ऋतुचित्र

उन्हाला वसंताची चाहूल लागत असताना गव्हाची शेतं हिरवेपणाचा कंटाळा आल्यागत पिवळी पडू लागलेली. शेतं तालेवार झाली की शेतकरी त्यांचं पाणी तोडतात.
Seasons
SeasonsSakal
Summary

उन्हाला वसंताची चाहूल लागत असताना गव्हाची शेतं हिरवेपणाचा कंटाळा आल्यागत पिवळी पडू लागलेली. शेतं तालेवार झाली की शेतकरी त्यांचं पाणी तोडतात.

गावातले सुगीचे सारेच संदर्भ आता संपलेले. सुगीचा हिशेबही आता जुना झालेला. घेण्यापेक्षा देण्याच्या भारानेच गाव पार वाकून गेलेलं. असा येण्या-जाण्याचा हिशेब गावाला ठेवता येत नाही. गावाचं घेणं तसं देण्यासाठीच असतं. संचित सरलं तरी देणं मात्र बाकीच असतं.

उन्हाला वसंताची चाहूल लागत असताना गव्हाची शेतं हिरवेपणाचा कंटाळा आल्यागत पिवळी पडू लागलेली. शेतं तालेवार झाली की शेतकरी त्यांचं पाणी तोडतात. पाणी केव्हा तोडायचं हे त्यांना शिकवावं लागत नाही. खरे तर ज्यांना पिकवावं लागतं, त्यांना शिकवावं लागत नाही.

हवा हळुवार कोरडी होते आणि पहाटेचं धुकं संकोच करू लागतं. पहाट अशी संकोचली, की गव्हाच्या ओंब्या दमदार दाण्यांनी ओथंबतात. गव्हाच्या रानातले बगळे गारवा सरत असताना दूर रानात तळ्याच्या काठी समाधी लावायला निघून जातात. पाचोळा उडवत वावटळ भरदुपारची गावात शिरते. गावातले सुगीचे सारेच संदर्भ आता संपलेले. सुगीचा हिशेबही आता जुना झालेला. घेण्यापेक्षा देण्याच्या भारानेच गाव पार वाकून गेलेलं. असा येण्या-जाण्याचा हिशेब गावाला ठेवता येत नाही. गावाचं घेणं तसं देण्यासाठीच असतं. संचित सरलं तरी देणं मात्र बाकीच असतं. गावाची अशी वजाबाकी सुरू असताना ऋतुचित्र पालटून जातं.

गावात अशी वजाबाकी सुरू असताना शिशिराला म्हातारचळ सुटलेलं. झाडांकडे आता गाळायलाही पानं नसतात. झाडं भलतीच करंटी वाटू लागतात, पण ऋतूंनी दिलेल्या करंटेपणातूनच वसंत फुलत असतो. गळून पडायला काहीच उरलं नाही की मगच नवी पालवी फुटत असते. गमवायला काही शिल्लक नसलेलाच कमवू शकतो. शिशिर सरत असताना झाडं फुलांनी पानांना भागत असतात. अशा दिवसांतली दुपार तशी केविलवाणी असते. गावाची शेतंही ओकीबोकी झालेली. पौषातल्या अशा एखाद्या दुपारी पाखरं अचानक गावाकडे पाठ फिरवतात. सुगी सरली, की गावाकडे पाठ फिरवण्याची शिकवण पाखरांना पंख पसरण्याआधीच देण्यात येते. एखादी एकट टिटवी निसवलेल्या रानात मनातली हिरवळ डोळ्यांत आणून सुगीचे संदर्भ टिपत असते. अशा वेळी गावाला दुपारची झोप येत नाही, पण संपन्न सुस्तावलेपणाचा आव आणून गाव डोळे मिटून गप्पगार पहुडलेलं असतं. कडुनिंबाची अखेरची काही पानं वाऱ्याला दोष देत उगाच भिरभिरत जमिनीवर कोसळत असतात. पानांचा जीव जमिनीवर अंथरून झाडं अशी निष्पर्ण उभी असताना, भरदुपारी गावातल्या न्हात्या-धुत्या झालेल्या मुली कडुनिंबाच्या पारावर टिक्करबिल्ला खेळतात. मुलींचा टिक्करबिल्ला संपतो; पण खेळताना बांधलेली रेघोट्यांची घरं मात्र डोळ्यांच्या पापणकाठावर सजीव झालेली.

गावाने पानगळ अशी अंगोपांगी गोंदवून घेऊ नये. पानगळीची पुरेशी नोंद घेऊन ती विसरायची असते. संदर्भासह जपून ठेवावे असे शिशिरात काहीच घडत नाही. वसंत तिच्या केसांत माळायचा नसतो, तसाच शिशिरही डोळ्यांत भरायचा नसतो. तिन्ही ऋतू त्यांच्या संचितासकट क्षितिजावर पसरलेले असतात. पानगळही अशी हळूच मनात घर करते. झाडांचा धीर सुटला की पानगळ सुरू होते. ऋतूंचे असे गहिवर वहीच्या पानात जपून ठेवले की वहीची ती पानं केव्हाही छळतात. गारठवून टाकणारे वेडे वारे घेऊन माघ येतो. कापऱ्या वाऱ्यांनी झाडं चळाचळा कापतात. पांघरायला पानंही नसतात. हिरवेपण अनावर झाले की असे होणारच. मतलबी शुभ्र झळाळी घेऊन बगळे मग वृक्षांना सलाम ठोकतात. माघातले वारे कावळ्यांच्या घरट्यांशी छेडखानी करतात. ऋतू असे बेइमान झाले की गावाशी इमान बाळगून असणारी ती काळी पाखरं बेभान होतात. वाऱ्यावर चोचींनी प्रहार करण्याचा वेडेपणा करतात. कावळ्याची अस्वस्थ कावकाव या दिवसांत दुपार करपवून टाकते. दुपारच्या वामकुक्षीनंतर लगबगीनं दुकानाकडे जाणारा नामदेव शिंपी हातांचे वल्हे करून स्वत:च्याच डोक्यावरून फिरवीत जातो. माणसांच्या करंटेपणानेच गावावर पानगळ आली, हा त्या काळ्या पाखरांचा समज गावाच्या तीन पिढ्यांना काढता आलेला नाही. त्यांची घरटी असलेल्या निष्पर्ण झाडाखालून जाताना भागाबुढीचा डोळा कावळ्यांनी फोडल्याची कथा मात्र गाव वर्षानुवर्षे नव्या पिढीला सरत्या शिशिरात सांगत असते. भागाबुढी याच गावात नक्की राहायची का, ते कुणी विचारत नाही. शिशिर चाळ्यांनी कावळे चिडले असताना असले प्रश्न गावाला पडत नाहीत.

सुगी आटोपली की नदीचे पाणी आटण्याआधी घराची डागडुजी करून घ्यायची असते. मग माणसंही कामाला लागतात. गावच्या गढीची माती दुपारच्या एकांतात चोरून नेतात. गावचा पाटील म्हणे तालेवार होता. वाटण्या झाल्या तेव्हा तराजूने तोलून सोने वारसदारांमध्ये विभागले होते. गढीच्या खचलेल्या जाडजूड भिंतींमध्ये म्हणे सोन्याच्या लगडी लपवून ठेवल्या होत्या. पानगळीतल्या भयाण रात्री कुणी तरी एकटाच अंधारालाही ओळख न देता गढी खोदून सोन्याचा शोध घेतो. सुखाच्या शोधाचे असे किती तरी खड्डे गढीभर पसरले आहेत. गढी आता पानं गाळून बसलेल्या झाडासारखीच उजाड झालेली आहे.

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com