भागवतांची भविष्यवाणी दहा-पंधरा वर्षांत ‘हिंदू अखंड भारत’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu Akhand Bharat
भागवतांची भविष्यवाणी दहा-पंधरा वर्षांत ‘हिंदू अखंड भारत’

भागवतांची भविष्यवाणी दहा-पंधरा वर्षांत ‘हिंदू अखंड भारत’

देशात सध्या सातत्यानं आणि धोकादायक पद्धतीनं धार्मिक तणाव वाढवला जात असल्याचं दिसत आहे. इतिहासात प्रथमच रामनवमीच्या आणि हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये हिंदू जमाव तलवारी, चाकू आणि बंदुका घेऊन सहभागी झाल्याचं चित्र देशात अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. या जमावानं मशिदींसमोर चिथावणीखोर घोषणा दिल्या. काही ठिकाणी तर हे लोक भगवे झेंडे घेऊन मशिदींमध्ये घुसले आणि त्यांनी मिनारांवर ते झेंडे फडकवले. गेल्या काही आठवड्यांत दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात दंगली झाल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपेतर सरकार असल्यानं इथं आतापर्यंत तरी दंगलीची झळ बसलेली नाही. जवळपास सगळीकडेच दंगल घडवून आणण्याची पद्धत एकसारखी होती - हिंदू कट्टरतावादी हे मुस्लिमांना चिथावणी देतात, त्यांच्या घरांवर आणि दुकानांवर हल्ले करतात आणि त्यांनी प्रतिकार केला की आणखी तीव्र हल्ले करतात. भाजपशासित राज्यांमध्ये (दिल्लीतील पोलिसांवर केंद्राचंच नियंत्रण आहे) पोलिस आणि स्थानिक प्रशासनानं मुस्लिमांच्या विरोधात पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनच दाखवला.

हे सगळं काही अचानक घडलेलं नाही. गेल्या काही महिन्यांपासून भगवे कपडे घातलेल्या अनेक हिंदू साधूंनी, मुस्लिमांचं हत्याकांड करण्याची चिथावणीखोर भाषणं केली. हे असे साधू म्हणजे पवित्र साधू-परंपरेवरचे काळे डागच आहेत. त्यांनी ही भाषणं ‘धर्मसंसद’ असं नाव असलेल्या कार्यक्रमात केली हे विशेष. संपूर्ण मुस्लिम समुदायाला ‘जिहादी’ असं नाव देऊन बदनाम करणारे हे बनावट साधू आणि स्वामी, हिंदूंना शस्त्र हातात घेऊन हल्ले करण्यास भडकावत होते. बजरंग दल, हिंदू युवा वाहिनी आणि हिंदुत्वाच्या विचारसरणीनं प्रेरित झालेल्या आणि, संघपरिवाराशी ज्यांचा असलेला संबंध लपलेला नाही, अशा इतर कट्टरतावादी संघटनांनी देशाच्या अनेक भागांत आपले हात-पाय पसरले आहेत. तसंच, स्वातंत्र्यानंतर प्रथमच या संघटनांमधले आग लावणारे लोक मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचं आवाहन जाहीरपणे करत आहेत आणि या इशाऱ्याची ते हिंसक पद्धतीनं अंमलबजावणीही करत आहेत. गरीब मुस्लिम हेच त्यांच्या हल्ल्यांचं प्रमुख लक्ष्य ठरत आहेत. सामाजिक सौहार्द आणि सांस्कृतिक एकतेची शतकांची परंपरा मोडून टाकत मुस्लिम विक्रेत्यांना त्यांचा माल हिंदू मंदिरांशेजारी किंवा यात्रांमध्ये विकण्यास मनाई केली जात आहे. ‘हिंदुस्तान में रहना होगा तो, जय श्रीराम कहना होगा’, ही घोषणा तर हिंदू जमावांकडून सर्रास दिली जात आहे. तसे म्हणण्यास नकार देणाऱ्या कित्येक निष्पाप मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी मारहाणही झाली आहे.

शिवाय ‘बुलडोझर’चा मुद्दा आहेच. अनेक हिंदुत्ववादी नेत्यांचा हा सध्या आवडता शब्द बनला आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यांमध्ये राज्य सरकारकडून कायदापालनाचं कारण पुढं करून मुस्लिमांची मालमत्ता जमीनदोस्त करण्यासाठी बुलडोझरचा वापर होत आहे. अतिक्रमण करणारे आणि कायदा मोडणारे यांच्याविरोधात निश्‍चितच कारवाई व्हायला हवी; पण फक्त मुस्लिमांवरच कारवाई का? आणि ती करतानाही योग्य कायदेशीर प्रक्रियाही का पाळली जात नाही?

हा सर्व प्रकार घडत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या एका भाषणात याचा अत्यंत तोंडदेखला निषेध केला; तो पण एकदाच. फेब्रुवारीमध्ये नागपूरमध्ये ‘हिंदुवाद आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर बोलताना सरसंघचालक म्हणाले होते, ‘‘धर्मसंसद ही हिंदू-विचारसरणीचं प्रतिनिधित्व करत नाही.

धर्मसंसदेमध्ये जे काही बोललं गेलं, त्याचा हिंदू-भावनेशी आणि कृतीशी काहीही संबंध नाही. संतापाच्या भरात कोणती गोष्ट बोलली गेली असेल तर ते हिंदुत्व नव्हे.’’ मग त्यांच्या मते हिंदुत्व म्हणजे काय? तर, ‘सर्वांबद्दल आपुलकीची भावना असणं हे खरं हिंदुत्व आहे.’ त्यांची ही भूमिका योग्यच आहे; पण त्यांच्या या नापसंतीची दखल कुठंही घेतली गेली नाही. हिंदू कट्टरतावादी गटांनी त्यांच्या धर्मांध कारवाया अनिर्बंधपणे सुरूच ठेवल्या. संघाला अशा विघातक घटना थांबवण्याची खरोखरच इच्छा असेल तर त्यांच्याकडे नक्कीच तशी पूर्ण क्षमता आहे; पण धार्मिक ध्रुवीकरणासाठी ते मुद्दामहून आपली ही क्षमता दाबून ठेवत आहेत. या ध्रुवीकरणामुळेच हिंदू-मतपेढी विस्तारणार असून त्याचा संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपला फायदा होणार आहे. महागाई आणि बेरोजगारी यांवर नियंत्रण ठेवण्यात मोदी सरकारला आलेल्या अपयशानं जनता नाराज असल्यानं विधानसभेच्या आगामी निवडणुका आणि २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असं ध्रुवीकरण ही एक आवश्‍यकताच बनली आहे.

यानंतर आता भागवतांनी, दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी, तर्काला फाटा देणारं विधान केलं आहे. रामनवमीच्या मिरवणुकीनंतर जातीय दंगल उफाळल्याच्या काही दिवसांतच भागवतांनी आपल्या भाषणात अत्यंत गंभीर समस्येला जन्म घालणारा मुद्दा आपल्या भाषणात उपस्थित केला. ता. १३ एप्रिलला हरिद्वार इथं संतांच्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी, ‘अखंड भारताचं (भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशाचं एकत्रीकरण) संघाचं स्वप्न येत्या १० ते १५ वर्षांत पूर्ण होईल,’ असं विधान केलं. हे स्वप्न कसं पूर्ण होणार? त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले : ‘‘सगळं काही एकाच वेळी साध्य होणार नाही. माझ्याकडं ते सामर्थ्य नाही. ते सामर्थ्य जनतेकडे आहे. जनतेकडे सर्व नियंत्रण आहे. ज्या वेळी जनता यासाठी तयार होईल, तेव्हा प्रत्येकाची वर्तणूक बदलेल. आम्ही जनतेला त्यासाठी तयार करत आहोत. आम्ही अहिंसेचीच भाषा करू; पण काठी सोबत घेऊनच चालू. ही काठी चांगलीच मजबूत असेल. आमच्या मनात दुष्टभावना नाही, कुणाशीही शत्रुत्व नाही. तरीही, जगाला केवळ सामर्थ्याचीच भाषा समजते. आपल्याकडे सामर्थ्य हवं आणि ते जगाला दिसायला हवं.’’

त्यांच्या या वाक्यांचा खरा अर्थ पाहिला तर, त्यांचा हा संदेश केवळ विरोधाभासीच नव्हे तर, अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. ते म्हणतात : ‘‘आम्ही अहिंसेचीच भाषा करू; पण काठी सोबत घेऊनच चालू. ही काठी चांगलीच मजबूत असेल.’’ यातील ‘आम्ही’ म्हणजे कोण? त्यांच्या म्हणण्यानुसार, त्याचा अर्थ ‘जनता’ असा आहे. खंत करण्याची बाब म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित असलेले लोक आज निर्भयपणे केवळ काठीच बाळगून चालत नाहीत, तर त्यांच्या हातात तलवारी, चाकू आणि बंदुकाही आहेत. या नव्या, चुकीच्या संस्कृतीचा सरसंघचालकांनी निषेध केला का? ‘आपल्याकडे सामर्थ्य हवं आणि ते जगाला दिसायला हवं,’ असं भागवतांचं म्हणणं आहे. याचंच तर नेमकं अनुकरण संघाचे समर्थक करत आहेत. ते आपल्या शस्त्रांच्या सामर्थ्याचं आणि चिथावणीखोर भाषणांचं सर्व जगाला दिसू शकणारं आणि ऐकू येणारं प्रदर्शन करत आहेत. त्यांना पोलिसांचं अथवा न्यायालयाचंही भय वाटत नाही. भागवतांच्या ‘अखंड भारता’बाबतच्या भविष्यवाणीमुळे आणखी एक समस्या निर्माण होऊ शकते. त्यांच्या या विधानावर पाकिस्तानमधील आणि बांगलादेशमधील जनतेची आणि सरकारची काय प्रतिक्रिया असेल? विशेषत: भारतीय मुस्लिमांबाबत संघपरिवाराच्या वर्तणुकीवर टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रतिक्रियेला महत्त्व असेल. तुमच्याकडे ‘मजबूत काठी’ आहे आणि तुम्हाला ‘सामर्थ्या’ची भाषा बोलता येते म्हणून पाकिस्तानी, बांगलादेशी आणि दक्षिण आशियातील इतर लोक ‘अखंड भारता’त समाविष्ट होण्यास तयार होतील असं संघाला अपेक्षित आहे का? ही अपेक्षा अर्थातच अवास्तव आहे.

‘अखंड भारता’च्या स्वरूपात नव्हे; पण एकसंध गटाच्या स्वरूपात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येणं निश्‍चितच अपेक्षित आहे. हे गरजेचं आहे आणि शक्यही आहे. फक्त ही रचना समानता, शांतता, परस्पर-आदर, परस्पर-प्रेमभाव, परस्पर-सहकार्य आणि कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांची समृद्धी या मूल्यांवर आधारित असणं अत्यावश्‍यक आहे.

मात्र, भारताचं रूपांतर ‘हिंदू-राष्ट्रा’त करण्यासाठी आपल्याच देशातील धार्मिक अल्पसंख्याकांना वाईट वागणूक देणाऱ्या; त्यांच्या न्याय, सुरक्षा आणि आत्मसन्मानाची अजिबात काळजी न करणाऱ्या; भारताची सामाजिक वीण उसवण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष-लोकशाही राज्यघटनेची मोडतोड करण्यासाठी उतावीळ झालेल्या संघटनेच्या नेतृत्वात हे स्वप्न साकार होणं शक्य नाही.

भारतातील मुस्लिम, इतर धार्मिक अल्पसंख्याक आणि बहुतांश हिंदूच ही विघटनवादी ‘हिंदू-राष्ट्रा’ची संकल्पना नाकारतील. अशा राष्ट्राच्या निर्मितीसाठी म्हणून राज्यघटनेत बदल करण्यास ते कडाडून विरोध करतील. दक्षिण आशियातील सर्व देशांचा मिळून एक मोठा ‘हिंदू अखंड भारत’ पुढील १० ते १५ वर्षांत जगाच्या नकाशावर दिसेल, यावर भागवतांचा विश्‍वास असेल तर ते आणि त्यांचे समर्थक हे स्वप्नरंजनात मग्न आहेत, हेच वास्तव आहे. मात्र, ही कविकल्पना साकार करण्याच्या संघाच्या प्रयत्नांत कट्टरतावाद, हिंसाचार आणि देदीप्यमान वारशाचा नाश यांचा वाराही भारताला लागू नये हीच अपेक्षा.

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत असून, ‘फोरम फॉर न्यू साऊथ एशिया’ या संस्थेचे संस्थापक आहेत.)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

Web Title: Sudheendra Kulkarni Writes Mohan Bhagwat Hindu Akhand Bharat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top