करुणानिधींनंतर... (श्रीराम पवार)

रविवार, 19 ऑगस्ट 2018

एम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे.
करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी त्यांचा मधला मुलगा अळगिरी यांनी अद्याप शस्त्रं खाली ठेवलेली नाहीत.

एम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे.
करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी त्यांचा मधला मुलगा अळगिरी यांनी अद्याप शस्त्रं खाली ठेवलेली नाहीत.
स्टॅलिन यांची वाट सोपी नक्कीच नाही. दुसरीकडं तमिळनाडूत स्पष्टपणे दिसणारी राजकीय पोकळी थेटपणे किंवा स्थानिक पक्षांच्या खांद्यावर बसून भरण्यासाठी भाजप, कॉंग्रेस यांच्यासारखे राष्ट्रीय पक्षही या स्पर्धेत उतरतील. ज्यांच्याभोवती तमिळ राजकारणातलं "स्टार वॉर' केंद्रित होतं ते करुणानिधी आणि जयललिता हे दोन्ही तारे आता अस्तंगत झाले आहेत. आता तमिळ राजकीय विश्‍वाला नवा दक्षिण ध्रुव शोधावा लागेल किंवा लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्त्वांच्या अभावी सहमतीचा आणि तडजोडींचा मार्ग धरावा लागेल.

साधारणतः दोन वर्षांपूर्वी तमिळनाडूच्या राजकारणातून जयललितांची एक्‍झिट झाली, तर नुकतीच करुणानिधींचीही. दोन वेगळ्या धाटणीची; मात्र आपल्या नेतृत्वानं तमिळ राजकारणाला आकार देणारी व्यक्तिमत्त्वं काळाच्या पडद्याआड जाताना तमिळनाडू खऱ्या अर्थानं राजकीयदृष्ट्या कूस बदलतो आहे. तमिळनाडूतल्या या राजकीय घडामोडींचे पडसाद एरवी राष्ट्रीय पक्षांना पायही रोवू न देणाऱ्या आणि तमिळ अस्मितेभोवती फिरणाऱ्या तमिळ राजकारणात तर उमटतीलच; पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीकडं देश जात असताना राष्ट्रीय राजकारणातही ते उमटतील.
करिष्मा आणि व्यक्तिपूजा ही वैशिष्ट्यं असलेल्या तमिळ राजकारणात करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतर लोकांवर तसं गारुड करणारी अफाट क्षमता असलेला नेता उरलेला नाही. सिनेमातून राजकारणात येऊन राज्यावर अंकुश ठेवण्याची परंपरा तिथं आहेच. गेली पाच दशकं राजकीय रंगमंच व्यापून टाकणारे एम. जी. रामचंद्रन, जे. जयललिता आणि एम. करुणानिधी या तिघांनाही मुळात सिनेमाची पार्श्‍वभूमी होती. ही पंरपरा पुढं नेण्याच्या प्रयत्नात रनजीकांत आणि कमल हासन यांच्यासारखे सुपरस्टार सरसावत आहेत. मात्र, तमिळ राजकारणातल्या द्रविड मुन्नेत्र कळघमचं तळापर्यंत पसरलेलं बळकट संघटन, विचारसरणी आणि अण्णा द्रमुकचं लोकातलं अपिल यांचा अभाव या दोघांकडंही आहे. केवळ ग्लॅमर आणि "सध्या सारं बिघडलेलं आहे,' हा सूर किती जनसमर्थन त्यांना मिळवून देईल हा प्रश्‍नच आहे. अण्णा द्रमुकमधले वाद कायम आहेत आणि जयललिता यांच्यानंतर या पक्षाची वाटचाल जहाज भरकटल्यारखी सुरू आहे, तर त्या तुलनेत करुणानिधी यांनी अधिक योजनाबद्धपणे पक्षाची पुढील वाटचाल ठरवून दिली आहे. करुणानिधींचा वारस म्हणून स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली आहे. करुणानिधींनी जोपासलेलं कार्यकर्त्यांचं संघटन स्वतःसोबत ठेवणं आणि विश्‍वासार्ह पर्याय म्हणून उभं राहणं हे स्टॅलिन यांच्या समोरचं आव्हान आहे. दुसरीकडं तमिळनाडूत स्पष्टपणे दिसणारी राजकीय पोकळी थेटपणे किंवा स्थानिक पक्षांच्या खांद्यावर बसून भरण्यासाठी भाजप, कॉंग्रेससारखे राष्ट्रीय पक्षही या स्पर्धेत उतरतील. आधी करुणानिधी आणि एमजीआर व नंतर करुणानिधी आणि जयललिता यांच्यातला सरळ सामना असं दीर्घ काळ स्वरूप असलेल्या द्रविडी राजकारणातला नवा अध्याय सुरू होतो आहे. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं. हा माणूस लेखक होता, कविमनाचा होता, कडवा नास्तिक होता, तमिळ हक्कांसाठी काहीही करायला तयार असणारा आक्रमक तमिळवादी होता, कणखर प्रशासक होता, संवादाची अपार हातोटी लाभलेला नैसर्गिक वक्ता होता, आघाड्यांच्या राजकारणातला दमदार खेळाडू होता, नेत्याला दैवत मानणाऱ्या तमिळ राजकीय विश्वाताला हा शेवटचा तारा. द्रविडी अस्मितेची मशाल पेटवणाऱ्यांतला शेवटचा दुवा. करुणानिधींना प्रचंड आयुष्य लाभलं. उणंपुरं 94 वर्षांचं. त्यातली जवळपास आठ दशकं करणानिधी सार्वजनिक जीवनात वावरत होते. या माणसानं लोकांचं प्रचंड प्रेम अनुभवलं आणि विरोधकांचा टोकाचा दुस्वासही. इतका की वृद्धापकाळात विरोधातल्या जयललिता सरकारनं पोलिसांकरवी त्यांना अक्षरशः खेचून रस्त्यावर आणलं. करुणानिधींचं जीवन सरळ-साधं नव्हतंच आणि वादांपासून अलिप्तही नव्हतं. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. घराणेशाही तर त्यांनी उघडपणे जोपासली. पक्षावर घराण्याचं वर्चस्व राहील याची पुरेपूर काळजी घेतली.

एक करुणानिधी एक्‍झिट घेतो तेव्हा राजकारणातलं, साहित्यातलं, चित्रपटातलं, सामाजिक चळवळीतलं, एक दीर्घ पर्व इतिहासाचा भाग बनतं. द्रविडी चळवळींखेरीज तमिळनाडूच्या राजकीय इतिहासाचं आकलन होत नाही आणि रामस्वामी पेरियार ते एमजीआर आणि करुणानिधींशिवाय राजकारण पुरं होतं नाही. एमजीआर, त्यांच्याच शिष्या जयललिता आणि करुणानिधी यांनी तमिळ राजकारण व्यापून टाकलं होतं. त्यांच्या पश्‍चात उरली आहे ती या उत्तुंग नेत्यांच्या सावल्यांमधली हाणामारी. अण्णा द्रमुकमध्ये सत्ताधारी ईपीएस-ओपीएस गट आणि शशिकला-दिनाकरन यांच्यातली सुंदोपसुंदी सुरूच आहे, तर द्रमुकनं स्टॅलिन यांना नेतृत्व दिलं असलं तरी करुणानिधींचा थोरला मुलगा अळगिरी यांनी अद्याप शस्त्रं खाली ठेवेलली नाहीत.
तमिळ राजकारणानं करुणानिधींच्या हयातीत कितीतरी वळणं घेतली. अत्यंत टोकाचा हिंदीविरोध, ब्राह्मण्यवादाला विरोध आणि त्यापायी धर्मच नाकारून संपूर्ण नास्तिकेचा जाहीर स्वीकार ते "तमिळ अस्मिता ठीक आहे; पण नास्तिकतेवर भर कशाला?' असं विचारलं जाण्यापर्यंतची वळणं तमिळ राजकारणानं अनुभवली आहेत. करुणानिधी मात्र अखेरपर्यंत कडवे नास्तिक राहिले. देवधर्मवादाला त्यांनी ना व्यक्तिगत आयुष्यात थारा दिला ना सार्वजनिक जीवनात त्याचा बडेजाव माजू दिला. तमिळनाडूत नेत्याला सगळ्या गुण-दोषांसकट तारणहार मानण्याची प्रथा नवी नाही, त्यामुळेचं एमजीआर असोत की जयललिता... त्यांच्या निधनानंतर शोकाचा अविवेकी आविष्कार तिथं घडतो. करुणानिधींबाबतही हेच घडलं. करुणानिधी 94 वर्षांचे. अलीकडची त्यांची तब्येत जगजाहीर होती. तरीही त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच 24 जणांनी आत्महत्या केली. हे असलं सुपरस्टारपद सांभाळणं सोपं नाही. ते सांभाळणाऱ्यांच्या मालिकेतले करुणानिधी हे अखरचे राजकारणी ठरावेत. सिनेमा आणि राजकारण यांचं एकात्म होणं जेवढं तमिळनाडूत घडलं, तेवढं अन्य कोणत्याही राज्यात झालं नाही. याचे नायक होते करुणानिधी आणि एम. जी. रामचंद्रन. द्रमुकचे पहिले मुख्यमंत्री अण्णा दुराई, करुणानिधी आणि एमजीआर हे तिघंही पेरियार रामस्वामींच्या द्रविड चळवळीतले घटक. पेरियार यांचा सारा भर सामाजिक सुधारणांवर, बुद्धिवादी चळवळीवर आणि सर्व प्रकारच्या परंपरा आणि त्यातल्या विषमतेला लाथाडण्यावर होता. हे सारे गुण त्यांच्या शिष्यांनी जमेल तेवढे उचलले. राजकारणात चालवता येतील तेवढे चालवले. गरजेनुसार तडजोडीही केल्या. कदाचित यामुळेच या तिघांच्या द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या स्थापनेला पेरियार यांची मान्यता नव्हती. मात्र, या तिघांनाही पेरियार यांच्या कल्पनेतला द्रविडवाद प्रत्यक्षात आणण्यासाठी सत्तेचं राजकारण आवश्‍यक वाटत होतं. करुणानिधी रस्त्यावरच्या आंदोलनांबाबत आणि संघटनाबाबत सक्रिय होतेच आणि त्यासाठी अनेकदा तुरुंगवासही त्यांनी भोगला. द्रविड चळवळीचा गाभा असलेला ब्राह्मण्यविरोध ठासून मांडण्यासाठी त्यांनी माध्यम निवडलं ते सिनेमाचं आणि ते कमालीचं यशस्वी ठरलं. "करुणानिधींचे संवाद म्हणजे हमखास यशाची खात्री' असा एक काळच त्यांनी आपल्या लेखणीच्या बळावर तयार केला. तमिळ राष्ट्रावादाचा तडका असणारा हिंदीविरोध, धर्मविरोध हे सारे घटक त्यांनी सिनेमातून कमालीच्या सफाईनं मांडले. एमजीआर यांचा नायक करुणानिधींचे डायलॉग रुपेरी पडद्यावर बोलायचा तेव्हा त्याचा परिणाम तमिळ राष्ट्रवादानं भारलेली एक पिढीच तयार होण्यात झाला.

करुणानिधींची लोकप्रियता 1950 आणि 60 च्या दशकात टिपेला होती. सन 1957 च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी निवडणुकीत कधीच पराभव पाहिला नाही. 13 वेळा आमदार आणि पाच वेळा मुख्यमंत्री झालेल्या करुणानिधींनी राजकारणातले अनेक बदल पचवले. प्रत्येक अपयशानंतर संधी मिळताच पुन्हा झळाळून उठण्याची किमया त्यांनी दाखवली. राज्यातल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्याची चूक त्यांनी दोन वेळा केली. पहिल्यांदा एमजीआर यांच्या लोकप्रियतेचा अंदाज न घेता त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर एमजीआर हयात होते तोवर करुणानिधींना सत्ता मिळाली नाही. एमजीआर यांच्या पश्‍चात जयललितांबाबतही त्यांचा अंदाज चुकला. द्रविड राष्ट्रवादावर पोसलेल्या राज्यात जयललितांचं ब्राह्मण असणं स्वीकारलं जाणार नाही हा त्यांचा कयास जयललितांनी फोल ठरवला. तोवर पेरियारप्रणित चळवळीची सूत्रंही पातळ झाली होती. करुणानिधींचं सरकार दोनदा केंद्रानं बरखास्त केलं. एकदा आणीबाणीत आणि नंतर श्रीलंकेतल्या एलटीटीईचे सहानुभूतिदार असल्याच्या आरोपातून. यातल्या कशाचीच त्यांनी खंत बाळगली नाही.

करुणानिधींनी उघडपणे सांगितलं, "प्रभाकरन हा माझा मित्र आहे. तो दहशतवादी आहे, असं मी मानत नाही. त्याची पद्धत चुकीची असेल, ध्येय नव्हे.' प्रभाकरन आणि एलटीटीईनं श्रीलंकेत हाहाकार माजवलाच; पण तो राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातला आरोपीही होता. अशा दहशतवाद्याला उघडपणे मित्र म्हणणाऱ्या करुणानिधींवर एलटीटीईशी संबंधांबाबत टीका झाली, त्याच करुणानिधींनी तमिळ राष्ट्रवाद भारतीय संघराज्याच्या चौकटीत बसवण्याचं कामही केलं. ज्या माणसानं आयुष्यभर देवधर्माला केवळ विरोधच केला असं नव्हे, तर टिंगलही केली, तो मरणशय्येवर असताना त्याचे कित्येक चाहते मंदिरांमधून प्रार्थना करत होते. एका सिनेमाच्या कथानकात न मावणारं असं झंझावाती आयुष्य करुणानिधींच्या वाट्याला आलं. अखेरच्या टप्प्यात करुणानिधी आणि त्यांचा पक्ष राज्यात आणि केंद्रातही सत्ताहीन झाला होता. भ्रष्टाचार, घराणेशाही ते पर्यावरण उद्‌ध्वस्त करणारी धोरणं राबवण्यापर्यंतचे अनेक आक्षेप ज्यांच्यावर घेतले गेले, ते करुणानिधी गेले तेव्हा लाखो तमिळ नागरिक घरचंच कुणीतरी गेल्यासारखं रडत होते. दंतकथेसारखं लोकमानसात रुतून बसणारं आयुष्य करुणानिधी जगले. असा कलैग्नार होणे नाही! जयललितांपाठोपाठ करुणानिधींची एक्‍झिट तमिळ राजकारणाच्या प्रचलित चौकटींची मोडतोड करणारी आहे. दोघांच्या मागं उरलेले वारशाचे दावेदार त्यांचा वारसा चालवायला फारच तोकडे आहेत. आता तमिळनाडूत रंगेल तो तुलनेत खुज्यांचा संघर्ष. ज्यात राष्ट्रीय पक्षांनाही संधी दिसायला लागली आहे, जी अण्णा दुराई ते करुणानिधी व्हाया जयललिता यांनी कधीच मिळू दिली नव्हती.

करुणानिधी आणि जयललिता यांच्या पश्‍चात तमिळ राजकारण नव्या वळणावर आलं आहे. एका नेत्याच्या करिष्म्यावर पक्षाला तारून नेण्याचे दिवस संपल्यात जमा आहेत. त्यातल्या त्यात करुणानिधींचे पुत्र स्टॅलिन अशी क्षमता दाखवू शकतात. मात्र, करुणानिधींच्या तुलनेत तूर्त तरी ते अपुरेच दिसतात. जयललितांची एक्‍झिट तशी अनपेक्षित होती आणि एमजीआर यांच्याप्रमाणे त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची निश्‍चिती केली नव्हती. एमजीआर यांच्यानंतर जयललितांची कितीही कोंडी करायचा प्रयत्न झाला तरी त्यांनी आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्यात यश मिळवलं. जयललिता यांच्यानंतर मात्र अण्णा द्रमुकची अवस्था भरकटलेल्या जहाजासारखी होते आहे. पक्षातली गटबाजी तर उफाळून आलीच. मात्र, जयललितांसारखी प्रशासनावर किंवा राजकारणावर हुकमत कुणाचीच नसल्यानं अण्णा द्रमुकच्या
सत्तेच्या वाटाघाटीत मध्यस्थीची भूमिका बजावायची संधी दिल्लीकरांना म्हणजे भाजपच्या नेतृत्वाला मिळाली. तुलनेत द्रमुकची अवस्था बरी आहे. स्टॅलिन यांच्या रूपानं पक्षाचं नेतृत्व कोण करणार याची स्पष्टता करुणानिधींच्या हयातीतच झाली. करुणानिधींना खरंतर त्यांचा सर्वात थोरला मुलगा मुथू याला राजकारणात प्रस्थापित करायचं होतं. मात्र, तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर अळगिरी आणि स्टॅलिन यांच्यात नेतृत्वाची स्पर्धा सुरू झाली.

यात अखेरच्या टप्प्यात चेन्नईत वर्चस्व ठेवून असलेल्या स्टॅलिन यांनी बाजी मारली. वडिलांप्रमाणेच 14 व्या वर्षी राजकारणात सक्रिय झालेल्या स्टॅलिन यांनी यशापयशाचे फेरे अनेकदा अनुभवले. त्यांनी आणीबाणीत तुरुंगवास भोगला होता. दोन वेळा चेन्नईचं महापौरपद, एकदा राज्याचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं. मात्र, मागच्या निवडणुकीत प्रचारात द्रमुकचं नेतृत्व करताना त्यांना जयललितांना रोखता आलं नव्हतं, तसंच अलीकडं झालेल्या लोकसभेसाठीच्या पोटनिवडणुकीतही द्रमुक तिसऱ्या क्रमांकावर गेला. करुणानिधींचा करिष्मा नसताना स्टॅलिन यांना आता पक्ष सांभाळायचा आहे. तमिळ राजकारणात आजघडीला संघटन आणि अनुभव या दोन्ही आधारांवर स्टॅलिन हे इतरांहून उजवा प्रतिस्पर्धी आहेत. करुणानिधींनी राज्यात स्टॅलिन आणि दिल्लीतलं राजकारण सांभाळायला स्टॅलिन यांची सावत्रबहीण कनिमोळी यांची निवड करून ठेवली होती.

करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतर तमिळ राजकारणाचा पोत काय राहणार हा केवळ त्या राज्यापुरता मुद्दा नाही, तर लोकसभेतल्या जागांचं गणित पाहता तो राष्ट्रीय राजकारणासाठीही लक्षवेधी भाग आहे. त्यादृष्टीनं या दोन बड्या नेत्यांनंतर तयार होणाऱ्या स्थितीत तमिळनाडूत जवळपास पाच दशकं राष्ट्रीय पक्षांना नाकारलेली स्पेस मिळणार काय हा एक पाहण्यासारखा मुद्दा आहे. सन 1967 मध्ये तमिळनाडूत कॉंग्रेसचं सरकार गेलं आणि द्रमुकनं सत्ता मिळवली. त्यानंतर कधी द्रमुक तर कधी त्यातूनच बाहेर पडलेला अण्णा द्रमुक यांनीच राज्यात सत्ता टिकवली. इतकंच नव्हे तर, लोकसभेच्या बहुतांश जागाही हेच पक्ष जिंकत आले आहेत. जयललिता यांनी राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांशी आणि दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी अनेकदा केली तरी तमिळनाडूत त्यांना शिरकाव करू दिला नाही. करुणानिधी तर राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिकवादाचं प्रतीकच होते. या स्थितीत जयललितांच्या नंतर सत्तेचे वारसदार म्हणून पुढं आलेले पलानीस्वामी आणि पनिरसेल्व्हम किंवा सत्तेच्या हाणामारीत तूर्त बाजूला पडलेल्या शशिकला, दिनाकरन आदींना दिल्लीला हस्तक्षेप करू न देता दिल्लीशी संधान ठेवणं कितपत जमणार हा प्रश्‍नच आहे. करुणानिधींचे वारसदार स्टॅलिन यांचीही या मुद्द्यावर कसोटीच लागणार आहे. स्टॅलिन यांना करुणानिधींनीच वारसदार नेमलं असलं तरी भाऊ अळगिरी सहजी हे मान्य करणार नाही. यातून पक्षांतर्गत संघर्षाला तोंड द्यावंच लागेल. तमिळनाडूत अण्णा द्रमुक आणि द्रमुकशिवाय अनेक छोटे प्रादेशिक पक्ष आहेत. शिवाय, सिनेमातून राजकारणात येणाऱ्यांना प्रंचड यश मिळण्याची पंरपरा असलेल्या राज्यात कमल हासन आणि रजनीकांत यांच्यासारख्या लोकप्रिय कलाकारांना आता आपली वेळ आल्याची स्वप्नं पडू लागली आहेत. त्यांच्या साठमारीत भाजप आणि कॉंग्रेस पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षांना तमिळनाडूत प्रस्थापित करण्याची संधी म्हणून पाहण्याची शक्‍यता आहे. भाजप अलीकडेपर्यंत अण्णा द्रमुकमधल्या भांडणाऱ्या गटात समझोता घडवत तिथं चंचुप्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. रजनीकांतच्या पक्षाआडूनही भाजपच फासे टाकत असल्याचं सांगितलं जातं. अलीकडं मात्र अण्णा द्रमुकचे नेते भाजपवर टीका करू लागले आहेत. लोकसभेतल्या अविश्‍वास ठरावात या पक्षानं मतदान भाजपच्या बाजूनं केलं तरी आपली धुसफूस मांडलीच होती. करुणानिधींच्या अंत्यसंस्कारांसाठी मरिना बीचवर परवानगी नाकारण्याचा निर्णय अण्णा द्रमुकच्या सरकारनं घेतला तेव्हा भाजपचे राज्यातले नेते त्याविरोधात बोलत होते. यातून भाजप कदाचित द्रमुकशी जवळीक साधण्याचाही प्रयत्न करेल असं सांगितलं जातं. भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतात कमाल पातळीचं यश मिळालं आहे. येत्या निवडणुकीत ते टिकवणं हेच आव्हान आहे. या स्थितीत पश्‍चिम बंगाल, ईशान्य आणि दक्षिणी राज्यांतून कुमक मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, तर द्रमुकला भाजपविरोधी आघाडीचा घटक बनवण्यासाठी कॉंग्रेसचा प्रयत्न असेल. जयललिता आणि करुणानिधी यांच्या वारसदारांपुढं राष्ट्रीय पक्षांना तमिळ राजकारणात सीमित ठेवण्याचं आव्हान आहे, तसंच आतापर्यंत तमिळ अस्मिता किंवा उत्तरेच्या विरोधातला तमिळ प्रादेशिकवादाचा सूर यापुढं किती उरतो हेही लक्षवेधी असेल.

ज्यांच्याभोवती तमिळ राजकारणातलं "स्टार वॉर' केंद्रित होतं ते दोन्ही तारे आता अस्तंगत झाले आहेत. आता तमिळ राजकीय विश्‍वाला नवा दक्षिण ध्रुव शोधावा लागेल किंवा लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्त्वांच्या अभावी सहमतीचा आणि तडजोडींचा मार्ग धरावा लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shriram pawar write m karunanidhi article in saptarang