तंबाखूच्या बियांतून तेलही गळे...

संजय उपाध्ये
सोमवार, 18 मार्च 2019

आफ्रिकेत ‘सोलॅरिस’ नावाच्या जातीच्या तंबाखूचे उत्पादन मोठे होते. आणि याच्या बियांपासून दर्जेदार बायोडिझेल मिळते. त्यामुळे आता तेथे ‘सोलॅरिस’वर संशोधन सुरु आहे. काही वर्षातच व्यावसायिकदृष्ट्या या तंबाखू पिकाचे उत्पादन सुरु होईल. बियांच्या उत्पादनासाठी छोटे, मध्यम आणि मोठ्या जमिनीधारकांनाही या प्रकल्पात सामील करुन घेणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे ‘सोलॅरिस’मध्ये निकोटीन अतिशय कमी प्रमाणात असतो. त्यामुळे त्याचा व्यसनासाठी वापर न करता इंधन म्हणून करण्याकडे आहे.

निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते. तसेच औषधे आणि रंगनिर्मितीसाठी निकोटिन एक महत्त्वाचा घटक आहे. तो तंबाखूपासून मिळतो. तंबाखू म्हणजे विडी असे समीकरण बनल्याने विविध उत्पादने मिळतात, याकडे तंबाखू उत्पादक, व्यापारी, शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यातूनच निर्बंधांची कुऱ्हाड उगारली आहे. तंबाखूपासून बहुविध उत्पादने मिळविता येतात आणि त्यांतून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळविता येते, या दिशेने प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी विद्यापीठ, संस्था, सहकारी संस्था पुढे यायला हव्यात.

वेदगंगा नदी ही निपाणी परिसराची जीवनदायिनी आहे. तिनं परिसराला सुजलाम्‌ सुफलाम्‌ बनविलं आहे. पूर्वी कापूस, डाळी, शाळू चाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले वेदगंगेचे खोरे शतक-दीड शतकापासून तंबाखू पिकासाठी देशभर ओळखले जाते. आता तंबाखूचे फड कमी होऊन ऊसही वाढला आहे, पण तंबाखूला मिळणारा अत्यल्प दर आणि उत्पादनावरच घातलेली बंदी यामुळे उत्पादक गोंधळलेला आहे. निराश बनला आहे. पुढे काय असा यक्षप्रश्‍न त्याच्यासमोर आहे.

तंबाखू उत्पादनाची सद्यस्थिती
तंबाखू उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. चीन, ब्राझील आपल्या पुढे आहेत, पण जागतिक उत्पादनाचा विचार केला तर भारतात केवळ ८.३ टक्के इतकाच तंबाखू पिकतो. देशात सुमारे साडेचार लाख हेक्‍टर क्षेत्रावर तंबाखू आहे आणि एकूण पिकांच्या तुलनेत हे केवळ ०.२५ टक्के एव्हढेच आहे. त्यातून ७२ कोटी सात लाख २५ हजार किलो (७ लाख २० हजार ७२५ टन) इतके उत्पादन मिळते. देशात वापरण्याबरोबरच तंबाखूचा मोठा भाग निर्यात होतो. त्यातून देशाला ४,४०० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते. तर १४,००० कोटी रुपयांचे अबकारी करातून उत्पन्नही मिळते आणि गंमत म्हणजे तंबाखू उत्पादनातून शेतकऱ्याला जितके पैसे मिळतात, त्यापेक्षा जास्त पैसे कर रुपाने केंद्र-राज्य सरकारना मिळतात. मग आता तंबाखूवरच जर निर्बंध घातले तर हे सरकारचे उत्पन्न बुडणार आहे. शिवाय निपाणी परिसरातील आणि एकूणच देशातील तंबाखू उत्पादक शेतकरी देशोधडीला लागणार आहे. कारण सरकारने तंबाखूच्या ऐवजी कोणते पीक घ्यायचे त्याचा एकही पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवलेला नाही.

तंबाखू उत्पादक शेतकऱ्याला फारसे काही हाती लागत नाही. पण दुसऱ्या बाजूला सरकार, दलाल, व्यापारी आणि विडी उद्योजकांना मलिदा मिळतो आणि हे वर्षानुवर्षे सुरू आहे. सरकार पण आता तंबाखू उत्पादनच बंद करू पाहत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा दबाव त्यामागे आहे. तंबाखूमुक्त शेती आणि शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी हालचाली सुरू झाल्याने तंबाखू आणि विडी उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्याशिवाय जीएसटीचे भूतही मानगुटीवर आहे. तंबाखू पिकल्यानंतर वाळवण्यावेळी जराशाच पावसाने त्याची माती होते.

किमतीबाबत अतिशय बेभरवशाचे असे हे पीक आहे़, पण तरीही खस्ता खाऊन शेतकरी तंबाखू पिकवत आहे. त्याला फारसे काही मिळत नाही. त्यातूनही तंबाखू पिकावरच निर्बंध आणण्याचे सुरू आहे. त्याच्याऐवजी शेतकऱ्याला विश्‍वासात घेऊन तंबाखू उत्पादन घेऊन त्याला विडीऐवजी बहुविध उत्पादने घेण्यास उद्युक्त केले पाहिजे.

तंबाखूला निपाणीत पोषक वातावरण
निपाणी भाग हा पश्‍चिम घाटाच्या पायथ्यापासून जवळच आहे. त्यामुळे परिसरात चांगला पाऊस पडतो. त्याची वार्षिक सरासरी ७३० मिलिमीटर इतकी आहे. तर परिसरात तापमान १६ ते ४० डिग्री अंश इतके असते. गेल्या ३८ वर्षांत सरासरी ८०५ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. तर पावसाचे दिवस हे ६१ इतके होते. मे ते ऑक्‍टोबर या दरम्यान हा पाऊस पडत असतो. म्हणजे सहा महिन्यांत वेळोवेळी पाऊस पडून जातो. तंबाखू पिकांच्या विविध टप्प्यांत पावसाची गरज असते. त्यावेळी बऱ्यापैकी पाऊस होत असतो. साधारण १५ ऑगस्टच्या दरम्यान तंबाखूची लावण होते. त्यावेळी साधारण पावसाची गरज असते. तर तंबाखू कापणीवेळी म्हणजे साधारण १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान पाऊस नको असतो. कारण कापलेला तंबाखू रानात वाळत असतो. पावसाचे काही थेंब जरी पडले तरी तंबाखूचे मोठे नुकसान होते.

निपाणी परिसरात प्रामुख्याने बिडी तंबाखू पिकविला जातो. त्यासाठी दर्जेदार जमिनीची गरज असते. निपाणी परिसरातील जमिनीची ही ‘रिच सॉईल’ असे वर्णन केले जाते. म्हणजेच अतिशय सुपीक जमीन आहे. अतिशय काळीभोर, काळवट अशी ही जमीन आहे. या जमिनीची पाणी साठवण क्षमता ही ४० ते ६० टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. तसेच पाण्याचा निचराही या जमिनीतून चांगल्या पद्धतीने होत असतो. जमिनीत कार्बन मध्यम ते सर्वोच्च अशा स्वरुपात आहे. जमिनीची पीएच धारण क्षमताही ६.८ ते ८.५ इतकी आहे. या जमिनीत कमी फॉस्परस, पोटॅशियम सर्वात कमी पासून ते मध्यम स्वरुपात असते. मॅंगेनीजचे प्रमाण बऱ्यापैकी म्हणजे ३२ ते ६० पीपीएम इतके आहे. म्हणजे सर्वच गोष्टी या तंबाखू उत्पादनासाठी योग्य आहेत. त्यामुळे साहजिकच निपाणी परिसरात तंबाखूचे दर्जेदार उत्पादन येत असते. त्यामुळेच शासनाने लक्ष घालून निपाणीत तंबाखू संशोधन केंद्र निर्माण केले आहे.

सुप्रसिद्ध अक्कोळी तंबाखू
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी, चिक्कोडी, हुक्केरी आणि गोकाक तालुक्‍यात बिडी तंबाखूचे उत्पादन घेतले जाते. त्यातही निपाणी तालुक्‍यात तंबाखूचे उत्पादन सर्वाधिक आहे. तंबाखू पिकविण्यात निपाणी परिसरात म्हणत असले तरी अतिशय दर्जेदार तंबाखू पिकतो तो अक्कोळ या गावात. निपाणीपासून दहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. तेथील सुमारे हजार एकर शेती ही तंबाखू पिकाखाली आहे. अक्कोळच्या तंबाखूची चव, कडकपणा, मिठ्ठास आणि लज्जतदार स्वाद पूर्णतः वेगळी आहे. त्यामुळेच अक्कोळी तंबाखू देशात उच्च प्रतीचा मानला जातो. तसेच देशभरात कोठेही तंबाखू पिकू दे, कडकपणासाठी चाकी करुन त्यात अक्कोळी तंबाखू मिसळावाच लागतो. त्यानंतरच विडी किंवा जर्दा  पुडीला एकप्रकारे कडकपणा येतो. त्यामुळेच मोठे व्यापारी, तंबाखू व्यावसायिक, विडी कारखानदार अक्कोळी तंबाखू खरेदी करण्यासाठी स्पर्धा करतात. अक्कोळनंतर खडकलाटचा क्रमांक लागतो. तेथील काटवनचा तंबाखू सुप्रसिद्ध आहे. त्याशिवाय पडलिहाळ, चिखलव्हाळ, सिदनाळ, हुन्नरगी, भोज, बेडकिहाळ या निपाणी परिसरातील गावात तंबाखूचे पीक घेतात. पूर्वी फार मोठ्या क्षेत्रावर तंबाखू पिकायचा. एकेकाळी २५ हजार हेक्‍टर म्हणजे तब्बल ७५ हजार लाख एकर क्षेत्र तंबाखू पिकाखाली होते. आता ते १० ते ११ हजार एकरापर्यंतच मर्यादित राहिले आहे.

४०० पासून १६०० किलोपर्यंत मजल
निपाणीची बाजारपेठ तंबाखू खरेदी-विक्रीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. वार्षिक किमान १५० ते २०० कोटींची उलाढाल होते. पण तंबाखू उत्पादक हा मात्र योग्य भाव आणिकिमतीच्या निश्‍चित हमीअभावी पूर्णपणे कफ्फलक जीवन जगत आहे. पण आता तंबाखूपासून तेल आणि इतर पदार्थाच्या साह्याने तो बाहेर पडेल, अशा आशा आहेत. जिल्ह्यात गेल्यावर्षी (सन २०१७) ला १० हजार ८८९ हेक्‍टर क्षेत्र तंबाखू पिकाखाली होते. तर त्यातून तब्बल १७ हजार ४२२ टन (१५९९ किलोग्रॅम प्रति हेक्‍टरी) इतका तंबाखू उत्पादित झाला. पण एकेकाळी हाच तंबाखू २५ हजार हेक्‍टरवर असायचा. २००७-०८ ला २५ हजार हेक्‍टरवर तंबाखू असल्याच्या नोंदी केंद्राकडे आहेत. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत बिडी तंबाखू पिकाखालील कमी कमी होत गेले आहे. निपाणी परिसर नव्हे तर संपूर्ण कर्नाटकात हे क्षेत्र निम्यावर आले आहे. पण त्याबरोबरच दुसऱ्या बाजूला उत्पादनही वाढत गेले आहे. त्याचे कारण म्हणजे तंबाखूच्या सुधारित जाती. २००३-०४ ला एकरी ४०० किलो उत्पादन येत होते, ते आता पोहोचले आहे, ११०० किलोवर.

देशभरात दीड कोटी लोकांना काम
तंबाखूमुळे फक्त शेतकरीच जगतो, असे नाही, तर मजूर, दलाल, हमाल, दिवाणजी, कारकून, वखारीत काम करणारे कामगार यांनाही रोजगार मिळाला आहे. तसेच तंबाखूपासून विडी तयार करण्यासाठी तेंदूची पाने लागतात. त्या व्यवसायातही काम करणारे व्यापारी, ठेकेदार, मजूर लाखोंनी आहेत. त्याशिवाय विडी निर्मितीत दोरा, लेबल, विक्री व्यवस्था यातही रोजगार आहे. यातून देशभरात तब्बल दीड कोटी लोक काम करत आहेत.

तंबाखूच्या बायोडिझलवर उडाले बोईंग विमान
साऊथ आफ्रिकन एअरवेज (एसएए) आणि अमेरिकेची विमान निर्मिती कंपनी बोईंग यांनी गेल्यावर्षी (२०१८) बायोडिझेल (जेट फ्युएल) वापरुन विमान उडविले. बोईंग कंपनीचे हे विमान ३०० आसनक्षमतेचे होते. ते विमान जोहान्सबर्गहून केपटाऊनपर्यंत बायोडिझलवर चालले आणि नवा इतिहास निर्माण झाला. कारण हे बायोडिझल तयार झाले होते, तंबाखूच्या बियांपासून. दक्षिण आफ्रिकेत ‘सोलॅरिस’ नावाच्या जातीच्या तंबाखूचे उत्पादन मोठे होते. आणि याच्या बियांपासून दर्जेदार बायोडिझेल मिळते. त्यामुळे आता तेथे ‘सोलॅरिस’वर संशोधन सुरु आहे. काही वर्षातच व्यावसायिकदृष्ट्या या तंबाखू पिकाचे उत्पादन सुरु होईल. बियांच्या उत्पादनासाठी छोटे, मध्यम आणि मोठ्या जमिनीधारकांनाही या प्रकल्पात सामील करुन घेणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे ‘सोलॅरिस’मध्ये निकोटीन अतिशय कमी प्रमाणात असतो. त्यामुळे त्याचा व्यसनासाठी वापर न करता इंधन म्हणून करण्याकडे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solaris tobacco seeds oil used as bio diesel Sanjay Upadhye article