'ट्रोल'धाडीची गोष्ट

शैलेश पांडे
शनिवार, 28 जानेवारी 2017

विरोधी मत व्यक्त करणाऱ्यांना शिवीगाळ करण्यात, धमक्‍या देण्यात कोणताही पुरुषार्थ नाही. त्यातून ऑनलाइन किंवा ऑफलाइन काहीही चांगले घडण्याची शक्‍यता नाही. स्वाती चतुर्वेदीचे पुस्तक हे या चर्चेचे निमित्त असले तरी सुशिक्षितांच्या सामूहिक विवेकापुढे त्यातून भले मोठे प्रश्‍नचिन्ह उभे करण्यात आले आहे, हे नक्की!

व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्‌विटर, लिंक्‍ड इन, इन्स्टाग्राम इ. इ. ...आपले प्रत्यक्षातले जगणे आणि हे व्हर्च्युअल वर्ल्ड. सोशल मीडिया. येथे बऱ्याच अंशी लोकशाही आहे. काही अंतर्गत अटी-शर्ती पाळायच्या असतात. बाकी सारे मोकळे रान. कुणी आक्षेप घेऊन रिपोर्ट केले, तर संबंधित युजर ब्लॉक केला जातो. बाकी सारा मामला खुल्लेआम!.. या जगाशी आपली ओळख पुरेशी नाही. त्याचे व्यसन मात्र अनेकांना आहे. सोशल मीडिया आपल्याला "एंपॉवर' करतो; पण त्याचे व्यसन आपल्या व्यक्तिमत्त्वाचे "बॅकसीट ड्रायव्हिंग' करीत असते. हे ड्रायव्हिंग आपल्या लक्षातही येत नाही. सोशल मीडियावर जे दिसते ते सारे खरे; असे मानून ते कॉपी-पेस्ट करणारा किंवा फॉर्वर्ड करणारा एक मोठा वर्ग समाजात आहे. मध्यंतरीच्या काळात ट्‌विटरवर "ट्रोलिंग' नावाचा प्रकार बराच गाजला. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई यांच्यासारख्या ख्यातनाम पत्रकारांसह काही सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, लेखक मंडळी यांना ऑनलाइन गप्प करण्यासाठी "ट्रोलिंग'ची फौजच्या फौज तुटून पडायची. तुटून पडणारे सारेच तरुण होते, असे नव्हे. काही वयस्क लोकसुद्धा विशिष्ट व्यक्ती-पक्षाबद्दल प्रश्‍न उपस्थित केल्याबरोबर "ट्रोलेबाजी' सुरू करायचे. फेसबुक आणि ट्‌विटरवर हे सातत्याने व्हायचे. आताशा त्यात जराशी सुस्ती आलेली दिसते. मात्र, "ट्रोलिंग' पूर्णतः बंद झालेले नाही. कदाचित सोशल मीडियाच्या फायद्यासोबत आलेला हा तोटा असावा... असो, या विषयावर लिहिलेले पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांचे "आय ऍम अ ट्रोल' हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. या पुस्तकावरून स्वातीला भाजपविरोधक सहज ठरविता येऊ शकते. परंतु, तेवढ्याने तिने मांडलेला मुद्दा संपत नाही. पुस्तक छोटेसे आहे. त्यातील अनुभवांचा कॅनव्हॉसही मर्यादित आहे. परंतु, स्वातीने त्यातून मांडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. "डेमोक्रसी इज इन्कम्प्लिट विदाउट डिसेंट' अर्थात मतभेदाशिवाय लोकशाही अपूर्ण आहे, असे म्हणतात. भ्रष्टाचार, भाईभतिजावाद, गैरव्यवहार, गटबाजी, सत्तेचा माज इत्यादी कारणांमुळे काँग्रेसची राजवट लोकांना नकोशीच झाली होती, हे खरे. त्यामुळेच सत्तापरिवर्तन झाले, हेही खरे.

परंतु, गेली सत्तरेक वर्षे लोकशाहीची मूलभूत तत्त्वे समाजात चांगल्या पद्धतीने रुजत होती, हेही वास्तव आहे. काँग्रेसवरही प्रचंड टीका होत असे. ती व्हायलाच हवी होती. अशा परिस्थितीत अचानकपणे सोशल मीडियावर मुक्तपणे आपले मत व्यक्त करणाऱ्यांवर तुटून पडण्याची पद्धत कशी काय सुरू झाली, याचे चिंतन होणे आवश्‍यक आहे. सोशल मीडिया हातात सापडल्यामुळे असे घडले की, हे सारे ठरवून केले गेले, याचा धांडोळा स्वातीच्या पुस्तकात घेण्यात आला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर ऑनलाइन लढाईसाठी भाजपने सोशल मीडियावरील योद्‌ध्यांची फौजच तयार केली असल्याचा तिचा दावा आहे. त्यासंबंधीचे इन्व्हेस्टिगेशन तिने केले. काही लोकांच्या मुलाखती घेतल्या. असे लोक काँग्रेसमध्ये आणि "आप'मध्येही आहेत. भाजपने ते ठरवून व मोठ्या प्रमाणात केले, असे तिचे म्हणणे. त्याची काही उदाहरणे स्वातीने नावासकट दिलेली आहेत. पुस्तकात ट्‌विटरवर वापरल्या गेलेल्या अश्‍लाघ्य भाषेचे स्नॅपशॉटही आहेत. महिला पत्रकारांना वेश्‍या म्हणणे, बलात्काराच्या धमक्‍या देणे, विरोधात बोलणाऱ्यांवर लगेच लायकीसह अर्वाच्य शिव्यांचा भडिमार करणे हे सारे अनेकांनी अनुभवलेले स्वातीने बऱ्यापैकी तपशिलाने मांडलेले आहे. विशेष म्हणजे या साऱ्याला सत्तारूढ पक्षाचा मूक आशीर्वाद तसेच काही प्रमाणात सक्रिय सहभाग असल्याचे सांगतानाच पंतप्रधानांसकट काही मंत्र्यांनी यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर तिने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. यस्स... स्वातीला भाजपविरोधक ठरवणे सहज शक्‍य आहे. पण, तिचे पुस्तक वाचून काय ते ठरवले, तर जास्त बरे... तुम्ही भाजपचे समर्थक असाल तरी आणि विरोधक असाल तरीही!.. अभ्यासांती, विचारांती बोलण्याची आपल्या समाजाला सवय नाही. सोशल मीडियावरील मुक्त वातावरण अनेकांना चेकाळणारे ठरते. सत्तारूढ पक्षाच्या संदर्भात जराशीही टीकाटिप्पणी केली की, काँग्रेसच्या काळात असे होत नव्हते काय, असा प्रश्‍न फेकला जातो. त्यावर विनोदही झाले. पण, हे सारे विनोदाच्या पल्याड आहे. सहिष्णुता-असहिष्णुता या वादात जाण्याचे कारण नाही. पण, विरोधी मताबद्दलचा आदर करण्याची लोकशाहीची मूलभूत गरज अनेकांनी ठरवून विस्मरणात टाकलेली दिसते. त्यातून त्यांचे भले होण्याची शक्‍यता नाही. समाजाचे तर नाहीच नाही. देश म्हणजे देशातील माणसे. ती जितकी समंजस, विचारी व उद्यमी असतील तितका देश मोठा होतो. सर्व प्रकारची मतभिन्नता पचवून भारतीय संस्कृती जगन्मान्य झाली आहे.

परंपरा आणि परिवर्तनाची योग्य सांगड घालण्यासाठी हा देश आदर्श होता. आता तो फक्त दोन टोकांत वाटला गेलेला दिसतो. जुने ते सारे चांगले, हे टोक आणि सारेच बदलून टाकले पाहिजे, हे दुसरे टोक. टोकाच्या भूमिकांनी प्रश्‍न सुटत नसतात. त्यात नसती गुंतागुंत निर्माण होते. सोशल मीडियावर ठोसेबाजी किंवा "ट्रोल' करणारे लोक सातत्याने टोकाच्या भूमिका मांडताना व असंख्य लोक त्यांना कळत-नकळत "फॉलो' करताना आढळतात. ऑनलाइन जगतातले हे भांडण ऑफलाइन म्हणजे प्रत्यक्षातल्या जगण्यात प्रश्‍न व वाद निर्माण करते. कधीकधी हिंसाही घडवून आणते, हे साऱ्यांनी पाहिले आहे. विरोधी मत व्यक्त करणाऱ्यांना शिवीगाळ करण्यात, धमक्‍या देण्यात कोणताही पुरुषार्थ नाही. त्यातून ऑनलाइन किंवा ऑफलाइन काहीही चांगले घडण्याची शक्‍यता नाही. स्वाती चतुर्वेदीचे पुस्तक हे या चर्चेचे निमित्त असले तरी सुशिक्षितांच्या सामूहिक विवेकापुढे त्यातून भले मोठे प्रश्‍नचिन्ह उभे करण्यात आले आहे, हे नक्की!

Web Title: Story of Trolling