राहुल गांधींचं चुकतं कुठं?

काँग्रेस आज ज्या संकटग्रस्त स्थितीत आहे ते बघून त्या पक्षाला चिंतन आणि आत्मचिंतन अशी दोहोंची गरज आहे, हे सर्वांना माहीत आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Summary

काँग्रेस आज ज्या संकटग्रस्त स्थितीत आहे ते बघून त्या पक्षाला चिंतन आणि आत्मचिंतन अशी दोहोंची गरज आहे, हे सर्वांना माहीत आहे.

काँग्रेस आज ज्या संकटग्रस्त स्थितीत आहे ते बघून त्या पक्षाला चिंतन आणि आत्मचिंतन अशी दोहोंची गरज आहे, हे सर्वांना माहीत आहे. काँग्रेसचा प्रत्येक सच्चा कार्यकर्ताही हे कबूल करेल. गेल्या आठवड्यात उदयपूरमध्ये पार पडलेल्या पक्षाच्या ‘नवसंकल्प चिंतनशिबिरा’त चिंतन किती झालं आणि आत्मचिंतन किती, हे त्यात सहभागी झालेल्यांनाच ठाऊक. मात्र, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार आणि काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांची भाषणं ऐकल्यावर, या शिबिरातून काही तरी सकारात्मक समोर आल्याचं आणि काही महत्त्वाच्या मापदंडांवर मात्र पक्ष अपयशी ठरल्याचं दिसून आलं आहे.

लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये आणि काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकींसह आधीच्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर, तीन दिवसांच्या शिबिरानंतर पक्षात फार नाही; पण थोडी तरी ऊर्जा निर्माण झाली आहे ही सकारात्मक बाजू म्हणायला हवी. उदयपूरच्या शिबिरानंतर काँग्रेस पक्ष हा २०२४ च्या निवडणुकीतील संभाव्य विजेता म्हणून बाहेर पडला असेल, यावर कुणाचाच विश्‍वास नाही; पण तरीही, गेल्या आठ वर्षांत प्रथमच पक्षासमोरील आणि देशासमोरील मोठ्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी या पक्षाचे ४०० वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी एकत्र आल्यानं, हा पक्ष एकसमान धोरणानं वाटचाल करण्यासाठी अखेर सज्ज झाला असल्याचा चांगला संदेश सर्वत्र गेला आहे.

या शिबिराचा दुसरा फायदा म्हणजे, गांधीजयंतीपासून, म्हणजे येत्या दोन ऑक्टोबरपासून, जनतेशी संपर्क साधण्याच्या ‘भारत जोडो’ या राष्ट्रीय मोहिमेची घोषणा या वेळी करण्यात आली. बऱ्याच काळापासून पक्षाला या मोहिमेची आवश्‍यकता होती. पक्षाचं पुनरुज्जीवन करायचं असेल तर कोणताही ‘शॉर्ट कट’ उपयोगाचा नाही आणि ‘जनतेशी तुटलेला संपर्क’ पुन्हा एकदा प्रस्थापित करावा लागेल, असा इशारा राहुल यांनी नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला, हे बरंच झालं. ते स्वत: कन्याकुमारी ते काश्‍मीरदौऱ्याचे नियोजन करत असल्याचं समजतं आहे. बहुधा ही पदयात्राच असेल. भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या बाजूनं असणाऱ्या संघटना हिंदू-मुस्लिम वादाच्या आधारावर भारतीय समाजात ध्रुवीकरण करण्याची मोहीम तीव्र करत असताना, काँग्रेसनं घेतलेल्या या पुढाकाराचं शांतता, सौहार्द आणि राष्ट्रीय ऐक्याच्या बाजूनं असणाऱ्यांनी स्वागतच करायला हवं.

भारतातील बहुसंख्य जनता ही काँग्रेस पक्ष पुन्हा बळकट झालेला पाहण्यासाठी उत्सुक आहे. राष्ट्रीय पातळीवर पर्याय ठरण्याची या पक्षाची पूर्ण क्षमता आहे. अर्थात्, सध्या ही केवळ आशा आहे, त्याची खात्री नाही.

मला वाटणाऱ्या या संशयाचं मूळ नवीन नेतृत्व देण्यात काँग्रेसला, खरं तर राहुल गांधी यांना, आलेल्या अपयशातच आहे. मोदी सरकारच्या कामगिरीबाबत भ्रमनिरास झालेल्या सर्व भारतीयांना आकर्षून घेईल, अशा नेतृत्वाची काँग्रेसकडून अपेक्षा आहे. राहुल हे खरोखरच प्रामाणिक राजकीय नेते आहेत; पण इतरांशी संवाद साधण्यात ते अगदीच कच्चे आहेत. शिबिराच्या समारोपाच्या सत्रात त्यांनी केलेलं भाषण हा त्याचाच एक पुरावा आहे. हे शिबीर म्हणजे काँग्रेसच्या या माजी (बहुधा, भावीदेखील) अध्यक्षांना आपल्या पक्षाच्या आणि स्वत:च्याही आतापर्यंत झालेल्या चुकांची दखल घेऊन त्या दुरुस्त करण्याचा एक विश्‍वासार्ह आराखडा मांडण्याची आदर्श संधी होती. मोदी सरकारच्या बहुचर्चित अपयशांवर पुनःपुन्हा वार करण्याऐवजी, आर्थिक, राजकीय आणि विकासाच्या आणि सुशासनाच्या मुद्द्यांवर काँग्रेसतर्फे काय उपाययोजना करता येतील हे देशातील जनतेला त्यांनी सांगणं अपेक्षित होतं. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर शाब्दिक हल्ले करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस पक्षाची विचारसरणी ठामपणे आणि आर्जवीपणे मांडायला हवी होती. उदाहरणार्थ, काही महिन्यांपूर्वी जयपूरला केलेल्या एका भाषणात, त्यांनी (माझ्या मते, योग्य) सांगितलं होतं की, हिंदू धर्म आणि हिंदुत्व यात फरक आहे. त्यांच्या या विधानावर अनेक धर्मनिरपेक्ष मंडळींनी टीकेची झोड उठवली होती. राहुल हे ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चा प्रचार करत असल्याचं टीकाकारांचं म्हणणं होतं. राहुल यांनी चिंतनशिबिराचा उपयोग या महत्त्वाच्या मुद्द्यावर - ज्याबाबत काँग्रेस पक्षातच संभ्रमाचं वातावरण आहे - चिंतन करण्यासाठी करायला हवा होता.

कारण, मुस्लिम मतं आपल्याकडे कायम कशी ठेवायची यापेक्षा हिंदूंचा पाठिंबा पुन्हा कसा मिळवायचा, हा काँग्रेससमोरील प्रश्‍न आहे. काँग्रेसनेतृत्वाकडून ही वैचारिक समस्या जोपर्यंत स्पष्ट आणि तत्त्वाच्या आधारावर सोडवली जात नाही, तोपर्यंत बहुतांश हिंदू पुन्हा काँग्रेसला नाकारून भाजपला साथ देतील.

राहुल यांनी प्रादेशिक पक्षांवर अकारण नकारात्मक टिपण्णी करत घोडचूक केली. त्यासंदर्भात राहुल यांची काही विधानं अशी -

‘ही वैचारिक लढाई प्रादेशिक पक्ष लढू शकत नाहीत. कारण, ही दोन विचारसरणींमधली लढाई आहे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी विरुद्ध काँग्रेसची विचारसरणी.’

‘भाजप कधीही प्रादेशिक पक्षांबद्दल बोलत नाही, ते फक्त काँग्रेसवर टीका करतात. कारण, प्रादेशिक पक्षांकडे विचारसरणी नसल्यानं हे पक्ष आपल्याला पराभूत करू शकत नाहीत, हे भाजपला माहीत आहे.’

‘प्रादेशिक पक्ष हे बहुतांश एखाद्या जातीचं प्रतिनिधित्व करतात. ते समग्र जनतेचं नेतृत्व करत नाहीत.’

राहुल यांच्या या विधानांनंतर अनेक प्रादेशिक पक्षांनी - उदाहरणार्थ, झारखंड मुक्ती मोर्चानं - ज्यांच्यासह काँग्रेस झारखंडमध्ये सत्तेवर आहे - आणि राष्ट्रीय जनता दलानं - ज्यांच्याबरोबर काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत आघाडी केली होती - यावर टीका केली. ग्राम्य भाषेत या प्रकाराला ‘आ बैल मुझे मार,’ असं म्हणतात.

राहुल यांच्या आतापर्यंतच्या अनेक अपयशांपैकी एक म्हणजे प्रादेशिक पक्षांबरोबर मजबूत आघाडी निर्माण करण्याची त्यांच्यात क्षमताही नाही आणि तेवढा उत्साहही नाही. हे राजकीय तर्कांच्या अगदी विरोधात आहे. कारण, ज्या वेगानं काँग्रेस कमकुवत होत गेली, त्याच वेगानं भारतीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचं बळ वाढत गेलं आहे.

प्रादेशिक पक्षांबरोबर सध्या असलेली आघाडी टिकवून वाढवण्याबाबत राहुल यांना असलेल्या औदासीन्याचं एक धडधडीत उदाहरण सांगतो. महाराष्ट्रात नोव्हेंबर २०१९ पासून महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसही या आघाडीचा घटकपक्ष आहे; पण तरीही, राहुल हे गेल्या अडीच वर्षांत एकदाही मुंबईत आले नाहीत आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची किंवा या आघाडीचे खरे निर्माते असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली नाही. या अशा पद्धतीनं वागूनही आपण दीर्घकालीन आणि उपयुक्त राजकीय संबंध निर्माण करू शकू, असं काँग्रेसला वाटतं का?

उदयपूरमध्ये राहुल यांनी पुन्हा एकदा, आणि हेदेखील अकारण, चुकीची आणि विचित्र वैचारिक मांडणी केली. त्यावर भाजपनं अर्थातच जोरदार टीका केली. राहुल म्हणाले की, ‘भारत हे एक राष्ट्र नसून, राज्यघटनेत उल्लेख असल्याप्रमाणे ‘संघराज्य’ आहे.’ त्यांनी आधीही संसदेत भाषण करताना हेच विधान केलं होतं. भारत हे एक राष्ट्र नाही, या त्यांच्या दाव्याशी बहुसंख्य काँग्रेसजनही सहमत नाहीत. अखेरीस, आपल्या वैयक्तिक निष्ठेबाबत बोलताना ते म्हणाले,‘‘मला या सरकारचं अजिबात भय वाटत नाही. कारण, मी भ्रष्टाचार करून एकही रुपया मिळवलेला नाही. मी भारतमातेकडून एकही रुपया घेतलेला नाही.’’

राहुल हे भ्रष्टाचारी नाहीत, हे खरंच आहे; पण ‘मी भारतमातेकडून एकही रुपया घेतलेला नाही,’ हे म्हणायची काय गरज होती? आपल्या सर्वांकडे जे काही आहे, ते सर्व भारतमातेनंच दिलेलं आहे.

काँग्रेसनं चिंतनशिबिरात घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे, संपर्कधोरणात सुधारणा करणं. खरं तर, इतरांशी चांगला संपर्क कसा साधायचा हे शिकून घेत राहुल यांनीच याची सुरुवात करायला हवी. भारतीय जनतेला अजूनही त्यांच्याकडून आणि काँग्रेसकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत असून, ‘फोरम फॉर न्यू साऊथ एशिया’ या संस्थेचे संस्थापक आहेत.)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com