नींद क्‍यूं रातभर नहीं आती?

पराग पेठे
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

आपल्या चिंतनगर्भ गझलांनी पिढ्यान्‌पिढ्यांना झपाटून टाकणारा उर्दूमधला सार्वकालिक महान कवी म्हणजे मिर्झा असदुल्लाह बेग खाँ ऊर्फ मिर्झा ‘गालिब’. जो कुणी रसिक-वाचक-समीक्षक-साहित्यिक गझलेच्या प्रांतात आला, त्याला गालिब यांच्या गझलांनी झपाटून टाकलं नाही, असं झालं नाही. यातल्या अनेकांनी आपापल्या परीनं गालिब यांच्या व्यक्तित्वाचा आणि त्यांच्या गझलांमधल्या आशयाचा शोध घेतला. त्यांच्या सोप्यातल्या सोप्या आणि अवघडातल्या अवघड गझलांचं विश्‍लेषण आजवर असंख्य मर्मज्ञांनी केलं. प्रत्येकाला नवनवे पदर दर वेळी उलगडत गेले. हे काम तसं कधीच न संपणारं.

आपल्या चिंतनगर्भ गझलांनी पिढ्यान्‌पिढ्यांना झपाटून टाकणारा उर्दूमधला सार्वकालिक महान कवी म्हणजे मिर्झा असदुल्लाह बेग खाँ ऊर्फ मिर्झा ‘गालिब’. जो कुणी रसिक-वाचक-समीक्षक-साहित्यिक गझलेच्या प्रांतात आला, त्याला गालिब यांच्या गझलांनी झपाटून टाकलं नाही, असं झालं नाही. यातल्या अनेकांनी आपापल्या परीनं गालिब यांच्या व्यक्तित्वाचा आणि त्यांच्या गझलांमधल्या आशयाचा शोध घेतला. त्यांच्या सोप्यातल्या सोप्या आणि अवघडातल्या अवघड गझलांचं विश्‍लेषण आजवर असंख्य मर्मज्ञांनी केलं. प्रत्येकाला नवनवे पदर दर वेळी उलगडत गेले. हे काम तसं कधीच न संपणारं. त्यातलाच हाही एक प्रयत्न या नव्या सदरातून दर आठवड्याला.

मिर्झा असदुल्लाह बेग खाँ ऊर्फ मिर्झा ‘गालिब’ यांना ७२ वर्षांचं (२७ डिसेंबर १७९७ ते १५ फेब्रुवारी १८६९) आयुष्य लाभलं. त्यांची तारुण्यापर्यंतची २२-२३ वर्षं सर्वसामान्यांसारखी गेली आणि नंतर ज्या अडचणी त्यांच्या आयुष्यात आल्या, त्यांनी त्यांचा पिच्छा अखेरच्या श्‍वासापर्यंत सोडला नाही. मद्यपानाचं व्यसन, जुगाराचा नाद या गोष्टी त्यांच्या कर्जबाजारीपणाला कारणीभूत ठरल्या. पर्यायानं दारिद्य्र नशिबी आलं. त्यातच अपत्यवियोगाचं दुःख एकामागोमाग एक भोगावं लागलं.

या सगळ्या भोगांना-दुःखांना-संकटांना तोंड देत गालिब जगत राहिले...लिहीत राहिले...त्यांच्यातला श्रेष्ठ कवी प्रत्येक दुःखागणिक अधिकाधिकच झळाळून उठत गेला. त्यांच्या गझला हेच सांगतात. मिर्झांनी सुरवातीला ‘असद’ या नावानं गझला लिहिल्या आणि नंतर ‘गालिब’ हे टोपणनाव (तखल्लुस) घेतलं. गालिब यांच्या बहुतांश गझला कळायला तशा कठीण; पण त्यांनी काही सहज-सोप्या-सुगम गझलाही लिहिलेल्या आहेत. अर्थात अशा रचनांमधूनही त्यांची प्रतिभा, त्यांचं चिंतन, त्यांच्यातली तत्त्वज्ञता झळकल्यावाचून राहत नाही.
या सदराची सुरवात गालिब यांच्या अशाच एका साध्या-सोप्या गझलेनं करू या.
कोई उम्मीद बर नहीं आती ।
कोई सूरत नजर नहीं आती ।

(कुठलीच इच्छा पूर्ण होत नाहीय... कुठला उपायही सुचत नाहीय मला...कुणाकडं आशेनं पाहावं असंही कुणी नाहीय दृष्टिक्षेपात.)
(बर नही आना = पूर्ण न होणं)
***
आगे आती थी हाल-ए-दिल पे हॅंसी
अब किसी बात पर नही आती ।

(सुरवाती-सुरवातीला स्वतःच्या अवस्थेचं हसू यायचं... पण आता मात्र कुठल्याच बाबतीत काहीच वाटेनासं झालंय.)
गालिब यांची सात अपत्यं मृत्युमुखी पडली. सरकारकडून येणारी पेन्शनही जवळपास बंद झाली. परिणामी उधारी वाढली, मानहानी वाट्याला आली. अशा सगळ्या दुःखमय परिस्थितीमुळं काहीच कळेनासं-सुचेनासं झालं. गालिब म्हणतात ः
है कुछ ऐसी ही बात के चुप हूँ
वर्ना क्‍या बात करनी नहीं आती?

(परमेश्‍वर नाराज आहे आपल्यावर याची जणू कल्पनाच होती त्यांना! कधी तरी तो सगळ्या दुःखांमधून सोडवेल, याची खात्री आहे मला; म्हणून तर गप्प बसलोय मी. नाही तर काय बोललो नसतो का!)
***
हम वहाँ है जहाँ से हम को भी
कुछ हमारी खबर नहीं आती

(दुःखामुळं मरून गेलेलं माझं हे मन आता अशा कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी गेलंय, की माझी मलाच काही ख्याली-खुशाली कळेनाशी झालीय जणू!)
***
क्‍यूं न चीखूँ कि याद करते हैं
मेरी आवाज गर नहीं आती।

(परमेश्‍वरापर्यंत माझी दुःखं, माझी गाऱ्हाणी नेण्यासाठी आता काय जोरात ओरडू का? त्याच्यापर्यंत माझी तक्रार पोचवण्यासाठी, त्याला माझं दुःख सांगण्यासाठी आता मला हेच करावं लागणार आहे.)
***
दाग-ए-दिल नजर नहीं आता
बू भी ऐ चारागर, नहीं आती?

(अरे हे उपचारकर्त्या मित्रा, माझ्या हृदयाला झालेल्या जखमेच्या व्रणाकडं तुझं लक्ष नाही का गेलं? ठीक आहे; परंतु आतून माझं हृदय अजूनही जळतच आहे; त्याचा तरी वास यायला हवा होता तुला!)
(बू = वास), (चारागर = वैद्य, उपचारकर्ता)
***
मरते हैं आरजू में मरने की
मौत आती है, पर नहीं आती!

गालिब यांचं प्रत्येकच दुःख तसं मरणासमान. (आता सगळ्या संकटांवर उपाय म्हणजे मृत्यूच...तो आता खरोखरच यावा, अशी इच्छा आहे...पण तो काही येत नाहीय...मृत्यूच्या इच्छेनंच जीव जाऊ पाहत आहे जणू...आणि तसं पाहिलं तर तो येतोयही; पण संकटांच्या रूपानं. म्हणजे, तो येतोयही आणि येतही नाहीय!) किती साध्या सोप्या शब्दांत गालिब यांनी त्यांची व्यथा मांडलीय!
***
मौत का एक दिन मुअय्यन है
नींद क्‍यूं रातभर नहीं आती?

(मृत्यूची वेळ ही तर विधिलिखितच असते. जी कुठली त्याची वेळ ठरलेली असेल, त्या वेळी तो येणारच; पण सध्या रात्र रात्र झोप का लागत नाहीय? तो जवळ येत चालला असल्याची चाहूल तर नाही ना ही?)
(मुअय्यन = निश्‍चित, ठरलेला, Destined)
***
काबा किस मूँह से जाओगे ‘गालिब’?
शर्म तुमको मगर नहीं आती।

(एकदा मशिदीत जाऊन त्याच्यासमोरच सगळी व्यथा सांगावी की काय? असा विचार मनात येत नाही तोच दुसऱ्या क्षणी त्यांच्या लक्षात येतं आणि मग गालिब स्वतःलाच विचारतात ः ‘लाज वाटत नाही का? कोणत्या तोंडानं जाशील तू?’)
गालिब हे रोजा न ठेवणारे, नमाज न पढणारे, तर त्यांची पत्नी उमराव ही दिवसांतून पाचही वेळा नमाज पढणारी. असे हे परस्परविरोधी मियाँ-बेगम होते!
***
गालिब यांच्या बहुतांश गझलांमध्ये साधारणतः दहा ते बारा शेर आहेत; परंतु मला आवडलेले पाच ते सहा शेर व त्यांचं गालिब यांच्या तेव्हाच्या मनःस्थितीच्या आधारे केलेलं विश्‍लेषण व उलगडलेला अर्थ वाचकांपर्यंत पोचवायचा माझा प्रयत्न राहील.
(पुढच्या आठवड्यात पाहू या ही गझल ः  
हर एक बात पे कहते हो तुम कि ‘तू क्‍या है’?
तुम ही कहो कि ये अंदाज-ए-गुफ्तगू क्‍या है?)

Web Title: Sleep does not occur overnight?