नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्रालय (सुधीर फाकटकर)

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com
रविवार, 29 जानेवारी 2017

सन १९७० च्या दशकात निर्माण झालेल्या ऊर्जेच्या संकटाची झळ प्रामुख्यानं प्रगत देशांना बसली होती. त्यादरम्यानच्या पार्श्‍वभूमीवर भारतानंही ऊर्जेच्या भविष्यकालीन तरतुदीच्या दृष्टिकोनातून विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत अतिरिक्त ऊर्जास्रोत आयोगाची स्थापना केली. या आयोगाकडं नवीन आणि नवकरणीय (अक्षय) ऊर्जेसंदर्भात ध्येय-धोरणं ठरवण्यापासून संशोधन-विकास करण्याची, तसंच उपक्रम आखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढं १९८२ ला प्रथम नवकरणीय ऊर्जा विभाग निर्माण झाला, तर १९९२ मध्ये स्वतंत्ररीत्या नवकरणीय ऊर्जा मंत्रालय स्थापन करण्यात आलं.

सन १९७० च्या दशकात निर्माण झालेल्या ऊर्जेच्या संकटाची झळ प्रामुख्यानं प्रगत देशांना बसली होती. त्यादरम्यानच्या पार्श्‍वभूमीवर भारतानंही ऊर्जेच्या भविष्यकालीन तरतुदीच्या दृष्टिकोनातून विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत अतिरिक्त ऊर्जास्रोत आयोगाची स्थापना केली. या आयोगाकडं नवीन आणि नवकरणीय (अक्षय) ऊर्जेसंदर्भात ध्येय-धोरणं ठरवण्यापासून संशोधन-विकास करण्याची, तसंच उपक्रम आखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढं १९८२ ला प्रथम नवकरणीय ऊर्जा विभाग निर्माण झाला, तर १९९२ मध्ये स्वतंत्ररीत्या नवकरणीय ऊर्जा मंत्रालय स्थापन करण्यात आलं. २००६ मध्ये पुनर्रचना होऊन नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्रालय आकाराला आलं.

राष्ट्रासाठी ऊर्जाक्षेत्रात स्वावलंबी होऊन ऊर्जासुरक्षा आणणं हे मुख्य ध्येय मंत्रालयानं समोर ठेवलं आहे. याबरोबरच प्रदूषण निर्माण न करणाऱ्या (स्वच्छ) ऊर्जेचा विकास करणं व वापर वाढवणं, किफायतशीर आणि देशभरात सर्वदूर ऊर्जेचा पुरवठा करणं, असेही उद्देश आहेत. या ध्येय-उद्देशांच्या पूर्ततेसाठी सौर, जल, पवन, तसंच कचरा आदी स्रोतांच्या माध्यमांतून अक्षय स्वरूपाच्या ऊर्जानिर्मितीचं लक्ष्य साध्य करण्यासाठी स्वतंत्र संशोधन संस्था स्थापन करत देशातल्या अन्य संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळा, उद्योग आणि विद्यापीठांच्या सहकार्यानं अद्ययावत विज्ञान-तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी हे मंत्रालय प्रयत्नशील आहे. मंत्रालयाची ईशान्य भारतात दोन प्रादेशिक कार्यालयं असून, प्रत्येक राज्यात नवकरणीय ऊर्जेबाबत कार्य करणारी विस्तारित केंद्रं आहेत.
संशोधनासंदर्भात साधनं-उपकरणांपासून वितरण व्यवस्थेतल्या यंत्रणाप्रणालींचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड एनर्जी, सरदार स्वर्णसिंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोएनर्जी, तसंच द इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आणि सोलर एनर्जी कार्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थांची स्थापना केली आहे. याचबरोबर मंत्रालयानं जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर उपक्रम, राष्ट्रीय जैविक पदार्थ व्यवस्थापन कार्यक्रम, सौर कंदील, सौर औष्णिक, दूरस्थ ग्राम प्रकाशयोजना आणि लघू स्वरूपातले जलऊर्जा प्रकल्प इत्यादी उपक्रम आखलेले आहेत.

सन २०२२ पर्यंत देशभर सौरऊर्जेची व्याप्ती वाढवत २०५० पर्यंत जागतिक पातळीवर प्रगत देशांच्या बरोबरीनं ऊर्जासामर्थ्य मिळवण्याचे प्रयत्न नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्रालय करत आहे. आगामी कालखंडातल्या ऊर्जेचं महत्त्व लक्षात घेता अक्षय ऊर्जेच्या संशोधन-विकासाला पर्याय नाही, हे आता कळून चुकलं आहे. यामुळं या विषयक्षेत्रातल्या मनुष्यबळालाही तेवढंच महत्त्व प्राप्त झालं आहे म्हणूनच या संस्थांविषयी जाणून घेणं आवश्‍यक ठरावं.

नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्रालय,
सीजीओ कॉम्प्लेक्‍स, ब्लॉक क्रमांक १४,
लोधी मार्ग, नवी दिल्ली - ११०००३
दूरध्वनी - (०११) २४३६०४०४
संकेतस्थळ - www.mnre.gov.in

Web Title: sudhir phakatkar's article in saptarang