प्रारब्धाची कहाणी (शुभदा इनामदार)

shubhada inamdar
shubhada inamdar

अक्काचा कान करकचून पिळला गेला. तिला ओढत परसदारी नेलं गेलं. घाणीतला वरणाचा गोळा तसाच होता. ""खोटारडी! उचल, उचल ते अन्नब्रह्म! माजोरी कुठली. चल, खा ते वरण. खाऊन माजावं, टाकून नव्हे.'' अक्काला ते वरण खावंच लागलं. वरणाची तिला इतकी शिसारी बसली की नंतर आयुष्यात वरण तिला कधीच आवडलं नाही.

ऐका दैवा, प्रारब्धा तुमची कहाणी.
कहाणी तशी जुनी. एकशेवीस वर्षं पुराणी. त्या काळच्या स्थितीनुसार जाणून घ्यावी.
एक आटपाट नगर होतं.
तिथं एक कुटुंब होतं.
खाऊन-पिऊन सुखी होतं.
परकीयांचा अंमल होता. अंधश्रद्धांचा सुकाळ होता. सुधारणेच्या वाऱ्याचा समाजात दुष्काळ होता. स्त्रीशिक्षणाचा अभाव होता. अशा या काळात त्र्यंबक आणि उमाच्या पोटी जन्माला आली कमला. जन्मदिवस होता - भाद्रपद कृष्ण तृतीया. पितृपंधरवडा. जन्मक्षण निवडणं आपल्या हाती नसतं. तरीही माय-पित्यांनी, सग्या-सोयऱ्यांनी नाकं मुरडली. हरी या मुलाच्या पाठीवर मुलगी जन्मली; पण स्वागत यथातथाच झालं. अशा या कमलाच्या पाचवीला काय पूजलेलं होतं?
वाचा तीच कहाणी.
तिच्या प्रारब्धाची कहाणी.
दिसामासी कमला वाढू लागली. चारचौघींसारखं सामान्य रूप. तिच्या पाठीवर जन्मलेले सुशीला आणि बाळकृष्ण मात्र नक्षत्रासारखे सुंदर. या दोघांसाठी कमला बनली अक्का अन्‌ पुढं सगळ्यांचीच अक्का. वडिलांनी मुलांना शाळेत घातलं. शिकता शिकता अक्काला घरकाम-स्वयंपाक-शिवण-टिपण-विणकाम- भरतकाम यांचेही धडे मिळू लागले. तब्येतीची मात्र नेहमी थोडीफार कुरकूर चाले. रसरशीत, आरोग्यसंपन्न भावंडांत अक्का थोडी अशक्त, मलूलच दिसे.

वर्षं सरली. अक्कानं त्या काळची चौथीची परीक्षा दिली. आता लग्नाचं वय झालं. तिची जन्मपत्रिका तशी खडतरच होती. वधूपरीक्षा देणं सुरू झालं; पण नापसंतीचा शिक्का सतत बसू लागला.

"आता पाहण्याचा कार्यक्रम असला की सुशीलाला लपवून ठेवा' असे सल्ले मिळू लागले. धाकटीला मागण्या अन्‌ अक्काला नकारघंटा. बाशिंगबळ भारी जड.
शेवटी दूर शहरात एके दिवशी योग जमून आला. मुलगा गणेश पदवीधर, कमावता; पण लग्न जमत नव्हतं. कारण, "खाष्ट, भांडकुदळ स्त्री' म्हणून त्याच्या आईची दूरवर "ख्याती' पसरलेली होती. अशा घरात पोटचा गोळा द्यायचा म्हणजे काय? अक्काचं वय वाढत होतं. उमाबाईनं समजावलं ः ""कमळे, काही काळ सोस बाई सासुरवास. मुलगा चांगला मिळवता, सुस्वरूप आहे. तुझेही दिवस येतील.'' काळजावर दगड ठेवून निर्णय झाला.

एका सुमुहूर्तावर कमला ही गणेशची सरस्वती बनून सासरी गेली. सासुरवास म्हणजे काय याचा अनुभव घेऊ लागली. पंधरा-सोळा वर्षांचं वय. विधवा होऊन घरी परत आलेली नणंद आणि सासू यांचं जहरी वागणं ती पचवू लागली. तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सोसू लागली. कामाच्या ओझ्याखाली दबून गेली. सासरचं भलं मोठं खटलं. स्वयंपाक, तोही चुलीवर करायचा. "तिला मदत करू नका,' अशी गडीमाणसांना सक्त ताकीद असायची. परातभर तांदूळ अक्कानं निवडून ठेवावेत आणि नणंदेनं त्यात गुपचूप खडे मिसळावेत. त्यावर "डोळे फुटलेत का? कसली आंधळी सून पदरात पडली रे देवा!' असा आहेर मिळायचा. अक्का तशी सुगरण. मामंजींनी भाजीचं कौतुक केलं की सासू डोळे वटारायची. अक्काला मात्र तेवढाच काडीचा आधार!
लग्न होऊन वर्ष झालं तरी सासूनं नवरा-बायकोची साधी भेटसुद्धा होऊ दिली नाही. सगळे वर्षसण मात्र साग्रसंगीत वसूल केले. त्यातही "काय बाई तुझं माहेर...काय तो दरिद्रीपणा! जा, आण तुझ्या आईकडून मला मिळालेली ही साडी बदलून आण,' अशी सासूची मागणी. हाकलून दिलेल्या अक्कानं रडत रडत माहेरी जावं तर "आता तेच तुझं घर, तुला तिथंच जमवून घ्यायला पाहिजे,' असं सांगत माहेरची मंडळी दुःखी मनानं तिची रवानगी करायची. अश्रुभरल्या डोळ्यांनी ती परत यायची. असंच वारंवार चालायचं.

मासिकधर्माच्या काळात शिवाशिव, सोवळं-ओवळं अगदी कडक पाळलं जायचं. तेव्हाही पोतंभर गहू-तांदूळ निवडायचं काम अक्काला दिलं जायचं. भोजन-पाणी-वस्त्रं यासाठी "शुद्ध' माणसावर अवलंबून राहावं लागायचं. नणंदबाईंचे त्रास देण्याचे प्रकार अशा वेळीही सुरूच असायचे. एकदा तर नणंदेनं कपडे न दिल्यानं - दाराबाहेर ठेवलेलं जेवणाचं ताट घेऊन येण्यासाठी - लज्जारक्षण म्हणून अक्काला वर्तमानपत्राचे कागद गुंडाळून काम भागवावं लागलं होतं.
सगळ्यांची जेवणं झाल्यावर अक्काला उरल्यासुरल्या शिळ्या अन्नाचं जेवण मिळे. एकदा दुपारी आदल्या रात्रीची पोळी, गोळावरण आणि चटणी असं जेवण अक्काच्या पुढ्यात आलं. आंबलेल्या वरणाचा वास भसकन्‌ नाकात शिरला. पोटात ढवळून आलं. सामसूम होताच इकडं तिकडं पाहत अक्कानं वरणाचा गोळा स्वयंपाकघरामागच्या नालीत टाकला. "हुश्‍श' करत चटणी-पोळी संपवली. तेवढ्यात काकदृष्टीची नणंद आईला घेऊन आलीच.
""काय गं? खाल्लंस का सगळं?''
""हो!''
""वरण?''
""हो.''
अक्काचा कान करकचून पिळला गेला. तिला ओढत परसदारी नेलं गेलं. नालीतला वरणाचा गोळा तसाच होता.
""खोटारडी! उचल, उचल ते अन्नब्रह्म! माजोरी कुठली. चल, खा ते वरण. खाऊन माजावं, टाकून नव्हे.'' अक्काला ते वरण खावंच लागलं. वरणाची तिला इतकी शिसारी बसली की नंतर आयुष्यात वरण तिला कधीच आवडलं नाही.
काबाडकष्ट-हेटाळणी-अपमान-छळ...जीवन चाललं होतं. घरातल्या पुरुषांचं या कजाग सासूपुढं काही काहीच चालत नव्हतं...अन्‌ अचानक अक्काच्या सासूनं मुलाचं दुसरं लग्न ठरवलं. दीड-दोन वर्षं झाली लग्नाला...मूल-बाळ होत नाही हिला...ही मुलगी "रोगट', "अपशकुनी' आहे...वंशाला दिवा पाहिजे म्हणून मग दुसरं लग्न!
***

आता सरस्वतीच्या जोडीला शारदा आली. दूरच्या खेडेगावातली, गरीब घरातली बारा वर्षांची कोवळी, सुरेख पोर. ही शारदा मात्र या सरस्वतीसाठी, म्हणजेच अक्कासाठी पायगुणाची ठरली. कारण, लगेचच गणेशची बदली-बढती झाली. मध्य प्रदेशातल्या नर्मदाकाठच्या गावी मामलेदार म्हणून. नाइलाजानं सासूबाईंना दोन्ही सुनांना वेगळा संसार थाटू द्यावा लागला.

याच काळात काय ते प्रारब्ध अक्कावर प्रसन्न झालं. जीवनाचा जोडीदार सुजाण, सज्जन होता. सवतीला बहिणीप्रमाणे बरोबर घेऊन अक्कानं आपलं वैवाहिक जीवन सजवलं. टापटीप-स्वच्छता-रसिकता तिच्या घरकुलात दिसू लागली. बघता बघता घराचं "गोकुळ' झालं. वसंता-माधव-सुनंदा-मुकुंदा-अरविंदा. अडीच-अडीच वर्षांच्या अंतरानं पाळणा हलला. अक्का गाणं शिकली. पेटीवर भजनं म्हणू लागली. वृत्तपत्रं-पुस्तकं वाचू लागली. भरतकाम-विणकाम करू लागली. स्वयंपाकात नवनवे प्रयोग करत अन्नपूर्णा बनू लागली. शारदाला स्वतःचं मूल नव्हतं, तरी सवतीच्या मुलांचं ती प्रेमानं करायची. अक्का बहरली. रसरशीत दिसू लागली आणि प्रारब्धानं पुन्हा डोळे वटारले. किरकोळ आजाराचं निमित्त होऊन जीवनसहचर अक्काला सोडून गेला. दहा वर्षांचा संसार मोडून पडला. पाच अजाण मुलं पदरात. धाकटा अरविंदा तर अवघ्या सहा महिन्यांचा. "पांढऱ्या पाया'च्या सुनांना सासरी प्रवेश नव्हताच! अक्का माहेरी गेली. गत्यंतरच नव्हतं त्याशिवाय.

दरम्यान, मधल्या काळात अक्काचे वडील वारले होते; पण मोठा भाऊ हरी डॉक्‍टर झाला होता. त्याचं चांगलं बस्तान बसलं होतं. आप्तांना जपण्याचा, माणुसकीचा तो काळ होता. "अक्काकडं मी पाहीन,' हा वडिलांना दिलेला शब्द हरिभाऊंनी परिपूर्णतेनं पाळला. आपल्या संसारात अक्काला सामावून घेतलं. अक्का आता भावाकडं कष्ट करू लागली. सुदैवानं भावजय अत्यंत सुस्वभावी होती. कुठलाच दुजाभाव, हेवादावा नव्हता. तरीही अक्काच्या स्वाभिमानी मनाला एक मिंधेपणा कायमचा चिकटला. अशातच दैवानं अक्कावर पुन्हा घाला घातला. तिचा सगळ्यात देखणा, हुशार, सद्गुणी मुलगा मुकुंदा विषमज्वर होऊन तिला सोडून गेला. नंतर अक्काच्या प्राक्तनात वेगळंच ताट मांडून ठेवलं होतं. सुस्वभावी अक्का आजी व नातवंडांना भेटू देत असे. आजीनं म्हणजेच तिच्या "प्रख्यात' सासूनं उन्हाळ्याची सुटी संपता संपता वसंताला आणि माधवला काही दिवसांसाठी म्हणून आपल्या घरी नेलं. परस्पर अज्ञात गावी त्यांना दुसऱ्या शाळेत दाखल केलं. "आमची नातवंडं आहेत. तुला देत नाही, जा,' असं उत्तर अक्काला मिळालं. अक्काच्या काळजाचं पाणी पाणी झालं. भूक-तहान सुचेना. जिवाची नुसती तगमग. शेवटी, एखाद्या रहस्यकथेत शोभावी अशी योजना करून मोठ्या युक्तीनं पाळत ठेवून मुलांचा ठावठिकाणा शोधण्यात आला आणि मुलांच्या बाळकृष्णमामानं मुलांना अक्षरशः शाळेतून पळवून अक्काकडं परत आणलं. यावर कोर्टात जाण्याच्या तयारी असलेल्या आजीला तिच्याच वकील-मुलानं "कायदा आईच्या बाजूनं आहे, उपयोग होणार नाही,' असं ठणकावून सांगितलं तेव्हा ती कजाग आजी गप्प राहिली.
***

अक्काची मुलं अत्यंत हुशार. परिस्थितीची त्यांना जाणीव होती. मामावर भार नको म्हणून मॅट्रिक झाल्यावर नोकरी करत ती उच्च शिक्षण घेऊ लागली. थोरल्या वसंताला चांगली नोकरी मिळाली. "आता सून आणावी' या विचारात अक्का असतानाच हाताशी आलेला तरणबांड वसंता अकाली मृत्यू पावला. अक्काचं विधिलिखितच तसं होतं जणू! काळ काही कुणासाठी थांबत नाही. माधवला उत्तम नोकरी मिळाली. दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळालं. मुलगी सुनंदाचं सुस्थळी लग्न झालं. आता अक्कानं माधवसाठी माधुरी आणली. ती मुलाकडं राहू लागली. नातवंडं झाली. धाकट्या अरविंदाला कमिशन मिळून भारतीय लष्करात नोकरी मिळाली. त्याचेही दोनाचे चार हात झाले. परजातीतली सून अक्कानं आनंदानं स्वीकारली. "माधवाची माधुरी आणि अरविंदाची नीलांबरी' असं अक्का सुखानं-आनंदानं म्हणू लागली.

...पण पुन्हा एकदा प्रारब्ध खदखदा हसलं. ध्यानीमनी नसताना माधवचं एकाएकी निधन झालं. अकाली. तरुण-नाजूक माधुरी, तिची चिमणीपिलं यांच्या काळजीनं अक्काचं काळीज कुरतडलं जाऊ लागलं. जरा मन सावरलं की नियतीनं रट्टा मारलाच म्हणून समजा, असंच अक्काचं "भाग्य'! यातूनही तिनं मार्ग काढला. यानंतर तिचं स्वतःचं असं घर राहिलं नाही. कधी मुलाकडं, कधी मुलीकडं, कधी सुनेजवळ ती राहिली. सोशिक-सहनशील शांत असलेली अक्का या सगळ्या ताणानं आतल्या आत पोळून निघत होती आणि म्हणूनच तिला मधुमेहानं गाठलं. त्या काळी प्रभावी औषधं नव्हती. संशोधन नव्हतं. कडक पथ्यपाणी-इन्शुलिन...अक्का रोडावू लागली. तरीही तीस वर्षं अक्कानं मधुमेहाला सांभाळलं! विधिलिखिताच्या अग्निवर्षावात ती टिकून राहिली. परिस्थिती बदलता येत नाही; पण आपल्या वागण्यात, विचारांत तिनं बदल केला. जिथं राहील तिथं तिनं सगळ्यांना मदतीचा हात दिला. माणसं जोडली. भजनीमंडळं काढली. मुलींना-स्त्रियांना भरतकाम-विणकाम-कलाकुसर शिकवली. गृहिणींना सुगरणीचे सल्ले देऊन पाककुशल बनवलं.
"आजी, नातीचं नाव काय ठेवू? तुम्ही सांगा, तेच ठेवणार,' अशी श्रद्धा असलेली नाती तिनं जोडली.
अक्का मनात झुरली असेल; पण तिनं रडगाणं कधीच गायलं नाही. कुणी आपली "कणव' करावी असं तिला कधीच वाटलं नाही. परिस्थितीचं भांडवल तिनं कधीच केलं नाही. ती "दामिनी' नव्हती; पण "मानिनी' नक्कीच होती. एकतिसाव्या वर्षी वैधव्य आल्यापासून पांढरी, सुती नऊवारी साडी हाच तिचा पोशाख! एकही दागिना तिनं घातला नाही. कुणाचा द्वेष-मत्सर केला नाही. प्रारब्धाला दोष न देता वयाच्या एक्काहत्तराव्या वर्षी ती हरिदूताच्या स्वाधीन झाली. शांतपणे.
उतू नका, मातू नका, कर्तव्याला चुकू नका, दैवाला टोकू नका, मानवतेचा घेतला वसा टाकू नका, असा संदेश देणारी ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com