ती ज्ञानेश्वरी...

दत्तात्रय माधवरावमध्ये हे सगळे कुठून आले? त्याचे हस्ताक्षर खुपच सुंदर. वळणदार. तो चित्रही छान काढायचा. म्हणजे चित्रकार नव्हता; पण त्याच्या रेषांना वळण आणि गती होती.
Dnyaneshwari Book
Dnyaneshwari BookSakal
Summary

दत्तात्रय माधवरावमध्ये हे सगळे कुठून आले? त्याचे हस्ताक्षर खुपच सुंदर. वळणदार. तो चित्रही छान काढायचा. म्हणजे चित्रकार नव्हता; पण त्याच्या रेषांना वळण आणि गती होती.

वाटण्या झाल्या तेव्हा दत्तात्रय माधवरावने ज्ञानेश्वरी आणि जानीसार अख्तर यांचे ‘घर आँगन’ हे रुबाईंचे पुस्तक मागून घेतले होते. सोबत आजीने चांदीचा कुंकवाचा करंडा दिला... हा नेहमीच सांगायचा, आपल्या घरातले ज्ञान म्हणजे ती ज्ञानेश्वरी आणि संपत्ती म्हणजे तो चांदीचा करंडा..!

दत्तात्रय माधवरावमध्ये हे सगळे कुठून आले? त्याचे हस्ताक्षर खुपच सुंदर. वळणदार. तो चित्रही छान काढायचा. म्हणजे चित्रकार नव्हता; पण त्याच्या रेषांना वळण आणि गती होती.

जुन्या काळी बैठकीत अगदी आजोबा, पणजोबांपासूनचे फोटो लावण्याची पद्धत होती. माधवरावांचा एक फोटो तसलाच लावला होता बैठकीत. खूप म्हातारपणातला होता. अगदी मरणाच्या दहा-पंधरा दिवस आधीच. ते म्हणे आमच्या आज्जीला म्हणाले होते, काढून घ्या जोडप्यानं फोटो, नंतर नाही संधी ही... दत्तात्रय माधवराव आता अगदी त्यांच्यासारखाच दिसतो. माधवराव चित्र काढायचे, मूर्ती घडवायचे. ते संचित एक पिढी ओलांडून माझ्यात आले असावे का?

पुस्तकांची ओढ अन् वाचनाची ओढ मात्र संततधार ओघाने वाहत आली ‌पिढ्यांपिढ्या. वक्तशीरपणा आणि दिलेला शब्द पाळणे, खोटे न बोलणे या गोष्टी थोड्या क्षीण होऊन पाझरू शकल्या आहेत. वेळ नाही पाळली की हा चिडायचा अन् मग त्याचा राग यायचा. त्यातून वेळ पाळायचीच नाही, असे कधीतरी ठरवून बसलो असेन. त्याचा फटका आयुष्यात खूपदा बसला. याला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही. आई हा ऑफिसला जाताना चिकण सुपारीचे दोन-तीन तुकडे याच्या हातावर ठेवायची. आठवडाभराने याचे पायजामे धुवायला घेताना त्यातून सुपारीचे पावभर तरी तुकडे जसेच्या तसे निघायचे. वयाच्या एका वळणावर काही व्यसनं लागू लागतात. त्या वयात ऐटबाज सिगारेट ओढणारी माणसे आवडायची अन् हा बेटा दत्तात्रपय माधवराव साधी सुपारीही खात नाही, याचा राग यायचा. देवानंदसारखी यानेही छान मानेला झटका देत सिगारेट ओढावी, असे वाटायचे. हा नाही करत ते तर आपणच करून पाहिले पाहिजे म्हणून ओढून पाहिली सिगारेट. पहिल्यांदाच बाहेर सिगारेट ओढून आत येताना हाच भेटला दारात अन् याला कसंकाय कळलं तोच जाणे. मला म्हणाला, ‘‘ओढून पाहिली असेल आज तर हरकत नाही, करून पाहून सोडणे कधीही चांगले. पण, ओढल्यावर सोप आणि चमन बहार हातावर चोळून मग खाऊन टाकायचे. हाताच्या बोटांचा अन् तोंडाचाही धुरकट वास नाही येत तंबाखूचा...’’ त्यानंतर पुन्हा कधी सिगारेटकडे हात गेला की हाच आठवायचा. त्याने मारले असते तर कदाचित मग नळी फुक्या झालो असतो...

माधवराव हे इंग्रजांच्या काळात रेल्वेत स्टेशनमास्तर होते. वक्तशीरपणा तसा अंगात होताच. एकदा सकाळी ते पूजा करत बसले होते. मन रमलं असेल म्हणून लक्षातच नाही आले की ऑफिसची वेळ झाली आहे. आजीने आठवण करून दिली तेव्हा मग माधवराव तसेच धावत जवळच असलेल्या रेल्वे स्टेशनला गेले. तिथे विल्यम्स नावाचा त्यांचा इंग्रज अधिकारी होता. हे पूजा करतानाच पळाले असल्याने खाली गुलाबी रंगाचे सोवळे नेसले होते. वर अगदी विजारही घातली नव्हती. अशा टॉपलेस अवस्थेत आपल्या स्टेशन मास्तरला पाहून तो इंग्रज अधिकारी म्हणाला, ‘‘व्हाट इज धीस मॉधोराव?’’ यांना भान आल्यावर हे म्हणाले, ‘‘पूजा करत होतो...’’ ‘‘पूजा? वरशीप?’’ असे म्हणत तो इंग्रज अधिकारी त्याच्या क्वार्टरमध्ये गेला अन् त्याने लाल कापडात गुंडाळलेला एक ग्रंथ आणि एक चांदीचा करंडा आणून माधवरावांच्या हातात ठेवला. ती त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या वाचनातली ज्ञानेश्वरी होती. त्यावर त्याचे नाव लिहिले होते त्यानेच शाईच्या पेनाने अन् अनेक ठिकाणी ओव्या व अर्थ अधोरेखित केला होता. पानाच्या बाजूच्या समासात टिपणे काढली होती काही...

वाटण्या झाल्या तेव्हा दत्तात्रय माधवरावने तीच ज्ञानेश्वरी आणि जानीसार अख्तर यांचे ‘घर आँगन’ हे रुबाईंचे पुस्तक मागून घेतले होते. सोबत मग आजीने चांदीचा तो कुंकवाचा करंडा याला दिला... हा नेहमीच सांगायचा, आपल्या घरातले ज्ञान म्हणजे ती ज्ञानेश्वरी आणि संपत्ती म्हणजे तो चांदीचा करंडा...!

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com