पैसा आणि सुरक्षितता (श्री श्री रविशंकर)

श्री श्री रविशंकर
शनिवार, 11 मे 2019

"आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल" पुरवणीत...

चेतना तरंग
आयुष्यात पैसा आपल्याला स्वातंत्र्य आणि मालकी हक्काची जाणीव देतो. आपण पैशाच्या जोरावर काहीही विकत घेऊ शकतो किंवा कोणाच्याही सेवेची किंमत ठरवू शकतो, असे आपल्याला वाटते. एखाद्या गोष्टीची मालकी म्हणजे सुरवातीपासून शेवटपर्यंत तिच्या अस्तित्वाचे पूर्ण नियंत्रण होय. उदाहरणार्थ- आपण जमिनीच्या तुकडा पैसे देऊन विकत घेतो. त्यानंतर, त्याबद्दल मालकीची भावना येते. मात्र, मालक नसतानाही बराच काळ तिचे अस्तित्व कायम राहणार असते. अशी अनंतकाळ अस्तित्वात राहणाऱ्या गोष्ट आपल्या मालकीची कशी असू शकते? तुम्ही शक्तिमान आणि स्वतंत्र असल्याची जाणीवही पैसाच देतो. मात्र, त्यामुळे तुम्ही आपण परस्परांवर अवलंबून असलेल्या जगात राहतो, या वस्तुस्थितीकडे अंधपणे डोळेझाक करतो.

आपण शेतकरी, स्वयंपाकी, चालकासह आजूबाजूच्या इतर व्यक्तींवर अनेक सेवांसाठी अवलंबून असतो. एवढेच काय, एखाद्या निष्णात सर्जनलाही शस्त्रक्रियेसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. बहुतेक श्रीमंत व्यक्ती उद्धट का असतात? पैशामुळे निर्माण झालेल्या स्वातंत्र्याच्या भावनेतून हा उद्धटपणा येतो. दुसरीकडे, अवंलबित्वाच्या भावनेतून व्यक्ती नम्र होते. स्वतंत्रतेच्या या खोट्या भावनेमुळे नम्रतेचा मूलभूत मानवी सिद्धान्त दूर लोटला गेला आहे. आपण एकूण संपत्तीवरूनच लोकांचे मूल्यमापन करीत आहोत. अमुकतमुक यांची एकूण संपत्ती ५० कोटी वगैरे. पैसा खरोखरच माणसाचे मूल्य ठरवू शकतो का? एखाद्याला लक्षाधीश किंवा अब्जाधीश असे संबोधणे, ही काही कौतुकाची बाब नव्हे. तुम्ही मानवी आयुष्य पैशाच्या तराजूत मोजू शकत नाही. लोकांचा दिव्यत्व, स्वतःची क्षमता आणि समाजाच्या चांगुलपणावरचा विश्‍वास उडतो, तेव्हा त्यांच्यामध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यानंतर, पैसाच सुरक्षितता देऊ शकतो, असे वाटू लागते. श्रीमंतांमध्येही काही जणांना नातेसंबंधांमध्ये असुरक्षित वाटते. आपले मित्र खरेखुरे मित्र आहेत की त्यांना आपल्या संपत्तीत रस आहे, असा प्रश्‍न त्यांना पडतो. काही वेळापुरता पैसा सुरक्षिततेचा भ्रम तयार करू शकतो. एखादी व्यक्ती कौशल्ये आणि क्षमतांच्या जोरावर संपत्ती कमावू शकते. वारसा किंवा भ्रष्टाचारातूनही ती मिळवू शकते. यापैकी प्रत्येक मार्ग स्वत:सोबत काही परिणामही घेऊन येतो. भ्रष्टाचारामागे आनंद आणि शांतता मिळविण्याचाच हेतू असतो, मात्र, पैसा कमाविण्याचा मार्ग, असा भ्रष्ट असला की या गोष्टी अलगद निसटतात.

स्वातंत्र्य, मालकी आणि सुरक्षिततेच्या भ्रामक कल्पनांमुळे पैसा हा मायेचाच एक भाग समजला जातो. जगातील मोजता येणारी गोष्ट म्हणजे माया होय. पैसा हे यापैकीच एक. तुम्ही मोजता न येणाऱ्या गोष्टींवरही किमतीचे लेबल चिटकवून मानवी मूल्येच नष्ट करता. प्रेम, सत्य आणि मानवी आयुष्याचाही यातून नाश होतो. दुसरीकडे समाजातील सर्व अपप्रवृत्तीला पैशाला जबाबदार ठरविणाराही एक वर्ग आहे. काही जण तर पैशाला वाईटच मानतात. केवळ पैसा बाळगल्यामुळे उद्धटपणा येत नाही, तर त्याला नाकारूनही तो येतो. काही जण सहानुभूती मिळविण्यासाठी पैसा नाकारून गरिबीचा अभिमान बाळगतात. प्राचीन ऋषींनी पैशाला कधीही बदनाम केले नाही. त्यांनी संपत्तीचा लक्ष्मी म्हणून सन्मान केला. योगातून जन्मलेली ही नारायणाची पत्नी. योगच वाईट कर्मांचे रूपांतर करून कौशल्य आणि गुणवत्ता आणतो. अष्टसिद्धी आणि नवसिद्धीही प्रदान करतो. एखाद्याचे उद्धटपणातून आत्मविश्‍वासाकडे, अवंलबित्वाच्या ओझ्याकडून परस्परावलंबित्वाकडे, मर्यादित मालकीकडून संपूर्ण एकतेकडे रूपांतर योगच घडवतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sri sri ravishankar article Money and security