दत्तात्रय माधवराव...

तो प्रगत विचारांचा होता. अत्यंत प्रामाणिक. सुसंस्कृत, सभ्य, सचोटीचा... प्रचंड वाचन अन् व्यासंगी होता. तरीही लेकीवर आंधळे प्रेम अन् लेकही दुष्ट भिंतीसारखी उभी राहायची मध्ये.
दत्तात्रय माधवराव...
Summary

तो प्रगत विचारांचा होता. अत्यंत प्रामाणिक. सुसंस्कृत, सभ्य, सचोटीचा... प्रचंड वाचन अन् व्यासंगी होता. तरीही लेकीवर आंधळे प्रेम अन् लेकही दुष्ट भिंतीसारखी उभी राहायची मध्ये.

तो प्रगत विचारांचा होता. अत्यंत प्रामाणिक. सुसंस्कृत, सभ्य, सचोटीचा... प्रचंड वाचन अन् व्यासंगी होता. तरीही लेकीवर आंधळे प्रेम अन् लेकही दुष्ट भिंतीसारखी उभी राहायची मध्ये. म्हणून मला त्याच्यासारखे व्हायचेच नव्हते. आता कधी-कधी या वयात चुकून आरसा समोर आला तर माझ्यातही मला दत्तात्रय माधवराव दिसू लागतो...

मला त्याच्याबद्दल भीती आधी वाटली की आदर, हे आता सांगता यायचे नाही. कळत्या वयाचा झाल्यावर त्याच्याविषयीच्या भावनांना अभिजात भाषेत अन् नैतिकतेच्या सुसंस्कृत वचनात बसविण्यासाठी ‘आदरयुक्त धाक’ असा शब्द दिला असावा, ही शक्यताही नाकारता येत नाही. आदर वगैरे वाटायला आपल्या जाणिवांनी अभिजात अशी पातळी गाठलेली असायला हवी. बालवयात आधार कुणाचाही वाटू शकतो. त्यासाठी आपला जन्मदाता किंवा जन्मदात्रीच आहे, हे कळण्याची गरज नसते. ते कळल्यावर मातृ-पितृ ऋण वगैरे समाजरचनेसाठी आवश्यक असलेल्या सुसंस्कृत समजुतींची रुजवात होणे आवश्यक असते. तसे काही व्हायच्या वयाच्या आधी आपला बाप किंवा माय म्हणून नव्हे तर आपल्याला एक सुरक्षित ऊबदार सोबत इतकेच काय ते वाटत असले पाहिजे.

मला दत्तात्रय माधवरावबद्दल लहानपणी भीतीच वाटली होती. धाकच वाटू लागला होता. तो ऑफिसमधून यायचा असला की माय त्याच्या नावाने धाक घालायची, ‘‘ते आले की मग काही खैर नाही, माझं मेलीचं नका ऐकू; पण त्यांचा हात चालला ना की मग सरळ याल अन् बसाल अभ्यासाला,’’ असे ती आम्हाला म्हणायची. स्वत: दोन धपाटे तिने तोवर घातलेले असायचे. एकदा तो आॅफिसमधून अचानक आला असताना मी अंगणातल्या थोरल्या कडुनिंबाच्या वृक्षावर मोठ्या भावाने बांधलेल्या मचाणावर अभ्यासाचे नाटक करत बसलो होतो. माय मला म्हणतच होती की, ‘‘पडला-झडला तर सगळं आमच्यावर ऊरावर येईल ना...’’ या वाक्याच्या फुलस्टॉपलाच तो आला अन् त्याने मला अँग्री यंग मॅन बच्चन जसा गुंडांना थंड चेहऱ्याने बुकलायचा तसा बुकलून काढला. माझे दोन्ही हात अन् पायाचं मुटकुळं करून त्याने उभ्याने मला त्या वृक्षावर फेकून मारला होता. माझ्या पाठीला खरचटले अन् बराच मुका मारही बसला असावा. मी तिथेच, तसाच बसून होतो रात्रीचे आठ वाजून गेल्यावरही; पण दत्तात्रय माधवरावबद्दल घरात अन् आम्ही किरायाने राहयचो त्या वाड्यातही इतका धाक असावा की कुणीही मला साधी सहानुभूतीही दाखवायला आले नाही. रात्री सगळ्यांची जेवणे झाल्यावर कुडकुडत बसलेल्या माझ्याजवळ माय आली अन् म्हणाली, ‘‘पोटात ढकल चार घास अन् चुपचाप झोप... आज सुटला कसाबसा तू त्यांच्या हातून...’’

दत्तात्रय माधवरावला आम्हा लेकरांचा इतका राग का यायचा, ते कळत नव्हते. तसा तो शिकलेला, उच्च आणि सुधारणावादी विचारांचा. आमची बहीणही आमच्यासोबत (बहुतांश आमच्यापेक्षा जास्त) दांडगाई करत असायची. तो असा अचानक अंतर्ज्ञानाने कळल्यागत अचानक पोस्टातून यायचा अन् मोठ्याच्या पायात त्याच्या चपला येऊ लागल्या असल्याने तो सुटायचा. आम्हाला मारझोड करून तो मात्र माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या बहिणीला अतिव मायेने (माया आंधळीच असते, हे नंतरच्या अनुभवाने माझे पक्के झाले) जवळ घेत खिशातले काजू तिला द्यायचा. मायपण तिच्या दांडगाईचे तोंडाला पदर लावून हसत कौतुक करायची. आम्हाला मात्र त्या सांजेला घरात जेवण नाही, अशी शिक्षा फर्मावली असायची त्याने.

आपण मोठे झालो की अजिबात त्याच्यासारखे नाही व्हायचे, हे मी ठरवून टाकले होते. तो इंग्रजांच्या काळातला मॅट्रीक, त्यामुळे त्याचे इंग्रजी अगदी फर्डे होते. माय-बापाची माया सर्वच मुलांसाठी सारखीच असते, झाड काय त्याच्या खाली बसणाऱ्यांवर सावली धरण्यात दुजाभाव करते का, असे माय कधी कधी माझ्या तक्रारीवर म्हणायची. तिची नेमकी भूमिका कधीच कळली नाही, मात्र लेकीला बुंध्यापासचे स्थान देत प्रगाढ सावली देण्याच्या आपल्या नेणिवमनातल्या कृत्याची पापभिरुता दाटून आल्यावर ती कधी कधी गुळाच्या खड्यासोबत मनाच्या जखमेवर असा शाब्दीक मलम मात्र लावायची.

दत्तात्रय माधवराव सतत इंग्रजी पुस्तके वाचत असायचा. कधीकधी नातलग आले किंवा मित्र आलेत त्याचे की, त्यांना तो काय वाचतो ते सांगायचा. जे चांगले वाचून झाले ते वहीत लिहून ठेवायची त्याला सवय होती. त्याचे हस्ताक्षर तर एरवी आम्हाला दर्शन न घडलेल्या त्याच्यातल्या आखीव-रेखीव वळणांचे होते. कधीकधी मी त्याच्या त्या वह्यांना हात लावण्याचे दुस्साहस करायचो. त्यातले त्याने पुस्तकाच्या नाव व पान क्रमांकाच्या संदर्भासह लिहून ठेवलेले उतारे, सुवचने, कविता मी वाचून काढायचो अन् चोरून खाल्लेली बोरे जशी अंगी लागतात ना तसेच ते क्षणात अंगी भिनायचे. ते अजूनही पाठ आहेत मला. तो त्याच्या एकच असलेल्या लेकीला इंग्रजी शिकवत बसलेला कधीमधी पाहायचो अन् आम्हालाही त्याने तसे शिकवावे, असे वाटायचे... त्यावेळी माय मात्र आड यायची. तुमची लायकी आहे का, असे विचारायची. एकुलती म्हणून असलेल्या बहिणीपेक्षा आमची लायकी ही कशी ठरविते ते तेव्हाही कळले नव्हते. मायचा भाऊ आला सर्वात धाकटा की, माय त्याला म्हणायची, ‘‘या यांच्या वह्या तूच घेऊन जाशील... आमची पोरं तर नालायकच आहेत.’’ तिने ते कदाचित जन्मजात ठरवूनच टाकले होते. कदाचित मुलगी झाल्यावर थोरला अन् मुलीनंतर झालेलो आम्ही खालची तीन असे सगळेच बाप्पे नालायकच आहोत, हेच तिने ठसवले होते.

एकदा मी शाळेत इंग्रजीत भाषण करून अन् बक्षीस घेऊन आल्यावर ती एकटीच होती घरात तर तिने मला गुळपोळी दिली होती; पण नंतर सगळेच सांजेला एकत्र घरात असताना, लेक कशी इंग्रजीत बापाच्या वळणावर गेली आहे, याचा कौतुकपाठ करून तिने मला पुन्हा नालायकांच्या यत्तेत ढकलून दिले होते. दत्तात्रय माधवराव हा न्यायी माणूस आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, ऊर्दू, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते त्याचे अन् प्रचंड वाचनही. त्याला आपण कधीतरी दिसू असे वाटले होते. ती दहावीला नापास झाली, त्यावेळी मी सातवीला शाळेत पहिला होतो. घरात मातम होता. बोर्डाला वाईट ठरविण्यातच माय गुंतली होती हे खरेच; पण हाही त्यात सामील होता. मी दहावीला ओपन मेरीटला पास झालो तर त्याची दखलही नाही... ती त्यावेळी बीएला तृतीय श्रेणीत पास झाली कशीबशी तर याने चक्क साऱ्या ऑफिसला पार्टी दिली!

विवेकानंदाच्या गोष्टीत वाचलेलं त्या गरिबाने दान दिलेल्या थोडे सांडलेल्या पिठात लोळलेल्या मुंगसाचे अंग सोन्याचे झाले होते. तसेच त्याचे थोडेही आमच्यासाठी सांडले असते तर आमचीही कांती सोन्याची झाली असती. तो प्रगत विचारांचा होता, अत्यंत प्रामाणिक होता, सुसंस्कृत, सभ्य, सचोटीचा होता... प्रचंड वाचन अन् व्यासंगी होता... तरीही लेकीवर आंधळे प्रेम अन् स्वत: लेकही दुष्ट भिंतीसारखी उभी राहायची मध्ये. म्हणून मला त्याच्यासारखे व्हायचेच नव्हते. आता कधी कधी या वयात चुकून आरसा समोर आला तर माझ्यातही मला दत्तात्रय माधवराव दिसू लागतो... त्यावर येत्या काही भागात बोलूच!

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com