
नापास होणे हा तात्कालिक अपघात असतो. कोवळ्या वयात लागलेली ती ठेच असते. या गोष्टीवरून घरात आकाशपाताळ एक करण्याची गरज नसते.
ठेच लागली; आता झेप घ्या!
- अरुण शेवते
नापास होणे हा तात्कालिक अपघात असतो. कोवळ्या वयात लागलेली ती ठेच असते. या गोष्टीवरून घरात आकाशपाताळ एक करण्याची गरज नसते. नापास झालो, अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले नाहीत, कमी मार्क मिळाले तरीही निराश न होता आयुष्याची दिशा ठरवता आली पाहिजे. ‘नापास’ होण्याची ठेच लागल्यानंतर आपल्याला झेप घेता येते, हे जगभरात यशोशिखरावर पोहचलेल्या व्यक्तींनी सिद्ध करून दाखवले आहे.
दहावी-बारावी परीक्षेचा निकाल ऐकला की मन खूप अस्वस्थ होते. पास झालेल्या मुलांसाठी एका डोळ्यात आनंद, तर दुसऱ्या डोळ्यात नापास झालेल्या मुलांसाठी दुःखाचे अश्रू असतात. कमी मार्क मिळालेल्या मुलांसाठी मन अस्वस्थ असते.
नापास झालेल्या मुलांच्या घरात उदासीन वातावरण असते. जास्त गुण मिळालेल्या आणि कमी गुण मिळालेल्या मुलांच्या घरात आता याला ॲडमिशन मिळेल की नाही, याची चिंता असते. तिन्ही मुलांच्या घरात वेगवेगळे वातावरण.
त्या मुलांचा विचार करत असताना विचारांचे अनेक तरंग माझ्या मनात उमटत असतात. दरवर्षी निकाल ऐकल्यानंतर माझ्या मनाची हीच अवस्था असते. आता मुलांचा विचार करताना अनेक गोष्टी नजरेसमोर येतात.
मुलगा परीक्षेत नापास झाला, तर घरात दुःखाची छाया गडद असते. आई-वडील, शेजारपाजारचे टोमणे ऐकवत असतात. अशा वेळी मुलांना टोमणे मारणे हे अत्यंत चुकीचे असते. त्यांना मायेने समजून घेण्याची गरज असते.
मुलगा कुठल्या विषयात नापास झाला, का नापास झाला, याचा विचार करून धीर देणे गरजेचे असते. नापास झाला म्हणजे आयुष्य थांबले, असे होत नाही. नापास होणे हा तात्कालिक अपघात असतो. कोवळ्या वयात लागलेली ती ठेच असते.
या गोष्टीवरून घरात आकाशपाताळ एक करण्याची गरज नसते. मुलाला प्रेमाने सांगायचे असते, नापास झालास, आता निराश होऊ नको. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, काळजी करू नको. आपण शिक्षकांशी बोलून चर्चा करू. तू पुढच्या वेळेस नक्की पास होशील, असा आधार द्यायचा असतो. घरात आनंदाचे वातावरण ठेवून मुलाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढायचे असते.
नापास झालेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना धीर देण्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी ‘नापास मुलांची गोष्ट’ हे पुस्तक मी संपादित केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी लंडनला लॅटिनच्या परीक्षेत नापास झाले; पण नापास झाल्यावर, वेळेची बचत करून अभ्यासाला जास्त वेळ दिला आणि ते लॅटिनच्या परीक्षेत पास झाले.
प्रसिद्ध दिग्दर्शक कवी गुलजार हेही परीक्षेत नापास झाले. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण लॉच्या परीक्षेत नापास झाले. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी नापास झाले होते. गणितज्ञ रामानुजन, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, आर. के. लक्ष्मण,
देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शास्त्रज्ञ आईन्स्टाईन, किशोरी आमोणकर, जयंत साळगावकर, डॉ. श्रीराम लागू इत्यादी अनेक मोठी माणसे शालेय जीवनात हायस्कूल-कॉलेजमध्ये नापास झाली; पण नापास झाले म्हणून त्यांचे आयुष्य थांबले नाही. सार्वजनिक जीवनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवला.
आपल्यापुढे आदर्श ठेवला. नापास झाले म्हणून निराश होऊ नका, तर जिद्दीने अभ्यास करा. यश आपलेच आहे. नापास झाले म्हणून बुद्ध्यांक कमी नसतो. प्रत्येक मुलगा हा हुशारच असतो; पण दुर्लक्ष झाल्यामुळे किंवा वेळीच त्या त्या गोष्टी न कळल्यामुळे अपयश येते. अपयश हे क्षणिक असते. यश जीवनाच्या पायऱ्या चढायला शिकवते.
मी एका घरात पास झालेल्या मुलाचे अभिनंदन करायला गेलो, तर घरात दुःखाचे वातावरण होते. मला खूप नवल वाटले. मी मुलाच्या आई-वडिलांना म्हणालो, मुलगा चांगल्या मार्काने पास झाला तरी तुम्ही नाराज का? त्यावर पालकांचे उत्तर मोठे अजब होते.
अहो मुलाला ९० टक्के मार्क्स पडले, त्याला ९५ टक्के पाहिजे होते. मला हसावे की रडावे काहीच कळले नाही. मी त्यांना म्हणालो, मुलाला ९० टक्के चांगले मार्क पडले. उलट तुम्ही त्याचे अभिनंदन करून यश साजरे करायला हवे.
तुमचा मुलगा काही रेसचा घोडा आहे का? तो पहिलाच आला पाहिजे. मुलाला ९० टक्के मार्क मिळाल्यानंतर तुमचा एबी प्लॅन तयार पाहिजे. पुढे काय करता येईल, याचा विचार केला पाहिजे. ते सोडून तुम्ही मुलावर नाराज आहात. मुलावर तुम्ही अन्याय करत आहात, असे तुम्हाला वाटत नाही का? तेव्हा कुठे त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांनी घरातल्या नोकराला किलोभर पेढे आणायला सांगितले.
एक गोष्ट मुलांच्या बाबतीत लक्षात घेतली पाहिजे ती अशी की, आपल्या मुलांकडून मायेने अपेक्षा असतात; पण अपेक्षाभंग झाला म्हणून त्या यशावर मुलाच्या प्रयत्नावर विरजण टाकणे बरोबर नाही. सध्या स्पर्धेचे युग आहे हे मान्य करूनही आपण मुलाच्या भवितव्याचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. आज प्रत्येक शाखेत वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत.
अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले, तर दुसऱ्या अभ्यासक्रमाचा विचार करून त्यात यश कसे मिळवता येईल, याचा विचार केला पाहिजे. आशावादी राहिले पाहिजे. निराशा मनात ठेवली, तर काहीच हातात लागत नाही. आशावादी राहिले, तर दाही दिशा आपल्याच आहेत. पहिल्यासारखे आता राहिले नाही. अभ्यासक्रमात अनेक बदल झाले आहेत. प्रत्येक शाखेचे नवीन अभ्यासक्रम आहेत. त्यात आपण कुठे बसतो, याचा विचार करून पुढे जायला पाहिजे.
आता तिसऱ्या घरातल्या मुलांचा विचार करणे अधिक गरजेचे आहे. ज्या मुलांना ४०-५०-६० टक्के किंवा त्या अंतर्गत कमी मार्क पडले असतील. त्यांच्या पालकांनी मिळेल त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन पुढच्या वर्षी कसे चांगले मार्क पडतील, यासाठी मुलाला मार्गदर्शन करून मिळालेल्या कमी मार्कांचे मळभ त्याच्या मनातून दूर केले पाहिजे.
मार्क चांगले मिळणे केव्हाही चांगले; पण कमी मार्क मिळाले म्हणून नाराज न होता पुढच्या आयुष्याची दिशा ठरवता आली पाहिजे. प्रख्यात नाटककार शेक्सपियरने म्हटले आहे, ‘तारुण्याच्या गुर्मीत तुम्ही वेळेची उधळमाथळ करता, नंतर तोच काळ तुम्हाला कुरतडून टाकतो.’
तेव्हा विद्यार्थी दशेत, तरुणपणात वेळेचे महत्त्व जाणले पाहिजे. आपले व्यक्तिमत्त्व अभ्यासापुरते मर्यादित न राहता ते सर्वांगीण कसे विकसित होईल, याचा विचार केला पाहिजे. परीक्षेतल्या यशाबरोबर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे.
वाचन, संगीत, क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या आवडीनुसार सहभाग घेतला पाहिजे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात भाग घ्यायची संधी मिळाली, तर जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजेत.
कारण ते प्रश्न तुमचा सर्वांगीण विकास झाला की नाही, याची चाचणी परीक्षा असते. आणि तरीही आणि जरीही कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात भाग घ्यायची संधी मिळाली नाही, तरीही आयुष्याच्या चढ-उताराच्या, ऊन-पावसाच्या खेळात आपल्याला ठामपणे उभे राहता आले पाहिजे. वाईट प्रसंग येतील, तेव्हा त्याला तोंड देता आले पाहिजे.
आपण नापास झालो, अपेक्षेप्रमाणे चांगले मार्क मिळाले नाहीत, कमी मार्क मिळाले, तरीही निराश न होता आयुष्याची दिशा ठरवता आली पाहिजे. परीक्षेतले मार्क हेच एकमेव गुणवत्तेचे मोजमाप ठरत नाही, त्याही पलीकडे आपले आयुष्य असते. ते आनंदाने जगता आले पाहिजे. आपल्यापुढे असणाऱ्या स्पर्धेला यशस्वीपणे तोंड दिले तर अधिक चांगले.
(लेखक प्रसिद्ध लेखक-संपादक असून, त्यांनी संपादित केलेली ‘नापास मुलांची गोष्ट’ आणि ‘नापास मुलांचे प्रगतीपुस्तक’ ही महत्त्वाची पुस्तके प्रसिद्ध आहेत.)