अमेरिकेचा स्वयंगोल... (श्रीराम पवार)

रविवार, 22 जुलै 2018

जागतिक व्यापार असो, परराष्ट्रसंबंध असोत की जागतिक तापमानवाढीसारखे मुद्दे असोत... प्रचलित मळवाट सोडून अमेरिकेची धोरणदिशाच बदलू पाहत असलेले डोनाल्ड ट्रम्प आणि शीतयुद्धात पीछेहाट झाली तरी जगाच्या व्यवहारात आक्रमकपणे रशियाचं महत्त्व ठसवू पाहणारे व्लादिमीर पुतीन यांच्यातल्या बैठकीकडं जगाचं लक्ष असणं स्वाभाविकच. या परिषदेत ट्रम्प यांनी पुतीन यांना अमेरिकेतल्या निवडणूक-हस्तक्षेपापासून ते क्रीमियाला गिळंकृत करण्यापर्यंत आणि सीरियातल्या भूमिकेपासून ते माजी गुप्तहेरावर झालेल्या हल्ल्यापर्यंत ते युक्रेनमधल्या हस्तक्षेपापर्यंतच्या मुद्द्यांवर चार खडे बोल सुनवावेत अशी अपेक्षा होती.

जागतिक व्यापार असो, परराष्ट्रसंबंध असोत की जागतिक तापमानवाढीसारखे मुद्दे असोत... प्रचलित मळवाट सोडून अमेरिकेची धोरणदिशाच बदलू पाहत असलेले डोनाल्ड ट्रम्प आणि शीतयुद्धात पीछेहाट झाली तरी जगाच्या व्यवहारात आक्रमकपणे रशियाचं महत्त्व ठसवू पाहणारे व्लादिमीर पुतीन यांच्यातल्या बैठकीकडं जगाचं लक्ष असणं स्वाभाविकच. या परिषदेत ट्रम्प यांनी पुतीन यांना अमेरिकेतल्या निवडणूक-हस्तक्षेपापासून ते क्रीमियाला गिळंकृत करण्यापर्यंत आणि सीरियातल्या भूमिकेपासून ते माजी गुप्तहेरावर झालेल्या हल्ल्यापर्यंत ते युक्रेनमधल्या हस्तक्षेपापर्यंतच्या मुद्द्यांवर चार खडे बोल सुनवावेत अशी अपेक्षा होती. आपल्याला सगळं कळतं आणि कुणाशीही अमेरिकेच्या फायद्याचं डील आपणच करू शकतो, हा स्वभ्रम जोपासणाऱ्या ट्रम्प यांना पुतीन यांनी निर्विवाद चकवा दिला आणि पुतीन यांना कशासाठीही जबाबदार धरण्यापेक्षा ट्रम्प यांनी अमेरिकेल्या पूर्वसुरींवरच रशियाशी संबंध ताणलेले राहण्याबद्दल ठपका ठेवला. फिनलंडमधल्या हेलसिंकीत झालेल्या या बैठकीनंतर प्रचंड टीकेला सामोरं जाताना ट्रम्प सारवासारव करू लागले तरी या बैठकीतून अमेरिकेनं स्वयंगोलच करून घेतला आहे. पुतीन यांच्यासारख्या धूर्त नेत्याला आणखी काय हवं?

"आमच्या देशानं कित्येक वर्षं मूर्खपणा केला, नाहीतर तुमच्या देशाशी आमचे संबंध इतके वाईट झालेच नसते,' असं एका देशाचा सर्वोच्च नेता सांगतो तेव्हा दुसऱ्या देशाला आणखी काय हवं? आपल्या आधी सगळं बिघडलेलंच होतं आणि सगळं सावरायची जबाबदारी आपल्यावरच; किंबहुना आपल्याखेरीज हे कुणाला जमणारही नाही, असा ठाम समज करून घेतलेल्या आणि स्वप्रेमात आकंठ बुडालेल्या नेत्यांची जगात सध्या चलती आहे. या मंडळींना आपल्या पूर्वसुरींबद्दल आदर तर नाहीच; तुच्छतावाद मात्र न लपण्याइतका आहे. सगळ्या प्रश्‍नांवरची सोपी उत्तरं शोधायचा त्यांचा प्रयत्न असतो. ही उत्तरं अनेकदा लोकानुनयी आणि मूळ मुद्द्यापासून लोकांचं लक्ष भरकटवणारी असतात. अशा स्वप्रेमात अडकलेल्यांचे डोनाल्ड ट्रम्प हे शिरोमणी शोभावेत. ते जातील तिथं, मागच्या अमेरिकी अध्यक्षांनी कसं वाटोळं केलं, यावर कीर्तन करत असतात. रोनाल्ड रेगन यांच्यापासून बराक ओबामांपर्यंत त्यांच्या माऱ्यातून कुणीही सुटलेलं नाही. दुसऱ्या देशानं त्या देशाचं धोरण कसं ठरवावं, यावर आपली मतं असू शकतात; पण त्यासाठी जाहीरपणे त्या देशाच्या प्रमुखाला फटकारण्याला मुत्सद्देगिरी म्हणत नाहीत. मात्र, परराष्ट्र धोरणालाही कॉर्पोरेट डीलच्या अंगानं पाहणाऱ्या ट्रम्प यांना ते मान्य नसावं, म्हणूनच ब्रेक्‍झिटविषयी ब्रिटनमध्ये जाताना ते भलतंसलतं बोलतात आणि यजमानांची अडचण करू शकतात. मित्रांना दमबाजी, जमवून आणलेल्या करारांवर पाणी सोडणं, गुंतागुंतीच्या प्रश्‍नांवर रिऍलिटी शोसारखी दाखवेगिरी हे त्यांचं वैशिष्ट्य बनतं आहे. ट्रम्प "जी 7' देशांच्या परिषेदला गेले, तिथं परिषदेच्या घोषणापत्रावर सही करायला नकार देऊन परिषदेचा बट्ट्याबोळ करताना त्यांना फार काही वाटलं नाही. नाटो देशांच्या परिषदेला जाताना "जर्मनी हा रशियाच्या विळख्यात अडकलाय,' अशी टिप्पणी करून ते सहजपणे खळबळ उडवून देतात. रशियापासून नाटोनं संरक्षण करायचं तर मग रशियाच्या तिजोरीत भर पडणारे व्यवहार करता कशाला, हा ट्रम्प यांचा वरवर चोख वाटणारा युक्तिवाद; पण ते स्वतः रशियन स्ट्रॉंगमन व्लादिमीर पुतीन यांचं कौतुक करताना थकत नाहीत. "जी 7', नाटो, ब्रिटनदौरा या प्रत्येक ठिकाणी प्रचलित चालीला छेद देणारं काहीबाही बोलत जागतिक रचनेलाच धक्के देत चाललेल्या ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी भेटीच्या वेळी मात्र "जमेल तेवढं जमवून घ्यावं' असंच धोरण दाखवलं. "रशियाशी संबंध अत्यंत वाईट होत गेले, याचं कारण अमेरिकेचा मूर्खपणा' असं हा नेता जाहीरपणे सांगतो, तेव्हा पुतीन यांच्यासारख्या धूर्त नेत्याचं निम्मं काम होऊन जातं. लगेचच रशियाचं परराष्ट्र मंत्रालय ट्रम्पवाणीशी सहमती दाखवत "आम्ही हेच तर सांगतोय,' असा आविर्भाव आणतं, यात मग नवलं कसलं? यावर भडकलेल्या एका अमेरिकी नेत्यानं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसचं रूपांतर क्रेम्लिनच्या प्रचारयंत्रणेत केल्याची टीका केली. ट्रम्प ज्या रीतीनं पुतीन यांना सामोरे गेले, त्यावरून अमेरिकेत आणि पाश्‍चात्य जगात टीकेची झोड उठवली जात आहे. पुतीन आणि रशियानं अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत केलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दाच नाकारून सरळ शरणागती पत्करल्याचं अनेकजण मांडताहेत, तर पुतीन यांच्यासोबतची शिखर परिषद म्हणजे अमेरिकेसाठी भूराजकीय आत्महत्या असल्याचं निदान अनेकांनी केलं आहे. मात्र, अमेरिकेत परतल्यानंतर स्वपक्षातूनही विरोधाचा सूर समोर येत असल्याचं पाहून ट्रम्प यांनी पवित्रा बदलला. एका मुलाखतीत त्यांनी "निवडणुकीतल्या रशियन हस्तक्षेपाला त्या देशाचे अध्यक्ष या नात्यानं पुतीनही जबाबदार आहेत' असं सांगितलं. अर्थातच विरोधातलं वातावरण शांत करण्याचा हा प्रयत्न होता. ट्रम्प यांचं पुतीन यांच्याकडं झुकलेलं असणं यामुळं बदलत नाही. याचं कारण ट्रम्प यांच्या जागतिक व्यवहारांकडं पाहण्याच्या दृष्टिकोनात आहे.

ट्रम्प आणि पुतीन यांची चर्चा दोन नेत्यांपुरतीच आणि गोपनीय राहिली आहे. चर्चेसाठी कोणताही ठोस अजेंडा ठरलेला नव्हता आणि नंतर कसलंही निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं नाही. जे काही समोर आलं ते संयुक्त पत्रकार परिषदेतून आणि तीमधली ट्रम्प यांची वर्तणूक शरणागती दाखवणारी असल्याची टीका अमेरिकेतच होते आहे. या भेटीत गाजवला जातो आहे तो अमेरिकेच्या निवडणुकीत रशियानं केलेल्या हस्तक्षेपाच्या आरोपांचा मुद्दा. मात्र, त्यापलीकडं उभय देशांत मतभेदांचे, संघर्षाचे अनेक मुद्दे आहेत. त्यातल्या बहुतेक बाबतींत स्थिती "जैसे थे' असल्याचं दिसतं. सीरियातल्या इसिसविरोधातल्या कारवाईत दोन्ही देशांत मतभेद आहेत. "सीरियातल्या "बशर अल्‌ असद'च्या राजवटीवरचा रशियन वरदहस्त कायमच राहील,' असाच पुतीन यांचा पवित्रा कायम आहे, म्हणजेच तिथला तिढा सुटलेला नाही. तिथं इराणच्या सहभागासंदर्भात अमेरिकेचा हस्तक्षेप आहे. मात्र, रशिया तो मान्य करण्याची चिन्हं नाहीत. क्रीमियातल्या लोकांनी रशियात सामीलीकरणास मान्यता दिल्यानं हा मुद्दा निकालात निघाल्याची रशियन भूमिका आहे. ट्रम्प यांनी अलीकडंच "क्रीमियात बहुतांश लोक रशियन भाषा बोलणारे आहेत', अशी केलेली टिप्पणी पुतीन यांच्या पथ्यावर पडणारी आहे. मात्र, अधिकृतपणे अमेरिकेची भूमिका "क्रीमियाचं रशियातलं सामीलीकरण मान्य नाही,' अशीच आहे. यावरचे मतभेद हेलसिंकी बैठकीनंतर कायमच आहेत. युक्रेनला अमेरिका करत असलेल्या मदतीवर रशियाचा आक्षेप आहे. युक्रेनला नाटोचं सदस्य करू नये, यावरही पुतीन ठाम आहेत. यासंदर्भातली वाटचाल अनिश्‍चितच आहे. दोन देशांमधल्या अण्वस्त्रनियंत्रणाविषयीच्या कराराची मुदत 2021 मध्ये संपते आहे. त्यावर नव्यानं वाटाघाटी कराव्या लागतील. यातही पुढं कसं जायचं यावर मतभेद आहेतच. या सगळ्या मुद्द्यांवर अडीच तासांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, ट्रम्प सातत्यानं रशियाविषयी दाखवत असलेला जिव्हाळा पाहता, यातल्या कोणत्याही मुद्द्यावरून ते रशियाशी थेट संघर्षाची भूमिका घेणार नाहीत.

दुसऱ्या महायुद्धानंतर तयार होत गेलेली आणि शीतयुद्धानं पक्की केलेली, जागतिक व्यापारानं आणखी बळकट केलेली रचना मोडणारी वाटचाल ट्रम्प करत आहेत. या सहा-सात दशकांच्या वाटचालीत दीर्घ काळ साथीदार असलेल्यांची जाहीर अवहेलना करताना ट्रम्प हे पुतीन किंवा उत्तर कोरियाच्या किम जोंग उन यांच्यासारख्या नेत्यांसमोर मात्र नांगी टाकत असल्याचं दिसतं. अमेरिकेच्या निवडणुकीत रशियानं केलेल्या हस्तक्षेपाचे ढीगभर पुरावे अमेरिकेतल्या तपासयंत्रणांनी गोळा केले आहेत. पुतीन यांच्यासमवेतच्या बैठकीत ट्रम्प यासाठी आक्रमक भूमिका घेतील, अशी अमेरिकेत अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांनी आपल्याच यंत्रणेवर अविश्‍वास दाखवणारी टिप्पणी केली. हेलसिंकीतल्या चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत रशियन हस्तक्षेपाचा मुद्दाच त्यांनी उडवून लावला. निवडणुकीत ढवळाढवळ करण्याचा रशियानं प्रयत्न केल्याचा निष्कर्ष अमेरिकेतल्या दहा तपास यंत्रणांनी आणि गुप्तचर यंत्रणांनी एकमतानं काढला आहे; पण पुतीन यांनी अत्यंत जोरकसपणे हे आरोप नाकारले आहेत.

तिकडं, ट्रम्प यांनीही देशांतर्गत तपासावरच प्रश्‍नचिन्हं लावलं आहे. या स्थितीत आपल्या देशातल्या यंत्रणांना तोंडावर पाडणारी ट्रम्प यांची कृती अमेरिकेत वादाचं मोहोळ उठवून देणारी ठरली. यावरून अध्यक्षच शत्रुपक्षाला मिळाल्याची टीका सुरू झाली, तेव्हा ट्रम्प यांनी कधी नव्हे ते खुलासे करत सारवासारव सुरू केली. पुतीन यांच्यासमोर ट्रम्प यांनी जवळपास शरणागती पत्करल्यासारखं चित्र तयार झाल्यानंतर शब्दांचे खेळ करत अपयश झाकण्याचे प्रयत्न सुरू झाले, तरी ट्रम्प यांना रशियाशी अधिक जुळवून घ्यायचं आहे, ही वस्तुस्थती लपत नाही. त्यांनी बैठकीनंतर नाटो देशांच्या परिषदेपेक्षा पुतीन यांच्यासोबतची बैठक अधिक फलद्रूप झाल्याचं सांगितलं. ट्रम्प ज्या दिशेनं अमेरिकेला नेऊ पाहत आहेत, त्याचंच हे निदर्शक आहे. ट्रम्प यांच्यासारख्या अहंमन्य नेत्याला त्याचं अपयश दाखवणं मान्य होण्याची शक्‍यताच नसते. अशा वेळी सोपा मार्ग असतो व तो म्हणजे टीका करणाऱ्यांवरच हल्ला चढवायचा आणि त्यांच्या विश्‍वासार्हतेबद्दल, हेतूबद्दलच शंका घ्यायची! ट्रम्प आपल्या विरोधातलं किंवा विसंगती दाखवणारं काहीही समोर आलं की एकच उत्तर देतात ः "फेक न्यूज'! नाटोतला बेबनाव, रशियाला वगळून चाललेल्या "जी 7' देशांतली बेकी आणि युरोपीय संघासारखं संघटन कमकुवत होणं रशियाला हवंच आहे...ट्रम्प ज्या प्रकारची रचना करू पाहत आहेत त्यात हे विनसायास घडतं आहे.
ट्रम्प यांच्यावर कितीही टीका झाली तरी त्यांची वाटचाल त्यांच्या दीर्घकालीन, म्हणजे निवडणुकीपूर्वीही ते जे बोलत होते, त्या धारणांशी सुसंगतच आहे. त्या मुळातच वस्तुस्थितीचा विपर्यास करणाऱ्या आहेत हा भाग वेगळा. मात्र, ट्रम्प यांचं रशिया किंवा पुतीन यांच्याविषयीचं ममत्व नवं नाही. खरं तर ट्रम्प यांना निःसंशयपणे लोकशाही मार्गानं सत्तेवर आलेल्या आणि म्हणूनच चर्चा-संवादातून सहमतीची धोरणं राबवणाऱ्या नेत्यांपेक्षा कणखरपणाच्या आवरणाखाली एकाधिकारशाहीकडं झुकलेल्या नेत्यांसोबत डील करणं आवडत असावं. रशियन अध्यक्षांसमवेतची त्यांची भेट अमेरिकेतल्या मुत्सद्द्यांसाठी लवकरात लवकर विस्मरणात टाकावी असं वाटण्यासारखी झाली. थेरेसा मे यांना ब्रेक्‍झिटबद्दल चार गोष्टी सुनावणारे, जर्मनीच्या अध्यक्ष अँजेला मार्केल यांच्याविषयीच्या नापंसतीतून जर्मनीवर रशियाच्या कह्यात गेल्याचं तोंडसुख घेणारे, युरोपीय संघाचा अमेरिकेला काय लाभ अशी भमिका घेणारे, नाटोच्या एकसंधपणाविषयी आपल्या बोलण्या-वागण्यातून प्रश्‍नचिन्ह तयार करणारे ट्रम्प साऱ्या पारंपरिक मित्रांना, ते अमेरिकेचा गैरफायदा घेत असल्याचे तडाखे देतात. मात्र, रशियाला ते "चांगला स्पर्धक' मानतात. रशिया हे अमेरिका आणि मित्रांसाठी नेहमीच विरोधातलं राष्ट्र राहिलं आहे. नाटोची उभारणी मूलतः रशियाकडून असलेल्या धोक्‍याला तोंड देण्यासाठीच झाली होती. सोव्हिएत संघ आणि नंतर रशियाचं लष्करी सामर्थ्य, खासकरून आण्विक सामर्थ्य, लक्षात घेऊन बहुतेक अमेरिकी अध्यक्ष या देशाशी युद्ध होणार नाही इतपत संबंध ठेवण्यावर भर देत आले. ट्रम्प यापूर्वी मित्र-शत्रू, विरोधक, स्पर्धक यासाठीची परिमाणंच बदलून टाकू पाहत आहेत आणि जगातली सर्वात मोठी आर्थिक लष्करी ताकद असलेल्या देशाची धोरणदिशा अशा प्रकारे बदलायला लागते, तेव्हा त्याचे परिणाम जगावर अनिवार्यपणे होत असतात. ट्रम्प-पुतीन किंवा ट्रम्प-किम यांच्या भेटींकडं या दृष्टिकोनातून पाहायला हवं.

क्रीमियातल्या संघर्षानंतर रशियाला अमेरिकेनं आणि युरोपनं एकाकी पाडलं होतं, आर्थिक निर्बंध लादले होते. पुतीन यांची "बेभरवशाचा हुकूमशहा' अशी प्रतिमा तयार करण्याचे प्रयत्न स्पष्ट होते. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी अध्यक्षांसोबत बैठक होणं आणि त्यात ट्रम्प यांनी उघडपणे पुतीन यांची बाजू घेणं हे सारंच पुतीन यांचं महत्त्व वाढवणारं आहे. युरोपला "शत्रू' आणि रशियाला "चांगला स्पर्धक' मानणाऱ्या ट्रम्प यांनी प्रचलित व्यवस्थेला जोरदार धक्के द्यायला सुरवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून युरोपातून "आता अमेरिका भरवशाची राहिली नाही,' असा सूर स्पष्टपणे उमटतो आहे. नाटोद्वारे संरक्षणाची समान फळी अस्तित्वात आहे. मात्र, ट्रम्प यांचा पवित्रा पाहता यापुढं युरोपातले देश आपली संरक्षणयंत्रणा स्वतंत्रपणे भक्कम करू लागले तर आश्‍चर्याचं नाही. बहुराष्ट्रीय स्वरूपाच्या अमेरिकेच्या पुढाकारानं उभारलेल्या संस्थांवरही ट्रम्प यांचा आक्षेप आहे. त्यांचा भर द्विपक्षीय स्वरूपाच्या वाटाघाटींवर आहे. ही दिशा अस्तित्वात असलेल्या केवळ व्यापाराच्याच नव्हे तर भूराजकीय व्यवस्थेवरही परिणाम घडवू शकते. हिटलरच्या पराभवानंतर अमेरिकेच्या पुढाकारातून आणि पश्‍चिम युरोपातल्या देशांच्या साथीनं ही रचना अस्तित्वात आली. त्यात अभिप्रेत असलेल्या व्यापक सहमती असणाऱ्या देशांच्या आघाड्या आणि बहुराष्ट्रीय व्यासपीठांपेक्षा प्रत्येक देशानं आपापलं पाहावं, या दिशेनं ट्रम्प यांची वाटचाल आहे. ट्रम्प यांच्या या नव्या अमेरिकेशी जुळवून घेण्याचं आव्हान जगासमोर असेल. आठ-दहा दिवसांतला ब्रिटनसह युरोप, नाटोसदस्य देश आणि रशियासोबतचा ट्रम्प यांचा व्यवहार पाहता हे आव्हान किती गुंतागुंतीचं आहे याची चुणूक दिसते.

Web Title: shriram pawar write pakistan nawaz sharif article in saptarang