डाएट न करणे, हेच डाएट!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

स्लिम फिट - डायना पेंटी
मला फिटनेस ठेवायला आवडत असला, तरी जिमला रोज जाणे पसंत नाही. त्यामुळे मी शक्यतो घरीच व्यायाम करते. शरीर तंदुरुस्त आणि चांगल्या शेपमध्ये राहण्यासाठी मी पहिली पसंती योगासनांना देते. नौकासन हे माझे आवडते आसन आहे. यामुळे पोटावरील चरबी कमी होणे, तसेच रक्ताभिसरण सुधारण्याची प्रक्रिया होते. अनेक जण जिममध्ये जाऊन व्यायाम करतात, पण मला तेच प्रकार सोप्या पद्धतीने करायला आवडतात. त्यामुळे मी घरच्या घरीच व्यायाम करते. फुल बॉडी रोल अप्स, बायसिकल क्रंचेस, डबल लेग स्ट्रेचेस असे अनेक प्रकार शरीरातील विविध भाग तंदुरुस्त राहण्यासाठी करत असते.

कार्डिओ करण्याऐवजी मी डान्स करते. दररोज अर्धा तास आणि आठवड्यातून दोनदा एक तास मी कथक नृत्य करते. यामुळे कार्डिओची कमतरता भरून निघते. 

मी फुडी असल्याने माझ्यासाठी डाएट न करणे हेच खरे डाएट आहे. मला जे-जे खावेसे वाटते ते सगळे मी खाते. फक्त हे सर्व प्रमाणात खाल्ले जाईल याकडे मी लक्ष देते. मी माझ्या दिवसाची सुरवात एक वाडगाभर फळे खाऊन करते. यामध्ये मुख्यतः पपई, सफरचंद, पेर, चिकू आदींचा समावेश असतो. त्यानंतर तासाभराने मी ब्राऊन ब्रेडसोबत अंडे खाते. मी भातप्रेमी आहे.

त्यामुळे भात खाल्ल्याशिवाय मी राहूच शकत नाही. दुपारच्या जेवणात पांढऱ्या भाताऐवजी मी ब्राऊन राईस खाते. त्याबरोबर मी डाळ, चिकन किंवा फिश करी खाते, तसेच हिरव्या भाज्याही खाते. मी डेझर्ट खाणेही चुकवत नाही. मला चॉकलेट्स खूप आवडतात आणि ते मी खाते. ग्रीन टी घेणे मी कधीही चुकवत नाही. कारण यामुळे वजन तर कमी होतेच, त्याचबरोबर तुमची स्ट्रेंथही वाढते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: slim fit diana penty maitrin supplement sakal pune today