परराष्ट्र धोरणांसाठी आदर्श लोकमान्य टिळक!

रोहन चौधरी 
Thursday, 1 August 2019

लोकमान्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आज (ता. 1 ऑगस्ट) सुरू होत आहे. त्यानिमित्त विशेष लेख...

लोकमान्य टिळकांची ओळख अनेकांना स्वराज्यासाठी लढणारे नेते एवढ्यापुरतीच आहे. पण त्यांनी जागतिक राजकारणाच्या पटलावर पॅरिस शांतता परिषदेच्या माध्यमातून जे विचार मांडले आहेत, त्याचीही दखल आवर्जून घ्यायला हवी. लोकमान्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आज (ता. 1 ऑगस्ट) सुरू होत आहे. त्यानिमित्त.... 

पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या प्रचंड वित्तहानी आणि जीवितहानीच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक शांतता परिषद आकाराला आली, तसेच युरोपच्या राजकीय आणि आर्थिक भावितव्यासंबंधी चर्चा करण्यासाठ ही बैठक फ्रान्स येथे आयोजित केली होती. युरोपच नव्हे तर संपूर्ण जगाची नजर या परिषदेकडे होती. "लीग ऑफ नेशन्स' आणि "व्हर्सायच्या करार' या ऐतिहासिक गोष्टी याच परिषदेतून उदयास आल्या. भारत ब्रिटिशांची वसाहत असला तरीही भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि हसन इमाम यांची निवड करण्यात आली होती.

Image result for lokmanya tilak

लोकमान्य टिळक त्या वेळी ब्रिटनमध्येच होमरूल चळवळ चालवत होते. परंतु, दुर्दैवाने ब्रिटनने परवानगी नाकारल्याने टिळक शांतता परिषदेसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, हार मानतील ते लोकमान्य कसले? त्यांनी एडगर वेलास यांच्यातर्फे आपला ऐतिहासिक असा "शांततेचा मसुदा' परिषदेचे अध्यक्ष जॉर्ज कलेमानसो यांच्याकडे पाठवला आणि त्याची एक प्रत अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्याकडेही पाठवली. जागतिक राजकारणात भारताची काय भूमिका असेल, हेही विशद केले. त्या संदर्भात स्वातंत्र्याची मागणी करून ती का मिळावी, याची तीन कारणे टिळकांनी याच मसुद्याच्या आधारे सांगितली. 

अलिप्ततावादी धोरणाची बीजे 
पहिले कारण म्हणजे टिळकांच्या मते भारताचे स्वातंत्र्य हे ब्रिटिशांच्याच हिताचे आहे. भारत वसाहतीत टिकवून ठेवण्यासाठी ब्रिटिशांना जी ऊर्जा खर्च करावी लागते, ती ब्रिटिशांनी युरोपात खर्च केली तर त्याने ब्रिटिशांचे जागतिक राजकारणातील स्थान आणखी मजबूत होईल. शिवाय स्वतंत्र भारत हा जागतिक संघर्षापासून अलिप्त असेल, असेही त्यांनी त्यात स्पष्ट केले होते. 25 वर्षांनंतर नेहरूंनी मांडलेल्या अलिप्ततावादी धोरणाची बीजे लोकमान्यांच्या या मसुद्यात आढळतात. दुसरे, भारत स्वतंत्र झाला तर त्याची भौगौलिक वैशिष्ट्ये आणि साधनसंपत्तीमुळे जागतिक राजकारणाचे नेतृत्व भारताकडे आपोआपच चालून येईल. या नेतृत्वात साम्राज्यवादाचा आणि वसाहतवादाचा लवलेशही असणार नाही. भारत स्वतःहून कधीही आपल्या लष्करी सामर्थ्याचा वापर आपली शक्ती दाखवण्यासाठी करणार नाही. 1954मध्ये भारताने अवलंबलेल्या पंचशील धोरणाची मुळे आणि भारताचे आण्विक धोरणाचे प्रतिबिंब या मसुद्यात दिसून येते. तिसरे कारण आजच्या राजकारणाच्या संदर्भात आहे. टिळकांच्या मते भारताचे जागतिक राजकारणातले यश हे भारत आपल्या विविधतेचे कशाप्रकारे संवर्धन आणि संरक्षण करतो यावर अवलंबून असेल. याच अनुषंगाने त्यांनी हिंदू-मुस्लिम वादाचे यशस्वी निराकरण करणे गरजेचे आहे, अशी मांडणी केली होती. 

पाश्‍चात्त्यांच्या ढोंगीपणावर बोट 
याशिवाय लोकमान्यांनी भारत, जपान यांसारख्या आशियाई देशांनी एकत्र येऊन पाश्‍चात्त्य संस्कृतीचा सामना करण्याचे आव्हान केले, तसेच भारताच्या स्वयंनिर्णयाच्या हक्कांची मागणी करताना त्यांनी पाश्‍चात्त्य राष्ट्रांच्या ढोंगीपणावरही बोट ठेवले. त्यासाठी त्यांनी युरोपीय राष्ट्रांच्या आणि आफ्रिकन राष्ट्रांच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करताना भारतास कसे डावलले जाते, हे सोदाहरण स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर आयर्लंडच्या स्वयंनिर्णयावरच्या मागणीवर विचार मांडताना त्यांनी अमेरिकेच्या दुटप्पी धोरणांवरही अग्रलेखांतून कडाडून टीका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काश्‍मीरवरील विधान पाहता लोकमान्यांची आठवण आल्याखेरीज राहत नाही. 

स्वदेशीसारखा आर्थिक विचार, "स्वराज्य' ही राजकीय संकल्पना आणि होमरूलसारखी भारताच्या स्वातंत्र्याची कल्पना या सर्वांवर आधारित हा शांततेचा मसुदा असून, त्यांनी या परिषदेत "स्वयंनिर्णया'च्या हक्काची मागणी केली. या मागणीचे महत्त्व इतके होते की, आपल्या चौदा मुद्द्यांमुळे प्रसिद्धीस आलेल्या वुड्रो विल्सन यांना याच मागणीसाठी शांततेचे नोबेल मिळाले आणि टिळकांच्या नशिबी मात्र त्यांच्या कार्याचे "विस्मरण'. 
आज भारत जागतिक महासत्ता निर्माण होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

आर्थिक, राजकीय, वैज्ञानिक, अंतराळ तसेच तंत्रज्ञान इत्यादी सर्वच क्षेत्रात देश प्रगती करत आहे. महासत्तेच्या संकल्पना निरनिराळ्या असून, भारताची ताकद विविधतेत एकता हीच आहे. ही मांडणी वास्तविक लोकमान्यांनीच पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर केली. त्यांच्या पश्‍चात टागोर आणि गांधींनी त्याचा प्रसार आपल्या विचारातून केला, तर नेहरू यांनी त्या प्रसाराचे रूपांतर आपल्या धोरणांत केले. जसे भारताची खरी ताकद विविधतेत एकता ही आहे, तशीच ती ताकद इतिहासात, प्रामुख्याने स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील वैचारिक मंथनात आहे. जेव्हा भारत भविष्यात जगाचे नेतृत्व करेल तेव्हा ही विचाराची शिदोरी नक्कीच उपयुक्त ठरेल. अशा विचारांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असून लोकमान्यांच्या परराष्ट्र धोरणांची ओळख त्यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त करून देणे अपरिहार्य ठरते. 

(लेखक कोलकता येथील मौलाना अबुल कलाम आझाद इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज येथे संशोधक आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special article on Lokmanya Tilak on his Death Anniversary