‘ती’ सध्या काय करतेय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ती’ सध्या काय करतेय?

मुलगी म्हणून आजही समाजात ‘ती’ला किती महत्त्व आहे, हे समाजातील मुलींबाबत असलेल्या कुप्रथांवरून अधोरेखित होते. अनेक भागांमध्ये भयावह प्रथा-परंपरांना मुलींना सामोरे जावे लागते.

‘ती’ सध्या काय करतेय?

- सोनाली लोहार sonali.lohar@gmail.com

मुलगी म्हणून आजही समाजात ‘ती’ला किती महत्त्व आहे, हे समाजातील मुलींबाबत असलेल्या कुप्रथांवरून अधोरेखित होते. अनेक भागांमध्ये भयावह प्रथा-परंपरांना मुलींना सामोरे जावे लागते. बालविवाह, जरठविवाह आदी गंजलेल्या आणि अमानुष रुढींच्या चौकटी ओलांडून ‘ती’ बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना, समाज आजही त्याच दृष्टिकोनातून विचारतोय, ‘ती’ सध्या काय करतेय?

कधीतरी एखादा आफताब येतो आणि एखाद्या श्रद्धाचे ३५ तुकडे करतो, मग अजून एखादा तो किंवा ती येते आणि ‘तिने काय करायला हवं होतं’ हे तावातावाने सांगताना त्या संपलेल्या अस्तित्वाची अजून विविधरंगी ५० शकलं होतात.

जन्मापासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आंदोलनांच्या हिंदोळ्यावर झुलत कधी अलगद कधी ठेचकाळत आणि कधी झगडत ‘ती’ स्त्री म्हणून घडत जाते. तिच्या अंतर्मनाचा ठाव लागणं हे ऋषीचं कुळ शोधण्याइतकच कठीण, पण तिच्या अस्तित्वाचा झगडा मात्र कालही होता आणि आजही आहे, आजही ती फक्त ‘वापरलीच’ जातेय हे दाखवणाऱ्या आणि अंतर्मुख करणाऱ्या या अजून दोन सत्य घटना.

ही गोष्ट आहे अगदी सुखवस्तू, सुशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या एका कन्येची. अत्यंत हुशार, कलाप्रवीण अशी ही शाळकरी मुलगी एका आत्मनिर्भर भविष्याचे स्वप्न बघत असताना अचानक एक वावटळ आली. घरच्यांनी तिपटीच्या वयाच्या गृहस्थाशी प्रतिष्ठेच्या हव्यासापायी लग्न लावून दिलं. बालविवाह, जरठविवाह वगैरे सगळ्या जुनाट संकल्पना झाल्यात हे समजणाऱ्या आपल्या शहरी भागातलीच ही घटना. लग्न काय असतं, शरीरसंबंध काय असतात, हे काहीच न कळणाऱ्या वयात एक कळी खुरडली गेली आणि मग पुढची २०-२२ वर्ष सगळाच चिखल होत गेला. असह्य होऊन वयाच्या ३५ व्या वर्षी अखेर बंड केलं आणि नेसत्या वस्त्रानिशी भर मध्यरात्री ती घराबाहेर पडली. माहेरच्यांनी दरवाजे उघडले नाहीत.

आता या गोष्टीलाही दहा वर्ष झालीत. वय वाढलंय आणि त्याबरोबर वाढत्या वयाची आव्हानही. आज ती डोक्यावर हक्काचा छत आणि मंगळसूत्राचं पुरूषी संरक्षण नसलेली एक मध्यमवयीन एकटी स्त्री आहे. प्रेमासाठी आयुष्यभर आसुसलेली ती दुर्देवाने या वाटेवरही लुबाडली गेली.

ती सध्या काय करते?

ती सध्या मानसोपचार घेतेय, अपूर्ण शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न करतेय, तीन अर्धवेळ नोकऱ्या करतेय, बलात्कार पीडित महिलांसाठीच्या एनजीओसाठी काम करतेय, ती गाणं शिकतेय.. सध्या ती जगण्याचा प्रयत्न करतेय!

एका पुराणमतवादी पण सुशिक्षित शहरी समुदायात जन्माला आलेली अजुन एक ‘ती’. वयाच्या सहाव्या वर्षी तिची आजी तिला धार्मिक विधी करणाऱ्या दाईकडे घेऊन गेली. अंधाऱ्या बोळकांडीतल्या त्या छोट्याशा खोलीतल्या कुजबुजीने त्या लहानग्या मुलीच्या डोळ्यात भय दाटून आलं, काय होतंय तिला काहीच उमजेना. जमिनीवर पालथं पाडून आजीने आणि एका स्त्रीने तिचे हातपाय दाबून धरले, पाय फाकवले आणि मग एका धारदार ब्लेडने दाईने तिच्या बाह्य जननांगाला छेद दिला. असह्य वेदनांनी ती मुलगी किंचाळली... पुढच्या कित्येक रात्री ती मुसमुसत राहिली. आजीने आणि आईने सांगितलं की याबद्दल कुठेही बोलायचं नाही, प्रत्येक लहान मुलीला हा विधी करून घ्यावाच लागतो. ती ‘मुलगी’ आहे. तिचं पाऊल वेडंवाकडं पडू नये म्हणून हे सगळं गरजेचं असतं, कारण तिचं शरीर हे फक्त तिच्या पतीच्या वापरासाठीच असतं. त्या एका जखमेने वेदना आणि जंतूसंसर्ग हा तिच्या आयुष्याचा मग कायमचा भाग झाला. सगळ्याच जखमा ठुसठुसत राहिल्या, ती हळूहळू पेटत गेली.

ती सध्या काय करते?

गंजलेल्या आणि अमानुष रुढीच्या चौकटी ओलांडून ती धैर्याने त्या समुदायाबाहेर पडलीय आणि आपली वेदना समजून घेणारा परसमुदायातला जोडीदार तिने शोधलाय.सध्या तिच्या समुदायाने तिला बहिष्कृत केलंय.

जगभरात २०० दशलक्ष हून अधिक महिला या विकृत प्रथेच्या बळी आहेत. २९ हून अधिक देशांनी यावर कायद्याने बंदी आणली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याचा जोरदार विरोध करत हे स्त्री आणि मुलींच्या मानवाधिकारांचं उल्लंघन आहे असंही जाहीर केलय. तरीही अत्यंत छुप्या पद्धतीने आजही या घटना घडतच आहेत. ‘ती’ सध्या या प्रथेविरोधातल्या जागतिक चळवळीचा भाग बनलीय. याबाबत कायद्यात ठोस उपाययोजना व्हावी म्हणून ती झगडतेय.

‘ती’ प्रतिनिधी आहे शतकानुशतकं सुरू असणाऱ्या एका अव्याहत झगड्याची. म्हणूनच तिने काय करावं हे ठासून सांगण्याआधी तिचा हा प्रवासही समजून घेणं आत्यंतिक गरजेचं. ‘ती’चा एकच आक्रोश आहे, ‘मला ‘वापरू’ नका!’ सध्या तरी, ‘ती’ फक्त लढतेय!

(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत)