भिजपाऊस

वाऱ्याने फुलांवर फुंकर घालताना सावध असावे. कारण उन्हं आता तापू लागली आहेत. अशा तळपत्या उन्हाचे सगळेच संदर्भ तापदायकच असतात, असेही नाही.
Rain
RainSakal
Summary

वाऱ्याने फुलांवर फुंकर घालताना सावध असावे. कारण उन्हं आता तापू लागली आहेत. अशा तळपत्या उन्हाचे सगळेच संदर्भ तापदायकच असतात, असेही नाही.

पावसाचे येणे आणि निघून जाणे, नेहमीच सुरू असते. पाऊस निघून गेल्यावरही तो आत आत कोसळतच राहतो, उन्हं कितीही तापली तरी! ती न्हाऊन बाहेर आल्यावर तिच्या केसातून टपकणाऱ्या थेंबात ज्याला चिंब होता आलं, त्याला उन्हातल्या भिजपावसाचे सारेच संदर्भ सांगण्याची गरज नाही.

वाऱ्याने फुलांवर फुंकर घालताना सावध असावे. कारण उन्हं आता तापू लागली आहेत. अशा तळपत्या उन्हाचे सगळेच संदर्भ तापदायकच असतात, असेही नाही. आपलं फूल कोमेजून जाऊ नये म्हणून प्रत्येकच झाड बुडाशी सावली धरून असतं; पण सावलीशी फारकत घेऊन काही उनाड फुलं कोमेजतातच. अशा दिवसात मग फुलं-भरली डहाळी अधिकच हळवी झालेली असते. भरउन्हाळ्यात अशी डवरलेली जास्वंदी डहाळी बघितली की, कुणाची तरी अंगानं भरलेली हळुवार कोवळीक आठवून मन उचकटलेल्या संध्याकाळसारखे कातर होते. अंधार दाटत असताना गावाकडच्या पडक्या वाड्यात पिवळीजर्द नागीण बिळातून बाहेर पडावी, तसे मन सैरभैर होते. मग ती जास्वंदी डहाळी कुणीही हलवू नये. कारण बराच काळ नंतरही तिची हळवी लवलव थरारत राहते. उन्हं अशी बेगुमान तापत असताना नदीकाठच्या, बुडाशी सावली धरून बसलेल्या झाडांच्या सावल्याही मग पाण्याकडे धाव घेतात. नदी मात्र अवसान गाळून रोडावत चाललेली. तापलेली वाळू झाडांच्या निष्पर्ण सावल्यांच्या नक्षीत पाण्याचे संदर्भ शोधत असलेली. पात्र विस्तारताना नदीने नम्र असावे, हा नियम ऐन पावसाळ्यात नदी पाळत नाही. अशा उनाड नदीच्या तिच्या बेमूर्वतखोरपणाची किंमत उन्हाळ्यात चुकवावीच लागते. यात झाडांची काय चूक? पण नदीकाठच्या ढासळल्या दरडीवर मूळ रोवून उभी झाडं मग जमीन-समांतर आडवी होतात. अशा उन्मळून पडलेल्या झाडांच्या मुळांना झाड पेलवत नाही; जमीन सोडवत नाही. अशा कलत्या झाडांच्या पानांना पाणी शोषून घेता आले असते तर?

निष्पर्ण झाडांच्या सावल्या डोळ्यात घेऊन एखादं तहानलेलं ढोर शेताच्या बांधावर अंगभर फुललेल्या भगव्या पळसाखाली निमूटपणे बसून राहतं. भरलेलं पीक वाळावं म्हणून शेताचं पाणी सोडून पळसफुलात उद्याचा मोसम फुलण्याची स्वप्न बघणाऱ्या रापलेल्या कास्तकारात आणि त्या ढोरात एकच साधर्म्य असतं... डोळ्यांचं! पावसाची वाट बघणाऱ्या याच डोळ्यांमधून कधी काळी गंगा प्रवाहित झाली असेल.

पक्ष्यांनी उष्टावलेलं रान निसवत असताना वाऱ्याच्या नशिबी केवळ कोंडाच येतो. पक्षी मात्र चोच पंखात खुपसून नव्या हंगामाची वाट बघत चिडीचूप बसलेला. उन्हाळ्यातली संध्याकाळही स्वेदगंधानं मत्त झालेली. करड्या दिवसाच्या तुलनेत हळुवार गावशिवेवरून सांजवारे गावात शिरतात तेव्हा न्हात्याधुत्या नवतरण्या मुली गावमारुतीला दिवा लावायला लचकत निघालेल्या. उन्हाळ्यातली सांज म्हणजे ल्हायल्हायलेल्या जीवांना पडलेलं स्वप्न. अशी स्वप्नं पापण्यांवर तोलून गावमारुतीचा गाभारा उजळून पोरीसोरी निघतात, तेव्हा काही उनाड पाखरं त्यांच्या मेंदीभरल्या हातांचा माग घेत गावात येतात. पोरींच्या नितळ मुलायम हातांवर आपल्या चोचींनी हळव्या नक्षी काढून उडून जातात. नवतरण्या मुलींची रात्र मग स्वप्नबहाल होते. खट्याळ चांदणं अशा मेंदीभरल्या ओंजळीत मूठभर आभाळाचं दान टाकतं. सकाळी चांदण्यांचा शुभ्रगंधित मोगरा होतो. नदीकाठच्या देवळातून तुकोबाच्या गाथा प्रवाहित होतात. डोळ्यांतील स्वप्नबहर खुडून नेलेल्या उद्ध्वस्त प्रौढेच्या डोळ्यांच्या तळाशी साचलेल्या तळ्यात तिच्या व्यथा मात्र तरत नाहीत. अश्रूंचे संदर्भ कुणालाच न कळल्याने आयुष्याचे हसे होते. फुलांनी पानांना भागून आयुष्याचे कोडे सुटता सुटत नाही. अवघ्या अस्तित्वाची वाफ होत असताना तळ्याकाठी बसून आकाशाचे दान मागावे, तर आभाळ निर्जल झालेलं.

जिवांची उमेद संपत असतानाच एखादी टळटळीत दुपार मग हळवी होते. अशा हळव्या माध्यान्हीला पावसाळ्याचे डोहाळे लागतात. ऋतूंचे हट्टीपण मात्र संपलेले नसते; तरीही दुपार मात्र गहिवरलेली. कोरड्या खिडकीशी बसून घामेजल्या तळव्यात पावसाच्या आठवणी साठवून ठेवणारी ती; दुपारच्या अशा गहिवरण्यानं शहारते. तिच्या टपोर डोळ्यातील गाव देहभर वावरू लागतो. आठवणींची ओंजळ गच्च मिटून ती चिंबचिंब होते. तिच्या केसात माळलेला मोगरा अनावर आठवणींसारखा टपटपू लागतो. देहावरच्या मोगऱ्याच्या खुणा ती कुरवाळून घेते. माळलेल्या गजऱ्यातून ओघळलेलं तिचं मन दिवसातही स्वप्नं होतं. त्याच्या स्पर्शाची मेंदी पेट घेते. लालचुटूक ज्वाळा रिंगण धरून नाचू लागतात :

‘आळीण माळीण फुलं दे,

खालचे वरचे वेचून घे’

गिरकी वाढत जाते. मिलनाच्या मस्त झळा गारगार होतात आणि ग्रीष्मातली दुपार ओलीचिंब होते. ऐन उन्हाळ्यात कोसळणारा भिजपाऊस असा अचानक कोसळतो. रासवट मुजोरासारखा धसमुसळेपणानं येतो. पावसाची अशी धसमुसळी घुसखोरी मात्र हवीहवीशी वाटते अन् रागाने अधिकच तप्त होणाऱ्या उन्हाची याद येताच बहरायचे असते. तिलाही त्याचे असे आक्रमक कोसळणे हवेहवेसे वाटते.

दुसऱ्या ऋतूच्या काळात अशी घुसखोरी मात्र फक्त पावसानंच करावी. पाऊस खऱ्या अर्थानं मनस्वी असतो, मनमुराद असतो अन् त्याच्या अशा असण्यातच त्याचे अस्तित्व दडले असते. हिरवेपणाचे वरदानही त्याला त्यामुळेच असतं. पाऊस मग केव्हाही कोसळला तरीही तो कोसळण्याचे सारे संदर्भ जिवंत करतो. ऐन उन्हाळ्यात दिवसाढवळ्या कोसळलेल्या पावसानेही रस्त्यावर पाण्याचे डबके साचतेच. एखादं वेडं, चुकार पाखरू त्यात आपले पंख ओले करण्याचा उनाडपणा करते.

मातीला बहराचे वेड तर अनंत, अव्याहत असते. अशा अवेळी कोसळणाऱ्या पावसानेही ती आव्हान देणारा गंध लुटवून टाकते. मन काजळीही धरते. पावसानं उन्हाच्या भरलेल्या घराला असा नाट लावावा काय, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार असला, तरीही उत्तरावर मात्र कुणाचीच सत्ता चालू शकत नाही. कदाचित ग्रीष्मानंच अशा पावसाकडे मुद्दाम कानाडोळा केला असावा. कुणाच्याही लटक्या विरोधाला न जुमानता बेमोसम प्राजक्त हलविणारा असा पाऊस त्याच्या धसमुसळेपणासह आवडतो. ओसाड माळपठारावरून प्रचंड शिळा गडगडत यावी तसा तो येतो. अनुभवी हळुवारपण या पावसात नसतं. ऐन पावसाळ्यातल्या पावसागत तो निष्णात नसतो. खरं तर या दिवसांवर त्याचा असा अधिकारही नसतो. आरक्त ओंजरगोंजर करून फुलवत न्यायला त्याच्याकडे वेळ नसतो. कडेकोट पहाऱ्यातील प्रेयसीला भेटण्याचे अनावर धाडस करण्याऱ्या प्रियकरासारखा तो येतो. मग कृतीच शब्द होते. हळव्या वेलबुट्टीदार शब्दांना तिथे थारा नसतो. चोरलेल्या अशा थोडक्या वेळात मनभरून पाण्याची वाफ होते म्हणून असा ऐन उन्हात येणारा पाऊस गारांसह बरसतो. पडक्या वाड्यातली पिवळीजर्द नागीण मग स्वत:शीच लाजते. मत्त केवड्याच्या आठवणीने तिची सळसळ वाढते. पाऊस असा भलत्या वेळी कोसळू लागला की, नागीण मनामनात वारूळ करते. पावसाचे असे बेपत्ता पत्रासारखे येणे आणि निघून जाणे, असे नेहमीच सुरू असते. पाऊस निघून गेल्यावरही तो आत आत कोसळतच राहतो.

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com