आपलं ठिकाण कुठलं?

रेल्वेने नागपूर स्थानक सोडलं. आपलं खूप जिवाभावाचं असं काही सोडताना डोळ्यांत प्राण आणून खिडकीतून नागपूर शहर पाहून घेत होतो.
आपलं ठिकाण कुठलं?
Summary

रेल्वेने नागपूर स्थानक सोडलं. आपलं खूप जिवाभावाचं असं काही सोडताना डोळ्यांत प्राण आणून खिडकीतून नागपूर शहर पाहून घेत होतो.

प्रत्येक थांब्यावर त्या वयाचे संदर्भ तेवढे असतात. पहिला थांबा सोडताना आपल्याला वाटतं, की हेच मुक्कामाचं स्थान होतं अन् आपण हृदयातले गहिवर डोळ्यात आणून पाण्याच्या पडद्याआडून धुसर दिसणारा तो थांबा पाहून घेतो...

रेल्वेने नागपूर स्थानक सोडलं. आपलं खूप जिवाभावाचं असं काही सोडताना डोळ्यांत प्राण आणून खिडकीतून नागपूर शहर पाहून घेत होतो. ज्या शहरात आपण गेली विसेक वर्षे घालवलीत त्याच्याबद्दल असा काळीज जिव्हाळा, स्नेह दाटून येणारच. आपण या अटळ आणि अढळ स्थानाच्या शोधात स्थैर्याची परिक्रमा करत प्रार्थनाच करत असतो. त्या वेळी मग आपण वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकच गोष्टीला जीव लावतो. मेंदू तसे करण्यास परवानगी देत नाही म्हणून मग आपण वास्तव दर्शन घडवणाऱ्या मेंदूच्या विचारांपेक्षा आभासात अडकवणाऱ्या काळजाचा अविचार ऐकतो. म्हणून मग आपण वाटेत भेटणाऱ्या काट्यांमध्येही अडकतो. हे अडकणे जसे अध्यात्माला मान्य नाही तसेच ते बुद्धिजीवी विज्ञानालाही अमान्यच आहे. तरीही आपण तसे अडकत राहतो.

रेल्वे बऱ्यापैकी धावायला लागली असताना तिचा मेसेज आला, ‘‘सर, तो खूपच गंभीर आहे. अन्नपाणी सोडलं आहे. डॉक्टर काहीच खात्री द्यायला तयार नाहीत...’’ आता हा ‘तो’ म्हणजे गट्टू... कुत्रा. डॉक्टर म्हणतात म्हणे, की तो त्याच्या बाबांना मिस करतो आहे... आता हा बाबा कोण? तर तिचा नवरा. यांचे लग्न होऊन उणेपुरे एक वर्षही झालेले नाही. त्यात त्यांनी हा गट्टू पाळला. कुठल्या तरी खास ब्रीडचा हा ‘डॉगी’ त्यांनी विकत आणला. त्याचे हे दोघे आई-बाबा! तर आता बाबा त्या डॉगीच्या आईला कंटाळून निघून गेलेले. नवरा सोडून गेला म्हणून तिला पश्चाताप झाल्याचे ती सांगते. तो तिला कंटाळून पळून गेला होता. ‘ही रिलेशनशीप वर्कआऊट होणार नाही’ असं त्याचं मत होतं. तिचा प्रयत्न हा, की आपण आणखी एक संधी आपल्या नात्याला देऊ या. त्यात चूक असं काहीच नाही; यात तो डॉगी भरडला जातो आहे.

खूप जवळ आलं की दूर जावं लागतं, दूर गेल्याशिवाय नीट दिसत नाही अन् अनुभवताही येत नाही... तो दूर गेला, कदाचित ते जवळही येतील. असाच मी कधी काळी यवतमाळ सोडून नागपूरला आलो होतो. पुढे गेल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. प्रवाहित राहणे, हा निसर्गाचा नियम आहे.

नागपूरला आल्यावर माझा विकास झाला का ते येणारा काळच ठरवेल; पण ‘तुला आणखी प्रगती करायची असेल तुझ्या क्षेत्रात तर तू मुंबईतच असायला हवं...’ असं अनेक स्नेह्यांनी सांगितलं. याचा अर्थ माझा नागपूरच्या क्षमतेनुसार विकास झाला होता. त्याआधी पांढरकवडा या यवतमाळ जिल्ह्यातील एका पाचदहा हजार लोकवस्तीच्या गावात असताना दहावीला ओपन मेरीट आल्यावर वडिलांना लोकांनी सांगितलं, तुम्ही याला यवतमाळला शिकायला ठेवलं पाहिजे... त्यांनी यवतमाळलाच बदली करून घेतली.

यवतमाळ जवळ करताना पांढरकवड्याबद्दल अन् नागपुरात रमताना, यशाची चव चाखताना अन् नंतर विवाह केला त्या मुलीच्या प्रेमात पडताना नागपूरकर कधी झालो तेच कळलं नाही. मुंबईला निवासी जाण्याचा निर्णय सहकुटुंब घेतला तेव्हा जाणवलं, की हे सगळे थांबे असतात, मुक्कामाचं अखेरचं स्थान असं कुठलंच नसतं. प्रवाहित राहावं लागतं, नाही तर पाणी सडतं. प्रत्येक थांब्यावर त्या वयाचे संदर्भ तेवढे असतात. पहिला थांबा सोडताना आपल्याला वाटतं, की हेच मुक्कामाचं स्थान होतं अन् आपण हृदयातले गहिवर डोळ्यात आणून पाण्याच्या पडद्याआडून धुसर दिसणारा तो थांबा पाहून घेतो. नागपूर सोडून अजून वर्षही व्हायचं आहे, तरीही इकडे गुंतागुंत निर्माण होऊ लागलेली आहे. अडकत जाऊ अशा भावनेच्या वेली वाढू लागल्या आहेत. तिकडे गेलो असताना इकडे येण्याचीही हलकीशी ओढ दिवाळीनंतर जशी थंडी दाटून येते तशी दाटून यायला लागली आहे...

‘साहब, तो तूम उधर मेरे बर्थ पर एट नंबरपर जा सकते क्या?’’ खिडकीजवळ बसलेल्या त्या बाईने विचारलं. त्यांना दोघींना एकत्र सोबत असायचं होतं अन् त्यांना अंतरावर बर्थ मिळाले होते. तसा बारा तासांचाच प्रवास अन् त्यात आठ तास तर झोपेतच जाणार होते अन् तरीही त्यांना सोबत राहायचं होतं. आधी मी तयारही झालो होतो; पण तीच बाई म्हणाली, ‘‘आप का इधर का बर्थ उपर का है और मेरे साथ यह बच्चा है...’’

आधी मला जिथे बसलो तिथले सहप्रवासी असेच वाटले होते. एक दोन्ही पाय नसलेला अन् त्याची बायको, एक सतत फोनवर बिझी असलेला तरुण अन् एक म्हातारे जोडपे... काही वेळ असाच पुस्तकात डोके खुपसून राहिल्यावर मनात विचार आला, की आजूबाजूला अशी माणसांच्या रूपात जिवंत पुस्तकं असताना कागदांमध्ये का अडकायचं? गप्पा सुरू झाल्या अन् पाय गमावलेल्या त्या कोब्रा कमांडोपासून इन्स्पेक्टर म्हणून रुजू व्हायला निघालेल्या त्या तरुणाशी गप्पात रमलो. लगेच जीव गुंतले. तो कंपार्टमेंट आपला वाटू लागला अन् आता तिकडे काही वेळ जाऊन परतलेली ती बाई आर्जव करत होती, ‘‘आपण जाएगे क्या?’’ जिवावर आले ‘हो’ म्हणणे, पण गेलो...

तिकडची जागा अन् माणसं सोडून या कुपेत येताना वाईट वाटलं होतं. आता इकडचा एक माणूस म्हणजे चक्क घरचाच निघाला. आमचं ज्या वस्तीत राहणं यवतमाळला तिथेच याचं दुकान... ‘‘वो तुम्हारा गजानन बाबा के मंदिर के सामने घर है ना?’’ असं विचारत त्याने माहितीही दिली. ...पहाटे गाडी ठाण्याला थांबली. मी उतरलो. उतरावंच लागलं. घरची ओढ दाटून आली होती. ते सहप्रवासी गाढ झोपले होते.

मी स्टेशनच्या बाहेर आलो. रिक्षा शोधत होतो तर एक कार थांबली, ‘‘साहेब, या ना...’’ पाहिलं, नव्याने स्नेह जुळलेला एक मित्र होता. ‘‘तुम्ही आज येणार विदर्भने, असं वहिनी म्हणाल्या, मग दूध घ्यायला आज स्टेशनकडे आलो. म्हटलं साहेब भेटले तर येऊ घेऊन...’’ माणसं चुंबकासारखी अशी ओढ लावतात. गुंतवून टाकतात गुंत्यात. कुणालाच कळत नाही, की कुठलेच स्थान अढळ, अटळ नसते. कुठलाच अंतिम मुक्काम नसतो, हा थांबा असतो... कोण सांगावे, कुणी उद्या म्हणेल, मुंबईपेक्षा जास्त क्षमतेने काम करावेस तू, न्यूयॉर्कला का जात नाहीस?

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com