छोट्या गोष्टींचं महत्त्व मोठं (सुनंदन लेले)

रविवार, 20 जानेवारी 2019

भारतीय क्रिकेट संघासाठी २०१८ हे वर्ष महत्त्वाचं ठरलंय. एकीकडं चुकांमधून संघ शिकतो आहे, तर दुसरीकडं महत्त्वाच्या गोष्टींची पायाभरणी करण्याचंही काम सुरू आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. या सर्व गोष्टींबाबत ऊहापोह.

भारतीय क्रिकेट संघासाठी २०१८ हे वर्ष महत्त्वाचं ठरलंय. एकीकडं चुकांमधून संघ शिकतो आहे, तर दुसरीकडं महत्त्वाच्या गोष्टींची पायाभरणी करण्याचंही काम सुरू आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. या सर्व गोष्टींबाबत ऊहापोह.

मला आठवतो तो प्रसंग. सन २०१८च्या इंग्लंड दौऱ्यातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत पराभव पत्करून भारतीय संघ नॉटिंगहॅमला पोचला होता. तिसऱ्या कसोटी सामन्याअगोदर पत्रकारांशी बोलायला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आला होता. रवी काय बोलेल असा प्रश्‍न होता. संघ ०-२ मागं पडला असताना तो पराभवाची कारणमीमांसा करेल, बचावात्मक पवित्रा घेऊन बोलेल का पराभव झाल्याची फुटकळ कारणं देऊन नशिबाला दोष देईल, असं वाटलं होतं. 

‘‘आम्ही इथं लढायला आलो आहोत... सकारात्मक क्रिकेट खेळायला आलो आहोत... बचावात्मक क्रिकेट खेळून सामने अनिर्णित राखण्यात आम्हाला रस नाही... एखादा पराभव झाला तरी बेहत्तर; पण आम्ही विजयाकरताच खेळू...भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करू शकतो आणि विजय मिळवू शकतो, असा आम्हाला अजून विश्‍वास वाटतो...’’ रवी शास्त्री त्याच्या खास दणकेबाज शैलीत बोलला. रवी शास्त्रीच्या या आक्रमक पवित्र्यामुळं पत्रकार परिषद संपल्यावर मीच जरा गडबडलो आणि स्वत:लाच एकदा विचारलं, की २-० असा इंग्लंड संघ पुढे आहे का भारतीय संघ?

मात्र, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली. नॉटिंगहॅम कसोटीत भारतीय संघानं विजय मिळवला. सामन्यानंतर रवी शास्त्री मला भेटला, तेव्हा म्हणाला ः ‘‘मी म्हणालो होतो ना तुला? खूप लोकांना माझं बोलणं अतिशयोक्तिपूर्ण वाटलं असणार; पण परत ठासून सांगतो- आम्ही सकारात्मक आक्रमक क्रिकेट खेळायला आलो आहोत. बचावात्मक क्रिकेट खेळून सामने अनिर्णित राखण्यात आम्हाला रस नाही. चाबूक खेळले आपले लोक. एकदम आक्रमक. संधी मिळाल्यावर समोरच्या संघाला पाण्याबाहेर नाक काढायला वेळ दिला नाही. या संघात दम आहे रे! विश्‍वास ठेव... जरा फिनिशिंग टच देता यायला हवा इतकंच.’’ रवी चक्क मराठीत बोलत होता. त्याचा आत्मविश्‍वास आता तर वेगळ्या पातळीवर पोचला होता, हे मला दिसत होतं. 

तसं बघायला गेलं, तर सन १९८१पासून रवी शास्त्रीबरोबर माझी मैत्री आहे. आम्ही १९ वर्षांखालच्या ऑल इंडिया कॅम्पला एकत्र होतो, तेव्हा मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होतो. अगदी तेव्हापासून रवी शास्त्रीतला आत्मविश्‍वास मला वेगवेगळी रूपं दाखवत आला आहे. रवी कमाल गुणवान खेळाडू होता, असं कोणीच म्हणणार नाही; पण त्याला आपल्यात असलेल्या माफक गुणवत्तेचा वापर करून क्रिकेटच्या क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त कामगिरी कशी करायची याचं गमक नक्कीच उलगडलेलं आहे. 

भारतीय संघ सन २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यात सपाटून मार खात असताना बीसीसीआयनं रवी शास्त्रीला मार्गदर्शनाकरता भारतीय संघात दाखल व्हायला सांगितलं होतं. पहिल्यापासून रवीला आव्हानं आवडत आली आहेत. तरुण भारतीय संघाला मार्गदर्शन करायचं आव्हान रवीला भावलं. नंतर छोट्या कालखंडानंतर अनिल कुंबळेला प्रशिक्षकपदी नेमलं गेलं. मायदेशात चांगली कामगिरी करून नंतर अचानक भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या अनिल कुंबळेच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला गेला. अगदी खरं सांगायचं, तर २०१७ च्या चॅंपिअन्स करंडक स्पर्धेनंतर कुंबळेला ज्या प्रकारे प्रशिक्षकपदावरून दूर केलं गेलं होतं, ते मला अजिबात आवडलं नव्हतं. माझी नाराजी विराट कोहलीला बोलून दाखवली होती.

ऑस्ट्रेलिया दौरा संपत असताना विराटला मी भेटलो, तेव्हा त्यानं रवी शास्त्रीबद्दल बोलताना सांगितलं ः ‘‘माझा आणि रवीभाईंचा स्वभाव जणू एकसारखा आहे. आम्ही जात्याच आक्रमक आहोत. आम्हाला संघात एक ठराविक प्रकारची आक्रमकता आणायचा ध्यास आहे. २०१८ मध्ये आम्ही प्रचंड मोठं यश मिळवलं, असं कागदावर दिसणार नाही; पण एक नक्की आहे, की खूप पद्धतशीरपणे प्रवास करत प्रगतीची वाट आम्ही शोधली आहे. रवीभाईंचं योगदान मोलाचं आहे. त्यांनी दरवेळी कर्णधार म्हणून माझे कान उपटले आहेत. एकदा तर फलंदाज म्हणून चांगली खेळी करूनही त्यांनी मला माझ्यात कर्णधार म्हणून काय बदल व्हायला हवेत, हे उघड नाराजी व्यक्त करून सांगितलं होतं. बाकी खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी कशी करून घ्यायची, याचं तंत्र कर्णधार म्हणून विकसित करायला त्यांनी मला मदत केली. त्यांच्या स्वभावाचा एक गुण आहे, तो म्हणजे ते मत मांडायला मागंपुढं बघत नाहीत.’’

विराट सन २०१८ बद्दल बोलताना  म्हणाला ः ‘‘दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात आपण सतत चांगला खेळ करून विजयाचा मार्ग शोधत होतो; पण फिनिशिंग टच देता येत नव्हता. समोरचा संघ अडचणीत सापडला असताना त्याच्यावर घणाघाती आघात आम्हाला करता येत नव्हता. इंग्लंडमध्येही समोरच्या संघातल्या मुख्य फलंदाजांना योग्य वेळेत बाद करत होतो. तळातले फलंदाज आपल्याला त्रास देत होते. त्या दोन दौऱ्यांतल्या पराभवांमधून आम्ही शिकलो. चुका टाळायला काय करायला पाहिजे याचा अभ्यास केला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच चुका आम्ही टाळल्या आणि खरं यश हाती लागलं. ऑस्ट्रेलियात येऊन कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न साकारलं गेलं.’’

गेल्या वर्षातल्या फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलतानाही विराटनं वेगळे मुद्दे मांडले. ‘‘गेल्या वर्षातल्या कसोटी सामन्यांवर तुम्ही नजर टाकली, तर असं दिसेल, की दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मिळून तीन कठीण दौऱ्यांत आपण आव्हानात्मक विकेट्‌सवर फलंदाजी केली आहे. तुम्ही होता इंग्लंड दौरा कव्हर करायला. लॉर्डस्‌ कसोटीत फलंदाजीला पहिल्या डावात काय वातावरण होतं, हे तुम्हीच मला सांगा. त्या परिस्थितीत फलंदाजी करणं खूप कठीण होतं. चालू दौऱ्यात बघा. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला शतकी मजल मारता आली नाही. आपण पाच शतकं फलकावर लावली. अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे. छोट्या गोष्टींचं महत्त्व मोठं असतं, हे आता आम्ही समजू लागलो आहोत. कित्येक वेळेला फलंदाजानं योग्य वेळी केलेल्या ३०-४० धावा खूप चांगला परिणाम करून जातात. उदाहरण देतो. मेलबर्न कसोटी सामन्यात हनुमा विहारीनं संघाची गरज ओळखून सलामीला जायची हिंमत दाखवली आणि चांगला दीड तास विकेटवर तग धरला. नवा चेंडू खेळून काढला. त्याचा चांगला परिणाम असा झाला, की मला आणि चेतेश्‍वर पुजाराला नंतर मनमोकळी फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याकडे वाटचाल करता आली. म्हणून हनुमाच्या नुसत्या धावा आम्ही बघणार नाही, तर त्याचं योगदान बघायला शिकलो आहे,’’ विराट घडाघडा सांगत होता.

मग या फलंदाजांच्या यशाचं श्रेय कोणाचं आहे, असं विचारता कोहली म्हणाला ः ‘‘तंत्राच्या बाबतीत संजय बांगरचं मोठं श्रेय आहे. संजय सगळ्यांकडून खूप शिस्तपूर्ण मेहनत करून घेतो. त्याच्याबरोबर फलंदाज नुसतं काम करत नाहीत, तर तो गोलंदाजांनाही फलंदाजी कशी करायला हवी याचं योग्य मार्गदर्शन करतो. भुवनेश्‍वर कुमार  किंवा ऋषभ पंतच्या फलंदाजीच्या विचारात काय फरक पडलाय तुम्ही बघताय.’’

एकदिवसीय मालिकेतला ॲडलेडचा सामना दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे. मालिकेत बरोबरी साधण्याचं दडपण पेलून भारतीय संघानं २९८ धावांचा केलेला पाठलाग प्रेक्षणीय होता. महेंद्रसिंह धोनीनं केलेलं यशस्वी पुनरागमन लक्षात राहिलं; तसंच ४५ अंश सेल्सिअसच्या गरम हवेत पहिल्यापासून शेवटपर्यंत जोरानं पळून धावा काढताना भारतीय खेळाडूंनी दाखवलेली तंदुरुस्ती भन्नाट होती. विराटच्या जमान्यात फिटनेसबाबत भारतीय संघ वेगळ्या पातळीवर पोचला आहे, यात काडीमात्र शंका नाही. या बदलाचं मुख्य श्रेय फिटनेस ट्रेनर शंकर बासूला जातं. शंकरनं गेल्या दीड वर्षात सगळ्या खेळाडूंना पद्धतशीरपणे प्रशिक्षण देऊन कायापालट घडवून आणला आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांच्या तंदुरुस्तीच्या समस्या दूर केल्यानं वेगवान माऱ्यातली धार चांगलीच वाढली आहे. स्वत: विराट व्यायामावर लक्ष संपूर्णपणे केंद्रित करताना इतकी जबरदस्त मेहनत करतो, की बाकीचे खेळाडू प्रोत्साहित होतात.      

विराट आणि रवी शास्त्रीची जोडी एकत्रपणे भारतीय संघाला जोमानं पुढं ढकलत आहे. ‘‘मी म्हणतो त्या सगळ्याला रवीभाई हो हो करतात, असं लोकांना वाटतं. हा फार मोठा गैरसमज आहे. चुका केल्यावर त्यांनी माझी वारंवार कानउघडणी केली आहे. बारीकबारीक गोष्टी ते मला समजावून सांगतात. कर्णधार म्हणून मी परिपक्व होण्याचा जो प्रयत्न करतोय, त्या जडणघडणीत रवीभाईंचा मोठा वाटा आहे. मला आणि रवीला कसोटी क्रिकेटचं महत्त्व कळतं. म्हणून कसोटी क्रिकेटला प्राधान्य देत आम्हाला संघाला पुढं न्यायचं आहे. खरं सांगतो, आम्हा दोघांना कसोटी मालिका परदेशात जाऊन जिंकून दाखवण्याचं वेड आहे जणू. शास्त्रीय नृत्य येत असलं, की बाकी कोणताही नृत्यप्रकार सहजी शिकता, अंगीकारता येतो, तसं मला कसोटी क्रिकेटचं वाटतं. खेळाडूनं सर्वोत्तम कसोटीपटू होण्याचा ध्यास ठेवला, तर मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळणं जरा सोपं जातं. एका अर्थानं भारतीय संघाला कसोटी क्रिकेटचे ब्रॅंड ॲम्बेसेडर बनवायचं आहे आम्हाला. येत्या काही महिन्यांत विश्‍वकरंडक होणार आहे आणि त्याची जोरदार तयारी सलग १३ वन डे मॅचेस खेळून आपण करत आहोत. संघबांधणी जवळपास पूर्ण झाली आहे. एखाद्‌दुसऱ्या जागेकरता मोठी चुरस असणार आहे. संघबांधणीबाबत सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं १३ सामन्यांच्या अखेरीला नक्की मिळालेली असतील. मग धडक मारायची आहे इंग्लंडला जाऊन,’’ विराटनं हसतहसत विश्‍वासानं सांगितलं.

विराट कोहलीचं क्रिकेटवेड, त्याची तंदुरुस्तीबाबतची मेहनत आणि भारतीय संघाबाबतचं स्वप्न सगळंच अजब आहे. आपल्याला वाटेल, की त्याच्या हातावर टॅटू आहे...पण त्या टॅटूमध्ये भारतीय तिरंग्यातलं अशोकचक्र आहे; तसंच आई-वडिलांचं नावही गोंदलेलं आहे. सगळ्या गोष्टी आपल्या शैलीत करणं पसंत करणारा विराट कोहली खेळाडू आणि माणूस म्हणून जरा वेगळाच आहे इतकंच मी म्हणीन.

सुनंदन लेले
'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा
https://www.esakal.com/saptarang

Web Title: Small things matters the most in the preparations in World Cup 2019