भूतोन्मुखी नको, भविष्यमुखी होऊ या

इंडिया गेटच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण केलं, त्या वेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.
Nehru and Modi
Nehru and ModiSakal
Summary

इंडिया गेटच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण केलं, त्या वेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.

इंडिया गेटच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण केलं, त्या वेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. ते म्हणाले, ''स्वातंत्र्यानंतर भारताच्या संस्कृतीबरोबर आणि वारशाबरोबरच अनेक महान व्यक्तींचं योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला हे दुर्दैवी आहे. स्वातंत्र्यचळवळीच्या यशासाठी लाखो लोकांनी तपस्या केली; मात्र, त्यांच्या इतिहासाला कात्री लावण्याचे प्रयत्न झाले."

मोदींचं बरोबरही आहे आणि चूकही. त्यांचं अंशत: बरोबर का आहे? कारण, केंद्रातील आणि अनेक राज्यांमधील आपल्या दीर्घ सत्ताकाळात नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तींचाच उदो उदो केल्याबद्दल आणि त्यांचाच अतिसन्मान केल्याबद्दल काँग्रेस पक्ष निश्‍चितच दोषी आहे. त्यांनी अनेक सरकारी योजना, इमारती, विद्यापीठं, स्टेडियम, विमानतळ, पूल, उद्यानं, सांस्कृतिक केंद्रं आणि पुरस्कारांना जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, संजय गांधी आणि राजीव गांधी यांचीच नाव दिली आहेत. त्या काळात काँग्रेस पक्षात लांगुलचालनाची संस्कृती इतकी फोफावली होती की, एका पक्षाध्यक्षाला ‘इंदिरा म्हणजेच इंडिया आणि इंडिया म्हणजेच इंदिरा’ अशी घोषणा करताना कोणतीही लाज वाटली नाही. त्या तुलनेत अनेक थोर देशभक्तांचं योगदान एक तर दुर्लक्षिलं गेलं किंवा त्याला फारसं महत्त्व दिलं गेलं नाही.

मात्र, मोदींचं अंशत: चुकीचंही आहे. कारण, स्वातंत्र्यानंतर भारताची संस्कृती आणि वारसा (त्यांच्या मतानुसार, हिंदू-वारसा) पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला, हा आपला दावा सिद्ध करणारा फारसा सबळ पुरावा मोदींकडे नाही. त्यांचा हा दावा म्हणजे त्यांच्या ‘नेहरू-फोबिया’चं उदाहरण आहे. यामुळेच, ''नेहरू हे हिंदूविरोधी होते,'' या मताचा मोदींचे समर्थक अथक् प्रचार करत असतात. तुम्ही नेहरूंची पुस्तकं, त्यांची भाषणं किंवा त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना लिहिलेली पत्रं वाचलीत तर समजेल की, त्यांना भारताच्या सांस्कृतिक वारशाचं सखोल ज्ञान होतं आणि त्या वारशाचा त्यांना प्रचंड अभिमानही होता. या भारतीय सांस्कृतिक वारशात हिंदू-वारशाचाही समावेश होता; पण वारशाची व्याप्ती तेवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. गंगेबद्दल आणि हिमालयाबद्दल भावनांनी ओथंबलेलं आणि आदर व्यक्त करणारं नेहरूंनी केलं तसं लिखाण इतर कोणत्याही नेत्यानं केलेलं नाही. उदाहरणच हवं असेल तर त्यांची अखेरची इच्छा आणि मृत्युपत्र वाचा.

नेहरूंच्या पंतप्रधानकाळाचा आढावा घ्या आणि त्या काळातले चित्रपट, चित्रपटगीतं, ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित होणारं भक्तिसंगीत, कादंबऱ्या, नाटकं, पद्म पुरस्कार पाहा; आपल्या देशाच्या या पहिल्या पंतप्रधानांनी हिंदूंबाबत कधीही दुजाभाव दाखवला आहे?

नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या काळात ज्यांना भारतरत्न हा सन्मान मिळाला, त्या यादीवर एक नजर टाका : सी. राजगोपालाचारी (रामायण आणि महाभारतावरच्या प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक), डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (हिंदुवादावर लिहिलेली त्यांची अनेक पुस्तकं गाजली), भगवान दास (वैदिक विचारवंत आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे सहसंस्थापक), महर्षी धोंडो केशव कर्वे (हिंदू समाजसुधारक), राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन (काँग्रेसमधील नेहरूंचे राजकीय टीकाकार) आणि महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे (धर्मशास्त्रावरील महान विचारवंत) यांना त्या काळात हा सन्मान मिळाला होता.

मोदींच्या समर्थकांनीही आपल्याच नेत्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान होण्यापूर्वी हिंदुवाद आणि हिंदू-संस्कृती धोक्यात आली होती आणि आता भाजपला सत्ता न मिळाल्यास ती पुन्हा ‘खतरे में’ पडेल, असा दावा करण्याची एक फॅशनच मोदीसमर्थकांमध्ये आली आहे. यातून एकच बोध घ्यावा : कुणीही, विशेषत: माध्यमांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी, कोणताही दावा केला तरी तो पडताळून पाहा; पण या मुद्द्यावर फार चर्चा करण्याची गरज नाही. हिंदू धर्म, संस्कृती आणि वारसा यांना आधीही आणि आताही कोणताही धोका नाही. विचार करण्यासारखा खरा मुद्दा हा आहे की, भारतीय जनतेला वारंवार भूतकाळात का ढकललं जात आहे? आपला समाज ‘भविष्यमुखी’ होण्याऐवजी अधिकाधिक ‘भूतोन्मुखी’ का होत आहे? आपल्या राष्ट्राची केवढी तरी ऊर्जा वादांवर चर्चा करण्यावर (कधी कधी वाद निर्माण करण्यावर) खर्च होते : नेहरू विरुद्ध पटेल, गांधी विरुद्ध बोस, गांधी विरुद्ध जीना, औरंगजेब, टिपू सुलतान, भीमा कोरेगाव आणि इतर अनेक उदाहरणं आहेत. कुणी कुणाचा किती उंच पुतळा उभारला, कुणी मंदिराचा जीर्णोद्धार केला अशा मुद्द्यांच्या मोजपट्टीवरच सत्ताधाऱ्यांचं कर्तृत्व मोजलं जात आहे.

आपण देश म्हणून कोण आहोत आणि मानवी वंश म्हणून कोण आहोत हे जाणून घेण्यासाठी इतिहास समजून घेणं हे खरोखरच महत्त्वाचं आहे. भारताच्या भूतकाळाचा सत्यान्वेषी पद्धतीनं शोध घ्यायला हवा, त्याचं संशोधन, अभ्यास होऊन त्यावर चर्चाही व्हायला हवी. प्रत्येक देशाचा इतिहास - याला कुणीही अपवाद नाही - म्हणजे संघर्ष आणि विरोधाभास, मतभेद आणि फूट यांचीच कहाणी आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, विभिन्न समाजांमधली एकता आणि एकात्मतेचं दर्शन, आदर्श आणि समान ध्येयासाठी त्यांचं एकत्र येणं, अतुलनीय धाडस दाखवत मिळवलेले विजय आणि सर्वांनी साजऱ्या कराव्यात अशा प्रेरणादायी यशाच्या कथाही हा इतिहास आपल्यासमोर उलगडून सांगतो. त्यामुळे, अंतर्गत शत्रूंचा शोध घेऊन जुनं वैमनस्य उकरून काढणं हा इतिहासाचा धांडोळा घेण्याचा खरा उद्देश नाही. घडून गेलेल्या घटनांची चुकीची माहिती पसरवणं आणि धोका असल्याची अनाठायी भीती पसरवणं हाही उद्देश निश्‍चितच नाही. उलट, गतकाळातील चुकांपासून शिकणं, त्या दुरुस्त करणं, अन्याय दूर करणं, अधिक सौहार्दपूर्ण समाजाची निर्मिती करणं आणि सर्वांसाठीच चांगलं भविष्य घडवणं हा खरा इतिहासाच्या अभ्यासामागील उद्देश आहे.

नेहरूंच्या काही चुका झाल्या असतील; पण ते ज्या वेळी धरणं, विद्यापीठं आणि आयआयटीसारख्या संस्थांचा उल्लेख ''आधुनिक भारतातील मंदिरं'' असा करतात त्या वेळी ते देशातल्या नागरिकांना महत्त्वाचं आवाहन करत असतात...ते असं : ''भारताच्या प्राचीन आणि अमूल्य सांस्कृतिक वारशाचा आपल्याला अभिमान असला तरी, आपण आता आधुनिक युगात प्रवेश करण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी, उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, लोकशाही-स्वशासन आणि गरिबीनिर्मूलन यांसारख्या राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रांमध्ये स्वतःला स्वावलंबी करणारे सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागणार आहेत....''

हे आवाहन आता कालबाह्य ठरलं आहे का? अजिबात नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करत असताना अजूनही अपूर्णच असलेल्या उद्दिष्टांची संख्या मोठी आहे. भारताच्या लोकशाहीत अद्यापही अनेक त्रुटी आहेत. आपल्याकडचे राजकीय नेते जनतेचे सेवक म्हणून वावरण्यापेक्षा त्यांचे मालक असल्यासारखे वागतात. आपली नोकरशाही बहुतांश असंवेदनशील आणि जबाबदारी न उचलणारी आहे. न्यायपालिकांद्वारे सर्वसामान्य जनतेला लवकर आणि विश्वासार्ह न्याय मिळेलच असं नाही. आपली शिक्षणयंत्रणा आणि आरोग्ययंत्रणा गरिबांपेक्षा श्रीमंतांनाच अधिक उपलब्ध आहे. ''आपली प्रसारमाध्यमं निर्भय आणि स्वतंत्र असून कोणतीही धनशक्ती किंवा राजकीय शक्ती त्यांना वाकवू शकत नाही,'' असं म्हणणं धाडसाचं ठरेल. भारतात जगातील सर्वांत मोठी युवाशक्ती आहे; पण तिला रोजगाराची पुरेशी संधी नाही आणि त्यामुळे उज्ज्वल भविष्यही नाही. आपल्या नद्या, जंगलं, सागरकिनारे या पर्यावरणाच्या चेहऱ्यांवर ओरखडे दिसतात. आपली शहरं सध्याच्याच पिढीला राहण्याच्या लायकीची राहिलेली नाहीत, पुढच्या पिढीपर्यंत त्यांची अवस्था आणखी बिकट होईल.

भूतकाळातल्या घटनांच्या स्मरणरंजनात रममाण होऊन आणि भविष्याकडे दुर्लक्ष करून ही आव्हानं पार करता येतील का? लोकांचं ऐक्य, देशाची एकात्मता या बाबी विसरून आणि बहुसंख्याकांना चुचकारून, अल्पसंख्याकांना दुर्लक्षून उद्दिष्ट साध्य करता येईल? राजकीय विरोधकांवर वारंवार टीकास्त्र सोडणं, एकमत आणि सहकार्य टाळून कायम राजकीय डावपेच आखून लाभ मिळवण्याचा प्रयत्न करणं यामुळे काही फायदा होणार आहे का? इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा उभारलेला पाहण्यापेक्षा आपण आपला मार्ग सुधारला तर नेताजींच्या आत्म्याला खरं समाधान लाभेल.

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत असून, ‘फोरम फॉर न्यू साऊथ एशिया’ या संस्थेचे संस्थापक आहेत.)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com