सोशल मीडियावरचं गाजलेलं...क्षण मनाच्या कॅमेरातल्या...

ऍड.भाग्यश्री चौथाई
रविवार, 4 जून 2017

संध्याकाळची वेळ, कोयना जलाशयाचा अथांग निळाशार परिसर आणि वर आकाशात विहंग करणारे पक्षी, पटकन्‌ पाण्यावर येऊन पंखांनी पाणी उडवून जाणारे...किती मनमोहक दृश्‍य!...डोळ्यात साठवून ठेवावं असं; पण फक्त त्यावरच कसं समाधान होईल? सवयीप्रमाणं मोबाईल काढायला हात खिशात गेला खरा; पण सुरक्षिततेच्या कारणास्तव आमचे मोबाईल, कॅमेरे गाडीतच ठेवले होते- त्या क्षणी हे ध्यानातच आलं नाही. ‘अरेरे! आता मोबाईल जवळ हवा होता, काय सुंदर दृश्‍य आहे! फोटो तर घ्यायलाच हवा,’ अशी हळहळ वाटायला लागली व मोबाईलची गरज आणि कमतरता जाणवायला लागली. आताशा हे नेहमीचंच झालंय. मोबाईल जवळ हवाच. न जाणो एखादा क्षण सुटून जाईल, मग काय करायचं?

संध्याकाळची वेळ, कोयना जलाशयाचा अथांग निळाशार परिसर आणि वर आकाशात विहंग करणारे पक्षी, पटकन्‌ पाण्यावर येऊन पंखांनी पाणी उडवून जाणारे...किती मनमोहक दृश्‍य!...डोळ्यात साठवून ठेवावं असं; पण फक्त त्यावरच कसं समाधान होईल? सवयीप्रमाणं मोबाईल काढायला हात खिशात गेला खरा; पण सुरक्षिततेच्या कारणास्तव आमचे मोबाईल, कॅमेरे गाडीतच ठेवले होते- त्या क्षणी हे ध्यानातच आलं नाही. ‘अरेरे! आता मोबाईल जवळ हवा होता, काय सुंदर दृश्‍य आहे! फोटो तर घ्यायलाच हवा,’ अशी हळहळ वाटायला लागली व मोबाईलची गरज आणि कमतरता जाणवायला लागली. आताशा हे नेहमीचंच झालंय. मोबाईल जवळ हवाच. न जाणो एखादा क्षण सुटून जाईल, मग काय करायचं? दिवसेंदिवस ती हळहळ, हुरहूर, अस्वस्थता वाढतच चालली आहे.

बागेत फेरफटका मारत असताना दिसणारं वाऱ्यावर डोलणारं एखादं छानसं फूल, सकाळच्या वेळी झाडावर येणारा भारद्वाज, संध्याकाळी पश्‍चिमेच्या खिडकीतून दिसणाऱ्या आभाळातल्या मनमोहक रंगछटा, उन्हाळ्याच्या दिवसात बहरलेला बहावा, गुलमोहर किंवा जंगल सफारीच्या वेळीसुद्धा आपण कॅमेरे तयार ठेवून बसलेलो असतो. न जाणो अचानक वाघोबा समोर उभा ठाकायचा. फोटो तर हवाच. नाही का? आताशा अशा कित्येक अविस्मरणीय गोष्टी फक्त मनात, डोळ्यांत साठवून समाधान होत नाही.
बघा ना! आपल्याला अशा वेळी वाटत राहतं, हे क्षण मोबाईलमध्ये क्‍लिक करून ठेवायलाच हवेत, मग त्या क्षणांचा पुरेपूर आनंद घ्यायचा सोडून आपण क्‍लिकक्‍लिकाट करत राहतो. खरं तर मोबाईलपेक्षा आपल्या मेंदूची मेमरी कित्येकपट जास्त आहे; पण आपण अवलंबून राहतो ते त्या गॅजेटवर...जणू काही आपल्या शरीराचा एखादा आवश्‍यक भागच...फक्त फोटोंसाठी नाही, तर कित्येक गोष्टीत आपण या आणि या सारख्या गॅजेटवर अवलंबून राहतो.
आपला दिवस सुरू होतो मोबाईलच्या अलार्मनं. कित्येक महत्त्वाच्या गोष्टींसाठी रिमाइंडर लावला जातो. बॅंकेची कामं, इन्शुरन्सचा हप्ता, मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस, लग्न समारंभ, नातेवाईकांकडची जाणी-येणी यांसारख्या गोष्टी सहजासहजी लक्षात राहत नाहीत. आपली सगळी भिस्त मोबाईल नावाच्या उपकरणावर. उपजत असलेलं पंचज्ञानेंद्रियांचं काम व ताकद हळूहळू कमी व्हायला लागली आहे की काय, अशी भीती वाटू लागलीय. पूर्वी लोकांचे टेलिफोन नंबर पाठ असायचे, आताशा त्याची गरज वाटत नाही. हिशेब, पाढे, नक्षत्र, तिथी तारखा अशा अनेक गोष्टी सहजपणे लक्षात राहायच्या. या गॅजेट्‌सच्या आहारी जाऊन आपण आपली स्मरणशक्ती कमकुवत करत चाललो आहोत. नाही का? 
मग रेफ्रिजरेटर उघडला, की कशाला उघडला, म्हणून विचार करत बसतो- खरं ना? कित्येकदा तुम्हालासुद्धा आलाय ना हा अनुभव? आठवणीनं करायच्या गोष्टी विसरल्या जातात, मुद्दामहून म्हणून लक्षात ठेवलेल्या घटना नकळत विसरल्या जातात. हा सगळा परिणाम सतत मोबाईलवर विसंबून राहण्याचा आहे. मेंदूच्या लक्षात ठेवण्याच्या ताकदीचा आपण वापरच करून घेत नाही. आधुनिक गॅजेट्‌सनी आयुष्य सुखकारक केलं असलं, तरी त्याच्या दुष्परिणांमाची झळ पोचायच्या आत वेळीच काळजी घ्यायलाच हवी. 
एखादी घटना मनात, डोळ्यांत, कानांत साठवून ठेवायला हवी. तो क्षण तन, मन अर्पून अनुभवला गेला असेल, तर चिरंतन, शाश्वत रूपात मनात साठवला जातो...कधीही न विसरता येणारा आणि आयुष्यभर साथ-सोबत देणारा. तेही कोणत्याही गॅजेटशिवाय!

Web Title: social media famous article write bhagyashree chauthai