श्रावणी सोमवार! साबुदाणा खिचडी तर पाहिजे ना राव; पुण्यातील 'ही' आहेत बेस्ट ठिकाणं

नेहा मुळे
Sunday, 4 August 2019

पुण्यात उपवासाचे पदार्थ अधिक टेस्टी मिळतात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा हे प्रकार आपण नाष्ट्यालाही खातोच. श्रावणी सोमवारनिमित्त पुण्यातील उत्तम खिचडी आणि उपवासाचे पदार्थ मिळणारी काही ठिकाणे जाणून घेऊयात... 

वीकएंड हॉटेल 

उपवासाची मेजवानी 
श्रावणी सोमवार अनेक महाराष्ट्रीयनांसाठी एक खास, शुभ आणि आध्यात्मिक दिवस आहे. यादिवशी बहुतांश लोक उपवास करतात. माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी उपवासापेक्षा श्रावणी सोमवार म्हणजे मेजवानीच असते. त्यातून पुण्यात उपवासाचे पदार्थ अधिक टेस्टी मिळतात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा हे प्रकार आपण नाष्ट्यालाही खातोच. आपण श्रावणी सोमवारनिमित्त पुण्यातील उत्तम खिचडी आणि उपवासाचे पदार्थ मिळणारी काही ठिकाणे जाणून घेऊयात... 

साबुदाणा खिचडी 
अप्पा (शनिवार पेठ/कर्वेनगर) : अप्पाची काकडीच्या खिचडीची पुणेकरांना वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. अनेक दशकं डेक्कन जिमखानाजवळ हे छोटेखानी दुकान खिचडी प्रेमींसाठी आवडीचं स्थळ आहे. अप्पांच्या निधनानंतर डेक्कनऐवजी शनिवार पेठ आणि कर्वेनगर येथे या खिचडीचा आस्वाद घेता येतो. 

Sabudana Khichdi

बिपिन स्नॅक्‍स (कर्वे रोड) : "बिपिन'मधील काकडी खिचडीही अधिक आवडती आहे. याठिकाणची साबुदाणा खिचडी, त्यावर थोडासा बटाट्याचा चिवडा आणि शेजारी असलेली काकडीची कोशिंबीर म्हणजे सुख. 

मनोहर फास्ट फूड (मेहेंदळे गॅरेज, एरंडवणे) : उत्तम महाराष्ट्रीयन स्नॅक्‍स आणि जेवण मिळणाऱ्या या ठिकाणी साबुदाणा खिचडी तितकीच छान मिळते. 

न्यू स्वीट होम (कुमठेकर रोड) : कुमठेकर रोड आणि लक्ष्मी रोडवर खरेदी करून थकलेल्या आणि भुकेल्या लोकांना अनेक वर्षांपासून आपल्या सात्त्विक आणि टेस्टी डिशेशने तृप्त करणारे हे ठिकाण. येथील साबुदाणा खिचडीची चव नक्की घेण्यासारखी. 

श्री दत्त स्नॅक्‍स (पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वे) : पुणे-मुंबई रस्त्याने प्रवास करत असाल. तर खोपोलीजवळ श्री दत्तला थांबणं अनेकांसाठी आवश्‍यक असतं, ते येथील चविष्ट नाश्‍त्यासाठी. पोहे, शिरा आणि इतर डिशेससोबतच साबुदाणा खिचडी अतिउत्कृष्ट! 

प्रभा विश्रांती गृह (नारायण पेठ) : इथं साबुदाणा खिचडी फक्त गुरुवार आणि शनिवारी मिळत असली, तरी त्यांचा स्वादिष्ट साबुदाणा वडा मात्र रोज मिळतो. इथल्या वड्याची चव तुमच्या जिभेवर तरळत राहणारच... 

आषाढी एकादशी निमित्त अनेक ठिकाणी आपल्याला अनेक हॉटेल्स खास उपवासाची थाळी, उपवास मिसळ व इतर पदार्थ उपलब्ध करून देतात. त्यापैकी काही निवडक ठिकाणं : 

उपवासाची थाळी

बादशाही बोर्डिंग हाउस (टिळक रोड) : उपवासाच्या दिवशी इथं खास उपवासाची मिसळ आणि पोटॅटो टोस्ट या दोन पदार्थांसाठी बादशाहीला भेट देणं आवश्‍यक आहे. अतिशय चविष्ट अशा या दोन्ही डिशेसची चव घेतलीच पाहिजे. 

कृष्णा डायनिंग हॉल (लॉ कॉलेज रोड) : येथील उपवास थाळी फक्त महाशिवरात्री व आषाढी एकादशीलाच मिळते. थाळीसाठी महिनाभर आधीपासून बुकिंग व्हायला सुरवात होते! नेहमीच्या उपवासाच्या पदार्थांसोबतच शेंगदाणा उसळ, डांगर, केळं-सफरचंद रायता, रताळ्याचा किस आणि बरेच काही मिळते. बुकिंग फूल झाले असले, तरी पार्सल सुविधा मिळेल. 

हॉटेल श्रेयस (आपटे रोड) : महाराष्ट्रीयन जेवणासाठी आवडीचा असलेल्या या ठिकाणी, आषाढी एकादशीनिमित्त उपवास थाळी असणार आहे. त्यामध्ये खिचडी, वाऱ्याचे तांदूळ, दाण्याची आमटी, उपवास थालीपीठ अशा नेहमीच्या पदार्थांसोबतच, आलू टिक्की, श्रीखंड अशा अनेक पदार्थांचा समावेश आहे. पार्सलची सोय उपलब्ध. 

उपवास थाळी

बापट उपहार गृह (शुक्रवार पेठ, बाजीराव रोड) : येथील खिचडी अनेकांच्या आवडीची आहे. एकादशीनिमित्त या ठिकाणी चविष्ट उपवास मिसळ, उपवास दही मिसळ, उपवास पॅटिस, उपवास ताट आणि उपवास पॅकेज मिळते. 

अभिजात न्यू स्वीट होम (कुमठेकर रस्ता) : कुमठेकर रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावर खरेदी करून थकलेल्या आणि फुडी लोकांनाही अनेक वर्षांपासून आपल्या सात्त्विक आणि टेस्टी डिशेस्‌नी तृप्त करणारं हे ठिकाण. इकडची साबुदाणा खिचडी आणि स्पेशल गुलकंदयुक्त दाण्याच्या लाडूची चव नक्कीच घेण्यासारखी. एकादशीनिमित्त इथे उपवास थाळी, मिसळ, खास खजूर आणि गुलकंद आइस्क्रीम आणि इतर उपवास पदार्थ मिळणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special article on fast recepies on Shravan Monday