कोकणकन्यांचा झळाळता पॅटर्न (शिवप्रसाद देसाई)

shivprasad desai
shivprasad desai

दहावी-बारावीच्या परीक्षेत महाराष्ट्रात आता "कोकण पॅटर्न'चा बोलबाला आहे. यंदाही बारावी परीक्षेत सलग आठव्या वर्षी कोकण महाराष्ट्रात अव्वल स्थानी राहिलं. यात मुलींच्या टक्‍केवारीची आघाडी कायम आहे. उपजत बुद्धिमत्ता आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द यांच्या जोरावर हा बुद्धिमत्तेचा "कोकण पॅटर्न' तयार झाला आहे.

-महाराष्ट्रात दहावी-बारावी परीक्षेत एकेकाळी "लातूर पॅटर्न'ची चलती होती. गेल्या सात-आठ वर्षांत मात्र कोकणनं आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या बारावीच्या परीक्षेतही कोकणानं हे अव्वल स्थान कायम राखलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या पॅटर्नविषयीची उत्सुकता निर्माण झाली.

कोकणातले रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे पूर्वी कोल्हापूर विभागीय बोर्डाला जोडलेले होते. त्या काळात जास्तीच्या विद्यार्थिसंख्येमुळे कोकणची ही प्रज्ञा तशी झाकोळलेलीच राहिली. कोकण आणि कोल्हापूर यांच्यातलं अंतर जास्त असल्यानं शाळांना प्रशासकीय कामं करण्यात अडचणी यायच्या. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी स्वतंत्र "कोकण बोर्डा'ची दीर्घ काळची मागणी होत होती. आठ वर्षांपूर्वी ती पूर्णत्वाला आली आणि तेव्हापासून प्रज्ञावान कोकणचं लखलखीत यश महाराष्ट्राच्या पटलावर चमकू लागलं. बोर्ड स्थापन झाल्यानं कोकणचं स्वतंत्र मूल्यमापन होऊ लागले; पण शैक्षणिक संपन्नता, बुद्धिमत्ता ही काही केवळ आठ वर्षांपूर्वी प्रकट झालेली नाही. तर ती इथल्या संस्कृतीचाच भाग आहे.

शिक्षणक्षेत्रात चमकण्याची परंपरा जुनीच
संस्थानकाळापर्यंत मागं गेल्यास इथल्या तांबड्या मातीत शिक्षणाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत याची कल्पना येते. पूर्वी मंडणगडपासून ते सावंतवाडीपर्यंत अखंड रत्नागिरी जिल्हा होता. यातला दक्षिणेकडचा बराचसा भाग सावंतवाडी संस्थानकडं होता. त्या काळात बडोदा, त्रावणकोर, कोचीन, म्हैसूर अशा शिक्षणक्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या संस्थानांमध्ये सावंतवाडीचीही गणना व्हायची. इथल्या ग्रामीण भागात सव्वाशे वर्षं जुन्या प्राथमिक शाळा आहेत. फार पूर्वीपासून इथल्या गावपाड्यात शिक्षणाचा प्रसार झाला. सन 1924 ला सावंतवाडीच्या गादीवर बसलेले पुण्यश्‍लोक पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांच्या कारकीर्दीत दक्षिण कोकणात शिक्षणाचा सुवर्णकाळ सुरू झाला. शिक्षणक्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याचे धोरण त्यांनी अमलात आणलं. सन 1931 मध्ये (कै) रामभाऊ परुळेकर, (कै) प्राचार्य सी. रा. तावडे या तज्ज्ञांची शिक्षण समिती नेमून त्यांनी अहवाल तयार करून घेतला. यानंतर नवी शिक्षणव्यवस्था अमलात आणली. शिक्षकांसाठी प्रशिक्षणवर्ग सुरू केले. गावोगाव प्राथमिक शाळांचं जाळं विस्तारलं. कृषी, तंत्रशिक्षण यांचा अभ्यासक्रमात समावेश केला. त्या काळात त्यांनी प्रौढ साक्षरता मोहीमही राबवली होती.

उर्वरित रत्नागिरी जिल्ह्यात असे एकत्रित धोरणात्मक बदल झाल्याचे संदर्भ मिळत नाहीत. मात्र चिपळूण, रत्नागिरी, दापोली, खेड, संगमेश्‍वर अशी शहरं शैक्षणिक विकासाची केंद्रं पूर्वीपासूनच होती. यामुळे शैक्षणिक विकास, जागृती तिथल्या खेड्या-पाड्यांतही झाली. दुर्गम, मागासलेला भाग असूनही शिक्षण इथल्या संस्कृतीशी जोडलं गेलं. आताच्या "कोकण पॅटर्न'ची पाळेमुळे कदाचित या समृद्ध परंपरेत असावीत.

प्रत्येक विद्यार्थ्यावर बारकाईनं लक्ष
साधारणतः दोन पिढ्यांपूर्वी कोकणात धड रस्ते नव्हते. पंचक्रोशीत एखाद्या गावात प्राथमिक शिक्षणाची सोय असायची; पण माध्यमिक शाळेसाठी शहराचा किंवा जवळच्या मोठ्या गावाचा आधार घ्यावा लागायचा. तरीही पायपीट करून, प्रसंगी पोटाला चिमटा काढून संबंधितांनी शिक्षण घेतल्याच्या यशोगाथा आजही गावोगाव ऐकायला मिळतात. परिस्थिती बदलली. शाळा जवळ आल्या. कोकणाच्या बाहेरचीही आधुनिकता आणि प्रगती आणखी विस्तारली. परिणामी, सुधारलेलं कोकण त्या तुलनेनं तसं मागंच राहिलं. साहजिकच प्रतिकूलता आजही कोकणच्या पाचवीला पूजलेली आहेच, तरीही दहावी-बारावीत मिळणारं यश हे सोनेरीच म्हणावं लागेल.
या निकालातही दोन्ही जिल्ह्यांतल्या काही शाळा आपला वेगळा ठसा उमटवतात. कुडाळ हायस्कूल यापैकीच एक. यंदा त्यांचे 566 पैकी 551 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातही 90 टक्‍क्‍यांच्यावर चार विद्यार्थी आहेत. या शाळेचे मुख्याध्यापक प्रेमनाथ प्रभुवालावलकर बारावीच्या यशाचा हा पॅटर्न उलगडताना सांगतात ः ""आमच्याकडं हुशार, सर्वसाधारण बुद्धिमत्तेचे असे सर्वच प्रकारचे विद्यार्थी येतात. यातले बहुसंख्य गरीब शेतकरी, कामगार कुटुंबातले असतात. या विद्यार्थ्यांना कसं "हॅंडल' करायचं हे इतक्‍या वर्षांच्या अनुभवानं आमच्या शिक्षकांना पक्कं माहीत असतं. सगळ्यात आधी आम्ही विद्यार्थ्यांचा "केस टू केस' अभ्यास करतो. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव करून देतो. यामुळे त्यांच्यात जबाबदारीचं भान निर्माण होतं. काही विद्यार्थी अंतर्मुख, अबोल असतात. त्यांना बोलतं केलं जातं. काही लाडावलेले असतात. त्यांनाही विश्‍वासात घेतलं जातं. एकदा विद्यार्थ्यांची मानसिकता तयार झाली की सगळ्या गोष्टी सोप्या होत जातात.
हुशार विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण मिळवण्याइतकीच मेहनत काठावरच्या विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करण्यासाठी आम्ही घेतो. पूर्वपरीक्षेचा निकाल अधिक "स्ट्रिक्‍ट' लावला जातो. त्यात राहिलेल्या त्रुटींवर आम्ही विशेष काम करतो. वाणिज्य शाखा ही आमची खासियत बनली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची नस ओळखली की त्याला घडवणं सोपं होत जातं.''

मंडळ आणि शाळा यांच्यात चोख समन्वय
कोकण विभागीय परीक्षा मंडळाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावलेले सेवानिवृत्त सचिव आर. बी. गिरी यांनीही आपली निरीक्षणं नोंदवली. ते म्हणाले ः ""कोकणातल्या शिक्षणक्षेत्रात प्रामाणिकपणा आणि शिस्त आहे. इथं मुलं नियमित असतात. या ठिकाणी खासगी शिकवणीची सोय नाही. त्यामुळे विद्यार्थी पूर्णतः शाळेवर अवलंबून असतात. शाळाही खूप मेहनत घेतात. उन्हाळी सुटीपासून शाळेतच जादा वर्ग घेतले जातात. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात अभ्यासाचं वातावरण असतं. इथं उपजत बुद्धिमत्ता आहे. त्याचाही फायदा होतो. कोकण विभागीय मंडळाची स्थापना झाली तेव्हा सुरवातीला अपुरा कर्मचारी वर्ग, जागेचा अभाव अशा अनेक अडचणी होत्या; पण बोर्ड आणि मुख्याध्यापक, पर्यायानं शाळा, यांच्यातला समन्वय प्रभावी होता. साहजिकच परीक्षाप्रक्रिया शिस्तबद्ध वातावरणात, प्रामाणिकपणे पार पाडण्याचा पायंडा निर्माण झाला. यातून विश्‍वासार्हता तयार झाली. या सगळ्या घटकांचा दहावी-बारावीच्या निकालावर नक्‍कीच सुपरिणाम होतो.''

यंदाचा निकाल आणि पुढील वर्षाच्या तयारीबाबत माहिती देताना कोकण विभागीय परीक्षा मंडळाचे प्रभारी सचिव डी. बी. कुल्हाळ म्हणाले ः ""यावर्षी बारावीच्या प्रश्‍नपत्रिकांचं स्वरूप बदललं होतं. ते मुलांना समजून सांगण्यासाठी आम्ही शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या. याचा चांगला परिणाम दिसला. आम्ही प्रत्येक निकालातल्या त्रुटी शोधतो. पुढच्या वेळी आणखी सुधारण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न असतील. काही शाळांचा निकाल कमी आहे. त्यांना विशेष मार्गदर्शन केलं जाईल. वेळच्या वेळी भेटी देऊन पुढच्या वेळी त्यांच्या निकालात सुधारणांसाठी प्रयत्न केले जातील.''

बारावीनंतरचा प्रवास काहीसा दिशाहीन
यशाचा हा पॅटर्न सोनेरी असला तरी याला आणखी एक बाजू आहे. बारावीनंतरच्या शिक्षणाची स्थिती बऱ्याच अंशी दिशाहीन असल्याचं दिसतं. मार्गदर्शनाचा अभाव, शिक्षणाविषयीचा पारंपरिक दृष्टिकोन, आर्थिक क्षमता, मुलींबाबत असुरक्षिततेची भावना हे यामागचं प्रमुख कारण आहे. यासंदर्भात मध्यंतरी काही सामाजिक संस्थांनी जिल्ह्यात पाहणी केली होती. तीतून धक्‍कादायक गोष्टी समोर आल्या. संस्थांच्या निरीक्षणानुसार, जिल्ह्यात बारावीपर्यंतचा प्रवास चांगला होतो; पण तिथून बाहेर पडल्यावर जगात चाललेल्या स्पर्धेची विद्यार्थ्यांना माहितीच नसते. यामुळे ते भांबावून जातात. इंजिनिअरिंग, डॉक्‍टर या पारंपरिक क्षेत्राकडं जाण्याचा हुशार विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. मध्यम गुणवत्तेचे विद्यार्थी मात्र जवळच्या जवळ सहज मिळणाऱ्या "प्लेन' पदवीकडं वळतात. याचा करिअरच्या दृष्टीनं फारसा उपयोग होत नाही.
गरजांनुसार विशेष शिक्षणाची सोय हवी
कोकणच्या पॅटर्नमध्ये मुलींची टक्‍केवारीबाबत नेहमीच आघाडी राहिली आहे. मात्र, पुढच्या शिक्षणाची स्थिती बिकट आहे. कोकणात गरिबीचं प्रमाण जास्त आहे. घरात मुलगा आणि मुलगी असेल तर क्षमता असूनही मुलीच्या शिक्षणाला दुय्यम स्थान दिलं जातं. असुरक्षिततेची भावना हाही यातला महत्त्वाचा घटक असतो. एकट्या मुलीला दूर कसं पाठवायचं या भीतीपोटी तिला घराजवळच्या महाविद्यालयात बीए, बीकॉमच्या शिक्षणाला पाठवलं जातं. झटपट शिक्षण पूर्ण होणाऱ्या शिक्षणालाही प्राधान्य दिलं जातं. यात पूर्वी डीएड, बीएड अभ्यासक्रमाला मुलींना पाठवणाऱ्यांची संख्या जास्त असायची. अलीकडं नर्सिंगकडं कल वाढला आहे; पण त्या मुलींची क्षमता, आवड या बाबींचा विचार होताना दिसत नाही. सधन कुटुंबात आणखी एक ट्रेंड दिसतो. मुलीला इंजिनिअरिंग वा इतर अभ्यासक्रमाला पाठवले जाते; पण ही शैक्षणिक पात्रता केवळ लग्नाच्या बाजारात वापरली जाते. लग्न होऊन गेल्यावर त्या बिचारीचं ज्ञान, क्षमता, करिअरविषयीची स्वप्नं संसार सांभाळता सांभाळता नष्ट होऊन जातात.

बारावीनंतरच्या करिअरसाठी कोकणात अजून खूप काम करण्याची गरज आहे. कोकणवासियांची शिक्षणाविषयीची पारंपरीक झापडं दूर करण्यासाठी चळवळही उभारायला हवी. इथल्या गरजा लक्षात घेऊन विशेष शिक्षणाची व्यवस्था करायला हवी. स्पर्धा किती पुढं गेली आहे याची कल्पना देऊन मुलांबरोबरच पालकांना त्या प्रवाहात सहभागी करून घेण्याची गरज आहे. तरच कोकणच्या हा पॅटर्न खऱ्या अर्थानं यशस्वी होणार आहे.

"बारावीपर्यंतचा निकाल उत्तम लागतो; पण नंतर केवळ चांगल्या मार्गदर्शनाअभावी आमचे विद्यार्थी मागं पडतात. स्पर्धा परीक्षांमध्ये मोजकेच विद्यार्थी पुढं जातात; पण क्षमता असूनही अनेक जण मागं पडतात. इथं स्पर्धा परीक्षा, करीअरच्या आधुनिक वाटा यांचं प्रबोधन करणाऱ्या चळवळीची गरज आहे. क्षमता असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना आर्थिक मदत करणाऱ्या संस्थांची आवश्‍यकता आहे.''
- प्रेमनाथ प्रभुवालावलकर, मुख्याध्यापक, कुडाळ हायस्कूल

"स्पर्धा कुठपर्यंत पोचली आहे याची कल्पना विद्यार्थ्यांना आणि पालकांना नाही. आता दिल्या जाणाऱ्या शिक्षणाकडं "केवळ पदवी' म्हणून पाहिलं जातं. त्याचा करिअरच्या दृष्टीनं काय उपयोग आहे, हे लक्षात घेतलं जात नाही. कुठंही स्वयंरोजगार मिळू शकेल अशा शिक्षणाची सोय निर्माण व्हायला हवी. स्थानिक स्रोत लक्षात घेऊन त्यावर आधारित रोजगार निर्माण करणारं शिक्षण उपलब्ध असणं गरजेचं आहे. विशेषतः मुलींच्या बौद्धिक क्षमतांचा पूर्ण वापर होईल, असं शिक्षण त्यांना मिळण्याच्या दृष्टीनं काम व्हायला हवं.''
- योगेश प्रभू, व्यवस्थापक, लुपिन वेलफेअर फाउंडेशन, सिंधुदुर्ग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com