फिटनेससाठी स्वयंशिस्त महत्त्वाची!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

स्लिम फिट - काश्‍मिरा कुलकर्णी, अभिनेत्री
मला एक अभिनेत्री म्हणूनच नाही, तर एक माणूस म्हणून शरीर फिट ठेवणे आधीपासूनच महत्त्वाचे वाटत होते. शरीर फिट ठेवण्यासाठी फिटनेससोबतच मी डाएटलाही अधिक प्राधान्य देते. मला कधीकधी १६ तास चित्रीकरण करावे लागते. त्यामुळे वॉक किंवा जीमला जाणे नेहमीच शक्‍य होत नाही. मी अशा वेळी घरच्या घरी योगासने करणे अधिक पसंत करते.

मात्र, शूटिंग नसल्यास मी जीमला जाण्याचे टाळत नाही. चालायला नक्की जाते. रोज जीम किंवा फक्त वॉक, अशी आपल्या शरीराला सवय होऊ नये, म्हणून मी फिटनेसचे वेगवेगळे प्रकार करीत असते. 

मला योगासने करायला फार आवडतात. यात मला सूर्यनमस्कार घालायला अधिक आवडतात. मी दररोज २५ ते ३० सूर्यनमस्कार घालते. सूर्यनमस्कार घातल्याने मला खूप फ्रेश वाटते. शरीरात कोणत्या पद्धतींचे व्हिटॅमिन हवेत, याबाबत मी थोडाफार अभ्यास केला आहे. त्यानुसार रोज अनेक प्रकारचे व्हिटॅमिन घेणे अपेक्षित असते. मात्र, आपल्याला ते शक्‍य नाही, हेही तितकेच खरे. मी पूर्णतः शाकाहारी असल्याने या सर्व व्हिटॅमिन, प्रोटिन्सकरिता मी फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात खाते. भात खाणे शक्‍यतो मी टाळते. गोड खाण्याची मला पहिल्यापासूनच आवड नसल्यामुळे ते खाण्याचा प्रश्‍नच येत नाही. फिट राहण्यासाठी किंवा कामाचा स्ट्रेस दूर करण्यासाठी मी मुख्यत्वे ध्यानधारणेवर अधिक भर देते. सध्या मी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका करीत असून, यात माझी असलेली अनसूया ही भूमिका करताना मला स्वतःला आणि माझे पात्र अधिक उठून दिसावे, यासाठी अनेकदा धान्यधारणेची वाट धरावी वाटली. कोणत्याही प्रकारच्या फिटनेससाठी स्वयंशिस्त असणे फार गरजेचे आहे, असे मला वाटते.
(शब्दांकन - स्नेहा गावकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: slim fit kashmira kulkarni maitrin supplement sakal pune today