योगी ‘राज’ (श्रीराम पवार)

श्रीराम पवार shriram.pawar@esakal.com
रविवार, 26 मार्च 2017

 

 

‘उग्र हिंदुत्ववादी’ अशी प्रतिमा असलेले योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री व्हावं की नाही हा मुद्दाच नाही. तो कुणाही भारतीय नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, त्यातून कोणता संदेश दिला जातो आहे, याची चिकित्सा करायलाच हवी. भारतीय जनता पक्षानं आदित्यनाथ यांना राज्याच्या प्रमुखपदावर बसवून बहुसंख्याकवादाचा संदेश दिला आहे. ‘वादग्रस्त वक्तव्यं करणारा नेता’, अशीही आदित्यनाथ यांची प्रतिमा आहे. त्यांच्या निमित्तानं ‘आम्ही आणि ते’ अशी भाषा उघडपणे करणारं नेतृत्व मुख्य प्रवाहात प्रस्थापित झालं आहे. एका अर्थानं ‘नव्या हिंदुहृदयसम्राटा’चा हा उदय आहे. ‘उग्र हिंदुत्ववादी’ ही प्रतिमा आज आदित्यनाथ यांच्यासाठी आणि भाजपसाठीही लाभाची आहे. ती पुढच्या लोकसभेपर्यंत तशीच ठेवण्याची काळजी घेतली जाईल. त्यानंतर कदाचित आदित्यनाथ यांचंही ‘प्रतिमांतर’ करण्याची खेळी सुरू होईल.

 

उत्तर प्रदेशातल्या दणदणीत विजयानंतर भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्रिपदासाठी निवडलेला चेहरा, पक्ष कोणत्या वाटेनं जाऊ पाहत आहे, याची साक्ष देणारा आहे. अत्यंत टोकाच्या हिंदुत्वाचा प्रचार-प्रसार करणारे योगी आदित्यनाथ यांची देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरची निवड ही भाजप आता मुखवट्यांचा खेळ टाकून चेहराच पणाला लावण्याच्या टप्प्यावर आल्याचं दाखवणारी आहे. ‘विकासाची भाषा तोंडी लावत निवडणुका जिंकणारी महाप्रचंड यंत्रणा’ असा हा भाजपचा सुधारित अवतार असेल. योगी आदित्यनाथांच्या निवडीमागचं एक कारण दिलं जातं ते २०१९ ची लोकसभा निवडणूक. पंतप्रधानांनी ‘सन २०२२ मध्ये काय करणार,’ हे सांगायला सुरवात केल्यानं २०१९ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजप काहीही करेल, याचे संकेत मिळत होतेच. मात्र, त्यात योगींच्या नशिबी राजयोग लिहिला जाण्याचाही समावेश असेल, असं वाटत नव्हतं. आता भाजप आणि परिवाराच्या शिरस्त्यानुसार हे योगी किती हुशार आहेत, कसे कुशल संघटक आहेत, तेच कसे विकास करू शकतात आणि वर पुन्हा त्यांना संसारच नसल्यानं ते कसे स्वच्छ राहण्याची हमी आहे वगैरे समर्थनं केली जातीलच. यावर कडी म्हणजे ‘असतील हिंदुत्ववादी, आतापर्यंत नव्हतं का त्यांचं (म्हणजे मुस्लिमांचं) लांगुलचालन करणारे सत्तेवर आले? आता हिंदुत्वाचं जाहीरपणे बोलणारा आला तर काय बिघडलं?’ असा तर्क दिला जात आहे. मुळात आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री व्हावं की नाही, हा मुद्दाच नाही. तो कुणाही भारतीय नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, त्यातून कोणात संदेश दिला जातो आहे, याची चिकित्सा करायलाच हवी.

भाजपला काँग्रेसच्या सत्ताकाळात लोकशाही पंरपरांचा भलताच पुळका असायचा. काँग्रेसचं हायकमांड आणि त्याचे निर्णय हा नेहमीच थट्टेचा विषय बनवण्यातच भाजपवाल्यांना आनंद मिळायचा. आता उत्तर प्रदेशातली योगींची निवड काय सांगते? या राज्यानं भाजपच्या झोळीत ३२५ आमदारांचं घसघशीत दान टाकलं. लोकशाहीचा संकेत असं सांगतो, की निवडून आलेल्यांमधून नेता निवडावा. त्याला राज्यपाल मुख्यमंत्रिपदाची शपथ देतील. नेता निवडायचा भाजपचा अधिकार मान्य करूनही निवडून आलेल्यांबाहेरचा नेता देण्याला पूर्वी भाजपवाले ‘लादणं’ असं म्हणायचे, हे कसं विसरायचं? गोव्यात याच धर्तीवर मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले, तर उत्तर प्रदेशात खासदार असलेल्या योगींची निवड झाली. गमतीचा भाग म्हणजे, मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांतल्या कुणालाही उत्तर प्रदेशाच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत निवडलेलं नाही. भाजपवाल्यांच्या मते, सत्तेची अशी सगळी महत्त्वाची पदं या रीतीनं देण्याला आता विकासासाठीची अनिवार्यता म्हणायचं असतं, हायकमांडचा निर्णय नव्हे! खरंतर सत्ताकारणात भाजप हा काँग्रेसच्या वाटेनं निघाला आहे. तिथंही हायकमांड तयार झालं आहे. काँग्रेसमध्ये एका गांधी कुटुंबात सत्तेचं केंद्रीकरण झालं. त्याचे परिणाम पक्ष भोगतोच आहे. भाजपमध्ये दृश्‍यस्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी-पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडीच्या हाती, तर प्रत्यक्षात मोदींच्या एकहाती केंद्रीकरण झालेलं आहे. निवडून आलेल्या ३२५ सदस्यांमध्ये मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री व्हायला एकही लायक आमदार मिळू नये, ही बाब काय दर्शवते?
या निवडीचा उघड अर्थ असा आहे, की भाजपला ‘आता हिंदुत्वाचा स्पष्टपणे पुरस्कार करण्याची वेळ आली आहे,’ असं वाटू लागलं आहे. भारतीय राजकारणात टोकाचे घटक पक्षात ठेवणं नवं नाही. प्रसंगी ते उपयोगाचे ठरतात, हे व्यावहारिक शहाणपण त्यामागं असतं. मात्र, या परिघावरच राहणाऱ्या किंवा ठेवल्या जाणाऱ्या घटकांना मुख्य प्रवाहातल्या राजकारणाचं नायकत्व बहाल केलं जातं, तेव्हा चर्चा तर होणारच. आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्याचा आनंद हिंदुत्ववाद्यांना होणं स्वाभाविक आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना मुखवटा आणि लालकृष्ण अडवानी यांना चेहरा ठरवणाऱ्या पंथाला कधीतरी ‘थेट साधू-संन्यासीच राजगादीवर बसावेत,’ असं वाटण्यात नवल नाही. या मंडळींची थेटपणे हिंदुत्वाचा कैवार घेण्याची अपेक्षा सतत वाढणारी आहे. वाजपेयीही संघपरिवाराच्या वैचारिक मुशीतलेच होते. मात्र, त्यांचं काहीसं उदारमतवादी वागणं, काश्‍मीरमध्ये ‘इन्सानियत-जम्हूरियत’ची भाषा करणं, गुजरातच्या दंगलीनंतर मोदींना ‘राजधर्मा’ची आठवण करून देणं हे न आवडणारा वर्ग अडवानींवर फिदा होता. अडवानी राममंदिराच्या आंदोलनात थेटपणे उतरलेले, बाबरी मशीद पाडल्याचा गुन्हा अंगावर असलेले नेते आहेत. ते अधिक उजवे म्हणून हिंदुत्ववाद्यांचे अधिक लाडके होते. त्यांनी जीनांच्या मजारीवर जाऊन जीनांच्या धर्मनिरपेक्षतेचं गुणगान केलं आणि द्वेष हाच मूलाधार असलेल्या मंडळींचा संयम सुटला. अडवानी हळूहळू अस्तंगत होण्याकडं वाटचाल करू लागले, त्यानंतरच या मंडळींना मोदी यांच्यात नवा आयकॉन मिळाला होता. स्वच्छपणे हिंदुहिताची भूमिका गुजरातमध्ये घेणारा, ‘एकदा ‘त्यांना’ धडा शिकवलाच पाहिजे,’ ही मानसिकता असणाऱ्यांना ‘धडा म्हणजे काय,’ याचं प्रात्यक्षिक गुजरातमध्ये दाखवून देणारा नेता ही प्रतिमा त्यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणण्यापर्यंत गेली. आता कुणी हे बिरूद त्यांना लावत नाही. शेवटी प्रतिमाही त्या त्या वेळच्या राजकीय लढायांमध्ये उपयोगाच्या असाव्या लागतात. हिंदूंचा हृदयसम्राट होण्यातून जे साधायचं ते साधल्यानंतर ‘विकासपुरुष’ होण्यातलं महत्त्व मोदींनी ओळखलं. मात्र, तमाम हिंदुत्ववाद्यांना मोदींमध्ये आशा दिसतेच. आता त्यांच्यासाठी आदित्यनाथांच्या रूपानं नवा आयकॉन सापडला आहे. जणू ‘नवा हिंदुहृदयसम्राट’च. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय नेत्यांमध्येही एक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. आदित्यनाथ मात्र उघडपणे बहुसंख्याकवादी आहेत. या निवडणुकीत मोदींनी ‘स्मशान विरुद्ध कब्रस्तान’ची फाळणी करणारी भाषा केली. अशा भाषेची ‘पेरणी’ २०१४ मध्ये आदित्यानाथांनी लोकसभेत करून ठेवली होती. तेव्हा त्यांनी कब्रस्तानच्या कुंपणासाठी उत्तर प्रदेश सरकारनं केलेल्या तरतुदीवर बोट ठेवलं होतं. यावर पूर्व उत्तर प्रदेशात त्यांनी आणि त्यांच्या युवक हिंदू वाहिनीनं वातावरण बरंच तापवलं होतं.

आदित्यनाथ हे गोरखपूरच्या नाथसंप्रदायातल्या पीठाचे महंत आहेत. त्यांचे गुरू आणि आधीचे महंत अवैद्यनाथही खासदार होते. ते हिंदू महासभेचे अध्यक्षही होते. या मठाचा राजकारणाशी थेट संबंध स्वातंत्र्यापूर्वीपासूनच आहे. कडव्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा हा एक गड राहिला आहे. आदित्यनाथ यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या पार्श्‍वभूमीची चर्चा स्वाभाविक आहे. सातत्यानं दुफळी माजवणारी विधानं करणं आणि प्रसिद्धीत राहणं हे या योगी आदित्यनाथांच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य आहे. त्यांचं कर्तृत्व म्हणजे बाबरी मशीद पाडली गेल्यानंतरही ज्या गोरखपुरात वातावरण शांत होतं, तिथं हिंदू-मुस्लिम अशी उभी फूट पडली. योगी म्हणून सक्रिय झाल्यानंतर ‘नेपाळसीमेवरून मुस्लिम घुसखोरी करतात आणि त्यांचा वापर पाकिस्तानी गुप्तहेर संस्था करते,’ असा प्रचार त्यांनी सुरू केला. एका बाजूला आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करणारे आदित्यनाथ यांचा उदय होत होता, त्याच वेळी मुख्तार अब्बास अन्सारी या ‘डॉन’ अशीच प्रतिमा असलेल्या आणि गुंडगिरी हेच भांडवल असलेल्या नेत्याचा ‘मुस्लिमांचा मसीहा’ म्हणून उदय होत होता. महूमध्ये झालेल्या दंगलीत योगींच्या ‘हिंदू युवा वाहिनी’चा हात असल्याचा आरोप आहे. सन २००७ च्या गोरखपूर दंगलीतही असाच आरोप झाला. त्यांच्या समर्थकांनी शिया मुस्लिमांचं धार्मिक स्थळ पेटवून दिलं. ही दंगल भडकवल्याबद्दल आदित्यनाथ जेलयात्रा करून आले आहेत. त्यांना अटक केल्यानंतर समर्थकांनी रेल्वेचे दोन डबे पेटवून दिले होते. या कृतीनं योगी आणि त्यांच्या संघटनेला देशव्यापी प्रसिद्धी मिळाली. ‘कडवा हिंदुत्ववादी नेता’ अशी त्यांची प्रतिमा दृढ करण्यात या दंगलींचा वाटा मोठा आहे. अर्थातच आपल्या विधानांनी विखार फुलत राहील, याची काळजी त्यांनी वेळोवेळी घेतलीच. खुनाचा प्रयत्न, दंगली घडवणं, धार्मिक भावना भडकवणं अशा किमान १५ गुन्ह्यांत आदित्यनाथ आरोपी आहेत. ‘कायदा आणि सुव्यवस्थेसाठी समस्या’ म्हणून ज्यांच्याकडं आतापर्यंत पाहिलं गेलं, ते आता ‘कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी’ घेणार आहेत. लव्ह जिहाद, घरवापसी यांसारख्या हिंदुत्ववाद्यांच्या लाडक्‍या कल्पनांसाठीही योगी परिचित आहेत. ‘ज्यांना सूर्यनमस्कार घालायचे नसतील, त्यांनी देश सोडून जावं,’ असं सांगणारे हेच योगी होते. ‘समाजवादी पक्षाच्या कारकीर्दीत प्रचंड प्रमाणात जातीय दंगली झाल्या, याचं कारण विशिष्ट समुदायाची वाढती लोकसंख्या,’ हेही योगींचं आणखी एक गाजलेलं निदान. ‘१० ते २० टक्के मुस्लिम लोकसंख्या असेल तिथं किरकोळ प्रकार घडतात, २० ते ३५ टक्के असेल तिथं दंगली होतात आणि ३५ टक्‍क्‍यांच्या वर मुस्लिम लोकसंख्या असेल, तर तिथं मुस्लिमेतरांना स्थानच नसतं,’ असं ‘संशोधन’ही त्यांच्या नावावर आहे. उत्तर प्रदेशात गाजलेल्या स्थलांतराच्या मुद्द्यांवर ते सांगत असत ः ‘भाजप पश्‍चिम उत्तर प्रदेशाचा ‘काश्‍मीर’ होऊ देणार नाही.’ शाहरुख खानची तुलना त्यांनी दहशतवादी हाफिज सईदशी केल्याचं प्रकरणही गाजलं होतं. ‘एका हिंदू मुलीचं धर्मांतर झालं, तर १०० मुस्लिम मुलींचं होईल,’ या इशाऱ्याचे प्रणेतेही योगीच. ‘बाबरी मशीद पाडण्यापासून कुणी रोखू शकलं नाही, तर राममंदिर उभारण्यापासून कोण रोखतंय ते पाहूच,’ असं सांगणारेही योगीच. अनुपम खेर हा खरं तर बहुसंख्याकवादी अजेंड्याच्या प्रचारासाठी बेधडकपणे बोलत सुटलेला अभिनेता. मात्र, त्यानं ‘आदित्यनाथ आणि साध्वी प्राची यांना जेलमध्येच ठेवलं पाहिजे,’ असं सांगितलं तेव्हा भडकलेल्या योगींनी ‘अनुपम खेर वास्तव आयुष्यातही व्हीलनच आहेत,’ असं सांगून टाकलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी बलरामपूरच्या सभेत ते म्हणाले होते ः ‘भाजप जिंकला तर राममंदिर बनेल, नाही जिंकला तर ‘करबला’ आणि ‘कब्रस्तान’ बनतील.’ विभागणीची भाषा हे त्यांच्या नेतृत्वशैलीचं ‘वैशिष्ट्य’ राहिलं आहे.
केवळ मुस्लिमांच्या विरोधात आगखाऊ बोलण्याबद्दल योगी प्रसिद्ध नाहीत, तर त्यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोनही असाच मध्ययुगीन आहे. ‘महिलांना जन्मापासून मृत्यूपर्यंत पुरुषांचं संरक्षण आवश्‍यकच आहे, त्यांची ऊर्जा नियंत्रित केली नाही तर ती विनाशक ठरेल,’ असं हे योगी सांगतात. महिलांसाठी राजकीय आरक्षणाला योगींचा कडाडून विरोध आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलेल्या आरक्षणाचा आधी फेरआढावा घ्या, या प्रक्रियेत (आरक्षणाच्या) महिला आपलं आई, मुलगी, बहीण म्हणून असलेलं महत्त्व गमावून बसतील,’ असंही योगींचं निदान आहे. ‘पुरुषांनी महिलांचे गुण आत्मसात केले, तर त्यांचं रूपांतर देवात होईल; पण महिलांनी पुरुषांचे गुण घेतले, तर राक्षस तयार होतील,’ असंही त्यांनी लिहून ठेवलं होतं. आता कदाचित ‘सब का साथ, सब का विकास’च्या नव्या अवतारात जुनं सगळं खोडून टाकायची मोहीम सुरू होईल.

आदित्यनाथ यांची निवड झाल्यानंतर समाजात दुफळी माजवणाऱ्या त्यांच्या पार्श्‍वभूमीची आठवण करून देणं स्वाभाविक आहे. हा इतिहास माहीत असूनही निवड का केली, असा एक सूर असतो. मात्र, भाजप ज्या दिशेनं जाऊ पाहत आहे, त्यात हा इतिहास आहे म्हणूनच निवड केली, असं मानायला जागा आहे. विकासाची भाषा बोलणारे मोदी अशी निवड कशी करू शकतात, हा प्रश्‍नच भाबडेपणातून येतो, त्यांच्याच इतिहासाचं विस्मरण दाखवणारा असतो. आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्री बनण्याचा अधिकार नाकारायचं कारणच नाही. मुख्यमंत्री होताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना ‘वाद होईल असं काही बोलू नये,’ असा सल्ला दिला आहे. लगेच ते प्रशासक म्हणून बदलू लागल्याचा निष्कर्ष काढण्याचीही घाई दिसू लागली आहे. मोदींवरही गुजरातचे मुख्यमंत्री असताना कठोर टीका झाली. मात्र, त्यांनी आपली ‘विकासाभिमुख नेता’ ही प्रतिमा सिद्ध केली, याची आठवण अनेकांना होते. योगींबाबतही हेच घडेल, असा आशावादही दाखवला जातो. मुळात अडवानी, मोदी, योगी यांच्या नेतृत्वाचं सूत्र कायम आहे. मोदींचा उदय होताना ‘अडवानी बरे’ म्हणणं, योगींच्या उदयाच्या वेळी मोदींच्या विकासाभिमुखतेची साक्ष काढणं हे सगळं ‘वरलिया रंगा भुलणा’ऱ्या भोंगळपणातून येतं. ‘अडवानींच्या रथयात्रेनं देश कुठं हिंदुराष्ट्र झाला? किंवा मोदी पंतप्रधान झाल्यानं तरी कुठं झाला? तर मग आता योगींच्या मुख्यमंत्रिपदानंही असं काय आभाळ कोसळणार आहे?’ हा सवाल वरवर बिनतोड वाटत असेलही; पण या प्रवासाची दिशा क्रमाक्रमानं बहुसंख्याकवादाकडं जाणारी आहे. प्रत्येक वेळी तिचा आविष्कार उग्रच असला पाहिजे असं नाही. अल्पसंख्य समूहाला पूर्णतः वगळून देशातलं मोठं राज्य काबीज करता येतं आणि तिथं एका मठाच्या महंतांना मुख्यमंत्रिपदी बसवता येतं, यातून आवश्‍यक तो संदेश गेला आहेच. काँग्रेस, सप आदी धर्मनिरपेक्षता तोंडी लावणाऱ्या पक्षांनी मतांसाठी अल्पसंख्याकांचे लाड केल्याचा आरोप केला जातो. त्यात तथ्य असलंच तर लाड झालेतच; पण ते या समाजातल्या मूठभरांचे; त्यानं समाजात काहीच फरक पडला नाही इतकंच. सच्चर आयोगानं या स्थितीवर चांगलाच प्रकाश टाकला आहे. याची प्रतिक्रिया म्हणून बहुसंख्याकवादाला बळ मिळालं, हे नाकारण्यात अर्थ नाही. मात्र, याचा परिणाम स्पष्टपणे ‘मला उत्तर प्रदेशात आणि देशात हिंदुराष्ट्र साकारायचं आहे,’ असं सांगणारा नेता मुख्यमंत्री होतो आहे. योगी आदित्यनाथ सर्वंकष विकासाची भाषा सध्या बोलत आहेत. त्यावर ते काम करतीलही. त्यासाठीची संधी त्यांना जरूर द्यायला हवी. मात्र, विकासाची कामं करण्यासाठी देशाची बहुसंख्य-अल्पसंख्य अशी फाळणी करण्याचं समर्थन करता कामा नये. विकास हवाच; पण तो या देशातली समन्वयवादी परंपरा उद्‌ध्वस्त करून नव्हे.

योगी मुख्यमंत्री होण्यापूर्वी साध्वी उमा भारती यांनीही मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. योगींच्या निमित्तानं ‘आम्ही आणि ते’ अशी भाषा उघडपणे करणारं नेतृत्व मुख्य प्रवाहात प्रस्थापित झालं आहे. एका अर्थानं नव्या हिंदुहृदयसम्राटाचा हा उदय आहे. आज योगींसाठी आणि भाजपसाठीही त्यांची ‘उग्र हिंदुत्ववादी’ ही प्रतिमा लाभाची आहे. ती पुढच्या लोकसभेपर्यंत तशीच राहील, याची काळजी घेतली जाईल. त्यानंतर कदाचित योगींचंही ‘प्रतिमांतर’ करण्याची खेळी सुरू होईल. योगींच्या मुख्यमंत्रिपदानं लगेच काही आभाळ कोसळणार नसलं, तरी परिघावर चालणारं, चालवून घेतलं जाणारं उग्र मुद्रेचं बहुसंख्याकवादी राजकारण मुख्य प्रवाहाचा भाग बनतं आहे आणि हे केवळ मतांच्या राजकारणापुरतं उरत नाही, तर सगळ्या क्षेत्रांत पाझरत जातं, याची नोंद घ्यायलाच हवी. बहुमताचा अर्थ ‘बहुसंख्याकवादावर मोहोर’ असा लावला, तर त्याची हीच अटळ परिणती आहे.

Web Title: shriram pawar write political article in saptarang