भांडती थवे यादवांचे...

श्रीराम पवार 
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

उत्तर प्रदेशात 'यादवांचे थवे' सध्या भांडत आहेत! मुलायमसिंगांच्या परिवारात ज्या रितीनं सत्तेचं वाटप सुरू होतं, ते पाहता कधीतरी हे यादवकुलोत्पन्न एकमेकांच्या उरावर बसणार होतेच. भाऊ शिवपाल यादव आणि मुलगा अखिलेश हे एकमेकांचे पक्के वैरी बनल्याचं मुलायम यांना पाहावं लागत आहे. या सगळ्या गदारोळात मुलायम हे पक्षाची सारी सूत्रं आपल्या हाती ठेवण्याचा अट्टहास करत आहेत. मात्र, काळ त्यांच्या हातून निसटत चालला आहे. मुलायम यांच्यासमोर बाप म्हणून आव्हानं आहेत आणि नेता म्हणूनही.

उत्तर प्रदेशात 'यादवांचे थवे' सध्या भांडत आहेत! मुलायमसिंगांच्या परिवारात ज्या रितीनं सत्तेचं वाटप सुरू होतं, ते पाहता कधीतरी हे यादवकुलोत्पन्न एकमेकांच्या उरावर बसणार होतेच. भाऊ शिवपाल यादव आणि मुलगा अखिलेश हे एकमेकांचे पक्के वैरी बनल्याचं मुलायम यांना पाहावं लागत आहे. या सगळ्या गदारोळात मुलायम हे पक्षाची सारी सूत्रं आपल्या हाती ठेवण्याचा अट्टहास करत आहेत. मात्र, काळ त्यांच्या हातून निसटत चालला आहे. मुलायम यांच्यासमोर बाप म्हणून आव्हानं आहेत आणि नेता म्हणूनही. पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या बरोबरीच्या नेत्यांना बाजूला करत आपलं स्थान तयार केलेल्या या नेत्याला घरचं भांडण मिटवणं जड जाऊ लागलं आहे. 

उत्तर प्रदेशात निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याच्या ऐनवेळेस या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यात राज्य करणाऱ्या यादव मंडळींमध्ये माजलेली बंडाळी देशाचं लक्ष वेधणारी ठरणं स्वाभाविक आहे. या यादवीची वेळ कदाचित चुकली असेल; पण मुलायमसिंगांच्या परिवारात ज्या रीतीनं सत्तेचं वाटप सुरू होतं, ते पाहता कधीतरी हे यादवकुलोत्पन्न एकमेकांच्या उरावर बसणार होतेच. हे देशातल्या राजकीय चालीशी सुसंगतही आहे. एखाद्या नेत्यानं कष्टानं आपला प्रभाव तयार करावा, राज्य मिळवावं, राजकारण टिकवावं आणि पाठोपाठ सग्या-सोयऱ्यांनी अशा बलदंड राजकारण्याला विळखा घालावा, हे आपल्या राजकीय संस्कृतीत नवं नाही. असा नेता उतारवयाकडं निघाला की वारशासाठी होणारी भांडणं म्हणजे राजकारण ठरू लागतं, हेही देशानं पाहिलं आहे.

'घराणेशाही नको' म्हणत म्हणत राज्याराज्यातले सुभेदार कोणत्या ना कोणत्या स्वरूपात घराणेशाही पोसतातच आणि ती कधीतरी भाऊबंदकीचं वादळ अनुभवतेच. उत्तर प्रदेशातलं मुलायमसिंग यादवांचं कुटुंब सध्या याच अवस्थेतून जात आहे. राममनोहर लोहियांचा वारसा सांगत उत्तर प्रदेशात आपलं बस्तान बसवणारे मुलायम यांना भाऊ आणि मुलगा एकमेकांचे पक्के वैरी बनल्याचं पाहावं लागत आहे. यातून उत्तर प्रदेशातल्या समाजवादी परिवारात न सांधता येणाऱ्या भेगा पडल्याचं जगानं पाहिलं. हे इतकं टोकाला गेलं आहे, की मुलायम यांनी भाऊ शिवपाल यादव आणि मुख्यमंत्री असलेले चिरंजीव अखिलेश यादव यांना गळाभेट घ्यायला सांगितलं, तर भर बैठकीत दोघं हमरीतुमरीवर उतरले, एकमेकांवर धावूनही गेले. पक्ष आणि कुटुंब एकत्रच आहे, अशी रंगसफेदी करण्याचा मुलायम यांनी कितीही प्रयत्न केला, तरी दोन्ही दुभंगल्याचं वास्तव लपत नाही. हे सगळं घडतं आहे, त्याला एक पार्श्‍वभूमी आहे ती अमरसिंग हे समाजवादी पक्षात परतण्याची.

जनाधार आणि कोणत्याही वैचारिक राजकारणापेक्षा या गृहस्थांची ओळख आहे ती नेटवर्किंगसाठी. कॉर्पोरेट जगतापासून ते बॉलिवूडपर्यंत संबंध-संपर्क ठेवून असलेले अमरसिंग आपली ही नेटवर्किंगची ताकद अभिमानानं मिरवतात. कुणी 'राजकारणातला दलाल' म्हटल्यानं त्यांना फरक पडत नाही आणि उत्तर प्रदेशात बलदंड असलेल्या मुलायम यांच्यासारख्या राजकीय नेत्याला दिल्लीच्या दरबारी राजकारणात अशा मध्यस्थांची गरज भासत असतेच. समाजवादी पक्षात कधीतरी मुलायम यांच्यानंतर स्थान असलेले अमरसिंग यांचा मुलायम यांच्यावरचा प्रभाव सगळेच जाणतात.

मुलायम हे दिल्लीच्या राजकारणात महत्त्वाकांक्षा दाखवू लागले, तेव्हा त्यांच्यासाठी अन्य पक्षांचे दरवाजे उघडणारे अमरसिंगच होते. सन 2003 मध्ये बहुजन समाज पक्षात फूट पाडण्याची खेळी त्यांचीच. उत्तर प्रदेश विकास बोर्डात अंबानी, गोदरेज, बिर्ला आणि सुब्रतो राय यांच्यापर्यंत सगळ्यांना एकत्र आणणारे, अमिताभ बच्चन यांना राज्याचा ब्रॅंड ऍम्बेसिडर बनवणारेही अमरसिंगच होते. मात्र, समाजवादाशी किंवा कोणत्याच विचारपरंपरेशी त्यांचं काही देणं-घेणं नाही. मुलायम यांनी पक्षाच्या बैठकीत सांगितलं होतं : 'केवळ लाल टोपी घातली म्हणून कुणी समाजवादी होत नाही.' त्याच वेळी 'अमरसिंग यांच्याविरुद्ध काही खपवून घेणार नाही,' असं सांगतानाच, 'अमरसिंगांनीच आपल्याला तुरुंगापासून वाचवलं' याचीही आठवण त्यांनी करून दिली होती.

बेहिशेबी संपत्तीच्या प्रकरणात सीबीआयच्या पंजातून मुलायम यांच्या कुटुंबाची सुटका करण्यात अमरसिंगांचा वाटा असल्याकडंच हा निर्देश असल्याचं मानलं जातं. आताही देशातलं बदललेलं राजकीय वास्तव ध्यानात घेऊन केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांशी संबंध ठेवायला मुलायम यांना अमरसिंगांसारखा मध्यस्थ गरजेचा वाटू शकतो. म्हणजेच अमरसिंग यांनी कधीतरी केलेल्या उपकाराची बक्षिशी मुलायम देऊ पाहतात. तिथं समाजवादाचा संबंध नाही. अमरसिंग तर उघडपणे म्हणाले होते : 'मी कधीच जेलमध्ये गेलो नाही. लोकांच्या प्रश्‍नांवर तळपत्या उन्हात कधी आंदोलनंही केली नाहीत. त्यामुळं मी समाजवादी नाही; पण 'मुलायमवादी' आहे.' हे सगळं बिनदिक्कतपणे सांगत 'नेताजीं'विषयी संपूर्ण निष्ठेचं प्रदर्शन करणं हाही अमरसिंगांचा गुण. मात्र, या गुणासोबत पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर ते कसा ताबा ठेवतात, हे पाहिलेल्या मंडळींसाठी अमरसिंगांची घरवापसी म्हणजे नसती ब्यादच. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मुलायम यांचे चुलतभाऊ रामगोपाल यादव यांना अमरसिंगांचं परतणं नको आहे ते यासाठीच. कुणी जाहीरपणे काहीही सांगत असलं, तरी मुलायम यांच्या घरातलं भांडण हे अधिकारांचं भांडण आहे.

जवळपास पाच दशकं राजकारणात असलेल्या आणि 'मंडलोत्तर' राजकारणात चलाखीनं आपलं अस्तित्व तयार करणाऱ्या मुलायम यांनीच समाजवादी पक्षाची उभारणी केली, हे निर्विवाद आहे. चरणसिंगांच्या लोकदलाचे तुकडे पडल्यानंतर अजितसिंगांचा लोकदल (अ), हेमवतीनंदन बहुगुणा यांचा लोकदल (ब) आणि मुलायम यांचा जनता दल असे तीन पक्ष तयार झाले. यात उत्तर प्रदेशातल्या जातगणितांचं अचूक भान ठेवत मुलायम यांनी आपली मतपेढी तयार केली. ते यशस्वी ठरले. अजितसिंग हे जाटांचं वर्चस्व असलेल्या राज्याच्या पश्‍चिम भागपुरते उरले.

1990 च्या दशकात कॉंग्रेस उत्तर प्रदेशातून आकसत गेली. तिची जागा प्रामुख्यानं मुलायम यांच्या समाजवादी पक्षानं आणि कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षानं घेतली. शेतकरी जातींच्या एकत्रीकरणाचं पुढचं पाऊल होतं कॉर्पोरेट क्षेत्राशी जवळिकीचं आणि गुंडा-पुंडांच्या आधारे राजकारणाचं. यातही मुलायम यांनी आपलं अस्तित्व टिकवलं-वाढवलं. समाजवादी पक्षाची अधिकृत स्थापना झाल्यानंतरही आता त्यावरचा आपला एकाधिकार सोडायची त्यांची तयारी नाही. दुसरीकडं अखिलेश यांनी मुख्यमंत्री म्हणून एक टर्म घालवल्यानंतर पक्ष आणि प्रशासनात आपलं स्थान तयार केलं आहे. शिवपाल आणि रामगोपाल हे मुलायम यांचे भाऊ दोन गटांत विभागले गेले आहेत. मुलायम यांच्या आडून शिवपाल सत्तेवर मांड ठेवू इच्छितात. आपली मुख्यमंत्रिपदाची संधी अखिलेशमुळं गेली, असं त्यांना वाटतं, तर अखिलेश यांना पुढं करत रामगोपाल यांना सत्तेवर वर्चस्व ठेवायचं आहे. त्यात परत मुलायम यांची दुसरी पत्नी, तिचा मुलगा आणि संपत्तीचा वाद यांचाही तडका आहेच. त्यातच 'फिक्‍सर' किंवा 'नेटवर्कर' अशी बिरुदं ज्यांना लावली जातात, त्या अमरसिंगांना पक्षात परत घेणं अखिलेश आणि मंडळींना रुचणारं नाही.

खरा मुद्दा येऊ घातलेल्या निवडणुकीत तिकीटवाटपात वर्चस्व कुणाचं, हाच आहे. समाजवादी पक्ष ही यादव कुटुंबानं आपली खासगी मालमत्ता बनवल्यानं कुटुंबातला वाद हा राजकारणातला संघर्ष बनला आहे. मात्र, यात कुठंही तत्त्व, भूमिका शोधायचं कारण नाही. पक्षाचं स्थान आणि मुलायम यांनी काळजीपूर्वक जमवलेलं यादव-मुस्लिम समीकरण यामुळं कुटुंबातला वाद हा उत्तर प्रदेशातल्या राजकारणातला मध्यवर्ती संघर्ष बनला आहे. सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट कुठली ठरणार असेल तर ती म्हणजे, या यादवीचे उत्तर प्रदेशातल्या महाभारतावर काय परिणाम होणार? देशातलं हे सगळ्यात मोठं, लोकसभेला तब्बल 80 खासदार पाठवणारं हे राज्य देशाच्या राजकारणात प्रचंड महत्त्वाचं आहे. केंद्रात बहुमतानं सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाला या राज्यानं 73 म्हणजे 25 टक्‍क्‍यांहून अधिक जागा दिल्या आहेत. भाजपसाठी आणि नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यासाठी उत्तर प्रदेशातली लढाई अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मुलायम यांच्या घरातली यादवी चव्हाट्यावर येण्याच्या पूर्वीपर्यंत, यादव-मुस्लिम मतगठ्ठ्याच्या आधारावर समाजवादी पक्षाशी आणि दलित व काही वरिष्ठ जातींच्या मतगठ्ठ्याच्या आधारावरच मायावतींचा बसप यांच्याशी भाजपला कडवी झुंज द्यावी लागेल असंच चित्र होतं. एकमेकांच्या उरावर बसलेल्या यादवांनी यात नवं वळण आणलं. मायावती यांनी आधीच मुस्लिम मतेपढीत वाटा मिळवायचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या ब्राह्मण भाईचाऱ्याप्रमाणं मुस्लिम भाईचारा कमिट्या त्यांनी सुरू केल्या. 100 जागांवर मुस्लिम उमेदवार देऊन भाऊबंदकीत अडकलेल्या सपपेक्षा बसप हाच मुस्लिमांसाठी चांगला पर्याय असू शकतो, हे ठसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपच्या प्रचारानं 

ज्या प्रकारचं ध्रुवीकरण होण्याची शक्‍यता आहे, त्यात मुस्लिम समाजानं टॅक्‍टिकल व्होटिंगचा आधार घेतला तर आणि भाजपला रोखण्यात भांडणारे समाजवादी अपुरे आहेत असं दिसू लागलं, तर मायावतींचा लाभ होण्याची शक्‍यता स्पष्ट आहे. त्याचबरोबर यादवमतांची विभागणी आणि अन्य ओबीसी मतं मोठ्या प्रमाणात भाजपकडं वळली तर भाजपसाठी स्थिती बळकट होईल. सर्जिकल स्ट्राइकनंतरची वातावरणनिर्मिती आणि मोदींची प्रतिमा यांचा लाभ घेण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. यापलीकडचा एक तर्क मांडला जातो व तो म्हणजे, समाजवादी पक्षातच फूट पडली, तर अखिलेश यादवांचा गट स्वतंत्र लढेल. या स्थितीत सपच्या मतांत फूट तर पडेलच आणि त्या फुटीचा लाभ पुन्हा भाजप किंवा मायावती यांनाच मिळेल, हे झालं सरळ गणित. मात्र, राजकारण हे दिसणाऱ्या गणितांपेक्षा गुंतागुंतीचं असतं. अखिलेश पक्षातून बाहेर पडले तर उत्तर प्रदेशात लालूंचा राष्ट्रीय जनता दल, नितीशकुमारांचा संयुक्त जनता दल आणि कॉंग्रेस, तसंच अजितसिंग एकत्र येण्याची शक्‍यता आहे. बिहारच्या निवडणुकीत नेताजी मुलायम हे नितीश-लालूंसोबत न राहता स्वतंत्र राहिले, याची परतफेड करायची इच्छा नितीशकुमारांना असेलच. राष्ट्रीय राजकारणात मोदींना पर्याय म्हणून उभे राहण्याची त्यांची इच्छाही लपलेली नाही. त्यासाठी आणखी एक पाऊल टाकण्याकरिता म्हणून उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीचा उपयोग करायची चाल ते खेळू शकतात. अखिलेश यांच्यासोबत अशी आघाडी झाली, तर ती सत्तेत येईल की नाही, यापेक्षा ती उत्तर प्रदेशाच्या राजकारणावर लक्षणीय प्रभाव टाकेल. यात जमेची बाजू आहे ती अखिलेश यांची प्रतिमा. सुमारे पाच वर्षं सत्तेत राहून ती टिकवण्यात त्यांना यश आलं आहे. निवडणूक ही प्रतिमांची लढाई बनते, हे लोकसभा निवडणुकांच्या वेळी आणि बिहार, दिल्ली ते पश्‍चिम बंगालपर्यंत दिसलं आहेच. मागच्या निवडणुकीतही अखिलेश यांनी सायकलवरून राज्य पिंजून काढण्याचा परिणाम निकालात दिसला होता. त्यामुळंच त्यांना मुख्यमंत्री बनवावं लागलं होतं. अखिलेश यांच्या पुढाकारानं अशी आघाडी बनली आणि ती यशस्वी झाली, तर मुलायमसिंग यांचं राजकारण मावळतीला लागेल, हे उघड आहे. अर्थात, मुलायमही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. परिस्थितीनुसार मधू लिमये ते अमरसिंग असे सल्लागार बदलणारा हा नेता बिहारस्टाईल महाआघाडीसाठी पुढं येऊ शकतो. आता ते कुणाची निवड करणार याला महत्त्व असेल.

मुलायम यांचे वारस म्हणून अखिलेश सगळ्यात पुढं असलेले दावेदार आहेत. या वारशासाठी पक्षात फूट पडलीच तर देशातली राजकीय वाटचाल पाहता कोणता तरी एकच गट त्यात टिकेल. यात आजतरी अखिलेश अधिक भक्कम स्थितीत आहेत. खरंतर गेली पाच वर्षं अखिलेश मुख्यमंत्रिपदावर असले, तरी ते मुलायम यांच्या सावलीतच राहिले. आता पहिल्यांदाच ते नेतृत्व प्रस्थापित करायला लागले आहेत. काळ हातून निसटत असताना मुलायम हे पक्षाची सारी सूत्रं हाती ठेवण्याचा अट्टहास करत आहेत. समाजवादी यादवांमध्ये फूट तर पडली आहेच... मुद्दा इतकाच आहे, की अखिलेश थेट आव्हान कधी देणार आणि आपलं स्वतंत्र नेतृत्व प्रस्थापित करण्याचं आव्हान कधी स्वीकारणार याचा. मुलायम यांच्यासमोर बाप म्हणून आव्हानं आहेत आणि नेता म्हणूनही. पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या बरोबरीच्या नेत्यांना बाजूला करत आपलं स्थान तयार केलेल्या या नेत्याला घरचं भांडण मिटवणं जड जाऊ लागलं आहे. मामला यादवांच्या घरातला आहे; पण मुलायम-अखिलेश हे पिता-पुत्र कोणत्या चालीनं जातात, यावर उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीची चाल ठरणार आहे. मधल्या काळात एकमेकांना शिव्या देत राहायचं आणि आपण एकाच कुटुंबातले म्हणून रडारडीचे खेळ रंगवायचे, याची आवर्तनं सुरू राहतील.

Web Title: Shriram Pawar writes about political angles in fight between Akhilesh Yadav and Mulayam Singh Yadav