भारतीय विषुववृत्तीय हवामान संस्था (सुधीर फाकटकर)

भारतीय विषुववृत्तीय हवामान संस्था (सुधीर फाकटकर)

भारताच्या आर्थिक विकासाच्या अनेक योजना १९५०च्या दरम्यान कार्यान्वित झाल्या. या दरम्यानच जागतिक हवामान परिषदेनं भरवलेल्या तिसऱ्या परिषदेत विषुवृत्तीय क्षेत्रातल्या देशांनी हवामानविषयक अभ्यास-संशोधनाची निकड स्पष्ट केली. यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत एका प्रस्तावाद्वारे भारतीय विषुववृत्तीय हवामान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी-आयआयटीएम) स्थापन करण्यात आली. सुरवातीला या संस्थेचा कार्यभार केंद्रीय पर्यटन आणि नागरी विमानवाहतूक मंत्रालयामार्फत चालला. १९८५मध्ये ही संस्था विज्ञान-तंत्रज्ञान विभागाकडं वर्ग झाली. २००६पासून ती पृथ्वीविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत आली आहे.
हवामान आणि हवामान अंदाज या क्षेत्रांत अद्ययावत होण्यासाठी पायाभूत संशोधन करून जागतिक दर्जा प्राप्त करणं हा संस्थेचा मूलभूत उद्देश. त्या अनुषंगानं वातावरणीय विज्ञानाचा मागोवा घेण्यासाठी मूलभूत पातळीवर संशोधन करणं, या संशोधनासाठी आवश्‍यक वैज्ञानिक उपक्रम राबवणं, या क्षेत्रात विकास साध्य करण्यासाठी संबंधित संस्थांशी सहकार्य प्रस्थापित करणं अशा या ध्येयांना संस्थेनं समोर ठेवत वाटचाल सुरू ठेवली आहे.

दृष्टिकोन आणि ध्येय साध्य करण्यासाठी संस्थेत वातावरणीय विज्ञान, सागरी विज्ञान, हवामानविषयक आंतरक्रिया, हवामानबदल आणि प्रदूषण या विषयांच्या मूलभूत संशोधन सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. याशिवाय, अवकाशभौतिकी, वातावरणीय रसायनशास्त्र, जलहवामानशास्त्र, सागरी भौतिकी; तसंच भौतिकी या आंतरविज्ञान शाखांचाही संशोधनांसाठी समावेश आहे. आयआयटीएमच्या अंतर्गत ऋतूंशी संबंधित आणि विस्तारित हवामान अंदाज, वातावरणतले बदल आणि परिवर्तन, विषुववृत्तीय ढगांचं भौतिकज्ञान आणि चलनशास्त्र, पर्जन्य, वैश्‍विक बदल, उपग्रहीय वेधशाळा, वर्णपट विश्‍लेषण, हवा-वातावरण असे अनेक अभ्यास प्रकल्प राबवले जातात. आयआयटीएममध्ये संबंधित विज्ञान शाखा आणि प्रकल्पांसाठी सुसज्ज आणि अद्ययावत प्रयोगशाळांची सुविधा आहे. तसंच संस्थेशी संबंधित सर्व विषयांमधली आधुनिक स्वरूपातली जगभरातली पुस्तकं, नियतकालिकं, अहवाल इत्यादींनी समृद्ध अशी ग्रंथालय सुविधा हे इथलं वैशिष्ट्य आहे.

या संस्थेत भौतिक, रसायन, गणित, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि पृथ्वीविज्ञान या शास्त्र शाखा तसेच यांत्रिकी, बांधकाम, उपकरण, रसायन या अभियांत्रिकीच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी संशोधन आणि प्रकल्प विषयांमध्ये सहायक ते वैज्ञानिक अधिकारी असं मोठं कार्यक्षेत्र उपलब्ध असतं. या संदर्भात प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारं एक खास पत्रक संस्थेच्या संकेतस्थळावर आहे.

भारतासारख्या वैविध्यपूर्ण भूगोल असलेल्या देशात हवामान अंदाज हे क्षेत्र अत्यंत आव्हानात्मक असून, यासाठी भारतीय विषुववृत्तीय हवामान संस्थेचं कार्य महत्त्वाचं आहे.
भारतीय विषुववृत्तीय हवामान संस्थेचा पत्ता
डॉ. होमी भाभा मार्ग,पाषाण, पुणे- ४११००८.
दूरध्वनी - (०२०) २५९०४२००
संकेतस्थळ - www.tropmet.res.in.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com