वितळणारं हळवं धुकं...

हिवाळे असे येतात अन् सरतातही. तो मात्र धुक्याची मखमल बाजूला सारत अजूनही तळ्याकाठच्या चाफ्याच्या झाडापाशी जाऊन धापा टाकत उभा असतो.
वितळणारं हळवं धुकं...

हिवाळे असे येतात अन् सरतातही. तो मात्र धुक्याची मखमल बाजूला सारत अजूनही तळ्याकाठच्या चाफ्याच्या झाडापाशी जाऊन धापा टाकत उभा असतो. ती इनामदारांच्या चिरेबंदी वाड्याच्या अदबशीर खिडकीत उभी असते. तो डोळ्यांत धुकं घेऊन तिला बघायला तिच्या गावाच्या वाटेवर धावत जातो, तेव्हा ती पाठ फिरवून घेते आणि धुकंही वितळून गेलेलं असतं...

सरत्या शिशिरातल्या रात्री प्रेयसीसारख्या असतात. त्यांच्या भाळी मत्त केशरी चंद्राचा ढळढळीत पूर्ण गोल नसतो; पण सौभाग्यकांक्षिणी सुरेख, कोरीव लाजरी कोर असते. चांदणं पिऊन बसलेल्या मुग्ध तळ्याकाठी ती त्याला भेटायला येते, तेव्हा ही कोर लाजून ढगाआड जाते. गार-गार वाऱ्यानं तळ्याचं पाणी थरारतं. तळ्याकाठच्या मंदिराचा गाभारा गारठलेला. मिणमिणत्या नंदादीपातली ज्योत गोठून गेलेली. चाफ्याला आता फुलं नाहीत; पण रात्री त्याची पानं चांदीची होतात. चाफा या दिवसांत कात टाकून घेतो अन् त्याचा बुंधा गोरेटला होतो. देवळाभोवतालच्या वृक्षांच्या दाटीतून आभाळाकडे झेपावण्यासाठी चाफा अंमळ नागमोडी वाकलेला. चाफ्याच्या त्या वळणदार फांदीला रेलून ती उभी असते. भरल्या देहाची उभारी तोलत चाफा अधिकच लचकदार होतो. हेमंत यायचाच असतो; पण त्याचे बोचरे वारे मात्र वाहू लागलेले. तो हलकेच येतो. वाऱ्याच्या सळाळीमुळे त्याच्या पावलांचा आवाज मात्र येत नाही. बोचऱ्या थंडीचा बहाणा करून ती अंगभर संकोच लपेटून घेते. दोन्ही हातांच्या मुठीत पदर गच्च धरून ती उभी.

तिच्याच दोन्ही हातांची गुंफण; पण त्याच्या येण्याने त्यात ऊब येते. डोळ्यांतला चंद्र सांडू नये यासाठी तिचे कसोशीचे प्रयत्न; पण तो मात्र अंधारातही, तिच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने ती जमिनीवर काढत असलेला कशिदा बघण्याचा बहाणा करीत, स्वत:चे नवथरपण सांभाळण्याचा प्रयत्न करते. तळ्याच्या पाण्यावरून पाझरत येणारं धुकं दाटू लागतं. गारव्याची अनाहूत शिरशिरी तिच्या नाजूक देहातून सळसळत जाते. ती अनावर होऊन त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यांतला चंद्र तिला हुलकावणी देऊन ओघळतोच. तिच्या ओठांवर शरदाचं चांदणं फुलतं. तो हलकेच ते श्वासात भरून घेतो. थंडी हुरळून जाते. हुरळत्या थंडीत हळव्या झालेल्या जिवांना रात्र नेहमीच फसवत असते. हिवाळ्यात दिवस आळसावलेले असतात अन् पहाट जरा जास्तीच लांबलेली असते. रात्रीच्या शेकोट्यांवर धुक्याचं पांघरूण घालत पहाट येते, तरी पण रात्र सरली असं वाटतच नाही. ते एकमेकांना दुसऱ्यातून सोडवून घेण्याचा प्रयत्न करीत असताना एखादा चहाटळ पहाटपक्षी उजेडणार असल्याची हाळी देतो. ती आली असते अंधाराला उजेडाचा आरसा दाखवत आणि निघते तेव्हा तो तिच्या केसांत चंद्र माळून देतो. तिचा गजरा मात्र त्याच्या हातात अडकलेला असतो...

अशा भेटींना उलगडून लागलेल्या हिवाळ्याचे अन् सरत्या शरदातील चांदण्यांचेच संदर्भ का असतात, ते माहिती नाही. ते कळले तरी फारसा काही बदल होणार नाही. प्रत्येकच ऋतूत ते असेच भेटणार आहेत; पण ऋतूंची भूल मात्र त्यांना पडणार नाही. हिवाळ्यातल्या अशा हळवेपणाला काळ, काम, वेगाची कुठलीच गणितं चपखल बसत नाहीत. या ऋतूत दिवस-रात्रीचं भान हरपलं असतं. मन ओढाळ होतं. संपन्नतेचं समृद्ध दान पदरी टाकून पावसाळा निघून गेला असतो. या दिवसांत पाखरांच्या चोचीला दाणा आणि अधीर पावलांना दाटलेल्या हिरवळीत कोरलेली वाट भेटते. पहाटेच्या पूर्वीच हळव्या जिवांची धांदरट पावलं धुक्यातून वाट काढत गाव जवळ करतात. उजाडेल, सूर्याची शेकोटी पेटेल आणि धुकं वितळून जाईल. मग गावाशी इमान राखून असलेली पाऊलवाटही चुगली सांगणार नाही. दवात उमटलेली पावलं जळत्या कापरासारखी मागे काहीही न ठेवता उडून जातील... असं त्यांना कितीही वाटलं, तरीही काही गावाचे कातर डोळे पायवाटेवर रोखलेलेच असतात.

रानात गाय हरवल्याने सैरभैर झालेला गुराखी डोळ्यात असोशी अन् अंगात भिनत जाणाऱ्या थंडीत धुकं तुडवत फिरत असतो. गाय गाभण होती. अवघडली होती. घडण्याआधी असं प्रत्येकच माऊलीला अवघडावंच लागतं, हे त्या जाणत्या गुराख्याला माहिती असतं. पहाटेपूर्वी दवात न्हायलेल्या पायवाटेवर उमटलेल्या पाऊलखुणांचे संदर्भ न कळण्याइतका तो गुराखी बुळा नसतो. मुक्या जनावरांच्या मूक भावनाही हळव्या झालेल्या गुराख्याला पाऊलखुणांवरून कळतात. धुक्यात मिसळून गेलेल्या त्यांच्या स्निग्ध सावल्याही त्याला दिसतात; पण तो जाणतेपणानं डोळ्यांवर धुकं पांघरून घेतो. गाईच्या घुसमटत्या हंबरण्यानं त्याचे कान टवकारतात. पावलं शब्दवेधी होतात. तळ्याच्या पाळीवर वृक्षांच्या कोंडाळ्यात गाय मोकळी झालेली. तिच्या निळ्या डोळ्यांत चंद्र दाटून आलेला. धुक्यात गुंतलेली पावलं सोडवत वासरू उभं राहण्याचा प्रयत्न करतंय... कडकडत्या थंडीतही गुराख्याची कानशिलं तापतात. काटक्या गोळा करून तो शेकोटी पेटवितो. विडीचे झुरके धुक्यात मिसळतात अन् धुक्यालाही ठसका लागतो. डोळ्यांच्या टोकावर दाटलेलं पाणी गुराखी अंगठ्याने दूर करतो. लेकरासकट गाईला न्यावं कसं? कुणाची तरी मदत हवी. पण माय-लेकराला एकटं सोडून कसं जायचं? काही झालं तर? आतापर्यंत कोण होतं इथं? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! एखादा प्रश्नच इतर सर्व प्रश्नांचं उत्तर असतो. ‘कोण होतं इथं आतापर्यंत?’ काकड्यात जागतो तो, आपण ज्याला मंदिरात बसवितो तो.

डोंगरावर सूर्य चढत असताना पहाटधुकं गावच्या वाटेवर दाटलेलंच असतं. बैलगाडीचा खडखडाटच मग पाखरांना जाग आणतो. बैलगाडीत वासरू ठेवलेलं अन् लेकराच्या ओढीनं गळ्यात दावं नसतानाही गाय बैलगाडीमागे धावत असते. पाखरं बैलांच्या पावलांशी उडत-बागडत राहतात. गावात जाऊन सांगतात -पाटलाच्या कपिलेला कालवड झाली. बंडी माय-लेकराला घेऊन गावात शिरते तेव्हा धुकं हळूच गावात शिरतं. गावाची सकाळ चाळवते. काकडा संपल्यानं गाव बराच वेळ दुलईत लपेटलं असतं. रानातही तसं काम नसतं. दवात तळवे भिजू लागले की, मग गहू पेरायचा असतो. रात्री कपिलेचं बाळंतपण करावं लागल्यानं सकाळ तशी अंमळ सैल अन् प्रसन्न असते. उन्हं हळूहळू चढू लागतात. हिवाळ्यातल्या चढत्या उन्हांना रात्रीच्या सगळ्याच खाणाखुणा उजागर होऊन दिसतात.

गव्हासाठी मशागत केलेल्या काळ्याभोर रानात शुभ्र बगळे अंग शेकत उभे असतात तेव्हाच गावात, माजलेल्या धामण्या बैलांची जोडी असलेली दमणी शिरते. वाड्यात त्यांच्या स्वागताची लगबग. मानवाईकात अदबीनं वावरणाऱ्या तरण्या इनामदारावर गावाच्या नजरा रोखलेल्या. तुळशीच्या लग्नानंतर वाड्यासमोर मांडव पडतो...

हिवाळे असे येतात अन् सरतातही. तो मात्र धुक्याची मखमल बाजूला सारत अजूनही पहाटे धावतच मुग्ध तळ्याकाठच्या चाफ्याच्या झाडापाशी जाऊन धापा टाकत उभा असतो. ती इनामदारांच्या चिरेबंदी वाड्याच्या अदबशीर खिडकीत उभी असते. उजागर सौभाग्याचा टिळा भाळी लेवून, इनामदारांची इज्जत... तो डोळ्यांत धुकं घेऊन पाण्याच्या पडद्याआडून तिला बघायला तिच्या गावाच्या वाटेवर धावत जातो, तेव्हा ती नेमकी पाठ फिरवून घेते आणि धुकंही नेमकं वितळून गेलेलं असतं...

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com