तंत्रात खरोखर मन रमते! (श्रीरंग गोखले, सुधीर फाकटकर)

तंत्रात खरोखर मन रमते! (श्रीरंग गोखले, सुधीर फाकटकर)

रेडिओ, टेपरेकॉर्डर, म्युझिक सिस्टिम, टू-इन-वन, सीडी प्रॉडक्‍ट, कार ऑडिओ ही उत्पादनं तशी वरकरणी पाहता ‘किरकोळ’ वाटतात... या किंवा अशांसारख्याच अन्य उत्पादनांमध्ये सर्जनशीलता किंवा नवनिर्मिती ती काय असणार, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडू शकतो... पण त्यातही सर्जनशीलता असते, हे वास्तव आहे. त्याच सर्जनशीलतेचा प्रवास उलगडणारं हे सदर.

तंत्रसर्जन
अभियांत्रिकीच्या पदवीनंतर मला योगायोगानं नोकरी मिळाली ती आवडीच्याच विषयाची, म्हणजे डिझाइनची. अभियांत्रिकीला असताना मशिन डिझाइन हा माझ्या आवडीचा विषय होता. मात्र, पुस्तकं हाच माहितीचा स्रोत असण्याचा ५० वर्षांपूर्वीचा तो काळ. त्याकाळी वेगवेगळ्या कंपन्यांना पत्रं लिहून मी त्यांच्या उत्पादनांचे कॅटलॉग व ब्रोशर मागवत असे. धोपटमार्गानं जाण्याची सवय म्हणा किंवा आळस म्हणा, सगळे विद्यार्थी स्क्रू-जॅक, पॉवर प्रेस किंवा पिस्टन इत्यादी प्रोजेक्‍टची निवड करत असत. मी मात्र अगदी आगळावेगळा Root`s blower हा प्रोजेक्‍ट डिझाइनसाठी घेतलेला आठवतो. ‘मशिन डिझाइन’, ‘पॉप्युलर सायन्स’, ‘पॉप्युलर मेकॅनिक्‍स’ ही माझी अत्यंत आवडती मासिकं मी त्या वेळी सतत वाचत असे. पहिली नोकरी मिळाली ती ‘फिलिप्स’ या कंपनीत. आमच्या वेळी नोकरी सहज मिळत नसे व कॅम्पस इत्यादीचीही प्रथा तेव्हा नव्हती. माझं सगळं आयुष्य पुण्यात गेलेलं, काढलेलं व नोकरीची ऑफर होती कलकत्त्याची (आताचं कोलकता). ‘फिलिप्स’ची ऑडिओ डिव्हिजन त्या वेळी कलकत्त्यात होती. मनाचा हिय्या करून मी नोकरी स्वीकारली. ‘फिलिप्स’सारख्या इलेक्‍ट्रिकल व इलेक्‍ट्रॉनिक कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअरचं काय काम, असा प्रश्‍न त्या वेळी पडला; पण नंतर लक्षात आलं, की अभियांत्रिकीची पार्श्‍वभूमी ही सर्वव्यापी असते आणि प्रत्येक कंपनी त्यांच्या उत्पादनानुसार अभियंत्याला हवं तसं वळण देत असते. एखाद्याची थिअरी पक्की असेल आणि इंजिनिअरिंग- लॉजिक पक्कं असेल, तर नव्या परिस्थितीशी जुळवून घेता येऊ शकतं. क्रॅंकशाफ्ट, बीम, बॉयलर, गिअर असे विषय मागं पडून प्लास्टिक, स्प्रिंग, पॅकेजिंग, मास प्रॉडक्‍शन, डाय-मेकिंग अशा नवीन विषयांना मला हात घालावा लागला. इथं डिझाइन हे स्ट्रेंथ कॅल्क्‍युलेशन किंवा स्ट्रेसशी संबंधित नसून ले-आउट, कॉन्फिग्युरेशन, इरगॉनॉमिक्‍स किंवा प्रॉडक्‍ट स्टायलिंगशी संबंधित होतं.

दोन वर्षांतच माझी पुण्यात भोसरीमधल्या कारखान्यात बदली झाली. नवा कारखाना व अत्याधुनिक डिझाइन सेंटर. भोसरीमधला फिलिप्सचा हा कारखाना सन १९७० मध्ये सुरू झाला. मी त्याच वर्षी तिथं रुजू झालो आणि माझ्या सेवानिवृत्तीच्या वर्षी म्हणजे २००५ ला तो कारखाना बंदही झाला. म्हणजे जणू काही माझ्यासाठीच हा कारखाना निर्माण झाला होता! या ३४ वर्षांत ड्राफ्टस्‌मनसदृश नोकरीला सुरवात करून शेवटी संशोधन आणि विकास विभागाच्या (आर अँड डी) प्रमुखपदापर्यंतची प्रगती मला करता आली. या प्रदीर्घ काळात मी अनेक डिझाइन तयार केली. प्रत्येक उत्पादन हे एकेक आव्हानच होतं. हातानं केलेल्या ड्रॉइंगपासून - ही मी क्रोकक्विलसारख्या टाकानं करत असे-  ते pro E-CAD सारख्या अद्ययावत प्रणाली मी वापरल्या.

कंझ्युमर प्रॉडक्‍ट तयार करताना एक फायदा हा असतो, की आपण तयार केलेलं उत्पादन लगेच बाजारात येतं आणि त्याविषयीचा ग्राहकांचा प्रतिसाद कळत राहतो व त्यापासून कंपनीला होणारा नफाही सतत डोळ्यांपुढं असतो. असं होत असल्यामुळं संबंधित उत्पादनाच्या निर्मितीशी संबंधित अधिकारी- कर्मचारी उत्साही राहतात. तसं म्हणाल तर रेडिओ, टेपरेकॉर्डर, म्युझिक सिस्टिम, टू-इन-वन, सीडी प्रॉडक्‍ट, कार ऑडिओ ही उत्पादनं तशी किरकोळ वाटतात; पण या उत्पादनांशी संबंधित एखादी संकल्पना मूर्त स्वरूपात आणताना खूप मजा यायची, आनंद वाटायचा. आपण निर्मिती केलेल्या या उत्पादनापासून कंपनीला फायदा होत आहे, ही बाब त्या आनंदाहूनही अधिक मोलाची व अभिमानाची असे.

कित्येक संकटं येऊनसुद्धा माझ्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत ‘ऑडिओ’मध्ये भारतात फिलिप्सनं कायमच अव्वल स्थान राखलं आणि त्याचं मुख्य श्रेय हे डिझाइन सेंटरला, तसंच सर्जनशीलतेला (Creativity) आणि अभिनवतेला (Innovation) पाठिंबा देणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापन- धोरणाला द्यायला हवं. यात आमच्यासारख्या डिझायनरवर ‘विस्तारित जबाबदारी’ही असे. म्हणजे असं, की ज्या ग्राहकासाठी उत्पादन तयार केलं जात आहे, त्या ग्राहकाला त्याचा आनंद झाला पाहिजे. थोडक्‍यात, ग्राहकाचं समाधान हे मुख्य सूत्र. त्यासाठी डिझाइनमध्ये नावीन्य आणि अद्ययावतता असायला हवी. दर्जा उत्तम हवा, किंमत वाजवी हवी. म्हणूनच संबंधित डिझायनरसाठी ही ‘विस्तारित जबाबदारी’ नुसत्या डिझाइनपुरतीच मर्यादित न राहता त्याला मार्केटिंग व मार्केट रिसर्च, प्रॉडक्‍ट मॅनेजमेंट, क्वालिटी कंट्रोल व टेस्टिंग, पर्चेसिंग आणि प्रॉडक्‍शन या सगळ्या विभागांशी सतत देवाण-घेवाण करण्याचं कौशल्यही आत्मसात करावं लागे. या सगळ्या विभागांशी सातत्यपूर्ण संपर्क येत गेल्यानं माझ्या ठायी एक व्यापक दृष्टिकोन आपोआपच तयार होत गेला. या सगळ्या अनुभवांचा एक मुख्य धागा - मागं वळून पाहता- ध्यानात येतो व तो म्हणजे सर्जनशीलतेचा आणि नावीन्याचा ध्यास. आपल्याला सतत सर्जनशील राहावं लागणार आहे, याची जाणीव काम करताना मला नेहमी होत असे.

जणू काही कंपनी मला अदृश्‍यपणे सतत बजावत असे - ‘मि. गोखले, यू हॅव टू बी क्रिएटिव्ह.’ हा सततचा सकारात्मक धाक आणि माझी मनोवृत्ती अगदी जुळली होती. कुठलाही अभियंता स्वत-च स्वत-ला सर्जनशील असं म्हणवून घेत नाही, मीही तसा दावा अर्थातच करत नाही; पण सर्जनशीलतेचा हा प्रवास कसकसा होत जातो, होत गेला, ते मात्र मी उलगडून दाखवू इच्छितो. तुम्ही केलेल्या एखाद्या विषयाचा अभ्यास हा सर्जनशीलतेला अतिशय पूरक ठरत असतो, असा स्वानुभव आहे. मी असा अभ्यास सतत करत असे. या अभ्यासाबरोबरच काही टूलही माझ्या मदतीला आली. ‘फिलिप्स’मध्ये अशा ‘टूल्स अँड टेक्‍नॉलॉजी’चा खजिनाच होता. ही सर्व टूल वापरून आमचं डिझाइन अधिकाधिक स्मार्ट होत गेलं. या टूलमध्ये डिझाइन टूलबरोबरच क्वालिटी टूल, प्रॉब्लेम- सॉल्व्हिंग टेक्‍निक, ॲनॅलिसिस टूल, डिसिजिन टेकिंग टूल, कॉस्ट रिडक्‍शन अशी अनेक टूल शिकायला व वापरायला मिळाली. मी व्यवस्थापनाचं औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही. मात्र, काही तत्त्वं कंपनीच्या प्रशिक्षणादरम्यान शिकलो आणि अन्य काही तत्त्वं मार्केटिंगचा डिप्लोमा केला त्या वेळी शिकलो. ही सगळी तत्त्वं प्रत्यक्ष आचरणात आणल्यानं मला खूप केस स्टडिज्‌ तयार करता आल्या. नंतर माझी मुलगी व्यवस्थापन शिकताना तिनं मला विचारलेल्या शंकांचं निरसन करताना, ‘आपण व्यवस्थापनाची सगळीच तत्त्वं प्रत्यक्षात जगलो आहोत,’ याची मला जाणीव झाली.  

‘मानवी संबंध’ या विषयावरही मी नोकरीनंतर बरंच वाचन केलं. मासलोची तत्त्वं, प्रेरणा व कार्यक्षमता यांचे संबंध, नेतृत्वगुण, तडजोडीचं कलाशास्त्र, कामाची विभागणी हे सगळं किती महत्त्वाचं आहे हे समजलं. मी उद्योजक नसलो तरी ज्या मानसिकतेनं मी नोकरी केली, तो प्रवास हा Intrapreneur चा (अंतर्गत उद्योजक) होता हे नक्की. माझे वरिष्ठ, माझे सहकारी, मला नंतर भेटलेले शून्यातून विश्‍व निर्माण केलेले उद्योजक या सगळ्यांनी माझं अनुभवविश्‍व खूप समृद्ध केलं.
सेवानिवृत्तीनंतर मला ‘उद्योजकता’ किंवा Entrepreneurship या विषयात रस निर्माण झाला. नोकरीच्या कालावधीत मला कंपनीत मिळालेलं ज्ञान छोट्या व मध्यम उद्योजकांना किती उपयुक्त ठरेल याची जाणीव काही संस्थांमधून काम केल्यावर मला झाली. मी शिकलेली काही टूल ही अगदी शाश्‍वत स्वरूपाची होती. नंतर वाचनातून मी त्यांत आणखी काही तंत्रांची भर घातली. व्यवसाय करण्याची उद्योजकांची मानसिकता आणि व्यवसायाची प्रगती याबद्दल मी माहिती घेतली. या सगळ्या अनुभवांचा गोषवारा म्हणजे हे लेखन आहे; पण अर्थातच या लेखनाचा मुख्य गाभा आहे तो कल्पकता / सर्जनशीलता हाच. फिलिप्समधली उत्पादनं आज जरी साधीसुधी वाटत असली, तरी त्यांची निर्मिती करताना वापरलेली तत्त्वं महत्त्वाची आहेत. दोन वर्षांपूर्वी मला मोठं आजारपण आलं होतं, त्यादरम्यान माझं वाचन वाढलं. मुख्यत्वे मराठी वाचन. त्यातून एक लक्षात आलं, की मराठी वाङ्‌मय खूप समृद्ध आहे; पण त्यांत अनुभवांचं वैविध्य तसं कमीच आहे. विविध क्षेत्रांतल्या मंडळींनी आपापल्या विषयांवर लिहून आपली मायबोली समृद्ध केली पाहिजे, असं मला वाटतं. माझं जे अभियांत्रिकीचं क्षेत्र आहे, त्यावरचं असं अनुभवलेखन मराठीत तसं तोकडंच आहे. या विषयाच्या लेखनात माझ्यापरीनं काही समृद्ध भर घालण्याचीही प्रेरणा माझ्या या लेखनामागं आहे.

- श्रीरंग गोखले skg2743@gmail.com

-----------------------------------------------------------------------------
विज्ञानक्षेत्रे...

अणुऊर्जा विभाग

अणुविषयक शास्त्रीय संशोधन होत गेल्यानंतर विज्ञान-तंत्रज्ञानात एक नवीनच दालन उघडलं गेलं. अणू म्हटल्यानंतर केवळ अणुऊर्जा एवढंच नसून अन्नधान्यापासून औषधं ते अनेक साधनं-उपकरणांपर्यंत आणि मूलभूत ते उपयोजित संशोधन अशी प्रचंड व्याप्ती आहे. अणुविज्ञान-तंत्रज्ञानाचं महत्त्व जाणूनच जागतिक पातळीवर अणूचा शांततेसाठी वापर व्हावा, असा आग्रह धरणाऱ्या भारतात सन १९४८ मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली व १९५४ मध्ये स्वतंत्र अणुऊर्जा विभाग अस्तित्वात आला.

भारतीय नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी अणुविषयक विस्तृत संशोधन करत तंत्रज्ञान विकसित करणं, असा दृष्टिकोन या विभागानं समोर ठेवला आहे. याअनुषंगानं अणुऊर्जेच्या संदर्भात अणुगर्भीय मूलभूत संशोधन साध्य करत यंत्रणाप्रणालींचा विकास करणं, किरणोत्सार विषयक्षेत्रात संशोधन करणं व विकसित तंत्रज्ञानाचं औषध-शेती-उद्योग यासंदर्भात उपयोजन शोधणं, सुरक्षा-संरक्षणक्षेत्रात आण्विक तंत्रज्ञानाचे उपयोग शोधणं, आण्विक तंत्रज्ञानाशी संबंधित संगणकीय उपकरणप्रणाली विकसित करणं, तसेच अणुविषयक विज्ञान शाखांमध्ये अभ्यास-संशोधनाच्या सुविधा निर्माण करणं, अशा अनेक विषयक्षेत्रांमध्ये अणुऊर्जा विभाग कार्यरत आहे.

कार्याच्या अनुषंगानं अणुऊर्जा विभागाचं स्वतंत्र अणुऊर्जा नियामक मंडळ आहे. संशोधन-विकासासाठी या विभागाकडून भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र, राजा रामण्णा अद्ययावत तंत्रज्ञान केंद्र, अणुगर्भीय ऊर्जा सहयोग वैश्‍विक केंद्र, इंदिरा गांधी आण्विक संशोधन केंद्र आणि व्हेरिएबल एनर्जी सायक्‍लोट्रॉन सेंटरची स्थापना झालेली आहे. अणुऊर्जा विभागाशी टाटा मूलभूत संशोधन संस्था, साहा इन्स्टिट्यूट फॉर न्युक्‍लीयर फिजिक्‍स, हरिश्‍चंद्र संशोधन संस्था, राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च, इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्‍स सायन्सेस, अशा एकूण १३ संस्था संलग्न आहेत. याचबरोबरीनं अणुऊर्जा विभागाच्या औद्योगिक आणि खनिज क्षेत्राशी संबंधित तीन संस्था, सेवाक्षेत्रासाठीही तीन संचालनालयं, ऊर्जाक्षेत्रासाठी दोन संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातही तीन संस्था क्रियाशील आहेत. देशात असं कुठलंही क्षेत्र नाही, जिथं अणुऊर्जा विभागाचा संबंध येत नाही.


संस्थेचा पत्ता - अणुऊर्जा विभाग
अणुशक्ती भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,
मुंबई- ४००००१ दूरध्वनी - (०२२) २२०२२४३९
संकेतस्थळ - www.dae.nic.in

सुधीर फाकटकर
sudhirphakatkar@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com