सरप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shyam Pethkar write bitten by snake story of shivram

कुठेही सळसळ जाणवली की अण्णाजी वाडा गोळा करायचे. सरप हायच, म्हणत पूर्ण वाडा बघायला लावायचे. रात्री खिडकीशी आलेली बारीकशी फांदीही त्यांना सरप वाटू लागल्याने खिडकीजवळच्या कडूलिंबाच्या झाडाच्या फांद्या कापून टाकल्या होत्या...

सरप

एक दिवस शिवरामला अचानक तार आली, ‘‘स्टार्ट इमिजिएटली.’’ तो गावाला आला. सीताराम गेला होता. साप चावल्यावर त्याला केशोरी मिशनच्या दवाखान्यात दाखल केलं; पण तिथं तो गेला. राजाराम तेव्हा तीन-साडेतीन वर्षांचा होता. महिनाभराच्या सुटीनंतर शिवराम जायला निघाला. गावाहून निघताना नेहमीच तो हेलावयाचा, पण या वेळी उंबरे त्याला अडवत होते. शेती तर संस्कारातून आत उतरली होती. वंशपरंपरेने रक्तातही भिनली होती; पण शिक्षणाचेही संस्कार होते. कॉलेज, विद्यार्थी, नवे विषय, अध्यापन... या नव्या जाणिवा होत्या. अण्णाजी अद्याप काही बोलले नव्हते; पण त्यांनी म्हटलं तर कठीण होणार होतं. राहायचं झालं तरी सातारला जाऊन सगळंच आवरून अन् निरोप घेऊन यावंच लागणार होतं. दोनतीन दिवस तो अण्णाजीशी बोलण्याचे धैर्य एकवटत त्यांच्या आजूबाजूला घुटमळत राहिला. अगदीच निघावंच लागेल असा दिवस उगवला. घरात ज्याच्याशी बोलावं असं कुणीच नव्हतं. त्याला मायची आठवण आली. असती तर... ती पण सीतारामसारखीच अल्पायुषी. पान लागूनच गेली त्याच्याचसारखी. आपल्याला ती आठवते तरी, गोविंद, अलका यांना तर ती आठवतही नसेल.

फाट्यावर जाऊन दोनची गाडी पकडली तरच धामणगावहून रात्रीची रेल्वे पकडता आली असती. तो अण्णाजीच्या समोर जाऊन उभा राहिला. अण्णाजी तर वाळून गेले होते. जीव फुटलेल्या पुतळ्यासारखे टकामका बघत बसायचे. सीतारामवर त्यांचा शेतीइतकाच जीव होता. शिवराम समोर गेला. सातारला जाऊन येतो परत, हेच सांगायचं या तयारीनं...

‘‘अण्णाजी...’’ ते त्याच्याकडे बघत राहिले. निघण्याच्या तयारीमुळे त्याच्या अंगोपांगी एक त्रयस्थपण पसरलं होतं. आप्तांच्या गोतावळ्यातील अनोळखी माणसाकडे बघावं तसं ते त्याच्याकडे बघत राहिले. परत तोच म्हणाला, ‘‘अण्णाजी...’’

‘‘जाय ना तू... नोको राहू अठी. सरप असतेत ना शेतीत.’’ असं म्हणून ते माळवदावरच्या खोलीत निघून गेले. माय गेली तेव्हाही ते त्याच खोलीत बंद होते खूप दिवस. आबाजी चौधरी, तात्याजी, देशापांडे काकाजी सारे समजावायला आले; पण ते माळवद सोडत नव्हते. पाऊस सुरू झाला अन् हरवलेली हरळ परत हिरवी व्हावी, तसं काही झालं नव्हतं, अशा थाटात खोलीच्या बाहेर पडले अन् शेतीत रमून गेले. या वेळी मात्र कठीण दिसत होतं. एक तर त्यांचं वयही वाढलं होतं अन् गेल्या काही वर्षांत शेतीत सीतारामच नांदत होता.

घुटमळत, घुटमळत लहान्यांचा निरोप घेत शिवराम निघाला. शंकर त्याला सोडायला फाट्यापर्यंत गेला. त्याच्या सामानाची बॅग त्यानं डोक्यावर घेतली होती.

‘‘गडी हाय ना...’’

‘‘नोको, तुही बॅग मीच उचलीन... सीतारामच्या बाद तूच हाय आमाले...’’ मग मात्र तो फाट्यावर पोहोचेपर्यंत काहीच बोलला नाही. बस आली. शिवराम बसमध्ये बसल्यावर खिडकीजवळ येत बाहीनं डोये पुसत शंकर म्हणाला, ‘‘पाह्य दादा येजो वापस. अण्णाजी सरप सरप करतेत. आमी एकटे हावो.’’

‘‘चंद्रभान काका हाय ना... पन येतोच मी.’’

बस निघाली. प्रवास थांबला नाही. तो सातारला पोहोचला. हे शैक्षणिक सत्र तरी पार पाडून द्यावंच लागणार होतं. पाऊस आता सरत आला होता. थंडी पसारा मांडू लागली होती. गावावर आता सुगी पसरली असेल अन् अण्णाजी त्या साऱ्यात रमले असतील. दाराशी आलेल्या बहुरूप्यापासून अगदी माकडवाला, गारुड्यापर्यंत प्रत्येकाची फिरकी घेत असतील. मारुतीच्या देवळाच्या सभागृहात डंडारची तालिम झोकात आली असेल. दीक्षित गुरुजींचं कीर्तनही सुरू झालं असेल. तात्याजीनं कार्तिकाची दिंडी अन् आरती सुरू केली असेल. अण्णाजीचं दिंडीत पहाटेला पहाडी आवाजात ‘देव एका पायानं आहे लंगडाऽऽ’ हे भजन म्हणणं सुरू झालं असेल. कधी मूड आला की गोंधळ्याला थांबवून गोंधळ घालायला लावत असतील.

‘‘असी नाही बेट्या जांभूळ आख्यानातली गोठ... तुहा बाप बराबर म्हने. तू सिकला नाही बेट्या त्याच्याकडून,’’ असं म्हणत दोन पायल्या ज्वारी त्याच्या झोळीत टाकायला लावत असतील. वाटलं तर त्यांची जेवणंही अंगणाखालच्या कडूलिंबाखाली होत असतील. तेदेखील नेमके वाड्यावरच शिदोऱ्या उघडत. माहिती होतं, नुपर पडलं अन् नाही पडलं तरी वाड्यातून रायत्यापासून भाकरीपावतर सगळंच भेटते...

खिडकीजवळ बसून शिवराम विचार करत होता. गावाकडे अण्णाजी मात्र या साऱ्याच जगण्यात बाद झाल्यागत वावरत होते. त्यांना शंका आली की ते गड्यांना बोलावून सरप व्हय का बेटा थो, अशी शंका काढायचे अन् नीट तपासणी करायला लावायचे. ‘नव्हय ना आन्याजी...’ असं त्यांनी तीन तीनदा सांगूनही त्यांची खात्री होत नव्हती. मग ते शंकरला बोलवायचे. शंकरनं जिल्ह्याला झालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता; मात्र आता तो गावातच थांबला होता.

कुठेही सळसळ जाणवली, की अण्णाजी वाडा गोळा करायचे. सरप हायच, म्हणत पूर्ण वाडा बघायला लावायचे. रात्री खिडकीशी आलेली बारीकशी फांदीही त्यांना सरप वाटू लागल्याने खिडकीजवळच्या कडूलिंबाच्या झाडाच्या फांद्या कापून टाकल्या होत्या. वैदू झाले. जाणते झाले. केशोरी मिशनच्या दवाखान्यातही नेऊन आणण्यात आलं, डॉक्टर म्हणाले, ‘‘मानसिक आहे ते सगळं.’’

शिवरामला बोलवायचं म्हटलं की मात्र निक्षून सांगायचे, ‘‘नाही, त्याले नोका बोलावू अठी मराले. शेतीत सरप असतेत.’’

नंतर नंतर तर त्यांना झोपेत पांघरुणही पायाला घासलं तरी ते ‘सरप सरप’ म्हणून ओरडायचे. अगदी स्वत:चाच पाय त्यांच्याच पायाला घासला तरी ‘सरप’ म्हणून ओरडायचे. गड्याला अवघं आंथरुण, पांघरुण झटकायला लावायचे. तीन तीनदा झटकल्यावर मग त्यावर निजायचे. अलीकडे तर रात्री झोपताना गड्याला काडी घेऊन बसवून ठेवायचे झोपण्याच्या खोलीत. कधी चुकून चावडीवर गेलेच तर त्यांच्या गोष्टींचा एकच विषय असायचा, सरप. सारेच सरप विषारी नसतेत, पासून सुरू व्हायचं अन् गावखारीच्या शेतात असलेल्या पाच तोंडाच्या नागराजापर्यंत त्यांची चर्चा चालायची. अगदी सामान्य वाटायचे ते. गंभीरपणे चर्चा करायचे. अगदी पाच तोंडाच्या नागाबद्दल सांगतानाही कमालीचे सामान्य असायचे. नव्या लोकांना तर खरंच वाटायचं...

रात्री पायाला पाय घासला की काय झाले कळले नाही, पण अण्णाजी घुसमटल्यागत अस्पूट किंचाळत राहिले. त्यांच्या ओठांच्या हालचालीवरून ते सरप, असंच म्हणताहेत हे कळत होतं. तोंड वाकडं झालं त्यांचं. वाचा गेल्यागत झाली. अर्धांगवायू... अण्णाजीच नाही म्हणायचे म्हणून की सुचलंच नाही कुणाला म्हणून म्हणा... हे सारं कुणीच शिवरामला कळविलं नाही. शंकरनं पत्र पाठविलं त्यात, अण्णाजीची तब्येत आजकाल चांगली नसते, एवढं त्रोटक लिहिलं होतं. शिवरामच्या हातात अण्णाजी गेल्याचीच तार पडली. ‘अण्णाजी सीरियस, स्टार्ट इमिजियटली’.

Web Title: Shyam Pethkar Write Bitten By Snake Story Of Shivram

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :snakeayurvedasaptarang
go to top