आई, भाकर आणि गाणे

सकाळीचा परसदारी बसला होता. रात्रीनं कंदिलाच्या काचेवर जडवलेली काजळी पुसत. त्याचं तसं हे आवडतं काम होतं. काजळी पुसायला त्याला विलक्षण आवडत असे.
Mother
MotherSakal
Summary

सकाळीचा परसदारी बसला होता. रात्रीनं कंदिलाच्या काचेवर जडवलेली काजळी पुसत. त्याचं तसं हे आवडतं काम होतं. काजळी पुसायला त्याला विलक्षण आवडत असे.

आईचे गाणे ऐकण्याचे नशीब घेऊन तो जन्माला आला नसावा कदाचित. तसेही आईचे गाणे कुणालाच ऐकू येत नाही. कारण आई गाते, हे बापाला पसंत नसते. मग ती बापडी आपल्या गाण्याचा गळा चिणून निमूटपणे संसार करते. संसाराचा सूर मात्र बिघडू देत नाही... तिच्या गाण्याच्या कबरीवरच अनेक संसाराच्या तारा जुळलेल्या असतात. म्हणूनच ती आई असते. तो म्हणाला होता, ‘‘माझ्या आईने आयुष्यभर इतक्या भाकऱ्या भाजल्या की त्यांची एकावर एक अशी चळत रचली ना, तर ती स्वर्गापर्यंत जाईल...’’ आता त्याच्या फिरस्तीत तो भाकरी गोळा करतो.

तो सकाळीचा परसदारी बसला होता. रात्रीनं कंदिलाच्या काचेवर जडवलेली काजळी पुसत. त्याचं तसं हे आवडतं काम होतं. काजळी पुसायला त्याला विलक्षण आवडत असे. धुरकटलेल्या आयुष्यावर लांब निमुळत्या बोटांनी आपले नाव कोरायचा त्याचा छंद होता. अनेकांना ते खटकायचेदेखील. निमुळती बोटं हे कलावंताचे लक्षण असते, असे त्याला त्याच्या आईनेच सांगितले होते. त्याची आई चांगली गायची म्हणतात. त्याने तिचे गाणे कधी ऐकले नव्हते. आईचे गाणे ऐकण्याचे नशीब घेऊन तो जन्माला आला नसावा कदाचित. तसेही आईचे गाणे कुणालाच ऐकू येत नाही. कारण आई गाते, हे बापाला पसंत नसते. मग ती बापडी आपल्या गाण्याचा गळा चिणून निमूटपणे संसार करते. संसाराचा सूर मात्र बिघडू देत नाही... तिच्या गाण्याच्या कबरीवरच अनेक संसाराच्या तारा जुळलेल्या असतात. म्हणूनच ती आई असते. तो म्हणाला होता, ‘‘माझ्या आईने आयुष्यभर इतक्या भाकऱ्या भाजल्या की त्यांची एकावर एक अशी चळत रचली ना, तर ती स्वर्गापर्यंत जाईल...’’ आता त्याच्या फिरस्तीत तो भाकरी गोळा करतो. त्याला त्यांची चळत रचायची आहे अन् भाकरींवरून स्वर्ग गाठायचा आहे. त्याला त्याच्या आईचे गाणे कदाचित तिथे सुरू असेल, अशी वेडी आशा आहे.

तो तसा वेडाच आहे. त्याचे हे वेड त्याच्या गुरूंनी हेरले. कंदिलाच्या काचेची काजळी साफ करताना त्याची तन्मयता बघून ते कमालीचे हेलावले होते. त्याला म्हणाले, ‘रात्र झाली की कंदिलाच्या काचेवर परत काजळी धरणारच आहे, मग कशाला हा त्रास करून घेतोस?’’ आपले काम बाजूला न सारता तो म्हणाला, ‘‘बाबा, कंदिलाच्या काचेवर रात्रीने काजळी धरणे ही माझ्यासाठी शुभ घटना आहे. कारण मला मग सकाळी ती साफ करण्याची संधी मिळते. रात्रीनं काजळीच धरली नाही तर सकाळी मी काय करायचं?’’ त्याचे गुरू मग उत्तराभिमुख होऊन चालू लागले. ‘‘मला उत्तरायण गाठायचे आहे, तुला यायचंच असेल तर ये... मागाहून येण्यास परवानगी द्यावी, असा तू आहेस.’ असं म्हणून ते निघाले.

रात्र आता गावावर काजळी धरेल, याची चिंता न करता तो त्यांच्या मागून चालत राहिला. प्रकाशाच्या प्रार्थना शिकविता शिकविता स्वत:च प्रकाशमान होण्याचा मार्ग, तेच दाखवू शकतात, असा विश्वास त्याला वाटला. विश्वास ही प्रकाशाची पहिली पायरी असते. अनुभव आणि साक्षात्कार यातील फरक समजण्याची ती प्रासादिक वेळ होती. म्हणून तो भारल्यागत त्यांच्यामागे चालत राहिला. ते मात्र त्याला त्या क्षणानंतर दिसलेच नाहीत; पण तरीही त्यांच्या सावलीचे श्वास त्याला जाणवत राहतात. उत्तरायणाकडे निघालेल्या गुरूंच्या दिशेने असंख्य बाण त्याला दिसतात. आपली दिशा काही चुकलेली नाही, हे त्याला त्यावरून कळते. वाटेत काजळी धरलेल्या गावांमधून प्रकाशाची पायवाट जाणवते (त्याची त्यालाच), अन् एकांत तळ्याच्या काठी न्हाऊमाखू घातलेली काही माणसं डोळे स्वप्नात हरवून बसलेली दिसतात, तेव्हा त्याला कळतं गुरू याच वाटेनं पुढे गेले आहेत. काही ठिकाणी भुकेच्या स्निग्धांशाने बरबटलेली काही माणसं त्याला दिसतात अलीकडे. ती आशाळभूतपणे त्याच्याकडे बघतात हल्ली. का? त्याने तळ्यातील पाण्यावर साचलेले शेवाळ दूर करून स्वत:कडेच पाहून घेतले. त्याला जाणवले - आता आपण काहीसे गुरूसारखेच दिसतो. डोळ्यातली भूक अन् भुकले डोळे ओळखण्याची व्याकुळता त्याच्याकडे आली आहे...

जंगलात हरविलेल्या पांथस्थाला दूर कुठेतरी लुकलुकणारा दिवा दिसावा, तसा त्याला उजेड दिसतो दूरवर. उजेडाची निरगाठ मात्र उकलत नाही. उजेडाची निरगाठ उकलण्यासाठी काळीज-प्रकाशात न्हायलेली बोटं हवीत... त्याला मात्र अद्यापही हळव्या क्षणांच्या कोवळ्या हाका ऐकू येतात. आपल्या गावाच्या चेहऱ्याचे गाव दिसले की अद्यापही त्याच्या काळजाचा ठोका चुकतो. त्याला फुलांच्या गळणाऱ्या पाकळ्यांचे निश्वास जाणवले. फुलांच्या सावलीत निजणे अद्यापही त्याला जमते. ती साधना आहे, हे मानायला मात्र आदेश देणारा आवाज तयार नाही. बरे, आदेश देणाऱ्या या आवाजाला चेहरा नाही. (मनही नसावे कदाचित.)

वाटेत विहिरीवर पाणी प्यायला थांबला असताना एक तरुणी पाणी भरून ती निघून गेली, तेव्हा तिच्या घड्यातून झळकणाऱ्या जलरेषांवर त्याचे काळीज हेलकावत झळकले. हळव्या क्षणांच्या फसव्या आवाहनांना साद द्यायची नसते, त्याच्या गुरूंनी त्याला निघताना सांगितले होते. वसंत सरला की कोवळ्या झुल्यांचे चिताभस्म याच गावात मिळेल, हा कावेबाज विचार त्याच्या मनात आला; पण आल्या वाटेने परत फिरायचे नाही, या अटीवरच त्याला गुरूंनी आपल्या मागावर यायची परवानगी दिली होती. आपल्या नशिबात असेल तर कोवळ्या झुल्याचे चिताभस्म आपल्याला वसंत सरल्यावर कुठेही मिळेल म्हणून चालत राहिला... आईचं गाणं त्याला या प्रवासात ऐकायचंच होतं.

तो मात्र आता भूतकाळानं गडप केलेल्या गावाच्या काळरस्त्यावरून चालू लागतो. आपल्यासारखीच जिवंत माणसे याच रस्त्यांवरून स्वप्नांचे रंगीबेरंगी कपडे घालून मिरवत गेली असतील, या विचारानेही त्याला थरार सुटला. उन्हाटलेला उष्ण वारा डाव साधायलाच बसलेल्या वाटमाऱ्यासारखा त्याच्यावरून उधळला. कोसळलेल्या भिंतींचे सुळके आरपार आभाळात शिरलेले. त्या भिंतींमधल्या खिडक्या, मात्र सौभाग्यवती जख्ख म्हातारीसारख्या हसतमुख. त्या गतकाळातील जगण्याची चित्रे दाखवितात. कुणीतरी अज्ञाताचे हात आपल्याला ओढून घेतील की काय, अशी भीती त्याला वाटू लागली. तटबंदी केल्यागत रांगेनं त्या मोडक्या भिंती उभ्या. तप्त धुळीतून पावलं भाजत तो त्यातून चालत राहतो. हाडाचे सापळे गिळून बसलेली ती मंदिरासमोरची पुष्करणी असावी. कुठल्यातरी मंदिराचे भग्नावेश. काळ देवांच्या मूर्तींनाही गिळतो. देवांच्या मूर्तींचंही आयुष्य दगडाचंच. दगडांच्या कालगणनेतही माणसांचे श्वास जिवंत असतात. कारण भुकेला मरण नसते. दगडही मेल्यावर भूक शिल्लक असते. तिला प्रकट होण्याचं माध्यमच लागतं असंही नाही. मंदिराच्या जुनाट, पोळून निघालेल्या कुबट गाभाऱ्यातून अनेक हात आपल्याकडे झेपावताहेत, असा भास त्याला होतो.

गाभाऱ्यातून आभाळाकडे झेपावणारे हात प्रार्थनेचे असतात... पण हे हात भाकरी मागणारे. न मेलेल्या भुकेचे ते प्राक्तन आहे. एका पिढीच्या भाबड्या श्रद्धेनेही त्यांची भूक भागविलेली नाही. जिवंत देहाकडे जातिवंत भूक असेलच असे नाही; पण वासना असते आणि वासना शमविण्याची साधनेदेखील. ते हात त्याला करकचून विळखा घालतात. मरणाच्या भीतीचे ओथंब त्याच्या कपाळावर साचतात. त्याच्याकडे भाकरी नाही. त्याच्या आईकडे होती. ती लहानपणी गोष्ट सांगायची, पुराणातली गोष्ट. एका चंद्रवंशीय मर्यादापुरुषोत्तम राजपुत्राला त्याच्या बालपणी तो रडल्यावर आश्वासनाच्या आरशात भाकरीचा चंद्र दाखविण्यात आला होता. नंतरच्या अनेक पिढ्यांच्या प्रक्तनात भाकरींची केवळ आश्वासनेच येत राहिली. म्हणून आईने व्रत घेतले होते, भाकरी थापण्याचे. मघा स्वप्नाळू डोळ्यांची माणसं भेटली होती, त्यांची भाषा कळली नाही, पण त्यांनाही भाकरच हवी होती. भाकर दिल्याशिवाय गाणं फुलत नाही. आई भाकरी देत राहिली अन् लोक गाणी म्हणत राहिले. ती आईचीच गाणी होती. भाकर, गाणे अन् आईचा स्वर्ग तर मागेच राहिला... आपणही हे भाकरीचं व्रत स्वीकारलं पाहिजे. मग स्वर्ग गाठता येईल. तिकडे आईचे गाणेही असेल.

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com