मल्टिप्लेक्‍समध्ये ‘खाद्य’पट! (मंदार कुलकर्णी)

मंदार कुलकर्णी
रविवार, 5 ऑगस्ट 2018

मल्टिप्लेक्‍समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्याची मुभा सरकारनं दिली आणि एक ऑगस्टपासून कारवाईचा इशाराही दिला. त्यानंतर सगळीकडं एकच चर्चा सुरू झाली. घरी तयार केलेले पदार्थही चित्रपट बघताना नेता येतील, असंही स्वप्न दिसायला लागलं. या सगळ्या प्रकारावर एक तिरकस नजर.

‘‘अ  गं, आटप लवकर. झालं की नाही अजून,’’ असा प्रश्न मी विचारला, तेव्हा अर्थातच अख्ख्या सोसायटीला ऐकू गेला. सौभाग्यवती तशा लवकर आवरतात हो; पण काही वेळा कॅलेंडरचीही आठवण करून द्यावीच लागते. (इतरही काही गोष्टींची आठवण होतेय; पण गृहसौख्यापोटी त्या जरा बाजूला ठेवतो...तर सांगायचा मुद्दा एवढाच की) सौभाग्यवतींना हाक मारली. चित्रपट बघायला मल्टिप्लेक्‍समध्ये जायचं होतं. ‘‘येतेय हो, तुमच्याचसाठी चाललंय सगळं,’’ असं म्हणत मॅडम गाडीत बसल्या. तिचंही बरोबरच होतं. आज तिला वरणफळं करायची होती. ती गरम खाल्ली तरच चांगली लागतात. त्यामुळं वाफाळत्या वरणफळांचा डबा, तुपासाठी छानपैकी वेगळा डबा आणि बाकी सगळा सरंजाम घेऊन आम्ही निघालो. 

‘बाहुबली’ चित्रपट बघताना वरणफळंच बरी असं तिचं म्हणणं बरोबर होतं. ‘ॲव्हेंजर्स-इन्फिनिटी वॉर,’ ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’सारख्या जड चित्रपटांच्या वेळी पचायला बरं असलेलं इडली सांबार, करण जोहरच्या गोडगोड चित्रपटांच्या वेळी तिखट म्हाद्या, ‘धडक’सारख्या रटाळ चित्रपटांच्या वेळी शक्‍यतो कंटाळा येऊ नये म्हणून ‘फाइव्ह कोर्स मील’, काही ‘हॉट’ चित्रपटांच्या वेळी कोकम सरबतं, आईस्क्रीम्स; ‘मसान’सारख्या चित्रपटांच्या वेळी डाळवडे अशा सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. त्यामुळं अतिशय विचारपूर्वक आम्ही वरणफळं घेऊन मल्टिप्लेक्‍समध्ये पोचलो आणि सीटवर बसलो तेव्हा आश्‍चर्याचा धक्काच बसला.

शेजारचं कुटुंब ‘बाहुबली थाळी’च घेऊन आलं होतं. सगळे जण मोठमोठी ताटं घेऊन पदार्थ चापत होते. सगळीकडं सुग्रास अन्नाचा वास पसरला होता. मागच्या कुटुंबानं शेवआमटी आणली होती; पण चटणीवर घालायला तेल विसरल्यामुळं दादा वहिनींवर डाफरत होते. समोरच्या काकू तर खूप उत्साही होत्या. त्यांच्या मिस्टरांना गरम भाकऱ्याच लागतात. त्यामुळं त्या बाई ‘हॉट प्लेट’च घेऊन आल्या होत्या. मस्तपैकी भाकऱ्या थापून त्या मिस्टरांना खाऊ घालत होत्या. पिठलं आणि मिरचीचा ठेचा यांचा वास प्रभासपर्यंत पोचला असता, तर तो केव्हाच देवसेनेला बाजूला सारून भाकरी-पिठलं खायला आला असता. एका काकांनी कुटुंबाला फ्रूट सॅलड खाऊ घालायचं ठरवलं होतं. त्यामुळं कलिंगड, खरबूज, अननस वगैरे त्यांनी आणले होते. सुरी घेऊन कापाकापी चालू होती. भल्लालदेव आल्यावर तर काका वेगानं हात चालवत होते. ‘‘भोपळा चालतो का गं फ्रूट सॅलडमध्ये,’’ असाही प्रश्न ते पत्नीला विचारत होते; पण एवढा मोठा भोपळा आणायचा कसा असा प्रश्‍न त्यांच्या सौभाग्यवतींना पडला होता. एका तरुणीला कार्ल्याची भाजी आवडत नव्हती; पण ‘‘प्रभासचे चित्रपट बघताना ती सगळं आनंदानं खाते,’’ असं तिचं कौतुक करत तिच्या मातुःश्री कार्ल्याची भाजी आणि माईनमुळ्याचं लोणचं तिला वाढत होत्या.  

मल्टिप्लेक्‍सच्या त्या थंड वातावरणात अनेकांनी अंगतपंगतही मांडली होती. एक काका खूपच उत्साही. त्यांनी उदबत्या वगैरे मांडल्या होत्या आणि केळीच्या पानांवर पंगत मांडली होती. एका लोकशाहीवादी तरुणानं मुद्दाम पत्रावळी आणल्या होत्या. मल्टिप्लेक्‍सवालेही खूप उत्साही झाले आहेत हल्ली. त्यांनी वाढपीही ठेवले होते. त्यामुळं ‘कृष्णाकाठ-कृष्णाकाठ-कृष्णाकाठ’, ‘मठ्ठा-मठ्ठा-मठ्ठा’ असं ओरडत ते रांगारांगांमधून हिंडत होते. एक जण तर बाहुबली ‘ऐसा रुद्रसा’ म्हणत येताना दिसला, की बरोबर मठ्ठा आणायचा. त्यामुळं ‘आ’ वासलेल्या तोंडात आपोआप मठ्ठा जायचा आणि पोट तृप्त व्हायचं. कुणी वरणभात चापतंय, कुणी पोळीला लावण्यासाठी एकमेकांना तुपाची बुधली पास करतंय, कुणी आणलेल्या शेपूच्या भाजीचा वास घमघमतोय, कुणी गव्हाच्या खिरीचा एकमेकांना आग्रह करतंय, कुणी ‘आमच्याकडही आमटीही खाऊन बघा बरं का’ असं म्हणतंय, कुणी केळीच्या पानावर जेवण्याचा प्रयत्न करतंय, असा सगळा माहौल जमून आला होता. 

चित्रपटांच्या सुरवातीला ‘वदनी कवळ घेता’ हा श्‍लोकही सगळ्यांनी म्हणणं बंधनकारक करायला पाहिजे, असं एक आजोबा त्यांच्या नातवाला तावातावानं सांगत होते आणि नातू मॅगीच्या नूडल्सशी ‘लढाई’ करत होता. लग्नघरात आल्यासारखंच वातावरण होतं एकूण. सनया, फुलांचे हार वगैरे नव्हते; पण एकूणच वातावरण छान होतं. प्रत्येक जण तृप्त होत होता. 

मल्टिप्लेक्‍समधून बाहेर पडलो, तेव्हा ‘‘त्या शिवगामीचं काय झालं हो शेवटी,’’ असा प्रश्न सौभाग्यवतींनी विचारला, तेव्हा लक्षात आलं, की अरे चित्रपट बघायचा तर राहिलाच की! वरणफळं, जिलबी, मठ्ठा वगैरेंचा आस्वाद घेताना चित्रपट बघणं तेवढं राहून गेलं होतं. मग दोन दिवसांनी पुन्हा यायचं असं आम्ही ठरवलं....‘‘अगं, पण तेव्हा तू गाजराचा हलवा कर बरं का,’’ असं सांगायला मी विसरलो नाही. शिवगामीचे डोळे तिखट आहेत ना. उगाच ॲसिडिटीचा त्रास नको बुवा!

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: spoof on Multiplexes by Mandar Kulkarni