सीरियातलं शल्यकर्म... (श्रीराम पवार)

shriram pawar write article in saptarang
shriram pawar write article in saptarang

सीरियात झालेल्या रासायनिक हल्ल्याला क्षेपणास्त्रांचा भडिमार करून अमेरिकेनं दिलेलं उत्तर लगेचच सीरियातल्या युद्धाची स्थिती बदलणारं नाही. मात्र, ‘मी अमेरिकेचा अध्यक्ष आहे; जगाचा नव्हे,’ असं सांगत जगाच्या प्रश्‍नांचं, युद्धांचं ओझं वागवायचं नाकारणारे आणि त्यासाठी पाठिंबा मिळालेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी हल्ला करून आपल्याच भूमिकेला दिलेली बगल व्यापक परिणाम घडवणारी ठरू शकते. जगाच्या कटकटींपासून अमेरिका सहजी बाजूला होऊ शकत नाही, हे या हल्ल्यांनी स्पष्ट झालं, तसंच ट्रम्प हे बेभरवशाचे गृहस्थ आहेत, या प्रतिमेवरही शिक्कामोर्तब झालं. यानिमित्तानं ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातल्या भाईचाऱ्यासमोर मात्र प्रश्‍नचिन्ह लागलं आहे. त्यातून होणारे परिणाम जगासाठी लक्षवेधी असतील. सीरियातलं हे शल्यकर्म अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात नवं वळण आणणारं आहे. म्हणूनच ‘आणखी एक क्षेपणास्त्र हल्ला’ यापलीकडं ते महत्त्वाचं आहे.

सी  रियातला रासायनिक हल्ला निष्पापांचेही क्रूरपणे जीव घेणारा म्हणून भयानकच आहे. ‘रासायनिक शस्त्रांचा वापर करू नये’, या संकेतांना तिलांजली देणाराही आहे, यात शंकाच नाही. मात्र, त्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शोधलेला उपायही आंतरराष्ट्रीय संकेत धाब्यावर बसवणारा आहे. ‘ज्याच्या हाती ताकद, तो काहीही करायला मोकळा,’ हे तत्त्व सीरियातल्या आततायी प्रवृत्तींनी विषारी वायूच्या हल्ल्यात शंभरावर बळी घेऊन दाखवलं, तसंच सीरिया हा युद्धग्रस्त देश असला तरी स्वतंत्र, सार्वभौम देश आहे, याची पत्रास न बाळगता अमेरिकेनं टॉमहॉक मिसाइलची बरसात करून ‘बळी तो कान पिळी’ याच तत्त्वाचा अवलंब केला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेनं पुढं कसलीच कारवाई केली नाही. मात्र, अमेरिका आणि ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणात एक निर्णायक वळण यानिमित्तानं आलं आहे. या वळणावर अमेरिका आणि रशिया एकमेकांच्या विरोधी बाजूला दिसण्याच्या शक्‍यतेनं ते जगासाठीही लक्षवेधी आहे.

सीरियात बशर अल्‌ असद यांची राजवट पाश्‍चात्त्य देशांना खुपणारी आहे. काहीही करून सीरियात असद यांना सत्ताभ्रष्ट करण्याला अमेरिका आणि मित्रराष्ट्रांची पसंती आहे. तसे प्रयत्न हस्ते-परहस्ते अनेकदा झाले आहेत. असद हे प्रकरणही भ्रष्ट आणि हुकूमशाही वृत्तीचं; प्रसंगी आपल्याच प्रदेशातल्या लोकांवर लष्करी बळाचा बिनदिक्कत वापर करणारं आहे. आपल्या विरोधातल्या बंडखोरांना ठेचण्यासाठी असद यांना मानणाऱ्या फौजांनीच इडलिबलगत रासायनिक हल्ला केल्याचा संशय आहे. रासायनिक हत्यारांचा हल्ला मानवताविरोधी आहे, या अर्थानं त्याचा जगानं केलेला धिक्कार योग्यच होता. हा हल्ला नेमका कुणी केला, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्यानं सीरियातली गुंतागुंत वाढली आहे. ज्याचा परिणाम इसिसविरोधातल्या मोहिमांवर होऊ शकतो, तसाच अमेरिका- रशिया संबंधांवरही. इसिसविरोधातल्या लढाईत असद हाच एक प्रमुख घटक आहे. त्यातच असद यांच्या राजवटीला रशियाचा भक्कम आधार आहे. शिवाय, इराणचाही पाठिंबा आहेच; इसिसच्या पाडावानंतरच्या स्थितीत या भागात वांशिक तणाव न टळणारा आहे. याला शिया-सुन्नी वादाची किनारही आहे. इराण असद राजवटीच्या पाठीशी उभा राहतो, याचमुळं आणि अरब देश एकमुखानं ‘आधी असद यांचा बंदोबस्त करायला हवा,’ असं पाश्‍चात्त्यांच्या सुरात सूर मिसळून म्हणतात तेही त्याचमुळं. सीरियातल्या रासायनिक अस्त्रांच्या वापरानंतर ट्रम्प यांचा संयम सुटला. छोट्या मुलांच्या वेदनादायी मृत्यूची दृश्‍यं पाहून त्यांनी कारवाईचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. ट्रम्प यांच्या एका हल्ल्यानं त्यांच्याविषयी नेहमी टीकेचा सूर लावणारे अमेरिकेतले अनेक प्रस्थापित त्यांची प्रशंसा करू लागले. अर्थात, दुसऱ्या बाजूला मुळात अमेरिकेच्या अध्यक्षांना अशा प्रकारे दुसऱ्या देशात हस्तक्षेपाचा अधिकार कुणी दिला, याचीही चर्चा जगाच्या पटलावर सुरू झाली आणि अमेरिकेतही अशा बाह्य हस्तक्षेपासाठी काँग्रेसची मंजुरी आवश्‍यक असल्याचं सांगितलं जात आहे.

यात खरा मुद्दा ट्रम्प-पुतिन यांच्यातला भाईचारा पुढं सुरूच राहणार, की सीरियातल्या हस्तक्षेपावर रशिया तशीच प्रतिक्रिया देणार हा आहे. हे दोन्ही नेते बेभरवशाचे आहेत, तसंच आपापल्या देशात अत्यंत सामर्थ्यसंपन्न आहेत. आतापर्यंत ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी मिळतंजुळतं घ्यायची भूमिका घेतली होती. तिचा कस सीरियात लागणार आहे. पुतिनही अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांविषयी जाहीर ममत्व दाखवत होते. इतकं की ट्रम्प अधिकारारूढ होण्याच्या काही दिवस आधी रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची ओबामा यांच्या मावळत्या प्रशासनानं गठ्ठ्यानं हकालपट्टी केली. संकेतानुसार तितक्‍याच अधिकाऱ्यांची रशियानं हकालपट्टी करणं ही जवळपास गृहीत बाब होती. मात्र, पुतिन यांनी अमेरिकेतला सत्ताबदल लक्षात घेऊन शांत राहणं पसंत केलं. ट्रम्प यांनाही पुतिन यांच्यामध्ये एक कणखर जागतिक नेता दिसत होता. ‘बराक ओबामा यांच्यापेक्षा पुतिन हे कणखर नेते आहेत आणि त्यांनी महान कामगिरी करून दाखवली आहे,’ असं प्रशस्तिपत्रही ट्रम्प यांनी दिलं होतं. ट्रम्प विजयी व्हावेत, यासाठी रशियानं निवडणुकीत हेराफेरी केल्याचे आक्षेपही आहेत. या आक्षेपांविषयी अमेरिकेत चौकशीही सुरू आहे. अशा मैत्रीत टॉमहॉकचा सीरियातला वर्षाव तात्पुरता तणाव आणणार, की कायमचा तडा देणार, हा जगासमोरचा प्रश्‍न आहे. ‘अमेरिकेनं पुन्हा सीमरेषा ओलांडायच्या भानगडीत पडू नये,’ असा दम रशिया आणि इराणनं तातडीनं दिला आहेच. पुतिन आपले ‘बेस्ट फ्रेंड’ बनतील, असा आशावाद ठेवणाऱ्या जागतिक राजकारणात नवख्या ट्रम्प यांच्यासमोर पुतिन हे सगळ्यात कडवा प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकण्याचा धोका सीरियातल्या हल्ल्यानं तयार झाला आहे.
रासायनिक शस्त्रांचा धोका जगातल्या शहाण्यांनी फार आधीच ओळखला होता. एका झटक्‍यात प्रचंड मनुष्यहानी करून युद्धात निर्णायक बाजी मारण्याचे मनसुबे नवे नाहीत. अण्वस्त्रं काय किंवा रासायनिक अस्त्रं काय, त्यांचा वापर जगात सामर्थ्य दाखवण्यासाठी करण्याकडंच कल असतो. रासायनिक अस्त्रं वापरण्याचा सीरियातला हा काही पहिला प्रसंग नाही. १९१५ पासून असे प्रयोग झाल्याच्या नोंदी आहेत. जर्मनीनं विषारी वायू हे युद्धातलं शस्त्र बनवलं होतं. पहिल्या महायुद्धात दोन्ही बाजूंनी असे प्रयोग झाले, त्यात हजारो जणांचे बळी पडले होते. इटली, जपान, इराक यांनीही कधीतरी विषारी वायूचे प्रयोग केले आहेत. आता या वायूनं झालेली हानी पाहून व्यथित झालेल्या अमेरिकेनंही असा वापर केल्याचे आरोप झाले आहेत.

व्हिएतनामच्या युद्धात अमेरिकेनं केलेले प्रयोग याविषयीच्या ‘जीनिव्हा समझोत्या’चं उल्लंघन करणारेच होते. ‘सामर्थ्यवंतांचं सगळं खपतं,’ या तत्त्वानुसार तेव्हाही अमेरिकेचा उद्योग खपून गेला. व्हिएतनाममध्ये नामुष्की पत्करावी लागली, तरी विषारी वायूंसाठी अमेरिकेला कुणी शिक्षा केली नाही. आता असद राजवटीनं आपल्याच नागरिकांवर विषारी वायूचा वापर केल्याचा आक्षेप आहे. याच असद यांनी २०१३ मध्येही विषारी वायूचा वापर केला होता. त्यात सुमारे दीड हजार जण बळी पडले होते. आता बळींची संख्या शंभराच्या घरात आहे. असद यांचा हा इतिहास असतानाही रशिया त्यांना पाठीशी घालतो आहे. यात रशियाचे या प्रदेशातले हितसंबंध गुंतले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकारानं सीरियाच्या या उद्योगांवर नियंत्रण आणण्याच्या सर्व प्रयत्नांत रशियानं नेहमीच खोडा घातला आहे. आताही अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनं ‘विषारी वायूचा हल्ला करणाऱ्या विमानांच्या उड्डाणांचे तपशील, वैमानिकांची नावं आणि अन्य तपशील देण्यास सीरियाला बाध्य करावं,’ असा ठराव सुरक्षा परिषदेत आणला आहे. मात्र, इथंही रशिया व्हेटो वापरेल, यात शंका नाही. कदाचित हे ध्यानात घेऊनच ट्रम्प यांनी एकतर्फी कारवाईचा निर्णय घेतलेला असू शकतो.

असद यांच्या राजवटीला अमेरिका आणि नाटो देशांचा, तसंच अरब देशांचा विरोध जगजाहीर आहे. मात्र, ट्रम्प यांच्या विजयानंतर असद यांना हटवण्यात अमेरिकेला रस उरल्याचं दिसत नव्हतं. अमेरिकेकडून असद यांच्यासह इसिसच्या विरोधात लढ्याला मान्यता देण्याची भूमिका मांडली जात होती. किंबहुना ‘जगाच्या सुरक्षेची धुणी अमेरिकेनं का धुवावीत, अगदी नाटो देशांनीही सुरक्षेसाठी किंमत चुकवली पाहिजे,’ असं ट्रम्प यांचं अलीकडेपर्यंत सांगणं होतं. एक खरं आहे, की ट्रम्प यांच्याविषयी अंदाज बांधणं कठीण जावं, असं ते व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या धोरणाला नेमकी एकच एक दिशा असेल, हे संभवत नाही. सत्तेवर येता येता तैवानच्या अध्यक्षांशी संभाषण करून त्यांनी चीनच्या विरोधात जाण्याचे संकेत दिले. पुढं हा मामला तसाच सोडून देत चीनच्या ‘वन चायना’ धोरणाला संमती दिली. त्यांच्या बाबतीत ‘धरसोड’ हेच कायमचं लक्षण ठरण्याची शक्‍यता आहे. या स्थितीत पुतिन आणि ट्रम्प यांच्यातली मैत्री आटेल. फक्त काही निमित्त घडायला हवं, असं ट्रम्प यांचा मागोवा घेणारे सांगत होते. सीरियातल्या हल्ल्यानं असं निमित्त पुरवलं आहे. रशियाचा सीरियाला पूर्ण पाठिंबा असताना ट्रम्प यांनी सीरियात क्षेपणास्त्रं डागून रशियाला डिवचलं आहे. रशियाच्या सामर्थ्याची किंवा पुतिन यांच्याशी मैत्रीची ट्रम्प पत्रास बाळगत नाहीत, हेच या हल्ल्यातून दाखवून देण्यात आलं आहे. दुसरीकडं पुतिन हेही असेच अहंमन्य नेते आहेत, तेही अमेरिकेची पत्रास बाळगतील, ही शक्‍यता नाही. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असूनही जागतिक राजकारणात रशिया आक्रमक चाली खेळतोच आहे. ‘ट्रम्पयुगात रशिया- अमेरिका जवळ येतील, त्यातून चीनच्या विरोधात आघाडी तयार होईल. पूर्वाश्रमीचा सोव्हिएत संघ भरात असताना अमेरिकेनं चीनला रशियापासून तोडलं आणि शीतयुद्धात निर्णायक बाजी मारण्यात ती एक महत्त्वाची चाल ठरली, त्याच धर्तीवर आता रशियाला चीनच्या कच्छपी लागण्यापासून अमेरिका रोखेल आणि त्याबदल्यात चीनचं वाढतं महत्त्व रोखण्याचे प्रयत्न होतील,’ असं ट्रम्प यांच्या विजयानंतर सांगितलं जात होतं. या सगळ्या समीकरणांनाच सीरियातल्या घडामोडींनी तडा जाऊ शकतो. ‘अमेरिकेचा हस्तक्षेप मान्य नाही,’ अशी स्पष्ट भूमिका रशियानं घेतलीच, ‘पुन्हा असं धाडस करू नका,’ अशी दमबाजीही केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीनंतरही मॉस्कोतले मुत्सद्दी असद यांच्या बाजूनंच आहेत आणि ‘असद यांना घालवलंच पाहिजे’, असं अमेरिका सांगते. यात तडजोडीची शक्‍यता नसल्याचंच सूचित होतं. असद यांना पदभ्रष्ट केलं, तर सीरियाचं भवितव्य काय, हा प्रश्‍न उरतोच. असद नसतील तर तिथं धर्मांध सुन्नी गट सत्ता ताब्यात घेतील, अशीच शक्‍यता आहे. हे इराण सहजी मान्य करणार नाही. सद्दाम यांच्यानंतरचा इराक आणि गडाफी यांच्यानंतरचा लीबिया अस्वस्थतेच्या खाईत लोटला गेला, तशीच अवस्था सीरियातही येऊ शकते. हे टाळायचं कसं, याचं उत्तर कुणाकडंच नाही.

अमेरिका आणि रशिया पुन्हा एकमेकांसमोर ठाकले, तर ट्रम्प-पुतिन यांची मैत्री समोर ठेवून मांडले जाणारे सगळे अंदाज कोलमडतील. याचा परिणाम जगभरात, अगदी आपल्याकडं दक्षिण आशियातही होईल. सीरियात रशियाचा पाठिंबा असूनही एकतर्फी कारवाईचं धाडस करणारे ट्रम्प हाच कित्ता चीनच्या बळावर जगाला वाकुल्या दाखवणाऱ्या उत्तर कोरियाबाबत गिरवणार काय, हा आता विचारला जाणारा प्रश्‍न आहे. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन हे असंच जगाला डोकेदुखी बनलेलं खोडसाळ बेणं आहे. त्याचा समाचार कधीतरी जगाला घ्यावाच लागणार आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय बोलणी सुरू असतानाच सीरियात हल्ला करून ट्रम्प यांनी योग्य तो संदेश द्यायचं काम केलं आहे. उत्तर कोरिया असो की इराणचा अणुकार्यक्रम, रशिया आणि चीनचा पाठिंबा असूनही अमेरिका प्रसंगी कारवाई करू शकते, असा सीरियातल्या हल्ल्याचा अर्थ लावला जाऊ शकतो. जगाच्या व्यवहारात अमेरिकेवर बोजा टाकून नाक न खुपसण्याच्या व अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याच्या ट्रम्पप्रणित रेसिपीच्या विरोधात ही कृती असेल. मात्र, ट्रम्प कधीही यू टर्न घेऊ शकतात. त्यांनी असद यांच्या विरोधातली, पर्यायानं रशियाच्या विरोधातली भूमिका कायम ठेवली. दुसरीकडं उत्तर कोरियाच्या विरोधात कारवाईची पावलं उचलून चीनलाही डिवचलं, तर ट्रम्प यांची कारकीर्द नवी जागतिक समीकरणं लिहिणारी ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com