रेस पक्ष मुक्त आहे. आता केंद्रातही सत्ता नसल्यानं ‘काँग्रेस पक्षच गुजरातच्या प्रगतीत अडथळा बनतो,’ या प्रचारातूनही सुटका झाली आहे.

गुजरात मॉडेलचं यशापयश, पटेलांचं आरक्षण, शेतकऱ्यांच्या रास्त भावाच्या मागण्या, जीएसटी- नोटबंदीचा परिणाम यांसारख्या लोकांच्या जगण्याशी जोडलेल्या मुद्द्यांपेक्षा प्रचार भावनिक पातळीवर आणण्याचा, ध्रुवीकरणाकडं नेण्याचा प्रयोग पहिल्या टप्प्यातला प्रचार संपताना रंगात आला होता. पाटीदारांचा नेता हार्दिक पटेल, ओबीसींचं संघटन करणारा अल्पेश ठाकूर आणि दलितांचा युवा नेता जिग्नेश मेवाणी हे त्रिकूट भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या साथीला आलं आहे. या तिघांनाही मिळणारा प्रतिसाद भाजपला चिंता वाटायला लावणारा आहे. खासकरून हार्दिक पटेलच्या सभांना प्रचंड गर्दी होते.  त्याला प्रसिद्धी मिळणार नाही, अशी कितीही चोख व्यवस्था केली तरी सोशल मीडियावरून होणारा गाजावाजा भाजपसाठी डोकेदुखी वाढवणारा आहे. यातूनच प्रचाराची दिशा भावनिक मुद्द्यांवर वळवणं हा हातखंडा प्रयोग गुजरातमध्ये अनिवार्यपणे सुरू झाला. ‘आपण देशभक्त आणि विरोधक देशविरोधी’ हे भाजपच्या प्रचाराचं हुकमी सूत्र असतं. तेही गुजरातच्या प्रयोगशाळेतच तयार झालेलं. ते सूत्र देशाच्या काही भागांत चाललं, काही भागांत नाही. आताही सर्जिकल स्ट्राईकविषयीची काँग्रेसची भूमिका, डोकलाममध्ये चिनी आणि भारतीय जवान एकमेकांसमोर ठाकले असताना राहुल यांनी चिनी दूतावासात घेतलेली भेट हे भाजपच्या प्रचाराचे मुद्दे तेच सूत्र पुढं नेण्यासाठी वापरले गेले आहेत. रोहिंग्यांचा प्रश्‍न आणि हाफिज सईदची पाकमधली सुटका हेदेखील प्रचारात वापरले जाणारे मुद्दे आहेत. राहुल हे हिंदू आहेत की नाहीत, यासारखा मुद्दा वादाचा बनवण्याचा प्रयत्न झाला. सोमनाथमंदिराला त्यांनी भेट दिली तेव्हा अहिंदूंसाठीच्या रजिस्टरमध्ये त्यांच्या नावाची नोंद कुणीतरी केली आणि चॅनेलचर्वणाला विषय मिळाला. या वादात खरंतर पारपंरिक पद्धतीनं काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली असती तर भाजपच्या जाळ्यात प्रचार सापडला असता. मात्र, राहुल ‘जानवेधारी हिंदू’ असल्याचा शोध काँग्रेसनं लावला आणि सारं घराणंच शिवभक्त असल्याचाही साक्षात्कार जगाला दिला. देशव्यापी पक्ष म्हणून दीर्घ काळच्या वाटचालीत याप्रकारचं धर्माचं प्रदर्शन किती रास्त, असा आक्षेप काँग्रेसवर घेतला जाणं स्वाभाविकच. मात्र, निवडणुकीच्या आखाड्यात हिंदुत्वाच्या चालीला हिंदुत्वाचीच प्रतिचाल देण्याचा प्रयोग काँग्रेसनं केला. विरोधकांकडून झालेलं एखादं निसटतं विधान असं वापरायचं की प्रचाराला कलाटणीच मिळाली पाहिजे, हे तंत्रही भाजपला साधलं आहे. अशी संधीच द्यायची नाही, यासाठी काँग्रेसचा आटोकाट प्रयत्न सुरू होता. एक निवडणुकीत सोनियांनी केलेल्या ‘मौत का सौदागर’ या उल्लेखाचा मोदींनी घेतलेला लाभ काँग्रेसला धसका घ्यायला लावणारा होता. ‘चहावाला’ म्हणून मोदींची संभावना करण्याचा लोकसभा निवडणुकीतला काँग्रेसचा बाष्कळपणाही मोदी यांनी काँग्रेसवर - कायमच लक्षात राहील अशा पद्धतीनं - उलटवला होता. अशाच संधीची भाजपवाले जणू वाट पाहत होते आणि पहिल्या टप्प्याचा प्रचार संपता संपता ही संधी काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी मोदींच्या अक्षरशः हातात दिली. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख करताना पाळायची सभ्यताही अय्यर विसरून गेले आणि त्यांनी वापरेल्या ‘नीच’ या शब्दाचा भाजपनं पुरेपूर लाभ उठवला. अय्यर यांना माफी मागायला लावणं आणि पक्षातून निलंबित करणं यातून ‘चूक झाली तरी कारवाई करताना हयगय केली नाही,’ असं सांगण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दिसतो आहे. मोदींचं गुजरातमधलं स्थान पाहता अय्यर यांची माफी, राहुल यांनी केलेली तडकाफडकी कारवाई या बाबींची दखल मतदार किती घेणार हा प्रश्‍नच आहे. मात्र, काँग्रेसनं एक सेल्फ गोल नोंदवला यात शंकाच नाही. अय्यर यांची जीभ घसरली आणि त्याबद्दल त्यांना दोष द्यायलाच हवा. मात्र, भाजपनंही यापूर्वी इतर पक्षांतल्या नेत्यांना काय कमी दूषणं दिली आहेत? भाजपवाल्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची खिल्ली उडवणं, त्यांना निकम्मा ठरवणं हे कोणत्या सभ्यतेत बसणारं होतं? किंवा मोदींनीच सोनियांचा निर्देश ‘जर्सी गाय’ असा करणं हे कसली मूल्यं पाळणारं होतं? ‘पचास करोड की गर्लफ्रेंड’ हा शशी थरूर यांच्यावरचा हल्ला तरी कसली अभिरुची जपणारा होता? आताही भाजपकडून हार्दिक, अल्पेश आणि जिग्नेश या तरुण नेत्यांचा - त्यांच्या नावांची इंग्लिश आद्याक्षरं एकत्र करून - ‘हाज’ असा उल्लेख करणं हे काय दाखवतं?

यशाची खात्री उरली नाही की जे घडतं ते सारं गुजरातमध्ये सुरू झालं आहे. काँग्रेसला मंदिरं आठवणं असो की भाजपनं ‘औरंगजेब’, ‘खिलजी’ आदींना प्रचारात उतरवणं असो, राहुल यांच्या कार्यालयातील गांधीजींच्या फोटोऐवजी ‘बाबरा’चं चित्र लावून भ्रम तयार करण्याचे प्रयत्न असोत... या सगळ्यातून दर्शन घडतं ते मुद्द्यांवर विश्‍वास नसल्याचंच. गुजरातची लढत अशी भलत्या कारणांनी गाजत असली तरी ती चुरशीची झाली आहे हेही खरंच. आता खरा मुद्दा असेल आखाड्यातली दिसणारी चुरस मतपेटीत आणायची तर त्यासाठीच्या तळातल्या संघटनाचा. यात भाजपची यंत्रणा अधिक शिस्तबद्ध आणि अनुभवीही आहे. तीन तरुण नेत्यांसह राहुल गांधींनी जमवलेलं सोशल इंजिनिअरिंग, निरनिराळ्या समाजघटकांतली नाराजी याचा लाभ काँग्रेसला होणार की मोदी यांचा करिष्मा भारी ठरणार याचा फैसला गुजरात करेलच. यात सरशी कुणाचीही झाली तरी निवडणूक लक्षात राहील ती भरकटलेल्या प्रचारामुळं. निवडणुका हे लोकांपर्यंत धोरणं, विचारसरणी नेण्याचं साधन मानण्याचे दिवस आता संपले आहेत. दुसऱ्याचं प्रतिमाभंजन करून वातावरण मॅनेज करणं ही कला मानली जाऊ लागली आहे. गुजरातची निवडणूक याच वाटचालीतलं आणखी एक आवर्तन बनली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shriram pawar write gujarat assembly elections article in saptarang