ओबामांचा वारसा... (श्रीराम पवार)

shriram pawar's article in saptarang
shriram pawar's article in saptarang

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द आता संपते आहे. गेल्या बुधवारी त्यांनी निरोपाचं भाषणही व्हाइट हाउसमध्ये केलं. दोन महत्त्वाच्या पावलांसाठी ओबामा इतिहासात दखलपात्र राहतील. पहिलं पाऊल म्हणजे अमेरिकेच्या शेजारी राहून कम्युनिझमचा पुकारा करत अमेरिकेला सतत आव्हान देणाऱ्या क्‍यूबाशी त्यांनी अधिकृतपणे संबंध प्रस्थापित केले आणि इराणशी अणुकरार हे दुसरं पाऊल. ओबामांच्याच काळात भारतही अमेरिकेच्या जास्त जवळ गेला, हीसुद्धा एक महत्त्वपूर्ण घडामोड होय.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी ‘व्हाइट हाउस’चा निरोप घेण्याची वेळ झाली आहे. त्यानंतर नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पदभार स्वीकारतील. ओबामा यांचं बुधवारी निरोपाचं भाषण झालंही आहे.

या काळात जगाचं सगळ्यांचं लक्ष आहे ते ट्रम्प पदावर येताच काय आणि कोणते बदल करणार याच्यावर. प्रचारमोहिमेतले ट्रम्प विजयानंतरही फार बदलले नाहीत. व्हाइट हाउसमध्येही ते तसेच राहणार काय? प्रचारात कुणी काहीही बोललं तरी सत्तेची म्हणून एक चौकट असते आणि साधारणतः तिथं ‘पॉलिटिकली करेक्‍ट’ भाषेत व्यवहार चालतो. सत्तेवरची माणसं बदलल्यानं देशांच्या दीर्घकालीन भूमिका-धोरणं फार बदलत नाहीत. याला रोज तडा देणारे ट्रम्प यांच्याविषयीचं कुतूहल स्वाभाविक आहे. याच वेळी मावळते अध्यक्ष ओबामा यांनी अमेरिकेला काय दिलं याचा आणि प्रचंड अपेक्षांचं ओझं घेऊन ‘येस, वुई कॅन’चा नारा देत आलेला हा अध्यक्ष जाताना मागं काय ठेवून निघाला आहे याचाही वेध घेतला जातो आहे. अर्थातच यात जाणकारांची टोकाची मतं आहेत. ‘ओबामांची कारकीर्द ऐतिहासिकच’ किंवा ‘ती सगळ्या आघाड्यांवर अपयशी’ अशी परस्परविरोधी मांडणी ध्रुवीकरण हा मंत्र बनलेल्या जगात अनिवार्य बनते आहे.

निरोपाच्या भाषणात ओबामा यांनी ‘येस, वुई डिड’ असं सांगून कारकीर्द यशस्वी ठरवली; पण नेमकं काय साधलं, काय राहिलं याला अमेरिकेच्याच नव्हे, तर जगाच्या दृष्टीनंही महत्त्व आहे. ओबामा एक प्रचंड असा आशावाद घेऊन अध्यक्षपदी आले. अमेरिका हा लोकशाही देश आहे आणि जगभर लोकशाहीची निर्यात करण्याचं कामही या देशानं स्वखुशीनं स्वीकारलं आहे. जगभरातल्या गुणवत्तेला मुक्त वाव देत देशाची प्रगती आणि जगातलं वर्चस्व कायम ठेवण्याचं धोरण अमेरिकेनं सातत्यानं ठेवलं. मात्र, तरीही अमेरिकी समाजातली विषमता आणि वांशिक संघर्ष झाकता न येण्यासारखा आहे. तो ‘आतले आणि बाहेरचे’, ‘आधी आलेले आणि नंतर’ असा तर आहेच; शिवाय ‘काळा-गोरा’ असाही आहे. ओबामा यांचं अध्यक्ष होणं हे त्या देशात कुणालाही सर्वोच्च स्थानी जाण्याची संधी आहे असा आशावाद जोपासणारं होतं. एक कृष्णवर्णीय किंवा आफ्रिकी-अमेरिकी व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षपदी येते, ही दोन शतकांहून मोठा लोकशाहीचा वारसा सांगणाऱ्या देशातही ‘न भूतो’ अशी घटना होती. जे व्हाइट हाउस कृष्णवर्णीय गुलामांच्या श्रमातून उभारलं गेलं, तिथं जाण्याचं स्वप्न म्हणजे १९६०च्या दशकापर्यंत वेडेपणाच होता. तिथं बराक हुसेन ओबामा नावाचा माणूस सन्मानानं पोचला, याचं कौतुक सतत काहीतरी साजरं करणं ही भूक असलेल्या जगासाठी स्वाभाविकच...याच व्हाइट हाउसमध्ये १९५० मध्ये पहिला कृष्णवर्णीय कर्मचारी नेमला गेला. तेव्हा मात्र त्याच्या वावरावर अनेक बंधनं होती. ओबामांचा जन्म झाला तेव्हा अमेरिकेत अधिकृतपणे गोऱ्यांसाठी वेगळी काळ्यांसाठी वेगळी अशी भेदावर आधारलेली व्यवस्था होती, जिथं गोऱ्यांचं पाणी वेगळं, काळ्यांच वेगळं होतं. त्या अमेरिकेत ओबामा अध्यक्ष झाले. ही क्रांती की काळानुसार थेट वर्णवादी होता येत नाही म्हणून स्वीकारलेली तडजोड? जन्म-वंश या आधारावर व्यवस्था ताब्यात ठेवू पाहणारे घटक मूलभूत बदल न करता असले वरवरचे बदल करून, या बदलांनाच क्रांती माना, अशी भूल देत असतात. त्यातून मुळात परिवर्तन होतच नाही. ओबामांनंतर ट्रम्प येण्याला याचंच द्योतक मानता येईल काय? अध्यक्ष झाल्यानंतरही ओबामांचे कृष्णवर्णीय असल्याची जाणीव करून देणारे लज्जास्पद प्रसंग घडलेच. उदारमतवादी जगाला कृष्णवर्णीय अध्यक्ष होण्यासारखी अशी उदाहरणं आपला अजेंडा मुख्य प्रवाहात ठेवण्यासाठी आवश्‍यक असतात, तर भांडवलशाहीला मूळ धोरणात बदल न करता अशी प्रतीकं उभी करणं, त्यांच्याकरवीच आपली मूल्यं घट्ट करणं, हेतू साध्य करणं लाभाचं असतं. म्हणूनच ओबामा याच्या कारकीर्दीचा शेवट जवळ येईल, तशी अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय समाजात ओबामांच्या यशानं प्रतिष्ठा मिळाली, यापलीकडं नेमका काय बदल झाला, यावर चर्चा झडते आहे. वरवर समतेचे मुखवटे घेऊन वावरणाऱ्या अमेरिकेतला वांशिक भेदाभेद किती टोकाचा आहे, हे ट्रम्प यांच्या विजयातल्या गोऱ्यांच्या निर्णायक सहभागानं स्पष्ट झालं आहेच. ओबामांचा विजय केवळ कृष्णवर्णीयांसाठी प्रतिष्ठेचा बनला नव्हता. ते जी भाषा बोलत होते, त्यामुळं मूळ प्रवाहाबाहेर राहणाऱ्या जगभरातल्या समूहांना आशा वाटत होती. ‘आय हॅव अ ड्रीम’ म्हणणाऱ्या मार्टिन ल्यूथर किंग यांच्या लढ्यातल्या एका स्वप्नाची पूर्ती म्हणून त्याकडं पाहिलं गेलं. ओबामांची पहिली २००८च्या निवडणुकीतली प्रचारमोहीम सकारात्मकतेची रेघ वाढवून केवढं यश मिळवता येतं, याचं उदाहरण म्हणून सांगितली जात असे. तोवर जनमानसात रुजलेला सोशल मीडिया हे लोकांपर्यंत पोचण्याचं निर्णायक हत्यार बनवणारा पहिला लक्षणीय असा यशस्वी प्रयोग ओबामांचा. हिलरी क्‍लिंटन यांच्यावर पक्षाच्या उमेदवारीत मात करतानाच, ओबामांखेरीज कुणी अध्यक्ष होऊच शकणार नाही, असं वातावरण त्यांनी तयार केलं होतं. त्यांचं हे टेम्प्लेट घेऊन प्रतिमानिर्मितीवर निवडणुका जिंकण्याचे अनेक देशी-विदेशी प्रयोग मधल्या काळात झाले आहेत. मुद्दा अशा प्रकारे प्रत्येकाच्या मनातली विकासाची, बदलाची अपेक्षा उंचावल्यानंतर प्रत्यक्ष होणाऱ्या कारभाराचा आहे आणि असं अपेक्षांच्या हिंदोळ्यावरून सत्ता घेणाऱ्या कुणालाही उंचावलेल्या अपेक्षा आणि निर्णय घेण्यातल्या मर्यादा यातला विसंवाद चुकत नाही. तो ओबामांच्याही वाट्याला आला. अशा अपेक्षा उंचावणाऱ्यांना मतं देणारे, पाठीशी उभं राहणारे अनेक समूह परस्परविरोधी हितसंबंध जपणारे असतात. निर्णय घेताना त्यात समतोल ठेवणं ही कसरत बनते. केवळ सदिच्छा, सुविचारांवर देश नाही चालवता येत. यातूनच ओबामांचं अध्यक्षपदावरचं स्वागत आणि ते व्हाइट हाउसमधून बाहेर पडतानाचा मूड यातलं अंतर तयार झालं आहे. निरोपाच्या वेळी ओबामा यांनाही आपली कारकीर्द खडतर झाल्याची कबुली द्यावी लागली. ओबामा हे अपवादात्मक वक्तृत्वाचे धनी आहेत. आपल्याला वाटतं ते देशाला पटवून देताना त्यांचा हा गुण कामी आला. कामगारांच्या विकासाच्या लढाईत मागं पडलेल्यांची व्यथा ओबामांना समजत होती. ते विचारांनी डावे नसले तरी या वर्गाला दिलासा देण्याच प्रयत्न करत राहिले. मात्र, त्यांच्या काळात श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी वाढलीच.

अमेरिकेचा जगातला दबदबा किती वाढला, यावरही अमेरिकेच्या अध्यक्षांचं मूल्यमापन होत असतं. जगातल्या अनेक संघर्षांमध्ये मध्यस्थाची भूमिका अमेरिका घेत आली आहे आणि त्यासाठी लष्करी बळाचा सढळ वापर करण्याचं त्यांना वावडं नाही. ट्‌विन टॉवरवरचा अल्‌ कायदाचा हल्ला हा अमेरिकेच्या प्रतिष्ठेवरचा घाला होता आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या ओसामा बिन लादेनला संपवणं, हाही तेवढाच प्रतिष्ठेचा मामला होता. ओबामांच्या काळात हे घडलं.

अमेरिकेच्या शत्रूंना कुठूनही शोधून संपवू, हा संदेश त्यातून दिला गेला. हे निःसंशय ओबामांचं यश होय. मात्र, अल्‌ कायदा छापाचा दहशतवाद संघटनांची नाव बदलून वाढलाच, हीही त्याची दुसरी बाजू. दीर्घकाळचे संघर्ष मिटवण्याचा, कमी करण्याचा प्रयत्न ओबामांनी नक्कीच केला. दोन ऐतिहासिक पावलांसाठी ओबामा इतिहासात दखलपात्र राहतील. अमेरिकेच्या शेजारी राहून कम्युनिझमचा पुकारा करत आव्हान देत राहिलेल्या क्‍यूबाशी त्यांनी अधिकृतपणे संबंध प्रस्थापित केले. १९२७ नंतर क्‍यूबाला भेट देणारे ते पहिले अमेरिकी अध्यक्ष. याचे नेमके परिणाम समजायला आणखी काही काळ जावा लागेल. मात्र, इतिहासातल्या जखमा आणि समजांसाठी भविष्य ओलीस धरू नये, हा पोक्तपणा त्यांनी दाखवला. इराणशी अणुकरार हाही त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीतला मैलाचा दगड मानता येईल. इराणवर आर्थिक निर्बंध लादून जेरीला आणण्याचे डावपेच दीर्घकाळ सुरू होते. इराणचा अणुकार्यक्रमही आव्हान देत होता. यात लष्करी ताकदीऐवजी मुत्सद्देगिरीचा अवलंब ओबामा प्रशासनानं केला. इराण आणि अमेरिका दोन्हीकडं संशयवादी असताना त्यांनी इराणशी संधी केली. एकही गोळी न चालवता इराणचा अण्वस्त्रकार्यक्रम थांबवणं हे मुत्सद्देगिरीतलं मोठचं यश आहे. शत्रुत्व हे धोरणांशी की त्या त्या देशातल्या जिवंत माणसांशी, यातली निवड त्यांनी अचूक केली. ओबामा लढाईपेक्षा ती टाळण्याला प्राधान्य देतील, असाच त्यांच्याविषयीचा समज होता. अफगाणिस्तान आणि इराकमधल्या युद्धातून बाजूला होत त्यांनी काही प्रमाणात हे साधलं. मात्र, आठ वर्षांच्या काळात अफगाणिस्तानचं भवितव्य ओबामांना निश्‍चित करता आलं नाही. अफगाणप्रश्‍नी ओसामला दडवणाऱ्या पाकिस्तानची साथ घेण्याशिवाय पर्याय नसल्याची अगतिकताही त्यांनी अनुभवली. सीरियात थेट अमेरिकेची लष्करी गुंतवणूक टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ओबामांनीही मान्य केलेली परराष्ट्र धोरणातली मोठी गफलत ठरली ती म्हणजे लीबियातला हस्तक्षेप. लीबियाची झालेली दैना हा त्यांच्या धोरणावरचा डागच मानला जातो. इराकमध्ये जे धाकट्या बुश यांच्या आततायीपणानं केलं, तेच लीबियात बुश यांच्यापेक्षा पूर्णतः वेगळी भूमिका असलेल्या ओबामांच्या काळात घडलं. येमेनमध्ये स्मशानावर आणि हॉस्पिटलवरही केलेली बॉम्बफेक, ड्रोनच्या हल्ल्यात पाकिस्तान आणि सोमालियात पडलेले नागरिकांचे बळी यांचीही ओबामांच्या कारकीर्दीत नोंद राहील. इसिस हे त्यांच्या काळात उभं राहिलेलं सगळ्यात मोठं दहशतवादी आव्हान. त्याबाबत ओबामांची अमेरिका धरसोडच दाखवत आली. ओबामा अध्यक्षपदावरून ‘लॉग ऑफ’ होताना इसिसचा पाडाव झालेला नाही आणि जगाला ग्रासणारा इस्लामी मूलतत्त्ववाद्यांच्या कारवायाही संपलेल्या नाहीत. दहशतवादाची भीषणता आणि त्यावरचा जागतिक दुटप्पीपणाही वाढतोच आहे. ओबामांच्या काळात अमेरिकेचे रशियाशी संबंध ताणलेलेच राहिले. चीनशी संबंध हा अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी शीतयुद्धोत्तर जगातला आव्हानाचा मुद्दा असतो. समन्वय आणि स्पर्धा यांची किनार एकाच वेळी असलेलं नातं अमेरिका-चीन चालवत आले आहेत. यात चीनचं सामर्थ्य वाढत गेलं. ओबामांनी दुसऱ्या अध्यक्षीय टप्प्यात चीनविरुद्धच्या आघाडीत भारताचा समावेश करण्याचा प्रयत्न केला. बराक ओबामा-नरेंद्र मोदी मैत्रीपर्वाच्या मुळाशी अमेरिकेच्या आशिया पॅसिफिकमधला बदलता प्राधान्यक्रम आहे. ओबामांच्या काळात भारत हा अमेरिकेच्या अधिक जवळ गेला हे निःसंशय.

नवउदारमतवादी धोरणांतून तयार झालेले विसंवाद, विसंगती, विषमता यांच्यावर ओबामा काही इलाज करतील, अशीही अपेक्षा होती. या आघाडीवर ‘जैसे थे’वादी धोरण हेच त्याचं वैशिष्ट्य राहिलं. आर्थिक आघाडीवर सबप्राइम क्रायसिसनंतरचा गोंधळ संपवण्याचं, मंदीतून अमेरिकेला आणि जगालाही बाहेर काढण्याचं मोठं आव्हान ओबामा यांच्यापुढं होतं. बॅंका धडाधड कोसळत होत्या, वॉल स्ट्रीटवर हाहाकार होता, मोटार-उद्योग गर्तेत अडकला होता. मंदीचं मळभ दाटलं होतं. या स्थितीत ओबामा अध्यक्ष झाले. त्यांनी सुरवातीलाच ७८७ अब्ज डॉलरचं पॅकेज दिलं. करसवलती, उद्योग-बॅंकांना सढळ मदत करत आर्थिक गाडा रुळावर आणला. अमेरिका मंदीत तगली. ओबामांच्या कारकीर्दीच्या अखेरच्या काळात तिची अर्थव्यवस्था सकारात्मक चिन्हंही दाखवू लागली. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरच्या बॅंका, अडचणीत आलेले उद्योग यांना भल्या मोठ्या आर्थिक मदतीची पॅकेज देऊन अर्थव्यवस्था हलती ठेवण्यावर भर राहिला. त्याची फळंही मिळाली. मात्र, ओबामांवर आक्षेप राहिला तो जे या गोंधळाला-घोटाळ्यांना जबाबदार होते, नफेखोरीपायी ज्यांनी जगालाच जवळपास वेठीला धरलं त्यांचं काय वाकडं झालं? जगाशी व्यापार हे अमेरिकेचं बलस्थान आहे. यात सर्व ताकद वापरून अमेरिकेला हवे तसे खेळाचे नियम बनवण्याचे प्रयत्न होत असतात. ओबामांनी ‘ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप’च्या माध्यमातून अन्य बड्या ११ देशांशी मुक्त व्यापाराचा प्रस्ताव आणला. ‘ट्रान्स ॲटलांटिक ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट पार्टनरशिप’चा प्रस्ताव युरोपीय देशांपुढं ठेवला. हे बहुराष्ट्रीय करार जागतिक व्यापारात व्यापक बदल घडवू शकतात. अर्थात ते पूर्णत्वाला येण्यात आता ट्रम्प प्रशासनाच्या भूमिकेचा अडथळा असेल. जागतिक हवामानबदलांचं गांभीर्य समजून त्याविषयी ठोस पावलं उचलण्याची तयारी ओबामांनी दाखवली. इथंही ट्रम्प त्याउलट दिशेनं जाण्याचा धोका आहेच.

स्वप्नाळू आशावादाचं स्वप्न निरोपापर्यंत ओबामांसोबत राहिलं. त्यांच्याविषयीचा जगाचा आशावादही काहीसा स्वप्नाळूच होता; म्हणूनच शांततेचं नोबेल त्यांना काही केल्याबद्दल नव्हे, तर ते शांततेसाठी ठोस काही करतील, या अपेक्षेनं देण्यात आलं होतं. ते जागवत असलेल्या आशावादाच्या कल्पना अनेकदा व्यवहारी वास्तवाच्या खडकावर आपटल्या. आशा आणि बदल हे परवलीचे शब्द बनवून अध्यक्षपद सांभाळलेल्या ओबामा यांनी अमेरिकेतल्या प्रस्थापित रचनेत फार मूलभूत बदल केले नाहीत. मध्यममार्गी आणि समन्वयवादी भूमिका यावरच त्यांचा भर राहिला. ज्या मूल्यांचा ते पुरस्कार करत राहिले, त्याच्या विपरीत प्रवृत्ती आज अमेरिकेत बलिष्ठ झाल्या आहेत. जगही जागतिक भाईचाऱ्याकडून संकुचित राष्ट्रवादाकडं ढकललं जातं आहे. हे घडताना ओबामांची कारकीर्द आशेचं कारण मानायचं की या बदलांना जन्म देण्याचं? तसंही अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचा अध्यक्ष पायउतार होतो, तेव्हा लगेचच त्याच्या सर्व निर्णयांचे परिणाम समजत नसतात. काही निर्णयांमधलं बरं-वाईट उमगायला दशकं उलटतात. निरोप घेताना ओबामा यांनी आपली प्रतिमा ‘भला माणूस’ अशी ठेवली, हेही नसे थोडके!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com