सोशल मीडियावरचं गाजलेलं... (श्रीकांत मुळ्ये)

श्रीकांत मुळ्ये (shrikantmulay174@gmail. com) ९८२२०९८२५०
रविवार, 5 मार्च 2017

एक सुखद अनुभव

एक सुखद अनुभव
व्यवसायाच्या निमित्तानं नुकतंच एका खूप मोठ्या धनिक माणसाच्या कार्यालयात बोलावलं होतं. दहा वाजताची भेट ठरली होती. बरोबर दहा वाजता त्यांच्या कार्यालयात पोचलो. रिसेप्शनिस्टनं सांगितलं, की सरांनी तुम्हाला अर्धा तास थांबायला सांगितलं आहे. ते अजून अर्धा तास उशिरानं येणार आहेत, असा निरोप आला. शेवटी ते ११.२०ला आले. इतका मोठा माणूस; पण आल्या-आल्या त्यांनी उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मुळात त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी अपेक्षा मी स्वप्नातदेखील केली नसती, इतके ते मानानं आणि कर्तृत्वानं मोठे आहेत; पण पुढं उशिराचं कारण सांगितल्यावर तर त्यांच्याबाबतचा आदर अधिकच वाढला. त्यांनी सांगितलेलं कारण त्यांच्याच शब्दांत मांडतो.

‘‘काय आहे मुळे सरकार, आमच्या आईचे वय आहे ८४. आता वाढत्या वयात तिची झोप अनियमित झाली आहे, त्यामुळं ती कधीही झोपते, रात्री तिला झोप लागतेच असं नाही आणि माझा कित्येक वर्षांचा नियम आहे, की आईच्या पाया पडल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही. आज आई सकाळी झोपली होती, त्यामुळं ती जागी होईपर्यंत मला थांबणं भाग होतं. हल्ली असंच होतं, की ती सकाळी झोपते आणि तिला नमस्कार करण्यासाठी थांबावं लागतं, म्हणून मला उशीर होतो. गेल्या वर्षभरात तिची झोप अनियमित झालीय, त्यामुळं मला ऑफिसला यायला हल्ली उशीर होतो; पण मला उशीर झाला, तरीदेखील फार काही काम इथं अडत नाही, कारण माझ्या मुलानं त्याच्या आईचे आशीर्वाद घेऊन माझ्या आधी इथं येऊन त्याचं काम चालू केलेलं असतं. माझे वडील लवकर वारले, माझ्या आईच्या कष्टावर आणि त्यागावर आज मी ही प्रगती केली आहे, त्यामुळं मी आईचे आशीर्वाद घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही; मग काम कितीही महत्त्वाचं असो.’’

‘‘एक विचारू का सर?’’ मी म्हणालो.
‘‘अहो विचारा की बिनधास्त.’’
‘‘जर एखादी अत्यंत महत्त्वाची बिझनेस मीटिंग असेल आणि या कारणासाठी तुम्हाला वेळेत यायचं असेल तर अशा वेळी?’’
‘‘मुळात आता मुलगा बिझनेस व्यवस्थित सांभाळतो, त्यामुळं माझ्यावर अशी वेळच येत नाही; पण चुकून अशी वेळ आलीच, तरीदेखील मी ती मीटिंग पुढं ढकलीन; पण आईचे आशीर्वाद घेतल्याशिवाय ऑफिसला येणार नाही.’’
धन्य तो मातृभक्त असलेला ६२ वर्षांचा मुलगा आणि धन्य ती त्याच्यावर संस्कार करणारी आई. नाही तर आईला वृद्धाश्रमात ठेवणारे आहेतच की ढिगानं!

Web Title: social media article write on shrikant mulye