खुज्यांचं सरपटणं (श्रीराम पवार)

shriram pawar
shriram pawar

यवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांची "निमंत्रणवापसी' केली गेली त्यातून कारभाराची सूत्रं खुज्या आणि कणाहीनांच्या हाती गेली तर काय होऊ शकतं याचंच दर्शन घडलं. मराठी साहित्यविश्व किंवा मराठी माणूस असा बोलावून अपमान करणारा नक्कीच नाही. 92 वर्षांच्या सहगल यांच्या येण्याचा आणि बोलण्याचा धोका कुणाला वाटत होता? कोण एवढे कमकुवत कण्याचे आहेत हे कधीतरी महाराष्ट्राला समजायला हवं. ही "निमंत्रणवापसी' मराठी साहित्य संमेलनाच्या वाटाचालीत कायमची नोंदली जाईल आणि हा काही साहित्यविश्वाची आणि साहित्य महामंडळाची शोभा वाढवणारा प्रकार नाही, शोभा करणाराच आहे.

साहित्य संमेलनं गाजणं, ती साहित्यबाह्य बाबींनी गाजणं यात तसं काही नवं नाही. यंदा समोर आलेला वाद मात्र मतस्वातंत्र्याशी जोडलेला म्हणूनच महत्त्वाचा आहे. हा उत्सव अनेकांसाठी मिरवण्याचं आणि तिथल्या वावरण्यातून आपलं कथित थोरपण दाखवण्याचं साधन बनतो आहे. यामुळेच अनेक मान्यवर साहित्यिक या भानगडीत कधी पडत नाहीत. अध्यक्षपदाची निवडणूक या नावानं दरवर्षी जे काही घडत होतं त्याला यंदा फाटा देण्याचा धाडसी निर्णय साहित्य महामंडळानं घेतला. निवडणुकीऐवजी निवड करावी की नाही यावर मतभेद असू शकतात; पण निवडणुकीची प्रक्रिया राजकारण्यांनाही लाजवेल अशा रीतीनं व्हायची. त्या तुलनेत ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांची निवड ही साहित्यविश्वाला सुखावणारी घटना होती. या निवडीचं स्वागतही झालं. इथवर ठीक चाललेला संमेलनाचा प्रवास संमेलन तोंडावर आलं असताना मात्र, "उद्‌घाटकांनी येऊ नये,' असं आयोजकांनीच कळवण्यातून भरकटला. नयनतारा सहगल यांना साहित्य महामंडळानंच निमंत्रण दिलं होतं. सहगल याचं व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार, अलीकडं त्या जे काही मांडत आहेत हे सगळं या मंडळींना माहीत नसेल अशी शक्‍यता नाही. तसं असेल तर "साहित्यविश्वात यांनी लुडबूड तरी का करावी,' असंच विचारायला हवं. सहगल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या साहित्यिक आहेत. तशाच त्या स्पष्टपणे अभिव्यक्‍ती-स्वातंत्र्याच्या बाजूनं उभं राहणाऱ्या म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्याकडं मखरात बसलेल्या सेलिब्रिटींनी कुणाचंच चूक म्हणू नये, सगळं गोडीगोडीनं घ्यावं, आपण मखरात देवत्व मिरवावं, इतरांना हवा तो व्यवहार करू द्यावा, अशी एक अपेक्षा बोकाळते आहे. या अपेक्षेच्या चौकटीत सहगल बसणाऱ्या नाहीत हे उघड आहे. त्यांच्या महाराष्ट्रासोबतच्या नात्याबरोबरच त्यांना निमंत्रण देण्याचं वेगळं महत्त्व म्हणूनच होतं. त्यांनी सातत्यानं एका अर्थानं बंडखोर म्हणता येईल असं लेखन केलं आहे आणि केवळ लेखनातूनच नव्हे तर समजासमोरच्या प्रश्‍नांवर सडेतोड भूमिका घेताना कुणाला काय वाटेल, याची पत्रास त्यांनी बाळगलेली नाही. कलाकारांनी-साहित्यिकांनी भूमिका घेतली पाहिजे, असं ठामपणे सांगणाऱ्या त्या लेखिका आहेत. "मी माझ्या लेखानपुरता' ही स्वान्तः सुखाय भूमिका त्यांनी नाकारली. यातून अनेकदा त्यांच्याभोवती वाद उभे राहिले. सध्याच्या केंद्र सरकारला बुद्धिवंतांकडून मिळालेला मोठा झटका होता तो पुरस्कारवापसीचा. त्याचं धुरीणत्वही सहगल यांचंच. अभिव्यक्‍ती-स्वातंत्र्याच्या किंवा कोणत्याही मुद्द्यावर पुरस्कार परत करावेत की नाही, यावर वेगळी मतं असू शकतात; पण ज्याला हाच आपल्या विरोधाच्या अभिव्यक्तीचा मार्ग वाटतो त्याला का अडवायचं, हे भान त्या वादातही सुटलं होतं. त्यानंतर सहगल या सध्याच्या राज्यकर्त्या वर्गाच्या आणि त्यांच्या समर्थकांसाठी जणू वर्जित व्यक्ती ठरल्या आहेत. ज्यांना आपल्याहून वेगळं असं मत असू शकतं ते मत बाळगायचा आणि ते मांडायचा त्यांना अधिकार आहे हेच ज्यांना खुपतं, त्यांना सहगल खुपणारच. असे खुपणारे असणं आणि त्यांनी अस्तित्व दाखवत राहणं ही लोकशाहीवादी समाजाची गरज आहे. ज्यांना आपले सारे प्रश्‍न कुणीतरी मसीहा सोडवेल आणि एकदा त्याला निवडलं की आपलं काम संपलं असं वाटतं अशा संप्रदायाला हे पचणं कठीणच.

ज्या साळसूदपणे हा प्रकार घडवण्यात आला त्याची दखल घ्यायलाच हवी. एकतर यवतमाळसारख्या आत्महत्याग्रस्त भागात संमेलन होत असेल तर थाटमाट किती करावा, याचं भान असायला हवं. शेतकऱ्यांच्या काही संघटनांचा यासाठी विरोध होता. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुण्या पदाधिकाऱ्यांनी "सहगल या इंग्लिशमध्ये लिहिणाऱ्या, त्यांना कशाला उद्‌घाटनाला बोलावलं?' असं विचारत विरोधाची भूमिका घेतली. असलं काहीतरी निमित्त, सहगल येऊ नयेत आणि त्यांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलता येऊ नये असं वाटणाऱ्यांना जणू हवंच होतं. त्यांनी यथास्थित फील्डिंग लावली. आधी सहगल यांनीच यायला नकार द्यावा, अशा प्रकारची रचना या विरोधाच्या आडोशानं करायचा प्रयत्न झाला. तोही त्यांचं भाषण तयार झालं, ते अनुवादितही झालं त्यानंतर. म्हणजे तोवर त्या काय बोलणार हे साहित्य संमेलनाचा व्यवहार पाहणाऱ्या कारभाऱ्यांना समजलं असेलच. मुद्दा हाच तर होता, त्या जे बोलणार ते पचवायचं कसं? यातला अदृश्‍य दबाव इतका प्रचंड होता, की एरवी भाषणस्वातंत्र्यावर बोलणाऱ्यांनाही सुरक्षेची ढाल करत "घालीन लोटांगण'चा प्रयोग लावावासा वाटला. आयोजकांनी निमंत्रणवापसीचा मेल धाडण्यापूर्वीच खरं तर मनसेनं "सहगल यांना विरोध नाही,' असं स्पष्ट केलं होतं. मात्र. त्या येऊच नयेत हा दबाव त्यापलीकडचा असला पाहिजे. तो झुगारणं या उत्सवाच्या कारभाऱ्यांच्या आवाक्‍यातलं नव्हतं. त्यांनी लोटांगण घालणं पसंत केलं. "झुकायला सांगितलं तर सरपटायला लागले' असं प्रसिद्ध विधान लालकृष्ण अडवानी यांनी
आणीबाणीच्या वेळी माध्यमांना उद्देशून केलं होतं. त्याचा आधार घेत इथंही झुकायला सांगितलं तर सरपटणारा व्यवहार झाल्याचं काही जण मांडत आहेत. मात्र, खरं तर इथं सरपटण्याचेच आदेश असावेत आणि ते मानण्याखेरीज पर्यायच ठेवला गेला नसावा. अर्थात हे कुणी जाहीरपणे बोलत नाही; पण विदर्भात साहित्यवर्तुळात सर्वज्ञात आहे ते म्हणजे सहगल येणार असतील तर संमेलनाचा घाट पार कसा पाडायचा, असाच मुद्दा उभा केला गेला होता. तो संमेलनाच्या खर्चाशी संबंधित होता आणि ते शिवधनुष्य पेलण्याची क्षमता आणि स्थिती उरलेली नव्हती. मग सुरक्षेचं कारण ढाल म्हणून पुढं करणं सोपं होतं. संमेलनाच्या मांडवात मिरवायची हौस असणारे "जमेल तितकं साधं करू; पण ठरलेले पाहुणे आणि त्यांचं भाषण होईलच,' असं सांगण्याइतपत ताठ बाण्याचे नाहीत. त्यातून निमंत्रणवापसीची अगतिकता आली आणि ही विनंती स्वीकारल्याबद्दल सहगल यांचे आभार मानणारा ओशाळलेपणाही आला. आता हे काम कुणाचं, महामंडळाचं की स्थानिक आयोजकांचं, हा वाद फिजूल आहे. सहगल यांच्यासह संमेलन पार पाडण्याइतक्‍या सशक्त कण्याचं यातलं कुणीच नाही हे, ज्यांना त्या येऊ नयेत असं वाटतं, त्यांना पक्कं ठाऊक होतं.

निमंत्रणवापसीचं एक कारण साहित्यसंमेलनाच्या दणेकबाज आयोजनात शोधलं जात आहे. साहित्य महामंडळ आयोजक निवडतं. एकदा आयोजक ठरला की कुणाला बोलवायचं, हे तो ठरवतो. मात्र, अशा रीतीनं सगळं खापर आयोजकांवर फोडायचं तर साहित्य महामंडळाचं काम काय उरतं? या आयोजनाला भरपूर खर्च येतो आणि त्यासाठी कुण्या तशाच बड्या असामीचा वरदहस्त आवश्‍यक बनतो. हीच पुढच्या मिंधेपणाकडं नेणारी रेसिपी असते. साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या प्रचलित व्यवहाराकडं यानिमित्तानं नव्यानं पाहण्याची संधी आहे. या वादाच्या निमित्तानं संमेलनावर बहिष्कार टाकणारे आणि संमेलन उत्साहात होऊ द्यावं, असं सुचवणारे असा एक उपवाद समोर आला आहे. संमेलनाकडं पाठ फिरवणारे तेवढे क्रांतिकारी आणि जाणारे कणापिचके इतका सरधोपट दृष्टिकोनही बरा नव्हे. संमेलनाकडं पाठ फिरवणाऱ्यांना संमेलनविरोधी ठरवायचंही कारण नाही. बहिष्कार हाही व्यक्‍त होण्याचा मार्ग आहे, तसंच सहगल यांच्या निमंत्रणवापसीचा निषेध करून ज्यांना संमेलनाला जायचं त्यांना तसं करू देणं हेही अभिव्यक्‍ती-स्वातंत्र्याला धरूनच नाही काय? संमेलनावर बहिष्कार टाकणाऱ्यांना अवश्‍य टाकू द्यावा, तसंच संमेलन व्हावं, त्यात संमेलनाध्यक्षांना योग्य सन्मान मिळावा आणि हवं ते बोलू द्यावं या सांगण्यातही काही गैर नाही. तसेही सहगल यांच्या निमंत्रणवापसीतून तयार झालेले प्रश्‍न संमेलनापुरते नाहीतच.
***

आता मुद्दा सहगल यांच्या विचारांचा, त्यांच्या विचारांचं समर्थन करणाऱ्यांचा आणि विरोध करणाऱ्यांचा. सहगल यांचे विचार काही लपून राहिलेले नाहीत. त्या सडेतोडपणे मतं मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यातही सत्तेत कोण आहे याची पत्रास त्यांनी त्या त्या काळातल्या समाजासमोरच्या प्रश्‍नांवर व्यक्त होताना ठेवलेली नाही किंवा त्यानुसार तीव्रता कमी-जास्त करण्याची चलाखीही केलेली नाही. त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची आहेत, विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या आहेत हे विरोधामागचं कारण असल्याचं सुचवलं जातं आहे. मात्र, नेहरूकन्या इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेताना त्यांना नेहरूंची भाची असल्याचं ओझं वाटलं नव्हतं. राजीव गांधींच्या काळातही त्या तशाच सडेतोड राहिल्या. हाच प्रवास सध्याही सुरू आहे. तो राज्य करणाऱ्या प्रत्येकाला खुपला तर नवल नाही. कारण, राज्य करणाऱ्यांना "आपलं काही चुकतं आहे' असं वाटत नसतं; किंबहुना आपल्या चुका दाखवणं म्हणजे विरोधकांना मदत करणं अशाच भूमिकेतून बघण्याचा प्रयत्न या वर्गाचा असतो. सहगल यांच्या बाबतीत हेच घडतं आहे. त्यांनी अलीकडच्या काळात अखलाकच्या हत्येपासून अनेक बाबींवर परखडपणे मतं मांडली आहेत. सहगल त्यांच्या न झालेल्या भाषणात अशाच मुद्द्यांकडं लक्ष वेधू पाहताना दिसतात. त्यांनी जमावहिंसेवर खडे बोल सुनावले आहेत. सरकारी यंत्रणा बाजूला उभी राहून हे पाहत असल्यावर बोट ठेवलं आहे. बहुसांस्कृतिक सामाजिक व्यवस्था धोक्‍यात येत असल्याकडं त्या लक्ष वेधतात. स्वायत्त संस्थांवरच्या अतिक्रमणाकडं निर्देश करतात. हे सारं कुणाला झोंबणारं आहे हे स्पष्ट आहे. या वादात व्यापक मुद्दा आहे देशातलं वैविध्य मान्य करत सर्वांना सोबत घेऊन जाणारी सांस्कृतिक वैविध्याचा सन्मान करणारी वाटचाल करायची की एकतेच्या नावाखाली एकसाची एककल्ली वाटचालीकडं जायचं हा. असा साऱ्यांना एकाच चौकटीत बसवू पाहणारा बहुसंख्याकवाद उघडपणे मिरवला जातो आहे. हा भारताच्या संकल्पेनविषयीचाच झगडा आहे. तो कुठल्या साहित्य संमेलनात टाळल्यानं टळत नाही, संपत नाही की दुर्लक्षिताही येत नाही.

सहगल यांना येऊ न देणाऱ्यांनी "कुठं आहे देशात बोलायला बंदी? कुणी हवं ते बालू शकतो' असं नाक वर करून सांगणाऱ्यांची पोलखोल केली आहे. "कुणावरही टीका करताच ना, आणखी कसलं मतस्वातंत्र्य हवं तुम्हाला?' असं वेळी-अवेळी दरडावणारे मुखंड अलीकडं मातले आहेत. सत्तेच्या अवतीभवती पिंगा घालणाऱ्या या साजिंद्या-बाजिंद्यांना मुक्तपणे व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याची किंमत कळण्याची शक्‍यताही कमीच. यात ज्या कुणाला सहगल यांनी महाराष्ट्रात येऊन अभिव्यक्ती-स्वातंत्र्य आणि समाजासमोरच्या प्रश्‍नांवर चार शब्द सुनावणं परवडणारं नाही असं वाटत होतं, त्यांनी एका बाजूला त्यांना येण्यापासून थांबवण्यात यश मिळवलं. मात्र, व्यापक अर्थानं यातून त्यांनी काय साधलं? एकतर महाराष्ट्रात बोलावून एका जगप्रसिद्ध लेखिकेला नंतर नकार कळवण्यातून अपमान तर केलाच; शिवाय मराठी साहित्यविश्वाला कमीपणाही आणला आणि या साहित्यविश्वाचा व्यवहार पाहणाऱ्यांच्या कणाहीनतेवर शिक्कामोर्तब झालं. त्यापलीकडं, सहगल न येण्यानं त्यांचा विचार पुढं येणार नाही असं त्यांना रोखण्यात आनंद शोधणाऱ्यांना वाटत असेल तर ते कोणत्या जगात वावरतात हाच मुद्दा आहे. सहगल यांनी संमेलनासाठी भाषणाची तयारी आधीच केली होती. ते तयार भाषण समाजमाध्यमी स्फोटाच्या काळात जगभर जाणार हे उघडच होतं आणि कदाचित संमेलनाच्या व्यासपीठावरून ते झाल्यानं जेवढं गाजलं-वाजलं असतं त्याहून अधिक ते न झाल्यानं चर्चेत आलं. न झालेलं आणि सर्वात गाजलेलं, परिणामकारक ठरलेलं भाषण म्हणूनही सहगल यांच्या या भाषणाची नोंद होईल.

काही शहाणे असंही विचारत आहेत की कोण या नयनतारा सहगल? त्या न आल्यानं काय बिघडणार आहे? किती मराठीजनांना त्या माहीत आहेत? एकतर हा मुद्दाच गैरलागू आहे. त्या कुणीतरी आहेत म्हणूनच तर त्यांना निमंत्रण दिलं होतं ना? आता ते नाकारायची नामुष्की आल्यानंतर "त्या कोण' म्हणून विचारण्याला काय अर्थ? ज्यांना असं आता वाटतं त्यांनी निमंत्रण दिल्यानंतर लगेचच असा गळा काढल्याचंही दिसत नाही. दुसरीकडं ज्यांनी उत्तम साहित्याची निर्मिती केली ते सगळे जण आणि त्यांचं लेखन जनसामान्यांना माहीत असेलच असंही मानायचं काही कारण नाही. या निवडी काही जनमताच्या कौलावर करायच्या नसतात. हाच निकष मानायचा तर अंकलिपी हे सर्वात लोकप्रिय साहित्य आणि क्रमिक पुस्तकं लिहिणारेच महान साहित्यिक ठरवावे लागतील! कसदार लेखनानं विचारप्रवाहांवर प्रभाव टाकणारं किती लोकांनी वाचलं यावर त्याचं महत्त्व ठरत नसतं. साहित्यिक, विचारवंत, लेखक या मंडळींनी काही भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असते. ती कोणतीही असू शकते. यात सहगल यांची भूमिकाच नाकारणारेही असू शकतात. मात्र त्या कोण, हा "व्हॉट्‌स अप विद्यापीठा'तल्या तज्ज्ञांचा सवाल तो विचारणाऱ्यांच्या कुवतीला साजेसाच आहे. सहगल यांच्या भाषणातला प्रत्येक मुद्दा खोडून काढायला जरूर संधी असली पाहिजे. मात्र, त्यांना बोलताच येऊ नये याला मुस्कटदाबी नाहीतर काय म्हणायचं? आपल्याला मान्य नसलेली मतंही मांडायचा इतरांचा अधिकार मान्य करणं हे लोकशाहीचं मूलभूत लक्षण आहे. त्यालाच इथं हरताळ फासला जात आहे. त्याला स्पष्टपणे विरोधाची भूमिका घेणं महत्त्वाचं ठरतं.

न केलेल्या भाषणात सहगल एके ठिकाणी म्हणतात ः "जिथं विचारस्वातंत्र्य किंवा लोकशाहीबाबतच्या हक्कांविषयी आदरभाव नसतो, तिथं लेखन ही धाडसी आणि धोकादायक कृती बनते.' मुद्दा हे आव्हान पेलण्याचा असायला हवा. सर्वसमावेशक आणि विरोधी मतांचाही आदर बाळगणाऱ्या भारताच्या संकल्पनेसाठी तरी ते पेलायला हवं. अर्थात कुणाच्या तरी दबावाखाली येऊन विचारांची मुस्कटदाबी करणाऱ्या दिवाभीतांकडून किंवा सारं घडवून नंतर "जाऊ द्या हो सहगलबाईंचं; त्यासाठी संमेलनाला का वेठीस धरता?' असं सांगणाऱ्या साळसुदांकडूनही ही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. त्यापलीकडं एक प्रवाह आहेच आणि मुक्त विचार रोखू पाहणाऱ्या निमंत्रणवापसीच्या विरोधात त्यानं ठामपणे आवाजही उठवला, हेही कमी नाही. सारंच बिघडलंय आणि काहीही दडपता येतं असा कंठाळी सूर लावायचं कारण नाही, हाही सद्यस्थितीत दिलासाच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com