आम्ही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होतो पण आता...(व्हिडिओ)

images.jpg
images.jpg

लग्नानंतरची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या घेऊन बंधनात राहण्यापेक्षा लग्न न करता "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्येच राहिलेले बरे! अलीकडच्या तरुण पिढीची ही भूमिका असते. पण, यामधील धोके, लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिपमधील फरक, याबद्दल कायदा काय सांगतो, हे जाणून घेण्यासाठी नुकतेच "मोकळे व्हा'च्या डिजिटल पुरवणीअंतर्गत फेसबुक लाइव्ह आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ऍड. अभय आपटे व समुपदेशक स्मिता जोशी यांनी मार्गदर्शन केले. याव्यतिरिक्त आलेल्या प्रश्‍नांना स्मिता यांनी इथे उत्तरे दिलेली आहेत.


माझी एका तरुणीशी चांगली ओळख झालेली आहे. आम्ही दोघेही एकाच कॉलेजमध्ये आहोत. परंतु, लग्न करण्याबाबत आमच्या दोघांचाही विचार नाही. आमचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तीन वर्षे एकाच शहरात आम्ही राहणार आहोत. आम्ही दोघेही एकत्र लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहू, असे दोघांनी ठरविलेले आहे. त्याच्यासाठी काही वेगळी नोंदणी किंवा करारपत्र करावे लागेल का? 
- तुमच्या दोघांचेही लग्न अद्याप झालेले नाही. त्यामुळे तुम्ही दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे ठरविल्यास दोघांच्या संमतीने तुम्ही राहू शकता. त्यासाठी वेगळी नोंदणी अथवा करारपत्र करण्याची गरज नाही. तथापि, तुम्हा दोघांना तसा करार करून घ्यावयाचा असल्यास करून घेऊ शकता. त्यामध्ये एकत्र राहणे याबाबतच्या तुमच्या अटी आणि शर्ती तुम्ही नमूद करू शकता. परंतु, "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहिल्यानंतर त्यामध्ये येणारे धोके, त्यातील जबाबदाऱ्या या सर्व गोष्टी माहिती करून घेणे हे खूप गरजेचे आहे. केवळ मजा म्हणून एकत्र राहणार असल्यास तुमच्या पुढच्या आयुष्यावर याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही असे एकत्र राहणार आहात, याची तुमच्या नातेवाइकांना तुम्ही माहिती दिली आहे का? त्यांच्या संमतीचा विचार तुम्ही करणार आहात का? हा संपूर्ण विचार करा आणि नंतरच योग्य तो निर्णय घ्या. 

मी आणि माझा मित्र दोघेही मागील दोन वर्षांपासून एकत्र राहत आहोत. आम्ही दोघांनी लग्न केलेले नाही. परंतु, तो माझ्यावर आता हक्क गाजवू लागलेला आहे. मी इतर कोणाशीही बोललेले त्याला अजिबात आवडत नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी वागले नाही, तर आमचे खूप वाद होतात. माझ्या इच्छेप्रमाणे मला काहीच करता येत नाही. त्याच्या सोबत राहणे मला नको वाटते आहे. परंतु, आता तो मला सोडायला तयार नाही. मी निघून गेले, तर माझी बदनामी करेल, असे म्हणतो, मी काय करावे? 
- तुम्ही दोघेही केवळ एकत्र राहत आहात. तुमच्यामध्ये कायद्याने कोणतेही नातेसंबंध निर्माण झालेले नाहीत. त्यामुळे तुला त्याच्यासोबत राहणे शक्‍य होत नसल्यास तू त्याच्यापासून विभक्त राहणे योग्य आहे. तो तुला सोडत नाही आणि तो तुझी बदनामी करेल, अशी भीती तुला वाटत असल्यास यासाठी तू पोलिसांची मदत घेऊ शकतेस. प्रत्येक व्यक्तीला तिचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणीही एकत्र राहण्याबाबत जबरदस्ती अशा नात्यांमध्ये करू शकणार नाही. याबाबत तू जवळच्या पोलिस चौकीत अथवा महिला दक्षता समितीमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकतेस. याबाबतीत तुला संरक्षण मिळू शकेल. 

मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही पाच वर्षे एकत्र राहिलो. आम्ही लग्न केलेले नव्हते. परंतु, आम्हाला एक मुलगी झाली. आमचे एकत्र राहणे माझे आई-वडील अथवा तिचे आई-वडील या दोघांनाही मान्य नव्हते. परंतु, आम्ही एकमेकांवर प्रेम करीत होतो आणि एकत्र राहिलो. त्यातून आम्हाला एक मुलगी झाली. आता मुलगी तीन वर्षांची झालेली आहे. आमच्या दोघांमध्ये काही वाद निर्माण झाले आणि ती मला आणि मुलीला सोडून गेली. आता मी एकटाच मुलीची देखभाल करतो आहे. आई-वडिलांच्या मनाविरुद्ध आम्ही दोघेही एकत्र राहत असल्याने पुन्हा मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. तिला माझी अथवा मुलीची कोणतीही काळजी नाही. लग्न न केल्यामुळे मी तिच्यावर कोणतेही हक्क दाखवू शकत नाही. लग्नाशिवाय एकत्र राहिल्याने माझी चांगलीच फसवणूक झालेली आहे. मी आता काय करावे? 
- लग्नाशिवाय एकत्र राहण्यामध्ये सुरक्षितता नसते. एकमेकांवर कोणतीही बंधने नसतात. त्यातून एखादे मूल जन्माला आल्यास त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच बिकट असतो. आपल्या समाजाने अजूनही लग्नाशिवाय एकत्र राहण्याला मान्यता दिलेली नाही. त्यामुळेच कुटुंबसंस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुमचे लग्न झालेले नसले, तरीही तुम्ही दोघेही त्या मुलीचे आई-वडील आहात. त्यामुळे तिला समजावून सांगून ती तुमच्या सोबत एकत्र राहायला तयार असल्यास चांगलीच गोष्ट आहे. परंतु, ती तुमच्या सोबत राहण्यास तयार नसल्यास मात्र तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्याचा विचार करून आयुष्यभर साथ देणारी जोडीदार शोधावी लागेल. यासाठी लग्नसंस्थेसारखा दुसरा पर्याय नाही. तुमच्या मुलीची जबाबदारी स्वीकारणारी आणि तुम्हाला आयुष्यभर साथ देणारी कोणी जोडीदार मिळत असल्यास तुम्ही विवाहाचा विचार करून मुलीला सुरक्षितता आणि तुमच्या आयुष्याला स्थैर्य मिळविण्याचा विचार करावा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com