कर्मकहाणी नीता नाईकची... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Standing Committee of Mumbai Municipal Corporation neeta naik politics

मुंबईतले गुन्हेगारी विश्व आणि शहरातले राजकारण या दोन्ही क्षेत्रांवर आपला स्वतःचा असा खोल ठसा उमटवणाऱ्या स्त्रियांमध्ये अश्विन नाईकची पत्नी नीता नाईक हिचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

कर्मकहाणी नीता नाईकची...

- वेल्ली थेवर

नेमक्या कोणत्या घटनाक्रमामुळे या दोघींना अशा रीतीने महापालिका निवडणूक लढवावीशी वाटली ? ७ मे, १९९४ रोजी नीताचा दीर अमर नाईकने खटाव स्पिनिंग अँड वीव्हिंग मिलचा मालक असलेल्या सुनीत खटावची हत्या केली होती.

दक्षिण मध्य मुंबईतील कापड गिरण्यांची जमीन कोट्यावधी रुपये किंमतीची झाली होती. ही जमीनच गुंड, राजकारणी आणि गिरणीमालक यांच्यातील संघर्षाचे मोठे कारण ठरणार ही बाब नव्वदच्या दशकाच्या आरंभीच स्पष्ट झाली होती.

मुंबईतले गुन्हेगारी विश्व आणि शहरातले राजकारण या दोन्ही क्षेत्रांवर आपला स्वतःचा असा खोल ठसा उमटवणाऱ्या स्त्रियांमध्ये अश्विन नाईकची पत्नी नीता नाईक हिचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

ती या क्षेत्रांच्या नभांगणातील सर्वाधिक तेजस्वी तारका होती. यात शहरांतल्या राजकारणाचा उल्लेख मी आवर्जून केला कारण मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या सभांमध्ये पूर्वी कधीही नसलेली रंगत नीतानेच आणली.

तिच्यामुळेच या सभांत चैतन्य आले. शिवसेनेची नगरसेवक झालेली नीता नाईक अत्यंत जहाल, स्पष्टवक्ती आणि शब्दांचा अचूक वापर करण्यात वाकबगार होती. भरीला आपले हे धारदार व्यक्तिमत्त्व ती मोठ्या अभिमानाने नखशिखांत मिरवत असे.

मुंबईतल्या तिसऱ्या क्रमांकाच्या टोळीचे वास्तव्य असलेल्या, चिंचपोकळीमधील १४४ क्रमांकाच्या चाळीपाशी, एन.एम. जोशी मार्गावरील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये नीता रहात असे.

पाशवी गोळीबार करून त्याच अपार्टमेन्टच्या कॉरिडॉरमध्ये तिची हत्या केली गेली त्याला आता वीस वर्षाहून अधिक काळ लोटला आहे यावर माझा विश्वासच बसत नाही. मी तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा माफिया डॉन अमर नाईकची बायको अंजली या तिच्या वहिनीबरोबर ती खालच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रहात होती.

त्या दोघी मिळून महानगरपालिकेची निवडणूक लढवायचे बेत करत होत्या. रोजरोज मध्यरात्री दार ठोठावत येणाऱ्या पोलिसांचा ससेमिरा त्यांना चुकवायचा होता. अंजली काहीशी बुजरी आणि संकोची स्वभावाची होती. तर नीता एकदम विरुद्ध टोकाची. तिच्याकडे उत्कृष्ट संभाषणकौशल्य होतं. तिचं एकंदर व्यक्तिमत्त्व तिच्या वाणीला शोभेल असंच तेजस्वी होतं.

गिरण्या बंद करून बहुमजली इमारती बांधण्यासाठी त्या विकासकांना विकावयाची गिरणीमालकांची इच्छा होती. यात गुंतलेली रक्कम डोळे विस्फारायला लावणारी होती. सगळी कोटीच्या कोटी उड्डाणे! आणि वरील सर्वच संबंधितांना यात आपापला हिस्सा हवा होता. यात केवळ गिरणी कामगारांनाच तेव्हढे वाऱ्यावर सोडले गेले.

सुनीत खटाव बरोबर होणाऱ्या खटाव मिलच्या जमीनव्यवहारात आपला शिरकाव करून घेण्यात अरुण गवळीला यश मिळाल्यामुळे अमर नाईक चिडला होता. यातील आपला वाटा बुडाल्याची त्याची भावना झाली. हे घबाड सापडल्यामुळे आता अरुण गवळीची टोळी अधिक मजबूत होणार हेही तो जाणून होता. अरुण गवळीची ही आर्थिक नाडी कापण्यासाठीच अमर नाईकने सुनीत खटाववर मारेकरी धाडले.

सुनीत खटावच्या हत्येमुळे पोलीस अमर नाईकच्या दाराशी पोहोचले. अमर नाईकचा भाऊ अश्विन याच्याशी लग्न झालेले असल्याने नीता चिंचपोकळी रेल्वे स्टेशनजवळच्या १४४ क्रमांकाच्या चाळीतच रहात असे. गुंड गुन्हेगारांशी लग्नगाठ बांधलेल्या या दोन्ही स्त्रियांना नीट श्वास घ्यायचा होता. मोकळं जीवन जगायचं होतं.

त्यांना वाटलं की एकदा आपण राजकारणात पुढे आलो की पोलिसांचा आपल्यामागचा जाच संपेल. कदाचित खरं कारण वेगळंच असावं असा मला दाट संशय आहे. अमर नाईकला एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकाऱ्यांपासून वाचवण्यासाठीच त्या राजकारणात शिरल्या असाव्यात.

मूळ गुजराती असलेली उंचीपुरी नीता त्यावेळी चोवीस वर्षाची होती. या दोघींत तीच अतिशय प्रभावीपणे बोलू शकत असे. तिचे टपोरे, मोहक डोळे विलक्षण बोलके होते. मोहकता ठासून भरलेली होती तिच्यात. तिचं व्यक्तिमत्त्व जबरदस्त होतं. साडी ती अगदी चापून चोपून नेटकेपणाने नेसत असे. एखादी मूर्तीच जणू.

तिचं चालणं , बोलणं - सारं वागणंच अतिशय डौलदार होतं. एका गुंडाशी आपलं लग्न झालंय अशी खंत तिच्या बोलण्यात नसे. आपला नवरा खरं तर इंजिनिअर होता. या गुन्हेगारी विश्वात शिरण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती. पण इतर गुंडांकडून हल्ल्यामागून हल्ले होऊ लागल्यानं अत्यंत अनिच्छेने त्याला आपला निर्णय फिरवावा लागला असे तिने आम्हाला सांगितले.

कॉलेजमध्ये शिकत असतानाच तिची अश्विनशी गाठ पडली होती आणि ते दोघे प्रेमात पडले होते. आम्ही प्रथम भेटलो तेव्हा तिची मुलगी अवघ्या दोन वर्षांची होती आणि मुलाला नुकतंच वर्ष पूर्ण झालं होतं. मी तिला म्हणाले की मनात आणलं तर ती हे गुन्हेगारी विश्व सोडू शकेल.

ती उत्तरली, “तुला काय वाटतं, आज ना उद्या आपल्यावर हल्ला होणारच या अव्याहत भीतीने ग्रासलेलं हे असलं असुरक्षित जगणं मला आवडत असेल ? पण तुला सांगते, एकदा तुम्ही या धंद्यात आलात की तुमची सुटका नसते.

परतीची दारे बंद असतात. एक दिवस मस्त उठून आता हे बस्स झालं म्हणत सगळा भूतकाळ पुसून टाकून नवं आयुष्य सुरू करण्याचा पर्याय तुमच्याकडे शिल्लकच नसतो. तुमची प्रतिस्पर्धी टोळी तुम्हाला तसे कधीच करू देत नाही. काहीतरी सामाजिक काम सुरू करून त्यात मन रमवत आपली उमेद टिकवायला मला अश्विननंच सांगितलंय."

याचवेळी तिनं आणखी एक प्रसंग आम्हाला सांगितला. व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या तिच्या नवऱ्याबरोबर चेन्नईची सहल करून ते सारे परतत होते. परतीच्या प्रवासात विरुद्ध टोळीने त्यांच्यावर हल्ला केला.

ती म्हणाली, "वाचलो आम्ही कसेबसे पण आमच्या टोळीतील दोन तरुण मुले मात्र मारली गेली." आपल्या घराजवळच कचरा टाकला जायचा ती जागा साफ करून तिथे एक देऊळ उभे करण्यात आपण कसा पुढाकार घेतला हेही तिने बोलता बोलता मला सांगितले.

अश्विन त्यावेळी आर्थर रोड जेल मध्ये होता. ती म्हणाली, ‘‘आता मी जरा निश्चिन्त आहे. तुरुंगात तो सुरक्षित असल्याने त्याच्या जिवाच्या काळजीतून तरी माझी सुटका झालीय.’’ महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने या दोन्ही स्त्रियांना तिकीट दिले.

नीता निवडून आली. अमर नाईकची बायको अंजली मात्र हरली. निवडणुकीतील या विजयानंतर नीताच्या आयुष्यात अनेकविध घटना घडल्या. त्यांनी तिचं जीवनच बदलून टाकलं. अगदी पहिल्या दिवसापासूनच तिला आपल्या राजकीय जीवनात देदीप्यमान यश लाभत गेलं. पण तिच्या वैवाहिक जीवनाची गाडी मात्र रुळावरून घसरली.

अश्विन नाईकला न्यायालयात हजर केले जात असताना अरुण गवळीच्या नेमबाजांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. जीव तर वाचला पण अश्विन अधू बनला. पुढे जामिनावर सुटका झाल्यावर जीव वाचवण्यासाठी त्याला परदेशात पळून जावं लागलं. माफिया गुंडांनी नीताच्या वडिलांचीही हत्या केली. तिचा दीर अमर नाईक याला एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस इन्स्पेक्टर विजय साळस्करने ठार केले.

अश्विन बरोबरच्या ताटातुटीमुळे नीताचे वैवाहिक जीवन विस्कळीत झाले. मुंबई पोलिसातील एकजण तिचा शरीररक्षक म्हणून काम करत असे. नीता त्याच्या प्रेमात पडली. तिचं वैवाहिक जीवन असं कोलमडून पडण्यापूर्वी नीता अगदी सुखात होती. ड्रायव्हिंग करण्यात, माणसांच्या भेटीगाठी घेण्यात तिला रस होता.

ती नगरसेविका म्हणून निवडून आल्यावर मी तिला अनेकदा भेटले होते. तिचा आत्मविश्वास आणखीनच वाढलेला दिसत होता. ती अधिकच उत्साही आणि कामाच्या ओढीने प्रेरित झालेली होती. जगली वाचली असती तर राजकारणात तिने अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त केले असते याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

तिची हत्या झाली त्याच्या थोडेच दिवस आधी अगदी खिन्नपणे आपल्या कुत्र्याकडे बोट दाखवून ती मला म्हणाली होती, ‘‘या कुत्र्यासारखंच आयुष्य आहे बघ माझं. अगदी एकाकी.’’ आपण आता कार चालवत नाही असं तिनं मला सांगितलं. म्हणाली, ‘‘खूप कामे असतात, ताण असतो ग मनावर.’’ फार निर्घृणपणे मारलं गेलं तिला.

समोरून येणाऱ्या मारेकऱ्यांकडे सरळ पहात असतानाच तिच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. तिच्या नवऱ्यावर - अश्विनवरच खुनाचा आरोप ठेवण्यात आला. पण न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली. ती म्हणत होती तसंच मरण आलं तिच्या वाट्याला. राजकारणात शिरत असतानाच ती मला म्हणाली होती,

‘‘ आज ना उद्या हल्ला हा होणारच! ’’