व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास होतो? हे आहेत उपाय!

डॉ. परेश गांधी
शुक्रवार, 14 जून 2019

व्हेरिकोस व्हेन म्हणजे फुगलेली, वाकडीतिकडी आणि मूळ लांबीपेक्षा वाढलेली नस. हृदयाकडील रक्तप्रवाह सुरळीत ठेवणाऱ्या झडपा त्यांचे कार्य योग्यरीतीने करू शकल्या नाहीत, तर पायांतील नसा फुगतात व रक्ताचा पुरवठा वेडावाकडा होऊ लागतो. या व्याधीला व्हेरिकोस व्हेन्स असे म्हणतात. याचे लक्षण म्हणजे गुडघ्यांच्या मागे किंवा मांडीवर अशा फुगलेल्या नसांचे जाळे दिसू लागते. कुठलीही नस ही व्हेरिकोस व्हेन्सच्या व्याधीने ग्रासली जाऊ शकते, परंतु सर्वाधिक धोका पायाच्या नसांना असतो. दीर्घकाळ उभे राहणे किंवा चालल्यामुळे शरीराच्या खालील बाजूच्या नसांमधील दाब वाढतो.

व्हेरिकोस व्हेन म्हणजे फुगलेली, वाकडीतिकडी आणि मूळ लांबीपेक्षा वाढलेली नस. हृदयाकडील रक्तप्रवाह सुरळीत ठेवणाऱ्या झडपा त्यांचे कार्य योग्यरीतीने करू शकल्या नाहीत, तर पायांतील नसा फुगतात व रक्ताचा पुरवठा वेडावाकडा होऊ लागतो. या व्याधीला व्हेरिकोस व्हेन्स असे म्हणतात. याचे लक्षण म्हणजे गुडघ्यांच्या मागे किंवा मांडीवर अशा फुगलेल्या नसांचे जाळे दिसू लागते. कुठलीही नस ही व्हेरिकोस व्हेन्सच्या व्याधीने ग्रासली जाऊ शकते, परंतु सर्वाधिक धोका पायाच्या नसांना असतो. दीर्घकाळ उभे राहणे किंवा चालल्यामुळे शरीराच्या खालील बाजूच्या नसांमधील दाब वाढतो. सुरवातीला फारसा त्रास झाला नाही, तरी कालांतराने घोट्याजवळ सूज येणे, घोट्याजवळ जखम होणे, पाय दुखणे, नस गोठणे असे त्रास संभवतात. रक्ताभिसरणाबरोबर गोठलेल्या रक्ताच्या गुठळ्या फुफ्फुसात जाऊन गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो.

व्हेरिकोस व्हेन्सच्या निदानासाठी वैद्यकीय तपासणी करावी लागते. काही रुग्णांना अल्ट्रासाऊंड या छोट्या स्वरूपातील चाचणीही करावी लागते. नसांमधील व्हॉल्वचे कार्य व्यवस्थितपणे सुरू आहे की नाही आणि रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या आहेत का, याबाबत खातरजमा करण्यासाठी ही चाचणी केली जाते. व्हेरिकोस व्हेन्सवर वेळीच योग्य उपचार न झाल्यास हा आजार गंभीर स्वरूप धारण करतो. व्हेरिकोस व्हेन्सवर फक्त शस्त्रक्रियेद्वारे उपचार होऊ शकतात, असा गैरसमज लोकांमध्ये आहे. प्राथमिक टप्प्यातील व्हेरिकोस व्हेन्सवर सोप्या उपायांद्वारे मात करता येते. व्यायाम, वजन घटविणे, घट्ट कपडे न घालणे, पाय उंचावणे आणि दीर्घकाळ उभे राहणे किंवा बसणे टाळल्यास व्हेरिकोस व्हेन्समुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो.

या सोप्या उपायांनी फरक न पडल्यास बाजारात विशिष्ट प्रकारचे स्टॉकिंग्ज उपलब्ध आहेत. या स्टॉकिंग्जमुळे पायांना आराम मिळतो. त्याला कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज असे म्हणतात. हे स्टॉकिंग्ज दिवसभर घातल्यास नसा आणि स्नायूंना आराम मिळतो व परिणामी रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो. मात्र, त्यासाठी योग्य मापाचे स्टॉकिंग्ज घालणे आवश्‍यक आहे. त्यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. व्हेरिकोस व्हेन्सने गंभीर स्वरूप धारण केल्यास शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध असतोच. शस्त्रक्रियांमध्ये स्क्‍लेरोथेरपी, कॅथेटर-एसिस्टेड पद्धत, व्हेन स्ट्रिपिंग, अँब्युलेटरी फ्लेबेक्‍टोमी, एन्डोस्कोपिक व्हेन सर्जरी असे विविध प्रकार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solutions on varicose veins

टॅग्स