मानसिक आरोग्यासाठी "युअरदोस्त' 

richa
richa

बिझनेस वूमन 

जगभरात तसेच भारतातही मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्याकडे कलंकित दृष्टीने पाहिले जाते. रिचा सिंह ही तरुणी "युअरदोस्त' या स्टार्टअपच्या माध्यमातून हा कलंक दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

खरंतर, रिचा अपघातानाचं या क्षेत्राकडे वळली. गुवाहटीतील आयआयटीमधून डिझाइनमधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असताना प्लेसमेंटच्या तणावातून तिच्या मित्राने आत्महत्या केली. रिचासह तिच्या एकाही मित्रमैत्रिणीला तो हे टोकाचे पाऊल उचलेल, याची अजिबात कल्पना नव्हती. आपल्या मित्राची आत्महत्या टाळता आली असती, अशी खंत तिच्या मनाला लागून राहिली. आपल्या महाविद्यालयात समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ असूनही क्वचितच विद्यार्थी स्वतःहून मदत मागत असल्याचेही तिच्या लक्षात आले. या सर्व पार्श्‍वभूमीवरच रिचाने मानसिक आरोग्यासाठी युअरदोस्त या स्टार्टअपची स्थापना केली.

तणावाखाली व्यक्तींना मानसिक, भावनिक आरोग्यासाठी युअरदोस्तने ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये समुपदेशकापासून नातेसंबंध सल्लागारापर्यंतच्या एक हजारांपेक्षा अधिक तज्ज्ञांचा समावेश आहे. युअरदोस्त मोबाईल ऍपही आहे. युअरदोस्तची सेवा दिवसाचे चोवीस तास विविध पातळ्यांवर सुरू असते. त्यामध्ये तज्ज्ञांशी लाइव्ह चॅटिंग करता येते. त्याचप्रमाणे, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्ससाठीही अपॉइंटमेंट घेण्याची सोय आहे. त्याचप्रमाणे, संबंधित व्यक्तींची गोपनीयताही जपली जाते. युअरदोस्तच्या काही सेवा निःशुल्क तर उर्वरित सेवा सशुल्क आहेत.

युअरदोस्तने आतापर्यंत 12 लाखांपेक्षा अधिक जणांशी थेट ऑनलाइन संवाद साधला असून, दररोज साधारणपणे दोन हजार जणांशी प्रत्यक्ष संवाद साधला जातो. मानसिक आरोग्याशी संबंधित कुठलेही औपचारिक शिक्षण, तसेच अनुभव नसतानाही रिचाने या स्टार्टअपची स्थापना केली. त्यासाठी, मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सोशल मीडियाचाही चांगला वापर केला. युअरदोस्तने ताणतणावातून जाणाऱ्यांना समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञांच्या माध्यमातून मैत्रीचा हात पुढे केला. या अनुभवाबद्दल रिचा म्हणते, ""अनेकजण नोकरी आणि नातेसंबंधातील समस्यांमुळे तणावाखाली असल्याचे माझ्या लक्षात आले. त्याचप्रमाणे, समाजाकडून मनोरुग्ण असा शिक्का बसण्याच्या शक्‍यतेमुळे बहुतेक व्यक्ती स्वतःहून संपर्क साधत नसल्याचा अनुभव आला. माझा सुवर्णपदक विजेता सहकारी मित्र पुनीत मनुजालाही प्लेसमेंटच्या प्रचंड तणावातून जावे लागले. आम्ही एकमेकांशी चर्चा करून 2014 मध्ये युअरदोस्तची सुरवात केली.''

"तुमच्यामुळे आम्ही आत्महत्येपासून परावृत्त झालो, आमचे आयुष्य वाचले,' अशा प्रतिक्रिया हीच आपली सर्वांत मोठी कमाई असल्याचे रिचा आणि तिचे सहकारी मानतात. महिला उद्योजकांना मोठी स्वप्ने पाहण्याचा सल्लाही ती देते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com