यशासाठी शोधाव्यात नव्या वाटा

यशासाठी शोधाव्यात नव्या वाटा

बिझनेस वुमन
नव्या वाटांवर चालत यश मिळवणारे उद्योजक किंवा व्यावसायिक मोजकेच असतात. त्यात महिलांची संख्या आणखीच कमी. प्रिया फिलिप या अशाच निवडक मोजक्‍या धाडसी आणि जिगरबाज महिला उद्योजक. इंटेरिक्‍स डिझाईन्स या ब्रॅंडिंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या त्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. प्रिया यांची २५ वर्षांची यशस्वी व्यावसायिक कारकीर्द आहे. त्या मूळच्या डिझाईन आणि मॅनेजमेंट या विषयातील पदवीधर आहेत. त्यांनी १९९५मध्ये पतीसोबत इंटेरिक्‍स डिझाईन्स या ब्रॅंडिंगच्या क्षेत्रात कंपनीची स्थापना केली. मात्र, १९९८ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर कौटुंबिक आणि व्यावसायिक अडचणींसमोर त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. आव्हानांना सामोरे जात त्यांनी इंटेरिक्‍स डिझाईन्सला व्यावसायिक यशाकडे नेले. ब्रॅंडिंगच्या तुलनेने नव्या क्षेत्रात काम करण्याची अनेक गुणांची, कौशल्यांची आवश्‍यकता होती.

प्रिया यांनी धडाडीने त्यात आपली क्षमता सिद्ध केली. आज इंटेरिक्‍स डिझाईन्स ही कंपनी इंटिग्रेटेड ब्रॅंडिंग, फ्रुगल ब्रॅंडिंग आणि स्पेशल ब्रॅंडिंग या ब्रॅंडिंगमधल्याच वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत यशस्वी वाटचाल करते आहे. मॅन्युफॅक्‍चरिंग, इंजिनिअरिंग, ऑटोमेशन, मशिन टूल्स, टेक्‍स्टाईल्स, पॅकेजिंग, ऑटोमोबाईल आणि फार्मास्युटिकल्स या क्षेत्रामधील देशातील आणि परदेशातील नामवंत कंपन्यांच्या ब्रॅंडींगचे अवघड काम इंटेरिक्‍स डिझाईन्स करते आहे. नवनवीन कल्पना, अथक परिश्रम आणि गंभीरपणे आव्हानांना सामोरे जाण्याच्या वृत्तीने प्रिया फिलिप यांनी २५ वर्षांची यशस्वी कारकीर्द घडवली आहे. आपल्या कामासाठी इंटेरिक्‍सला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या क्षेत्रात फारशा महिला कार्यरत नसताना या क्षेत्रात पाय ठेवत आपला ठसा उमटवण्याची कर्तबगारी प्रिया यांनी दाखवली आहे. महिलांनाच नाही, तर किंबहुना जीवनात यशस्वी होऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठीच त्यांची कारकीर्द प्रेरणादायी आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत व्यावसायिक यश संपादन करत गगनभरारी कशी घ्यायची हे प्रिया फिलिप यांनी दाखवून दिले आहे.
(शब्दांकन - विजय तावडे)

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com