तो गेला तेव्हा...

आपल्या मोबाईलमध्ये खूपसारा डेटा असतो. डेटा हा शब्दच तसा तांत्रिक अन् आता ज्या संदर्भात आला तो तर यांत्रिक आणि तांत्रिक वाटत असलेला.
तो गेला तेव्हा...

गेली अनेक वर्षे तो मला भेटलेला नाही. माझ्या वर्तमानाला त्याचा भक्कम आधार होता; मात्र भूतकाळासारखा. तो इतरांना भेटत राहिला, मी ठरवूनही त्याला भेटू शकलो नाही. आपलं वय वाढलं, शरीरातही त्यानुसार बदल झाले, तरीही आपल्यात आपलं बालपण नांदत असतंच, हाही तसाच नांदत राहिला होता, हे कधी कळलं नाही. कळलं तेव्हा तो गेला होता..!

आपल्या मोबाईलमध्ये खूपसारा डेटा असतो. डेटा हा शब्दच तसा तांत्रिक अन् आता ज्या संदर्भात आला तो तर यांत्रिक आणि तांत्रिक वाटत असलेला. खूप लोकांचे संपर्क क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये असतात. सहज कधी चाळत असताना या नावाने आपण राखून ठेवलेला हा नंबर नेमका कुणाचा, त्याचा संदर्भ काय, हेच कळत नाही. काही नंबर्स असे असतात की, ती माणसं गेलेली असतात. माणसं या जगातून गेली, तरीही ती इतकी जिव्हाळ्याची असतात की मग त्यांचा नंबर आपण ‘डिलीट’ करणे म्हणजे आपण त्याच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करणे, त्याचा मृत्यू आपण मान्य करणे, असेच होते. त्याचाही नंबर तसलाच...

तो गेल्याची बातमी अशीच अचानक आली. अशा बातम्या अचानकच येत असतात. मृत्यू हा अटळ आहे आणि तो केव्हाही, कसाही येऊ शकतो, हे आपल्याला माहिती आहे. तसले अनुभव आपण घेतलेले असतात, तरीही मरणाचं एक वय आपण गृहीत धरलेलं आहे. माणसं म्हातारी झाल्यावरच मरतात, असा आपला ठाम समज आहे. त्यात चूक नाही. तोही एक सार्वत्रिक अनुभव आहेच... त्यामुळे तो गेल्याची बातमी आली तेव्हा धक्का बसलाच. कारण तो काही मरायच्या वयाचा नव्हता. माणसं कुठल्याची वयात मरू शकतात, अगदी बाळ मेलेलंच जन्माला येण्याच्या घटना आपल्या साऱ्यांच्या वाट्याला थोड्याफार अंतराने आलेल्या आहेत, तरीही मरणाचं आपलं एक ढोबळ वय आपण नक्की केलेलंच असतं. तो त्या वयाचा नव्हता. अगदी पन्नाशीला आलेला.

बरं, त्याच्या कुठल्या आजाराची बातमीही नव्हती. म्हणजे त्याला अमूक एक आजार झालेला आहे; अन् तो बरा होण्याच्या पलिकडे गेलेला आहे, असंही काही ऐकिवात नव्हतं. वय तसं तरणंच होतं. सुदृढ होता. आर्थिक आणि इतर कुठल्याही समस्या त्याला नव्हत्या. दुसऱ्या लाटेत त्याला कोरोना झालेला कळला. मग त्याला पांढरकवडा या गावातून यवतमाळला हलवावं लागलं, हेही कळलं. मात्र, वय, सुदृढता पाहू जाता तो यातून बाहेर पडेलच, असं वाटत असताना त्याच्या मरणाची वार्ता आलीच... आयुष्याचा एक निरागस, हळवा कोपरा करपून गेल्याचं, आपण आता म्हातारे झाल्याचं जाणवलं. हे असं तेव्हाच होतं जेव्हा आपण ‘बालपण देगा देवा’, असंही म्हणू शकत नाही. त्याच्या जाण्यानं माझ्या आयुष्यातलं बालपणच पुसलं गेलं. म्हणजे अगदी डस्टबिनमध्येही ती स्मृती राहिलेली नाही, याची जहरी दंश झाल्यासारखी जाणीव झाली...

तसा तो गेली अनेक वर्षं मला भेटलेला नाही. आयुष्यातील पार पडलेल्या अवस्थेसारखाच तोही. माझ्याच आयुष्याचा भाग होता; पण तरीही तो मागं पडला होता. माझ्या वर्तमानाला त्याचा भक्कम आधार होता, मात्र भूतकाळासारखा. तो माझं बालपणच होता, त्यामुळेही कदाचित तो इतरांना भेटत राहिला, मी ठरवूनही त्याला भेटू शकलो नाही. कधीमधी आमची गेल्या वीस-तीस वर्षांत एखाद-दोन वेळा फोनवर भेट झाली. तेही तो माझ्याशी खूपच आदराने आणि म्हणूनच त्रयस्थासारखा बोलत राहिला... आपलं बालपण ज्याला डावलून स्मरताच येत नाही, त्याने, ‘‘तुम्ही खूप छान लिहिता राव!’’ असं म्हणावं? बरं त्याने ते इतक्या प्रामाणिक आदारानं म्हटलेलं की, त्याला, ‘‘अबे तुम्ही-आम्ही काय करतोस?’’ असं विचारण्याचीही हिंमत झाली नाही.

पांढरकवड्याला त्यांचा मोठ्ठा वाडा. बरीच बिऱ्‍हाडं किरायानं असायची त्यात. आम्हीही त्यातलेच. तो घरमालकांचा मोठा मुलगा. वडील शिस्तीचे. आई करडी साहेबीण. हा मात्र तसा उनाड. त्यांच्या शेतातल्या कापसाच्या गाड्या गावातल्या मार्केटात यायच्या तेव्हा त्या वाड्यावरच मुक्कामाला असायच्या. हा त्या काळात त्यांच्या सोबतच असणार. साजूक तुपातला याचा टिफीन शेतगड्यांना देणार अन् स्वत: त्यांची भाकर खाणार...

आमच्या त्या वाड्याच्या सभोवती सीताफळाच्या झाडांचं कुंपण होतं. याची आई, आमच्या मामी म्हणजे घर मालकीणबाई सीताफळांच्या मोसमात लक्ष ठेवून असायच्या... अन् हाच आम्हाला सीताफळं चोरायला मदत करायचा. पेरूच्या झाडावर चढून कौलारू छतावर अन् तिथून गच्चीत जाण्याचा मार्ग यानेच आम्हाला सुचविला, शिकवला. गच्चीत कांदे, भुईमुगाच्या शेंगा, तीळ... असे काय काय शेतीतले वाळत घातलेले असायचे; अन् हा आम्हाला त्यावर डल्ला मारायला शिकवायचा. मी कधी नाही म्हणालो, तर हा, घाबरट आहेस, म्हणत डिवचायचा... मामींची धाड पडली की नेमका हाच त्यांच्या हाती सापडायचा अन् मार खायचा... मार खाऊन बाहेर आला की खट्याळ हसत असायचा!

अंगणातल्या थोरल्या कडुनिंबाच्या वृक्षावर मचाण बांधून त्यावर डेरा टाकण्यात आमच्या मोठ्या भावाचा पंटर हाच असायचा. बालपणाला न शोभणारा मी गंभीर होतो. वाचत बसलेलो असायचो. याने माझ्या हातातली पुस्तकं काढून मला निसर्ग वाचायला शिकविला. माझ्या हातात गुल्लेर (गलोल) दिली. हा त्यातला मास्टर. नेम खूपच भारी याचा. दगड नेमका लक्ष्यभेद करायचा. पावसाळ्यात नाल्यांवर मासोळ्या पकडणं, खेकडे पकडणं, असे खेळ करायचा. घर अगदी पूर्ण शाकाहारी, हादेखील; पण इतरांना हा पकडून द्यायचा. खेकडा कसा पकडायचा, हे त्यानं मला शिकविलं. एकदा भड्या माकडानं अचानक झाडावरून उडी मारत माझी पॅन्ट पकडली होती, तेव्हा यानेच त्याला गुल्लेरीनं नेमका डोक्यावरच दगड मारून हाकलला होता... एकदम करड्या शिस्तीच्या अन् इंग्रज साहेबांच्या सोफिस्टिकेशनच्या प्राध्यापकाच्या घरचा हा मोठा लेक होळीला लोकांच्या खाटा होळीत आणून टाकण्यापासून घानमाकडवर खेळण्यापर्यंत उनाड होता. या साऱ्यांची ओळख माझ्यापेक्षा अगदी चार-पाच वर्षांनी मी लहान असूनही त्यानेच मला करून दिली...

पुढे गावातच आम्हाला सरकारी निवासस्थान मिळालं. माझ्यावर दहावीचं बर्डन आलं. मग आमची बदली झाली. कॉलेज, बेरोजगारी, नोकरीचा शोध अन् आयुष्यात स्थिरावणं यात तो बालपणासारखाच परका झाला. आपलं वय वाढलं, शरीरातही त्यानुसार बदल झाले; तरीही आपल्यात आपलं बालपण नांदत असतेच, हाही तसाच नांदत राहिला होता आपल्या अस्तित्वात, हे कधी कळलं नाही. कळलं तेव्हा तो गेला होता...!

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com