धोरणात्मक व्यूहरचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Strategic Plan for business growth bank finance benefits of strategic plan

हल्ली कर्ज देताना बँकर्स सावधपणे विचारतात की, ‘तुम्ही ही अपेक्षित विक्री कशी मिळविणार?

धोरणात्मक व्यूहरचना

- डॉ. गिरीश जाखोटिया

महाभारतीय युद्ध हे पांडवांसाठी कठीण असणार होते. म्हणून ‘धुरंधर व्यूहरचनाकार’ असलेल्या कृष्णाने तो जिंकण्यासाठीचा ‘स्ट्रॅटेजिक प्लॅन’ आधीच बनवला होता. पांडवांचे सैन्यबळ कमी होते. भीष्म, द्रोणाचार्य व कर्ण असे अजेय धनुर्धारी कौरवांकडे होते.

यामुळे पांडवांच्या विजयाचे ''व्हिजन'' साकारण्यासाठी विशेष अशा स्ट्रॅटेजींची गरज होती. आपले उद्योजकीय व्हिजन साकारण्यासाठी जे मिशन करावयाचे आहे, ते कसे करायचे या प्रश्नाचे विस्तृत उत्तर किंवा ब्रॉड रोडमॅप म्हणजे ''स्ट्रॅटेजिक प्लॅन'' होय.

हा प्लॅन साधारणपणे पाच वर्षांसाठी बनवायचा असतो कारण महत्त्वाच्या आणि दूरगामी स्ट्रॅटेजींची अंमलबजावणी करण्यासाठी इतका कालावधी लागू शकतो. काही कंपन्या हा प्लॅन तीन वर्षांसाठी बनवतात.

अन्य काही कंपन्या हा प्लॅन ‘मूविंग'' ठेवतात, म्हणजे दरवर्षी प्लॅनमधील पहिले संपलेले वर्ष वगळून ते पुढचे वर्ष त्यात मिळवतात आणि आपल्या व्यूहरचनांची फेरजुळवणी करतात. माझ्या अनुभवानुसार हा पाच वर्षांचा प्लॅन बनवावा आणि दरवर्षी त्याच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करीत त्यात सुधारणा कराव्यात.

या प्लॅनमध्ये प्रत्येक स्ट्रॅटेजीसमोर तिच्या अंमलबजावणीचा विस्तृत तपशील हा सहा कॉलम्समधून द्यायला हवा, जसे की - अंमलबजावणी करणारी टीम व तिचा नेता, अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी व त्या दूर करण्याच्या क्लृप्त्या, अंमलबजावणीचे वेळापत्रक, स्ट्रॅटेजीमध्ये करावयाची सुरुवातीची गुंतवणूक आणि नेहमीचा खर्च,

स्ट्रॅटेजीचा मोजता येण्यासारखा किमान तीन वर्षांचा फायदा आणि स्ट्रॅटेजी अपयशी ठरू लागल्यास तीतून सहीसलामत बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे अपयशामुळे होणारे नुकसान कमीत कमी व्हावे आणि एक पर्यायी स्ट्रॅटेजी तयार असावी.

स्ट्रॅटेजिक प्लॅनचे बरेच फायदे आहेत- आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचे ते एक दिशादर्शन असते. हल्ली कर्ज देताना बँकर्स सावधपणे विचारतात की, ‘तुम्ही ही अपेक्षित विक्री कशी मिळविणार?’ या प्रश्नाचे उत्तर विक्रीविषयक योजलेल्या विविध स्ट्रॅटेजीजमधून देता येते. याच प्लॅनचे पाच वार्षिक भाग पाडून प्रत्येक वर्षाचा अर्थसंकल्प बनविता येतो.

वार्षिक कामगिरी करण्याला या प्लॅनमुळे व्यूहात्मक आधार मिळतो. ठरवलेली स्ट्रॅटेजी ही अंमलबजावणी करताना कुचकामी ठरू लागली तर आणखी पुढे होणारे नुकसान टाळत त्या अपयशी स्ट्रॅटेजीमधून सहीसलामत बाहेर पडण्याचा मार्ग आधीच अधोरेखित केलेला असतो.

या संपूर्ण प्लॅनमध्ये प्रत्येक फंक्शनल विभागाचा व बिझनेस युनिटचा प्लॅन समाविष्ट असल्याने त्या त्या फंक्शन व बिझनेसच्या कर्मचाऱ्यांना आपली दूरगामी वाटचाल नीटपणे कळलेली असते. यामुळे संपूर्ण कंपनीत उत्तम उद्योजकीय संस्कृती काम करू लागते.

संपूर्ण अंमलबजावणीचे वेळापत्रक या प्लॅनमध्ये विस्तारपूर्वक दिलेले असल्याने महत्त्वाची उद्योजकीय कार्ये समांतरपणे वेळेवर होऊ लागतात व साधनसामग्रीचे नियोजनही नीटपणे होते.

स्ट्रॅटेजिक प्लॅन बनविण्याचा महत्त्वाचा आधार असतो तो तीन वित्तीय मापदंडांचा - वार्षिक विक्री व तिच्या वाढीचा दर, गुंतवणुकीवरील परतावा आणि उद्योगाच्या व्हॅल्युएशन मधील वाढ. वार्षिक विक्रीतील वाढीचा दर काळजीपूर्वक ठरवताना सरासरी महागाईचा दर त्यातून वजा करावा किंवा नगांच्या विक्रीचा (व्हॉल्यूम) दर विचारात घ्यावा.

इथे वार्षिक वाढीचे दोन दर असू शकतात - एक महत्त्वाकांक्षी आणि अधिक वेगाने प्रगती घडविणारा म्हणजे ‘डिझायरेबल’ आणि दुसरा सहज शक्य असणारा परंतु सरासरी वेगाने प्रगती घडविणारा म्हणजे ‘अचिवेबल.’ या दोन्ही कामगिरींच्या स्ट्रॅटेजीज भिन्न भिन्न असतील.

प्रगतीच्या या दोन दरांमध्ये साधारणपणे २० टक्के फरक असावा. उदाहरणार्थ- विक्रीतील वाढीचा वार्षिक अचिवेबल दर हा पंचवीस टक्के असेल तर डिझायरेबल दर हा तीस टक्के असेल. (पंचवीसच्या वीस टक्के म्हणजे पाच टक्के त्यात मिळविले.) वार्षिक विक्रीच्या दरानुसार उद्योगाचे सर्व खर्च, नवीन गुंतवणूक,

कर्मचारी कार्यक्षमता व भरती, नवे तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणाऱ्या नव्या भांडवलाची उभारणी इ. गोष्टी ठरविता येतात. असे सर्व अंदाज बांधून पाच वर्षांचे नफा - तोटा पत्रक, बॅलन्सशीट व कॅशफ्लो स्टेटमेंट सॉफ्टवेअर प्रोग्रॅममुळे सहज बनविता येतात. यातूनच वार्षिक परताव्याचा अपेक्षित दर व उद्योगाच्या मूल्यांकनातील अपेक्षित वाढीचा दर हा मोजता येतो.

प्रत्येक स्ट्रॅटेजीची अंमलबजावणी करण्याचा विस्तृत आलेख बनवायला हवा. या आलेखात अंमलबजावणीचे महत्त्वाचे टप्पे, प्रत्येक टप्प्याला लागणारी साधनसामग्री, संभाव्य अडचणींची सोडवणूक, विशेष तयारी आदी गोष्टींचा तपशील अभिप्रेत आहे. मोठ्या स्ट्रॅटेजीचा परिणाम हा उद्योगाच्या विविध घटकांवर एकाच वेळी होत असतो.

उदाहरणार्थ- विक्रीच्या वाढीसंबंधीची स्ट्रॅटेजी ही खेळत्या भांडवलावर, मनुष्यबळावर, उत्पादन क्षमतेच्या वापरावर, ढोबळ नफ्यावर, वितरकांना द्यावयाच्या कमिशनवर व उधारीवर, जाहिरातीच्या प्रकारावर व खर्चावर, उत्पादन वाढल्याने खरेदीवर व पुरवठादारांवर, वाढलेल्या ग्राहकांच्या संख्येमुळे त्यांना द्यावयाच्या सेवेवर बहुआयामी परिणाम करते.

अशा स्ट्रॅटेजीच्या ‘परिणामांची एकूण कक्षा’ ही नीटपणे मांडली पाहिजे; अन्यथा तपशिलातील छोट्याशा चुकीनेही मोठे नुकसान होऊ शकते. यास्तव तिचे प्रक्रियात्मक, वित्तीय, कायदेशीर, सामाजिक, संस्थात्मक इ. सर्व परिणाम तपासायला हवेत. हे परिणाम उद्योगाच्या ‘जीवन साखळी’तील टप्प्यावरही अवलंबून असतात. उदाहरणार्थ- ‘मार्केट लीडर’ बनण्याच्या टप्प्यावर

असणाऱ्या एखाद्या कंपनीची कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतची स्ट्रॅटेजी ही खूप संवेदनशील असू शकते. छोट्याशा चुकीने कंपनीची प्रतिमा मलिन होऊ शकते. मार्केट लीडरशिप टिकविण्यासाठी नवे प्रॉडक्ट्स बनविण्याच्या व नव्या बाजारपेठा शोधण्याच्या स्ट्रॅटेजीज आवश्यक असतात ज्यांचे विविध परिणाम हे एकमेकांस पूरक असले पाहिजेत.

स्ट्रॅटेजिक प्लॅन बनविण्यासाठी वरिष्ठ व्यवस्थापकांसोबत तरुण व्यवस्थापकांनाही सोबत घ्यायला हवे कारण ते उपयोगी अशा भन्नाट आयडिया सुचवू शकतात. पाच वर्षांच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनचे जे पाच वार्षिक भाग केलेले असतात त्यांचेच रूपांतरण वार्षिक अर्थसंकल्पात करता येते. असे करताना प्रत्येक दूरगामी स्ट्रॅटेजीची त्या वर्षातली करावयाची अंमलबजावणी व त्याच वर्षातला नियमितपणे करावयाचा उद्योग यांचा ताळमेळ नीटपणे घातला पाहिजे.

स्ट्रॅटेजिक प्लॅनच्या अंमलबजावणीचा तिमाही लेखाजोखा (क्वार्टर्ली रिव्हीव) हा उद्योगाच्या कार्यकारी मंडळाने संचालक मंडळासोबत घेतला पाहिजे. यातून धोक्याचे इशारे, कमतरता, यशापयशाची कारणे व वेळीच करावयाचे उपाय ठरविता येतात. वर्षातून एकदा ‘स्ट्रॅटेजिक ऑडिट’ हे स्वतंत्र समितीकडून करून घ्यायला हवे.

या समितीत काही बाहेरचे उद्योजकीय तज्ज्ञ, कंपनीचे निवृत्त हुशार व्यवस्थापक, अनुभवी भागधारक, स्वतंत्र संचालक इत्यादी असावेत, जे योग्य मूल्यमापन करू शकतील. स्ट्रॅटेजीच्या उद्देशानुसार तिच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, तिचा उद्योगावरचा परिणाम, वापरलेली साधनसामग्री इ. गोष्टींचे हे ऑडिट असते.

यातील निष्कर्षानुसार स्ट्रॅटेजीतील बदल व अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील सुधारणा, अयोग्य स्ट्रॅटेजीचा त्याग इ. गोष्टी अमलात आणता येतात. मित्रांनो, पुढील भागात आपण ‘व्यवस्थापकीय नियंत्रणा’बाबत चर्चा करुयात.

उद्योगाची वाढ, खर्चावर नियंत्रण, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व समाधान, तंत्रज्ञानात सुधार आणि भांडवलाचे नियोजन- या पाचही भागांतले ढोबळ टार्गेट हे पाच वर्षांसाठी ठरवायला हवेत, जे एकत्रितपणे उद्योगाचे ‘मिशन’ बनते. यातील प्रत्येक कामगिरीचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी दूरगामी स्ट्रॅटेजी लागते. या सर्व स्ट्रॅटेजीजचे एकत्रित स्वरूप म्हणजे ‘स्ट्रॅटेजिक प्लॅन'' होय.

टॅग्स :BusinessFinancesaptarang